अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांची निवड झाली असून येत्या जानेवारी महिन्यात त्यांच्या हाती देशाची सुत्रे सोपवली जातील. या निवडणूकीने दहा वर्षे सत्तेत असलेल्या डेमॉक्रेट पक्षाला मोठाच दणका बसला आहे. कारण त्यांच्या लोकप्रिय उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा दारूण पराभव झाला आहेच. पण त्यांना पराभूत करणार्या डोनाल्ड ट्रंप यांनी सर्वच बाबतीत हिलरींना निर्विवाद पराभूत केले आहे. सहसा आजवर कुठल्या रिपब्लिकन उमे़दवाराने इतका निर्णायक विजय मिळवलेला नाही. प्रत्येक वेळी रिपब्लिकन उमेदवार जिंकला, तरी त्याला सहसा सर्वाधिक मते मिळवता आलेली नव्हती. किंबहूना पराभूत डेमॉक्रेट उमेदवार सर्वाधिक मते मिळवीत आणि अमेरिकन मतमोजणीच्या पद्धतीमुळे, कमी मते असूनही रिपब्लिकन उमेदवार अध्यक्षपदी विराजमान झालेला होता. ज्या राज्यात सर्वाधिक मते तिथली सर्व निर्णायक मते त्या उमेदवाराला; अशी पद्धत असल्याने अनेकदा कमी मतातही उमेदवार अध्यक्ष होऊ शकतो. आताही ट्रंप यांचे अध्यक्षपद निश्चित झाले असले, तरी अजून ते निवडून यायचे आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानात अध्यक्षाला निवडणार्या मतदारसंघाची निवड झाली आहे. ट्रंप यांचे प्रतिनिधी निवडले गेले आहेत आणि त्यांची संख्या २७० हून अधिक असल्याने ट्रंप विजयी झाले असे मानले जात आहे. २००० सालात जॉर्ज बुश यांच्यापेक्षा अधिक मते मिळवूनही प्रतिनिधी संख्येत कमी असलेल्या अल गोअर यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र ट्रंप जिंकणे शक्यच नाही, असे ठामपणे सर्व चाचण्या सांगत असताना, त्यांनी प्रतिनिधी संख्येत हिलरी यांच्यावर मात केलीच. पण लोकप्रिय मतातही त्यांनी निर्विवाद यश मिळवले आहे. मात्र ट्रंप यांचा विजय हा एकट्या हिलरीचा पराभव नाही. तो एकूणच अमेरिकन व जगभरच्या उदारमतवादी राजकारणाचा पराभव आहे.
इतक्या मतांनी हिलरी पराभूत झाल्या, किंवा इतक्या मतांनी ट्रंप जिकले; असे म्हणून भागत नाही. कारण गेले काही महिने या निवडणूकीच्या निमीत्ताने जे विश्लेषण अमेरिकन वा प्रस्थापित माध्यमातून चालले होते; त्याकडे पाठ फ़िरवून या निकालाची मिमांसा होऊ शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ट्रंप हा कोणी प्रस्थापित राजकीय नेता वा पक्षनिष्ठ नाही. रिपब्लिकन पक्षातर्फ़े ट्रंप यांनी उमेदवारी केली, तरी ते त्या पक्षाचे जुने कार्यकर्ते वा निष्ठावंत नाहीत. ते कधीही रिअप्ब्लिकन पक्षातर्फ़े वा अन्य कुठल्या पक्षातर्फ़े कुठल्याही घटनात्मक अधिकारपदासाठी निवडणुक लढलेले नाहीत. त्यामुळेच त्यांची कुठलीही ठाम राजकीय मतप्रणाली वा विचारसरणी नाही. त्यांनी कुठले सरकारी पद वा अधिकारपद उपभोगलेले नाही. म्हणूनच त्यांना राजकारणातला ‘उपरा’ असेही म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे जशी राजधानी दिल्ली हे सत्ताकेंद्र आहे, तसेच अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी हे राजधानीचे महानगर आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, विचारसरणी, मतप्रणाली वा तत्सम क्षेत्रात लुडबुडणार्यांचे महानगर अशी त्याची ओळख आहे. त्यामुळेच अमेरिकन राजकारणात काही करू इच्छिणार्याला तिथे बसलेल्या कुणाचा तरी आशीर्वाद वा कृपाप्रसाद मिळवावा लागतो. कुठल्याही पक्षात वा गोटातले असलात, तरी सहजासहजी तुम्हाला या महानगरात घुसणे सोपे नाही. तिथल्या कुणा मठाधीश वा आचार्य-गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा लागतो. त्याखेरीज तिथे हितसंबंध गुंतलेले पत्रकार, विचारवंत, विश्लेषक व जाणाकार, प्राध्यापक असा अभिजनवर्ग आहे. त्यापैकी कित्येकांच्या आशीर्वाद व कृपाप्रसादाने तुम्ही अमेरिकन राजकारणात पदार्पण करू शकता. उलट अशा अभिजनवर्गाचा विरोध असेल, तर तुम्ही तिथे पाऊलही टाकायचा विचारही करू शकत नाही. तुम्ही उपरे असता. म्हणूनच अमेरिकेसाठी तुम्ही धोका असता. ट्रंप हा असा अमेरिकेसाठी धोका होता.
हा संदर्भ लक्षात घेतला, तर ट्रंप यांच्या विजयाची खरी व्याप्ती समजू शकेल वा त्याचे विश्लेषण करता येऊ शकेल. सहाजिकच ट्रंप यांनी वर्षभरापुर्वी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला, तिथूनच त्यांच्या विरोधाला आरंभ झाला होता. आधी ते रिपब्लिकन पक्षातर्फ़े उमेदवारी करायला निघाले होते आणि त्याला वॉशिंग्टन येथील त्याही वैचारीक मठाकडून त्यांना मान्यता मिळू शकत नव्हती. पक्षाची उमेदवारी त्यांना मिळू नये, म्हणून त्याच पक्षातले अनेक मठाधीश व म्होरके अहोरात्र धडपडत होते. पण त्याचीच उलटी बाजूही होती. ट्रंप यांच्यासारखा धश्चोट उमेदवार रिपब्लिकन पक्षाकडून समोर आला; तर हिलरी क्लिंटन यांचा विजय सोपा होईल, म्हणून त्यांचे समर्थक आटोकाट प्रयत्न करीत होते. कारण त्या गोटात हिलरीच्या पक्षांतर्गत स्पर्धकांना संपवण्याची योजना आधीच कार्यरत झालेली होती. पत्रकार व माध्यमांना त्याकामी जुंपलेले होते. सहाजिकच ट्रंप यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना चिथावण्या देऊन ट्रंप विरोधीआघाडी लढवली जात होती. पण उमेदवारी मिळाली नाही तर स्वतंत्र अपक्ष उमेदवार होण्याची धमकी ट्रंप यांनी देऊनच टाकलेली होती. कारण पक्षाला नव्हेतर आपल्याला लोक निवडून देतील; याची ट्रंप यांना पुरेपुर खात्री होती. किंबहूना त्यासाठीच त्यांनी या आखाड्यात उडी घेतली होती. त्यातले एक साधन म्हणून त्यांनी पक्षाचा आधार घेतला होता. त्यात अडचण आली, म्हणून माघार घ्यायला हा माणुस अजिबात राजी नव्हता. शिवाय प्राथमिक लढतीमध्ये पक्षातला कोणीही स्पर्धक त्यांच्यापुढे टिकला नाही आणि नामूष्कीने रिपब्लिकन पक्षाला ट्रंप यांना उमेदवारी द्यावी लागली होती. पण त्यांचा कोणीही प्रतिस्पर्धी त्यांच्या पाठीशी उभा रहायला राजी नव्हता. यावरून ट्रंप हा वॉशिंग्टनमध्ये कसा उपरा आहे, त्याची कल्पना येऊ शकते. पण त्यांनी दाद दिली नाही. हे मुद्दे वगळून निकालाचे विश्लेषण होऊ शकत नाही.
एकदा पक्षाची उमेदवारी मिळाली आणि मगच खरी अध्यक्षीय लढत सुरू झाली होती. त्यात हिलरी क्लिंटन व त्यांच्या पतीचे एकूण असलेले राजकीय वजन, ट्रंप यांच्या विरोधात वापरणे सुरू झाले. एकामागून एक आरोप व बदनामीच्या मोहिमा राबवून ट्रंप यांना अध्यक्षीय उमेदवारीसाठी़च नालायक ठरवण्याची स्पर्धा सुरू झाली. त्यांच्या पुर्वायुष्यातील विविध घटना शोधून, अमेरिकन नागरिक व एकूणच जगासाठी ट्रंप हा कसा भयंकर धोका आहे, त्याचा रतिब माध्यमे नित्यनेमाने घालू लागली., दुसरीकडे हिलरी यांच्या तुलनेत ट्रंपना अनुभव नाही, त्यांच्या पक्षाची कशी ताकद नाही, किंवा विविध समाजघटक कसे ट्रंपच्या विरोधात आहेत; त्याचे भाराभर तपशील समोर आणले गेले. मात्र त्याला ट्रंप गोटातून दिले जाणारे उत्तर किंवा खुलासे लोकांपुढे येणार नाहीत, याची काळजी घेतली जात होती. ट्रंपचे प्रत्येक वाक्य विधान विकृत करून सादर केले जात होते. सर्वात कडी म्हणजे विविध मतचाचण्यातून ट्रंप मागेच पडत असल्याचे निकाल सादर केले जात होते. थोडक्यात ट्रंप जिंकले तर तो निव्वळ चमत्कार असेल, अशी मानसिकता निर्माण करण्याच पद्धतशीर खेळ चालला होता. असा माणूस निर्णायक मते मिळवून हिलरींना पराभूत करतो, तेव्हा त्याच्या विजयाचे विश्लेषण केवळ हिलरीचा पराभव असा होऊ शकत नाही. राजकीय अभ्यासक, विश्लेषक, चाचणीकर्ते, भाष्यकार, राजकीय मठाधीश, वॉशिंग्टनचे मक्तेदार अभिजन अशा कित्येकांचा एकाच फ़टक्यात केलेला तो पराभव आहे. किंबहूना असे सर्व लोक आता निकामी व निरूपयोगी झाल्याचा निर्वाळा मतदाराने दिलेला आहे. या तथाकथित अभ्यासक जाणकारांना जनमानसाचा किंचीतही थांगपत्ता नाही आणि ते कल्पनेच्या विश्वात रममाण झालेले भ्रमिष्ट असल्याचा निर्वाळा, अमेरिकन मतदाराने दिला. त्याला डोनाल्ड ट्रंप यांचा विजय असे संबोधणे नेमके ठरावे.
पुन्हा बुद्धीजिवी हरले अन् सामान्य जनता जिंकली आहे
ReplyDeleteBhau manalat tumhala......very well predicted.
ReplyDeleteभाऊ,काही लोक म्हणत होते की ट्रंप प्रतिगामी आहेत तर हिलरी पुरोगामी म्हणून हिलरीच जिंकणार पण जगात कुणालाच पुरोगामी नकोत पहिल्यांदा भारत मग इंग्लंड आता अमेरिका सगळीकडे पुरोगाम्यांचा सुपडासाफ
ReplyDeleteTuhmi trump jinkale tar media cha parabhav asel ase bhakit kele hote te aj khare tharale.
ReplyDeleteआपल्याकडे असाच अनुभव दोन वर्षांपूर्वी आला होता. म्हणून आता या निकालाचं एवढं आश्चर्य वाटलं नाही. किंबहुना माध्यमांच्या व पुरोगाम्यांच्या सार्या गडबडगुंड्यातूनही ट्रंप जिंकायची शक्यता दिसत होती. बरं मधे ज्या टेप्स बाहेर आल्या त्या थोड्या अजून उशीरा आल्या असत्या तर त्यांचा परिणाम टिकून राहिला असता. तसंच बिल क्लिंटनच्या वर्तनावर हिलरीने घातलेल्या पांघरुणाकडे व त्याला दुसर्या टर्ममधे निवडून देणार्या अमेरिकनांकडे पाहता, ट्रंप निवडून आले यात नवल नाही.
ReplyDeleteभाउसाहेब आपली भविष्य वाणी कधीही खोटी ठरत नाही. आपण असा कोणता पोपट पाळला आहे जो कधीही आपला पोपट होउ देत नाही.
ReplyDeleteबरोबर
Delete