अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक आता अगदी रंगात आलेली आहे. येत्या ८ तारखेला तिथे मतदान व्हायचे असून, अखेरच्या क्षणी मतदारांना आपल्याकडे ओढण्याची शर्यत दोन्ही उमेदवारात लागली आहे. त्यासाठी आपापले बालेकिल्ले सोडून हे दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार मुलूखगिरीवर फ़िरत आहेत. अमेरिकन मतदानात प्रत्यक्ष अध्यक्षाला निवडणार्या मतदारसंघाची निवड होत असते. म्हणजे असे, की प्रत्येक राज्यातली मते मोजून झाल्यावर तिथे ज्याला सर्वाधिक म्हणजे पन्नास टक्क्याहून अधिक मते मिळतील, त्याने ते राज्य जिंकले असे मानले जाते. सहाजिकच त्या राज्याला जितकी मते अध्यक्षीय मतदारसंघात असतील, ती त्या विजयी उमेदवाराला मिळून जातात. अशा प्रतिनिधींची संख्या ५३८ आहे. त्यापैकी २७० प्रतिनिधी जिंकेल, तोच राष्ट्राध्यक्ष होऊ शकत असतो. त्यात अनेक राज्ये रिपब्लिकन व डेमॉक्रॅट अशी निष्ठावान आहेत. तिथे हमखास अमूकच पक्षाला कौल मिळतो असेही मानले जाते. कारण तशी दिर्घकालीन विभागणी आहे. सहाजिकच ज्या राज्यात पक्षनिष्ठेने मतदान होत नाही, त्या राज्यांना महत्व असते. तिथे तुम्ही बदल घडवून आणला, तर तुम्हाला बाजी मारता येत असते. त्यामुळे अनेकदा सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार पराभूत होतो आणि सर्वाधिक प्रतिनिधी मिळवणारा विजयी होतो. जॉर्ज बुश असेच जिंकले होते आणि अधिक मते असूनही अल गोअर पराभूत झाले होते. आताही हक्काची राज्ये सोडून हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप अशा अनिश्चीत राज्यांमध्ये धावपळ करीत आहेत. कारण तिथचे खरा कौल मिळवायचा असतो. अशा हिशोबामुळेच हिलरीचा विजय नक्की मानला जात होता. पण अखेरच्या क्षणी एफ़बीआय या तपाससंस्थेने एक जुने प्रकरण उकरून काढले आणि सगळे समोकरणच उलथेपालथे होऊन गेले आहे. हिलरीचे धाबे दणाणले आहे, तर ट्रंप सुखावले आहेत.
गेले दहा महिने पुसून टाकलेले इमेल हे प्रकरण हिलरींना सतावते आहे. ओबामा यांच्या पहिल्या कारकिर्दीत हिलरी परराष्ट्रमंत्री होत्या आणि त्यांच्याच निष्काळजी वागण्याने लिबियातील अमेरिकन राजदुताची व मुत्सद्यांची सामुहिक हत्या झाली; असा एक आक्षेप होता. त्याखेरीजही अनेक बाबतीत त्यांनी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली वा बेफ़िकीरी दाखवली, असा मूळ आक्षेप आहे. त्याबद्दल गाजावाजा झाला. पण एफ़बीआयने त्यांना क्लिन चिट दिली आणि त्यावर पडदा पडला होता. त्यावर तपास झाला नाही आणि पुरावाच नसल्याचे मानले गेले होते. पण संशय कायम राहिला. आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असताना, अकस्मात एका खाजगी सर्व्हरचा शोध लागला आहे. तिथे हिलरीच्या अनेक इमेल सापडू शकतात, असे उघडकीस आले. तेव्हा त्याचा तपास करण्याची घोषणा एफ़बीआयच्या संचालकांनी केली. मजेची गोष्ट अशी, की हे संचालक मुळचे रिपब्लिकन हितचिंतक आहेत. तरीही त्यांची या महत्वपुर्ण पदावर ओबामांनीच नेमणूक केली होती. तत्पुर्वी त्यांनी रिपब्लिकन पक्ष सोडला होता. त्यामुळेच आता त्यांच्या नव्या घोषणेकडे राजकीय हेतूने बघितले जात आहे. पण सत्ता डेमॉक्रॅट ओबामांकडे असताना पक्षपाताचा आरोप हिलरीही करू शकत नाहीत. सहाजिकच अंतिम टप्प्यात निवडणूक आली असताना हिलरीच्या गोटात तारांबळ उडालेली आहे. त्याचे कारणही आहे. तमाम माध्यमांनी आणि अभिजन वर्गाने ट्रंप यांना शिकार बनवले होते. कुठल्याही मार्गाने ट्रंपची टिंगल करणे, किंवा जुन्यापान्या गोष्टी उकरून या उमेदवाराचे चारित्र्यहनन करण्याला माध्यमातही मोठे प्राधान्य मिळाले होते. परिणामी हिलरी ही माध्यमांची उमेदवार झाली होती. सहाजिकच आता तिचा पराभव म्हणजे माध्यमांसाठी प्रतिष्ठेचा विषय होऊन बसला आहे. पण तशी शक्यता दिसू लागली आहे.
आपल्याकडे जसे उमेदवार होण्याआधीपासून नरेंद्र मोदींना बदनाम करण्याच्या मोहिमा झाल्या आणि मैदानात मोदी आल्यावर त्यांना आरोपांनीच संपवण्याचे डावपेच खेळले गेले; तसाच काहीसा प्रकार ट्रंप यांच्याही बाबतीत झाला आहे. कुठल्याही समाजात वा देशात अभिजन नावाचा एक वर्ग असतो. समाजाचे किंवा देशाचे नैतिक नेतृत्व आपल्यापाशी असल्याच्या थाटात वावरणारा हा वर्ग; नेहमी उर्वरीत समाजघटकांवर आपली मते लादत असतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय जगाचे पान हलत नाही; अशी काहीशी समजूत करून घेतलेल्या या वर्गाचा रोष ओढवून घ्यायला अनेक दांडगे लोकही घाबरतात. लेखक, विचारवंत, कलाकार, न्यायाधीश, शास्रज्ञ, राजकारणी वा उद्योगपती, व्यापारी, कंपन्याही त्यांना वचकून असतात. त्यांना झुगारून देणार्यांना विविध मार्गाने व साधनांनी खतम करण्याचा सोपा मार्ग म्हणजे, अशा स्वयंभू व्यक्तीला देशद्रोही, समाजद्रोही, धर्मद्रोही, विघातक वा अपायकारक ठरवण्याची स्पर्धाच अशा अभिजन वर्गाकडून चालू असते. बाळासाहेब ठाकरे वा नरेंद्र मोदी यांना तशी वागणूक आपल्याकडे मिळालेली दिसेल. कारण त्यांनी अशा अभिजनांच्या वर्चस्वाला कधी जुमानले नाही. अशी स्वयंभू व्यक्ती त्या अभिजन वर्तुळाच्या परिघात बसणारी नसते आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रंप तशीच व्यक्ती आहे. अगदी थोडक्यास सांगायचे तर नरेंद्र मोदी जसे राजधानी दिल्लीच्या आतल्या गोटातले नव्हते, तसेच डोनाल्ड ट्रंपही अमेरिकन राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या वर्तुळातले नाहीत. कारण त्यांनी तिथे वसलेल्या स्वयंघोषित अभिजन मठाधीशांना कधी किंमत दिली नाही, की दाद दिली नाही. असा माणूस त्या वर्गाने कसा सहन करावा? त्यामुळेच पहिल्या दिवसापासून हिलरी या अभिजन वर्गाच्या गळ्यातला ताईत होती, तर ट्रंप उपरा म्हणून नकोसा होता. सहाजिकच मतदानापुर्वीच त्याचा पराभव या वर्गाने जाहिर करून टाकला होता. मात्र अखेरच्या टप्प्यात चित्र पालटून गेले आहे.
हिलरी यांच्याविषयी कुठलीही विपरीत बातमी असेल, तर ती मुख्यप्रवाहातील माध्यमांनी व विश्लेषकांनी दडपून टाकली. उलट याच माध्यमांनी ट्रंप यांच्या तीसचाळीस वर्षे जुन्या विधाने व चित्रणांचा शोध लावून, त्यांना संपवण्याचा चंग बांधला होता. महिला, मुस्लिम, कृष्णवर्णिय वा आशियाई अशा प्रत्येक समाजघटकाचा ट्रंप शत्रूच असल्याचे भडक चित्र रंगवण्यात आले. उलट त्याच काळात हिलरी यांच्याविषयी कुठलीही आक्षेपार्ह माहिती समोर आली वा आणली गेली; तरी माध्यमांनी तिकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम असा झाला, की सामान्य लोकांना अशी माहिती सोशल माध्यमात वा इंटरनेटवर शोधावी लागली. दुसरीकडे ट्रंप बेधडक सामान्य माणसाच्या मनात असेल ते बोलून दाखवत होते. त्यांना खोटे पाडण्याची कसरत अभिजनवर्ग व माध्यमे करीत होती. यातला पक्षपात नजरेत भरणारा होता आणि त्यातूनच आता विचित्र स्थिती आली आहे. हिलरी बाजूला पडल्या आहेत आणि माध्यमे व अभिजनवर्ग विरुद्ध ट्रंप, अशी लढत होऊन बसली आहे. अशावेळी अंतिम क्षणी हिलरी यांच्या इमेलचे नवे प्रकरण उघडकीस आल्याने खोट्या प्रचाराचे भांडे उघडे पडले आहे. अर्थात ट्रंप यांनी आधीपासूनच माध्यमांवर पक्षपाताचा आणि खोटारडेपणाचाही आरोप केला होता. तोच खरा ठरू लागला आहे. कारण मतदानाचा दिवस जवळ येत चालला आहे, तसतसे मतचाचणीचे आकडे फ़िरू लागले आहेत. सहज ट्रंपना पराभूत करणार्या हिलरीची लढत अवघड झाल्याच्या बातम्या त्याच माध्यमांना देण्याची अगतिकता आली आहे. हळुहळू ट्रंपचे पारडे जड झाल्याचेही मान्य करावे लागत आहे. थोडक्यात ९-१० तारखेला या निवडणूकीचा निकाल स्प्ष्ट होईल तेव्हा ट्रंप जिंकणार असतील, तर हिलरी पराभूत होणार नसून, अभिजन वर्ग आणि अमेरिकेतील मुख्यप्रवाहातील माध्यमांना हरवून ट्रंप जिंकले; असेच म्हणायची पाळी येणार आहे.
छानच भाऊ सुंदर
ReplyDeleteTrump wins !!
ReplyDeleteyour statement again proved...
Chhan
ReplyDeleteतुमचे आधीचे भाकीत व नंतर घडलेली निवडणूक निष्पत्ती यात थोडाही फरक नाही... जबरदस्त....
ReplyDelete