शिवसेनेची पन्नाशी हा अनेक बाजूने चर्चिला गेलेला विषय आहे. मागल्या वर्षभरात मीच विविध प्रकाशनांसाठी शिवसेनेच्या पन्नाशी संदर्भाने दहा लेख तरी लिहीले. शेकडो लेख या संदर्भाने लिहीले गेलेत. पण निदान माझ्या बघण्यात शिवसेनेला संपवणार्यांचे पुढे काय झाले, त्याचा उहापोह कुठे झालेला नजरेस आलेला नाही. अर्धशतकापुर्वी ही मुंबईत स्थापन झालेली संघटना एक अपवाद होता. तिच्यापाशी कुठले आपले स्वतंत्र राजकीय तत्वज्ञान नव्हते, की कुठल्या ठराविक राजकीय कार्यक्रमाला बांधून घेत ही संघटना उदयास आली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशा आंदोलनातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र नावाच्या मराठी राज्याच्या मुंबई या राजधानीतच मराठी माणसाला कमीपणाची वागणूक मिळते, अशी त्यामागची बोचरी भावना होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून जो आवाज उठत गेला, त्याने शिवसेना हे रूप धारण केले. त्यामुळे मोसमी आंदोलन किंवा प्रतिक्रिया समजून तिची कोणी गंभीर दखल घेत नव्हता. दुसरी बाजू ठराविक राजकीय पुर्वग्रह किंवा समजुतीवर आधारलेले विचारवंत आणि चिकित्सक यांची आहे. असे विश्लेषक लोक या संघटनेकडे गंभीरपणे बघायलाच तयार नव्हते. त्याखेरीज जे लोक व पक्ष राजकारणात होते, त्यांनीही कधी शिवसेने्ची एक नवे आव्हान म्हणून दखल घेतली नाही. सहाजिकच प्रथमपासून सेनेची चिकित्सा झाली, ती उथळ होती आणि कारणमिमांसा तर झालीच नाही. त्यापेक्षा आपल्याला नकोशी वाटणारी संघटना वा त्यातून व्यक्त होणार्या प्रतिक्रिया म्हणून शिवसेनेला संपवण्याचा विचार अधिक झाला. कारण राजकीय संघटना किंवा पक्ष म्हणून कुठल्याही चौकटीत ही संघटना बसत नव्हती की तिची व्याख्याही या क्षेत्रातल्या जाणकारांना करता येत नव्हती. सहाजिकच त्या संघटनेला वा तिने उभे केलेल्या आव्हानाला थेट सामोरे जाण्यापेक्षा, तिला चिरडून वा बदनाम करून संपवण्याच्याच बाजूने अधिक प्रयास झाला. त्यात ज्यांनी पुढाकार घेतला ते आज कुठे आहेत? त्यांचे पुढे काय झाले? त्यांच्या अशा कठोर परिश्रमानंतरही शिवसेना टिकून कशामुळे राहिली? याचा कुठलाही अभ्यास झालेला नाही किंवा मिमांसा करण्याची कोणाही राजकीय विश्लेषकाला गरज वाटलेली नाही. ही महाराष्ट्रातील वा भारतातील राजकीय मिमांसेची शोकांतिकाच नाही काय?
आरंभीच्या काळात शिवसेना मैदानात आली, ती मराठी माणसाच्या न्याय्य हक्काची राखणदार म्हणून! तेव्हा सेनेचे वक्ते, प्रवक्ते वा नेते सतत राजकारणावर झोड उठवत होते. किंबहूना शिवसेनाप्रमुख अशी बिरूदावली लावणारे बाळासाहेब ठाकरेही राजकारण म्हणजे गजकरण असेच म्हणायचे. मात्र त्यांच्या अशा बोलण्याने किंवा संघटनेने आपल्याला मतदानात आव्हान उभे राहिल्याचे पहिले भान काहीजणांना आले होते. संपुर्ण महाराष्ट्र समिती म्हणून एकत्र आलेल्या पुरोगामी डाव्या मानल्या जाणार्या पक्षांना त्याची पहिली जाणिव झाली. त्यांचे नेतृत्व तेव्हा कम्युनिस्ट व संयुक्त समाजवादी पक्ष करीत असल्याने त्याच दोघांशी शिवसेनेचे खटके उडू लागले. कारण या दोन्ही पक्षांचे काम वा शक्ति कामगार वस्त्यांमध्ये होती आणि तिथेच शिवसेना मुळ धरू लागली होती. वास्तविक याच पक्षांच्या पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्र चळवळ साकारली गेली होती. पण नंतरच्या काळात त्या चळवळीची प्रेरणा असलेल्या मराठी अस्मितेचा त्यांना विसर पडला आणि तीच प्रेरणा घेऊन शिवसेनेचा अवतार झालेला होता. त्या पक्षांनी शिवसेनेने उचलून धरलेल्या भूमिका व अस्मितेला साथ दिली असती, तर सेनेला राजकारणात शिरताच आले नसते. पण तसे झाले नाही. राजकीय प्रतिस्पर्धी नसलेली शिवसेना, पुरोगामी पक्षांच्या डोळ्यात खुपू लागली आणि त्यांनी सेनेला कॉग्रेसची बटीक-हस्तक ठरवुन बदनाम करण्याचा सोपा मार्ग शोधला. तसे असते तर शिवसेना फ़ार काळ तग धरू शकली नसती, की महाराष्ट्र चळवळीचा वारसा सेनेकडे गेला नसता. सेनेच्या स्थापनेनंतर अवध्या वर्षभरात चौथ्या सार्वत्रिक निवडणूका आल्या. तेव्हा लोकसभा विधानसभा एकाच वेळी होत. त्यात उतरण्याइतकी शिवसेना बलदंड झाली नव्हती, की प्रौढही नव्हती. म्हणूनच त्यात थेट सेना उतरली नाही, तर निवडक उमेदवारांना सेनेने पाठींबा दिला. त्यात नायगावचे व दादरचे प्रजा समाजवादी उमेदवार राम महाडिक व प्रा. मधू दंडवते यांचा समावेश होता. तेव्हा दोन समाजवादी पक्ष अस्तित्वात होते. एक प्रजा समाजवादी व दुसरे संयुक्त समाजवादी! या दुसर्या गटाला लोहियावादी असेही संबोधले जाते. त्यापैकी प्रजा समाजवादी पुरोगाम्यांच्या गटात नव्हते. कारण त्यांना कम्युनिस्टांचे खुप वावडे होते.
गिरणगाव किंवा कामगार वस्त्यांमध्ये त्या काळात समाजवादी व कम्युनिस्ट यांच्यात हाणामारीचे प्रसंग यायचे. त्यात कम्युनिस्ट आक्रमक असल्याने प्रजा समाजवादी नेहमी मार खायचे. प्रामुख्याने गिरणगावात तर कम्युनिस्ट म्हणजे गुंड अशीच समाजवाद्यांची भूमिका होती. त्यातच तेव्हा प्रजा समाजवाद्यांच्या उमेदवारांना शिवसेनेने पाठींबा दिला आणि तिथून सेनेच्या राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाल्या. मात्र खर्या हाणामारीला आरंभ झाला तो कॉग्रेसचे इशान्य मुंबईतील उमेदवार स. गो. बर्वे यांना सेनेने दत्तक घेतल्याने. पानशेतचे धरण फ़ुटल्यानंतर ज्या पुरात पुणे बुडाले, तेव्हा तिथे जिल्हाधिकारी असलेले बर्वे यांनी मोठे काम केलेले होते. त्यामुळे त्यांचे नाव झाले आणि पुढल्या काळात यशवंतरावांनी त्यांना कॉग्रेसमध्ये आणून मोठ्या राजकीय जबाबदार्या दिलेल्या होत्या. असे बर्वे इशान्य मुंबईत उभे होते आणि त्यांच्याच विरोधात संपुर्ण महाराष्ट्र समितीने कृष्ण मेनन यांना उभे केले. या मेनन यांच्या नाकर्तेपणामुळे चिनी आक्रमणाच्या प्रसंगी भारताला नामुष्कीने माघार घ्यावी लागली असे म्हटले जात होते. त्यात पुन्हा हा माणूस लुंगीवाला दाक्षिणात्य! शिवसेनेला तेवढे कारण पुरेसे होते. ‘हटाव लुंगी बजाव पुंगी’ अशी घोषणा करणार्या शिवसेनेसाठी मग इशान्य मुंबईत मेननचा पाडाव, हे ध्येय बनून गेले. त्याला पाडू शकणारा उमेदवार म्हणून मग सेनेने जणू कॉग्रेस उमेदवार स. गो. बर्वे यांना दत्तकच घेतले. तिथे शिवसैनिक नुसता प्रचार करायला जात नव्हते. कॉग्रेसपासून अलिप्त राहून शिवसेना स्वतंत्रपणे मेननविरोधी जाहिरसभाही घेत होती. शिवसेनाप्रमुखांनी तीस चाळीस सभा त्यासाठी घेतल्या. दुसरीकडे कृष्ण मेनन समितीचे पुरोगामी उमेदवार असले, तरी त्यांची सगळी जबाबदारी कम्युनिस्टांनीच उचलली होती. कारण कार्यकर्ते त्याच पक्षाकडे अधिक होते. तुलनेने कम्युनिस्टांइतका सुसंघटित गर्दी आणू शकणारा दुसरा पुरोगामी पक्ष मुंबईत नव्हता. सहाजिकच ती इशान्य मुंबईची लढाई शिवसेना विरुद्ध कम्युनिस्ट अशी होऊन गेली. त्यात सायन येथे एकदा कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई व शिवसैनिक यांच्यात हाणामारीही झाली. कारण कम्युनिस्टांच्या गिरणगावातील वर्चस्वामागे कृष्णा देसाईची गुंडगिरीही कारण होती. त्याच्या दादागिरीपुढे त्या भागातील प्रजा समाजवादी पुरते नामोहरम झालेले होते. त्याला शिवसेना थेट जाऊन भिडत असेल, तर प्रजा समाजवादी सुखावल्यास नवल नव्हते. मात्र अजून शिवसेना कुठल्या निवडणुकीत उतरली नव्हती.
निवडणूकांचे निकाल लागले आणि इशान्य मुंबईतून कृष्ण मेनन पराभूत झाले. स. गो. बर्वे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला. त्याचा आनंदोत्सव कॉग्रेसपेक्षा सेनेनेच अधिक साजरा केला. पण दुर्दैव असे होते, की लोकसभेत आपल्या पदाची शपथ घेण्यापुर्वीच बर्वे यांचे हृदयविकाराने निधन झाले. सेनेच्या पाठींब्याने नायगावचे प्रजा समाजवादी उमेदवार राम महाडीक आमदार झाले होते. गिरणगाव व कामगार वस्तीतून कम्युनिस्टांचे तीन आमदार विजयी झाले होते आणि जॉर्ज फ़र्नांडीस व कॉम्रेड डांगे असे दोन पुरोगामी खासदार मध्य व दक्षिण मुंबईतून लोकसभेत निवडून गेलेले होते. तिथे शिवसेनेने विरोधी प्रचार करूनही त्यांच्या वर्चस्वाला बाधा आलेली नव्हती. ही १९६७ सालच्या मध्याची गोष्ट! पण बर्वे यांच्या निधनाने इशान्य मुंबईत पोटनिवडणूक घेण्य़ाची वेळ आली. तिथे पराभूत कृष्ण मेनन यांना पुन्हा उभे करण्याची समितीला गरज नव्हती. तसे झाले नसते, तर कदाचित पुन्हा शिवसेना तिथे जाऊ शकली नसती आणि इतिहास वेगळा घडला असता. पण कॉग्रेसने बर्वे यांच्या भगिनी तारा सप्रे यांना उभे केले आणि मेननला पाडण्यासाठी शिवसेना पुन्हा इशान्य मुंबईत धुमाकुळ घालू लागली. तेव्हा कुर्ल्यापासून कल्याणपर्यंत पसरलेल्या भूभागाला इशान्य मुंबई मतदारसंघ म्हणून ओळखले जात होते. अल्पावधीत तिथे दोनदा डाव्यांच्या मेनन पाडताना, सेनेने केलेली मुलूखगिरी शिवसेनाप्रमुखांना आत्मविश्वास देऊन गेली. काही महिन्यातच आलेल्या तिथल्या नगरपालिकांच्या निवडणूकीत उतरण्याचा पवित्रा शिवसेनेने घेतला. त्यामुळे बर्वे-सप्रे यांच्या प्रचारात सहभागी झालेली सेना, कॉग्रेसची बटीक असल्याचा आरोपही धूसर झाला. कारण सेना आता पाठींबा सोडून थेट कॉग्रेसच्याच विरोधात दंड थोपटून मैदानात आलेली होती. त्यात तिला यशही मिळाले. वसंतराव मराठे हा सेनेचा पहिला नगराध्यक्ष ठाण्यात विराजमान झाला. कल्याण पालिकेतही सेनेला काही नगरसेवक निवडून आणता आले. कॉग्रेसला पाडून सेनेने ठाण्याची सत्ता मिळवली, तरी तिला कॉग्रेसची बटीक ठरवण्याचा उद्योग चालूच राहिला. बाळासाहेबांनी त्याची पर्वा केली नाही, की त्याला उत्तर देण्यात कालापव्यय केला नाही. खरे तर यातून शिवसेना स्वत:च राजकीय आव्हान होते आहे, याचे भान राजकीय शहाण्यांना यायला हवे होते. पण आपल्या राजकीय समजुती व पुर्वग्रहात गुरफ़टून रहाण्यातच धन्यता मानणार्यांना अभ्यासक म्हटले जात असेल, तर यापेक्षा वेगळे काही घडू शकत नव्हते. पुरोगाम्यांना तेव्हा वाटले होते, की बदनामीतून सेनेला संपवता येईल. त्यातूनच कॉग्रेसची बटीक किंवा वसंतसेना अशी शेलकी विशेषणे शिवसेनेला लावली गेली. तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि शिवसेना त्यांच्या ताटाखालचे मांजर असल्याची भाषा पुरोगाम्यांची आवडती बोली होती. म्हणून वस्तुस्थिती बदलत नव्हती, की परिणाम बदलणार नव्हते.
ह्या नगरपालिका निवडणूकीत उतरताना शिवसेनेने मोठी कसरत केली होती. आधी राजकारण नको म्हणणार्या शिवसेनेने २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण असे सांगत निवडणूकीत उडी घेतली. तेव्हा तिची राजकीय पक्ष म्हणूनही नोंदणीही झालेली नव्हती. मात्र सेनेच्या तथाकथित झुंडशाहीने प्रजा समाजवादी खुप सुखावले होते. नेहमी कम्युनिस्टांच्या झुंडशाहीसमोर मार खाणार्यांना आता सेनेमुळे अभय मिळाले होते. त्यामुळेच वर्षभरात आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेने उडी घेतली तेव्हा तिला पहिली मान्यता देणारा पक्ष प्रजा समाजवादी व नेता मधू दंडवते होते. ही शिवसेनेने केलेली पहिली राजकीय युती होती. जागावाटपातही दंडवते यांनी मोठा हिस्सा सेनेला देऊन छोटा भाऊ म्हणून युती स्विकारली होती. त्याचा त्या पक्षाला लाभ मिळाला आणि पुरोगामी कम्युनिस्टांना त्याचा मोठा फ़टका बसला. ज्या भागातून गिरणगावातून वर्षभर आधी कम्युनिस्टांचे तीन आमदार व एक खासदार निवडून आला होता, तिथे पालिका मतदानात त्यांचा पुरता सफ़ाया झाला. गिरगाव ते दादर माहिम नायगावपर्यंत शिवसेनेने बाजी मारली आणि तिथून सेनेचा आवाज दुमदुमू लागला. पण त्यातही उपनगरात सेनेचा दबदबा कमीच होता. तीन आमदार असलेल्या कम्युनिस्टांना अवघे दोन नगरसेवक निवडून आणता आले. पालिकेच्या निवडणूकीत सेनेने उतरण्यालाही पुन्हा समितीची पार्श्वभूमी होती. आधीच्या निवडणूकीत समितीने बहूमत मिळवले होते. पण तिथे कम्युनिस्ट व प्रजा समाजवाद्यांचे खटके कायम उडायचे. त्यांच्या तात्विक भांडणामुळे समितीचा बोजवारा उडालेला होता. आज जे आरोप बंगाल केरळात भाजपा किंवा रा. स्व. संघ कम्युनिस्टांवर करीत असतात, नेमके तेच आरोप तेव्हा प्रजा समाजवादी मंडळी कम्युनिस्टांवर करीत असत. भारतीय कम्युनिस्ट कधीच स्वयंभू व स्वतंत्र विचारांचे नव्हते. रशिया किंवा नंतरच्या काळात चिनी इच्छेनुसार त्यांची भारतातली धोरणे ठरत असायची. १९६० च्या नंतर पुर्व युरोपात वॉर्सा करारानुसार जी राज्ये सोवियत गोटात होती, त्यापैकी हंगेरीने लोकशाही आणायचा पवित्रा घेतला आणि त्या कम्युनिस्ट गटाला धक्का बसला. मग सोवियत फ़ौजा हंगेरीत घुसल्या आणि तिथला पंतप्रधान इंम्रे नाज याची हत्या करून सोवियत कळसुत्री बाहुले असलेला नवा नेता स्थनापन्न करण्यात आला. त्यासाठी इथले प्रजा समाजवादी इथल्या कम्युनिस्टांना खुनी ठरवत होते. यातला योगायोग असा, की प्रजा समाजवाद्यांचे आजचे वारस डॉ नरेंद्र दाभोळकर आणि कम्युनिस्टांचे आजचे वारस कॉ. गोविंद पानसरे आहेत. आणि असे दोन्ही बाजूंचे वारस आता तोच खुनखराब्याचा आरोप संघावर वा भाजपावर करीत असतात. अशा तात्कालीन स्थितीमुळे संयुक्त महाराष्ट्र समिती फ़ुटली आणि त्यातून भ्रमनिरास झालेला तरूण वर्ग नवे नेतृत्व शोधत शिवसेनेकडे गेला. किंबहूना अशा गोंधळामुळे शिवसेनेचा अवतार झाला.
युरोपातील घटनांचा मुंबई पालिकेतील कामकाजाशी संबंध नव्हता. पण मुद्दाम कम्युनिस्टांना खिजवण्यासाठी प्रजा समाजवाद्यांनी इंम्रे नाजच्या श्रद्धांजलीचा आणि सोवियत खुनशीपणाचा निषेध करणारा प्रस्ताव पालिकेच्या बैठकीत आणला. त्याला कम्युनिस्ट पाठींबा देऊ शकणार नव्हते आणि कॉग्रेसने तोच प्रस्ताव महापालिकेत मंजूर होण्यासाठी आपले पाठबळ उभे करून समितीमध्ये बेबनाव उभा रहाण्यास हातभार लावला. हे दोन पुरोगामी पक्षातील वैमनस्य इतके टोकाचे होते, की बॅ. नाथ पै यांनी कम्युनिस्टांकरवी यशवंतरावांचा केरेन्स्की होऊ देणार नाही, असे एका बैठकीत सांगितले. ही केरेन्स्की भानगड काय होती? तर नेतृत्वाशी पटले नाही तेव्हा केरेन्स्की याला जीव मुठीत धरून मायदेशातून पळ काढावा लागला होता. तरी त्याची हत्या झालीच. थोडक्यात कम्युनिस्ट म्हणजे ज्याचे हात मानवी रक्ताने रंगलेले आहेत, असे भासवण्यासाठी तेव्हाचे समाजवादी दिवसरात्र एक करत होते. आज अशा दोन्ही गोटांचे वारस दाभोळकर पानसरे हत्येनंतर एकसुराने हत्याकांडाचा निषेध करतात, ते बघून मनोरंजन होते. पण तेव्हा तोच विषय घेऊन शिवसेना निवडणूकीच्या आखाड्यात उतरली होती. युरोप वा अन्य विषयांचा पालिकेच्या कामाशी काय संबंध? हेच राजकारण हाणून पाडण्यासाठी शिवसेनेचे समाजकारण आहे अशी भूमिका घेतली गेली आणि तिला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला. १४० सदस्यांच्या पालिकेत सेनेचे ४२ तर प्रजासमाजवादी पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. खरेतर त्याच्या आधी पालिका सदस्याला नगरपिता असे संबोधन होते. पण प्रचार मोहिमेत आपले उमेदवार मतदारांचे बाप नाहीत. म्हणून जे निवडून येतील त्याना जनतेचे सेवक म्हणून नगरसेवक म्हटले जाईल; अशी घोषणा बाळासाहेबांनी केली आणि आज तेच सार्वत्रिक संबोधन होऊन बसले आहे. मात्र त्या निकालानंतर गिरणगाव आणि मुंबईचा बहुतांश मराठी लोकसंख्येचा विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला बनून गेला. तिथे अन्य पक्षांना किंवा बिगरकॉग्रेस पक्षांना स्थानच राहिले नाही. मुंबईची विभागणी कॉग्रेस आणि शिवसेना अशी होऊन गेली. त्याची प्रचिती विविध क्षेत्रातही येऊ लागली. पालिका लढवल्यानंतर शिवसेनेने आपली वेगळी कामगार संघटना स्थापन केली. त्यानंतर एक एक करीत विविध क्षेत्रात शिवसेना आपला वेगळा झेंडा रोवून उभी रहात गेली. तिच्याशी हाणामारी करणे बाजूला ठेवले, तरी कामात तिच्याशी स्पर्धा करणेही अन्य पक्षांना शक्य राहिले नाही. कारण वयात येणारा मराठी तरूण आपोआपच सेनेकडे जाऊ लागला. उलट अन्य बिगर कॉग्रेसी पक्षांकडे तरूणाला आकर्षित करू शकेल, असा कुठलाही कार्यक्रम शिल्लक नव्हता.
शिवसेनेला शिव्याशाप देणे, तिची हेटाळणी करणे वा नावे ठेवणे; यापेक्षा कुठलाही तरूणांना एकत्रित करू शकेल असा विचार वा कार्यक्रम अन्य पक्षांनी घेतलाच नाही. मग अशा डिवचण्यातून हाणामारीचे प्रसंग येऊ लागले. त्या क्षेत्रात सेनेशी टक्कर देऊ शकेल अशी कुठलीही शक्ती या पक्षांकडे नव्हती. नुसत्या डिवचण्याने वा शिव्या मोजून सेना संपण्याची स्वप्ने बघणे, हा निव्वळ मुर्खपणा होता. शिवाय सेनेकडे तरूणांची झुंड असली तरी नेतृत्व किरकोळ होते. ज्यांना भाषणे ठोकता येतील किंवा सविस्तर भूमिका मांडता येतील, असा सुजाणपणा असलेली संख्या दुर्मिळ होती. पण त्यामुळेच उमेदवारी मागणारे वा सत्तेसाठी साठमारी करू शकणार्यांची संख्याही कमी होती. तरूणांच्या अंगातील मस्तीला वाट करून देणारे कार्यक्रम वा व्यवस्था, असे सेनेचे स्वरूप होते. निवडणूका संपल्यावर कुठे शहाळी विकावी, घाऊक बाजारात खरेदी केलेल्या वस्तु आपल्या परिसरात स्वस्तामध्ये उपलब्ध करून द्याव्यात, असे स्थानिक पातळीवरचे कार्यक्रम शाखा करू लागल्या. त्यातूनच वडापावचा जन्म झाला. त्या पहिल्या निवडणूकीत भायखळा पुर्वेला सेना उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या चंद्रकांत आळेकर यांनी मग रेल्वे स्थानकापाशी एक बटाटेवडा विकण्याची गाडी सुरू केली. त्यावर एक फ़लक लावला, ‘शिवसेना पुरस्कृत बटाटेवडा!’ पालिका कर्मचार्यांनी त्रास देऊ नये म्हणून हा फ़लक कामी यायचा. कारण सेनेचा धाक तयार झाला होता. त्याची उजळणी मग मुंबईभर होत गेली. काही लोकांना रोजगार मिळाला, तर मोठ्या संख्येने हॉटेलात महाग पदार्थ वाटणार्यांना स्वस्तातला नाश्ता मिळू लागला. पण त्याच दरम्यान असे प्रयोग विविध आवश्यक वस्तुंच्या विक्रीसाठीही होऊ लागले. त्यातून एक शब्दावली निर्माण झाली. ‘शिवसेना पुरस्कृत किंमत कमी.’ सेनेच्या शाखा वा तिच्या जवळ कुठेतरी मोसमी वस्तुंची अशी विक्री चालायची. तिथे असा फ़लक नक्की असायचा. त्यामुळे त्याचा उपयोग वगनाट्यकार म्हणून लोकप्रिय झालेले शाहिर दादा कोंडके यांनी आपल्या नाटकातही करून घेतला होता. अशा अनेक आघाड्यांवर शिवसेनेचा तरूण व्यस्त असताना तसा कुठलाही कार्यक्रम अन्य पुरोगामी वा बिगरकॉग्रेस पक्ष तरूणांसाठी आणु शकले नाहीत. आपली संघटना लोकोपयोगी असल्याचे मनात ठसवण्यासाठी हे तरूण तेव्हा अखंड राबत होते. तुमची कुठलीही समस्या असू द्या, शाखेत या आणि निराकारण करून घ्या; असा एक प्रघात मुंबईत तयार होऊ लागला. सामान्य माणसाच्या समस्या खुप किरकोळ व नगण्य असतात. त्यांचे निराकरण आंदोलनाशिवाय होऊ शकते. याचा साक्षात्कार त्यातून मतदाराला होत गेला.
उदाहरणार्थ पालिकेच्या कर्मचार्यांकडून होणारी अडवणूक किंवा दिला जाणारा त्रास. त्यात शिवसेनेचे नगरसेवक थेट हाणमारीपर्यंत जात होते आणि जिथे नगरसेवक नाही, तिथे शाखाप्रमुखही अंगावर धावून जाण्याइतका आक्रमक असायचा. ह्याला सभ्यपणा म्हणता येत नाही. पण त्यातून धाक निर्माण होतो आणि ज्याची अडवणूक झाली आहे, त्याला आपल्यासाठी कुठला पक्ष लढतो, त्याची जाणिव होते. अशी सेनेची लोकप्रियता वाढत गेली. बारीकसारीक कामासाठी, अडचणीसाठी सेनेच्या शाखेत धावणे हा स्थानिक नागरिक रहिवाश्यांसाठी परिपाठ बनत गेला. त्यापुर्वी राजकीय संघटना वा पक्षांचे काम असे होत नसे. बैठका वा चर्चा आणि समस्येचा उपाय म्हणून थेट आंदोलनाचा पवित्रा, हे राजकीय कार्यक्रम होते. सेनेला त्याचे अजिबात वावडे होते. सेनेत लोकशाही नाही असे बाळासाहेब अगत्याने सांगत होते आणि तशीच ही संघटना चालतही होती. तिला कुठले मुख्यालय नव्हते की तिची कार्यकारिणी वगैरे भानगडी नव्हत्या. अशी संघटना चालते कशी आणि लोक तिला मते देतात कशाला, याचा विचार खरे तर विचाराधिष्ठीत संघटना व पक्षांनी गंभीरपणे करायला हवा होता. पण आजच्या प्रमाणेच तेव्हाही असे पुरोगामी पक्ष विचार न करण्यालाच विचार मानत राहिल्याने, सेनेच्या वाढीचा अभ्यास झाला नाही की या पक्षांचा कार्यक्रम बदलू शकला नाही. अशातच तोवर काही प्रमाणात आकमक तरूणांचा भरणा असलेल्या कम्युनिस्ट व सेना यांच्यात सतत खटके उडू लागले. सेनेने कामगार क्षेत्रात उडी घेतल्याने अशा हाणामार्या सातत्याने होऊ लागल्या. त्यापुर्वी सेनेप्रमाणे हातघाईवर येऊन मारामार्या करण्याची क्षमता फ़क्त कम्युनिस्टांमध्ये होती. त्यांच्यापुढे अन्य पुरोगामी पक्षांचीही डाळ शिजत नव्हती. त्याला शिवसेनेच्या उदयाने शह मिळाला. आता मुंबईच्या कामगार क्षेत्रात सेना विरुद्ध कम्युनिस्ट अशी जबरदस्त हाणामारी नियमित होऊ लागली. फ़रक इतकाच होता, की यापुर्वी कम्युनिस्ट कार्यकर्ते दांडगाई करण्यात पुढाकार घेत. नव्या स्थितीत शिवसेनेचे तरूण आधी हातघाईवर येत. सहाजिकच कम्युनिस्टांना सतत पोलिसांच्या आश्रयाला जाण्य़ाची नामूष्की आली. त्यात सर्वात गुंडवृत्तीचा कम्युनिस्ट नेता अशी कृष्णा देसाई याची ओळख होती. अगदी त्याच्यावर खुनाचेही आरोप होते. त्यामुळेच कम्युनिस्टांचे बुडणारे तारू रक्तपात झाला तरी कुठल्याही थराला जाऊन वाचवण्याची जबाबदारी कृष्णाला उचलावी लागली. या सतत हाणामारीचा परिपाक एक दिवस कृष्णाच्या हत्येमध्ये झाला. शिवसैनिकांच्या तथाकथित भगवा गार्ड नावाच्या टोळीने त्याला तावरीपाडा लालबाग येथे रहात्या घरी जाऊन ठार मारले. ते पकडले ही गेले आणि कम्युनिस्ट गिरणगावातून अंतर्धान पावले. त्याला शिवसेना जबाबदार नव्हती, तर पुरोगामी मुर्खपणा कारण झाला होत्ता. ज्या मराठी अस्मितेने समिती म्हणून या डाव्या पुरोगामी पक्षांना मुंबईत मोठे यश मिळवून दिले, त्याच मराठी अस्मितेला नाकारून आणि ठोकरून त्यांनी आपला आत्मघात ओढवून घेतला होता.
त्या हत्येनंतर आमदारकीची जागा मोकळी झाली होती आणि तिथे पोटनिवडणूक आली. आपला प्रभाव दाखवण्यासाठी सेनेला त्यात उडी घेणे भाग होते. पण त्यातही पुरोगामी मुर्खपणा करण्याची संधी सोडली गेली नाही. सेनेला संपवण्याचा खोटा अहंकार त्या आत्मघाताला कारण झाला. ही हत्या पुरोगामी आणि शिवसेना यांच्यात उभा दावा तयार करण्याला कारणीभूत झाली. अगदी प्रजा समाजवादी सुद्धा शिवसेनेपासून विभक्त झाले आणि प्रथमच शिवसेना विधानसभेच्या राजकारणात उतरली. आपला गिरणगावातला प्रभाव दाखवण्यापासून सेनेला पळता येत नव्हते आणि पुरोगाम्यांनीही एकजूटीने सेनेचा सामना करण्याचा पवित्रा घेतला. योगायोग असा की तिथे कृष्णा देसाईची विधवा पत्नी सरोजिनी देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आणि कॉग्रेसनेही त्यांना पाठींबा दिला. थेट लढत व्हावी असा व्युह रचला गेला. गंमत अशी की सेना कॉग्रेसची बटीक म्हटली जायची आणि तसा आरोप करणारेच सेनेशी लढण्यासाठी कॉग्रेसचा पाठींबा घेऊन लढत होते. त्यात कम्युनिस्टांचा पराभव ठरलेला होताच. पण प्रजा समाजवादी म्हणून जे काही मुठभर लोक होते, त्यांनाही शिवसेनेत जमा व्हायची पाळी पुरोगम्यांनी आणली. लालबागमध्ये कम्युनिस्टांच्या गुंडगिरीशी दोन हात करणार्यात प्रजा समाजवाद्यांचा एक पारशी नेता आघाडीवर होता, त्याचे नाव दादी गोवाडिया. त्याने अशोक मेहतांच्या सभेत कृष्णाच्या मार्याला तोंड देताना रक्तबंबाळ होऊन समाजवादी झेंडा जपलेला होता. त्यालाच कृष्णाच्या समर्थनाला उभे रहाणे शक्य नव्हते आणि त्याने शिवसेनेची कास धरली. पुढे दादी गोवाडीया शिवसेनेचा एक लोकप्रिय वक्ता म्हणून प्रसिद्ध झाले. पण त्या पोटनिवडणूकीने गिरणगावातून कम्युनिस्टांचे नामोनिशाण पुसले गेले. पुरोगामी विचारसरणीला त्या कामगार वस्तीत ओहोटी लागली, ती कायमची! अर्थात शिवसेनेला राजकीय पर्याय म्हणून मुंबईकर वा कामगार वस्र्तीने स्विकारलेले नव्हते. म्हणूनच सरोजिनी देसाई यांना हरवून सेनेचा पहिला आमदार म्हणून वामनराव महाडीक विधानसभेत पोहोचले. तरी तो राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित होऊ शकला नव्हता. मुंबईकर सेनेकडे स्थानिक संघटना किंवा कार्यकर्त्यांची झुंड म्हणूनच बघत होते. मात्र सेनेला संपवण्याच्या पुरोगामी मुर्खपणातून मुंबईत क्रमाक्रमाने पुरोगामी राजकारणाचा अस्त होत चालला होता. त्यात नव्या रक्ताची व नव्या पिढीची भर पडत नव्हती, की नव्या भूमिकेचा शोधही घेतला जात नव्हता. जणू शिवसेनेला संपवणे हा अशा पुरोगाम्यांचा एकमुखी कार्यक्रम होऊन गेला. रस्त्यावर, विभागात किंवा राजकीय कार्यक्रमातून सेनेला शह देता येत नाही, अशी खात्री पटल्यावर पुरोगामी मंडळींनी माध्यमाचा आश्रय घेतला. शिवसेनेला संपवण्याचे काम माध्यमातून करण्याचे उद्योग सुरू झाले. किंबहूना नंतरच्या काळात अवघी पुरोगामी चळवळ बुद्धीमंत किंवा पत्रकार पुस्तकपंडितांच्या आहारी गेली. तिचा सामान्य माणसाशी संबंध तुटत गेला.
यानंतर इंदिरा लाट व बांगला देश युद्ध, अशा दोन ऐतिहासिक घटनांमध्ये शिवसेना होती तिथेच घुटमळत राहिली. इंदिरा लाटेत सेनेने लोकसभा लढवताना नामुष्की ओढवून घेतली. ज्याला सेना बालेकिल्ला समजत होती, तिथेही तिला जागा जिंकणे सोडा, पुरेसा प्रभाव दाखवता आला नाही. विधानसभेत त्याचीच पुनरावृत्ती झाली. पण दोनच वर्षात आलेल्या मुंबई महापालिकेच्या मतदानात सेनेने पुन्हा आपला प्रभाव दाखवला. समाजवादी वा कम्युनिस्ट यांचा प्रभाव मुंबईतून संपल्याची ती खुण होती. पण इतके होऊनही शिवसेनेला आपला राजकीय प्रभाव कधी निर्माण करता आला नाही. राजकीय क्षेत्रातच नव्हेतर कामगार क्षेत्रातही सेनेला आपले वर्चस्व उभे करता आले नाही. उलट तिथूनच सेनेसाठी नवे आव्हान उभे राहू लागले. दत्ता सामंत यांच्यासारख्या आक्रमक व हाणामारीची तयारी असलेला नेता उदयास आला व त्याने सेनेशी टक्कर पुढल्या काळात घेतली. दरम्यान आणिबाणी आली आणि तमाम विरोधी नेत्यांना एकोणिस महिने इंदिराजींनी तुरूंगात डांबले. त्यापासून शिवसेना अलिप्त होती. सहाजिकच नंतरच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणूका आल्या, त्यात सेनेला पुन्हा फ़टका बसला. संपले वाटणारे पुरोगामी आणिबाणी विरोधाच्या पुण्याईवर पुन्हा यशस्वी झाले, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा पुरोगामी महिला लोकसभेत जाऊन पोहोचल्या. पुरोगाम्यांमध्ये तेव्हाचा जनसंघ वा आजचा भाजपा सुद्धा सहभागी होता. अशा वादळात सेना कुठल्या कुठे फ़ेकली गेली होती. यावेळी तिला महापालिकेतही फ़टका बसला. १९७८ ही सेनेने लढवलेली मुंबईची तिसरी पालिका निवडणूक. त्यात सेनेची संख्या २० पर्यंत घसरली. तिचे अनेक मोहरे जनता पक्षात निघून गेले, आमदारही झाले. पण या सगळ्या राजकारणापासून बाळासाहेब अलिप्त होते आणि त्यांनी कुठल्याही पराभवाची फ़िकीर केली नाही. त्यांचा निष्ठावान तरूण अनुयायी त्यांच्याशी एकनिष्ठ होता. लोकमत विरोधात गेले तरी अनुयायी ठाम होता. मात्र आपल्यातल्या अंतर्विरोधाने जनता पक्ष आटोपला आणि पुरोगामी राजकारण मुंबईतून जवळपास अस्तंगत झाले. १९७५ ते १९८५ हा काळ सेना संपली असेच मानले जात होते. कारण राजकीय उलथापालथीच्या घटना इतक्या वेगाने घडत होत्या, की राजकारणात अनभिज्ञ असलेल्या सेनेला त्यापैकी कशाचाही अंदाजही येत नव्हता. मात्र आपले वेगळे अस्तित्व टिकवण्याचा अट्टाहास बाळासाहेबांनी सोडला नव्हता. आणिबाणीनंतर इतक्या निराशेची वेळ आली होती, की १९८० ची विधानसभा निवडणूक सेनेने मुंबईतही लढवली नाही. त्यापेक्षा सरळ कॉग्रेसला पाठींबा देऊन विधान परिषदेतल्या दोन जागा मिळवण्यात धन्यता मानली. अंतुले यांना पाठींबा देण्यातून सेनेने वामनराव महाडीक व प्रमोद नवलकर अशा दोन आमदारांना पदरात पाडून घेतले. सहाजिकच सेनेचा जमाना संपला. असेच मानले गेल्यास नवल नव्हते. तसेही होऊ शकले असते. पण ते बिगर कॉग्रेसी व पुरोगामी पक्षांना मान्य नसावे. त्यामुळे इतके होऊनही आपल्या कर्तृत्वावर उभे रहाण्यापेक्षा पुरोगाम्यांनी शिवसेना संपवण्याच मनसुबा कायम राखला. त्यातून आजची राज्यव्यापी शिवसेना उदयास आली. किंबहूना शिवसेना नावाच्या राजकीय पक्षाला त्यातूनच जन्म मिळला असे म्हणायला हरकत नाही.
लहानसहान सगळे पक्ष जनता लाटेत सहभागी झाले असताना बाळासाहेबांनी त्यापासून वेगळे अस्तित्व कायम राखले. दोनतीन वर्षात जनता लाट ओसरली आणि संपुन गेली. मग इंदिरालाट आली आणि त्यात टिकाव लागण्याची शक्यता नसल्यानेच निवडणूकीतून माघार घेतलेल्या शिवसेनेने, आपली नव्याने बांधणी सुरू केली. त्यात बरेच दिवस गेले. पण अशी बांधणी केली, की त्यातून शिवसेनेच्या नेतृत्वाची नवी पिढीच अस्तित्वात आली. १९८० नंतर १९८४ साली निवडणूका आल्या त्याही वादळ घेऊन आल्या. गिरणीसंपाने गिरणगाव सेनेच्या हातून निसटला होता आणि त्यातच इंदिराजींची हत्या झाली. त्यांच्या जागी पंतप्रधान झालेल्या राजीव गांधींनी आईच्या हौतात्म्याचा लाभ उठवण्यासाठी विनाविलंब निवडणूका घेतल्या. त्यात सगळेच पक्ष वाहून गेले. आज ज्यांची दिल्लीवर सत्ता आहे, त्या भाजपाचा पुरता बोर्या वाजला. दोन खासदार निवडून येऊ शकले. शिवसेनेने त्यावेळी भाजपाशी प्रथमच युती केली. दोन उमेदवार भाजपाच्याच चिन्हावर निवडणूक लढले आणि आपटले. भाजपा परत बाजूला होऊन पवारांच्या गोटात गेला. सात वर्षे विरोधात व सत्तेबाहेर राहिलेल्या पवारांनी बिगरकॉग्रेसी राजकारणाची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. पण त्यात दत्ता सामंत व शिवसेना सहभागी झाले नव्हते. सामंत गेले नाहीत आणि पुरोगामी आघाडी म्हणून सेनेला सोबत घेतले गेले नाही. त्यातले सामंत गिरणी संपामुळे त्या राजीव लाटेत सुद्धा लोकसभेवर निवडून गेले आणि दोनच महिन्यात आलेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांचे तीन आमदार सेनेच्या बालेकिल्ल्यातून निवडून आले. शिवसेनेचे छगन भुजबळ कसेबसे जिंकले. शिवसेनेने २० वर्षात विधानसभेत निवडून आणलेला तो तिसरा आमदार होता. अन्यथा शिवसेना पालिकेच्या पुढे मजल मारू शकली नव्हती. मात्र पवारांचा बिगरकॉग्रेसी डाव यशस्वी होऊ शकला नाही आणि वसंतदादांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसने पुन्हा बहूमत मिळवले. एकूणच शिवसेनेच्या वाट्याला भयंकर निराशा आलेली होती. मुंबईतल्या शिवसेनेच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह लागले होते. मात्र बाळासाहेब आपल्या परीने नवनवे धाडस करीत होते. त्यांनीच पुढाकार घेऊन जॉर्ज फ़र्नांडीस व शरद पवार यांना सेनेच्या व्यासपीठावर आणले. त्याच्याही आधी कॉम्रेड डांगेही सेनेच्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करून गेले होते. अशा स्थितीत शिवसेनेला नवी संजिवनी मिळण्याचा योग आला. लोकसभा विधानसभा हरलेल्या शिवसेनेला बाळासाहेबांनी स्वबळावर मुंबई पालिकेच्या लढतीमध्ये उतरवले. बहूमत नाही, तरी सेना एकहाती सत्ता मिळवण्यापर्यंत पोहोचली होती. या निवडणूकीने सेनेच्या दुसर्या पिढीच्या नेतृत्वाचा उदय झाला. सुभाष देसाई, नारायण राणे, छगन भुजबळ, गजानन किर्तिकर, दिवाकर रावते हे याच निवडणूकीने प्रकाशात आले. पण आता शिवसेनेला तिथेच थांबवण्यास पुरोगाम्यांनी नकार दिला होता. आजवर मुंबईत अडकून पडलेल्या सेनेला महाराष्ट्रव्यापी पक्ष बनवण्याचा चंग बांधल्याप्रमाणे मग पुरोगामी पक्ष वागत गेले आणि त्यातून सेनेला राज्यव्यापी पक्ष होण्याखेरीज पर्यायच राहिला नाही.
पुलोद उभी करून पुरोगामी पक्षांच्या नौकेचे सुकाणू हाती घेतलेल्या पवारांनी आपला पक्ष पुन्हा कॉग्रेसमध्ये विसर्जित केला आणि मागल्या दाराने मुख्यमंत्री होण्याचा पवित्रा घेतला. १९९० च्या निवडणूकांपर्यंत सत्तेबाहेर रहाणे पवारांना शक्य राहिले नव्हते. त्यांनी कॉग्रेसची वाट धरली आणि त्यांच्या नादाला लागलेल्या शेकाप, जनता पक्ष वा कम्युनिस्ट वगैरे पक्षांची अवस्था गर्दीत हरवलेल्या बालकासारखी झाली. त्यांना आपण कोण आहोत आणि आपल्या भूमिका कर्तव्ये काय आहेत, त्याचेही भान उरले नाही. पवारांनी आमदार कॉग्रेसमध्ये नेले असले, तरी त्यांच्या पाठीशी जमलेला ग्रामीण तरूण कॉग्रेस विरोधी होता. त्याला नेतृत्व द्यायला पुरोगामी म्हणवणार्या कुठल्याही पक्षाला वा नेत्याला पुढाकार घेता आला नाही. पण त्यामुळे राज्यकारणात जी पोकळी निर्माण झाली, ती कोणीतरी भरून काढण्याची गरज होती आणि तिथे शिवसेना ओढली गेली. त्या काळात शेकाप, जनता पक्ष वा भाजपा यांनी प्रयास केला असता, तरी सेनेला महाराष्ट्रात मुसंडी मारणे शक्य झाले नसते. पण तसा योग नव्हता. बघता बघता सेना खेडोपाडी पोहोचली आणि तिला रोखण्यासाठी शंकरराव चव्हाण असमर्थ असल्याचे मानून राजीव गांधींनी पवारांना मुख्यमंत्रीपदी आणून बसवले. मात्र इतके होऊनही पुरोगामी लोकांची शिवसेनेला संपवण्याची खुमखुमी संपलेली नव्हती. १९८९ जवळ येईपर्यंत खेड्यापाड्यात घुमणारे सेनेचे वादळ ओळखून, प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांनी युतीचा प्रस्ताव टाकला. बाळासाहेबांनी तो स्विकारला. त्याची झलक पुढल्या लोकसभा मतदानात मिळाली. सेनेचे चार तर भाजपाचे दहा खासदार निवडून आले. तथाकथित पुरोगामी राजकारणाला लागलेली ती अखे्रची घरघर होती. खरे तर त्यांनी सेनेला संपवण्याच्या पोरखेळात पडण्यापेक्षा आरंभापासून स्वतंत्र काम केले असते, तर सेना वाढलीच नसती. पण तसे होऊ शकले नाही. सेनेला वा तिच्या हिंदूत्वाला विरोध करताना थेट मुस्लिम धर्मांधता व पाकिस्तानची बाजू घेण्यापर्यंत पुरोगाम्यांची घसरण होत गेली. तर त्यांची रिकामी होणारी जागा भाजपा शिवसेना व्यापत गेले. १९९० सालात शिवसेना विधानसभेतला विरोधी पक्ष बनला. तिच्यापुढे पुरोगामी पक्ष खुजे व नगण्य भासू लागले. १९९५ सालात तर सेना भाजपासह सत्तेवर आली. तिचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात राज्य करू लागला. पवारांचे छुपे पाठीराखेच अपक्ष आमदार होते, त्यांच्याच पाठींब्याने सेना सत्तेवर बसू शकली होती. पण हे बघण्याइतके भान पुरोगाम्यांना कधीच नव्हते. त्यांचा आंधळा सेनाविरोध कायम राहिला. मग १९९९ सालात मध्यावधी निवडणूका आल्या. तेव्हा पवार पुन्हा कॉग्रेसमधून बाहेर पडलेले होते. राष्ट्रवादी नावाचा नवा पक्ष काढून त्यांनी आपले बळ आजमावून बघितले. पण १९८० वा १९८५ च्या पुढे मजल जाऊ शकली नाही. मात्र सेना-भाजपा युतीला सत्तेत जाऊ द्यायचे नाही असा चंग बांधलेल्या तथाकथित पुरोगाम्यांनी आत्महत्या केलीच.
युतीला कमी जागा मिळालेल्या असल्या तरी दोन्ही कॉग्रेसच्या बेरजेपेक्षा अधिक होत्या. मात्र सोनियांनाच विरोध करीत बाहेर पडलेले असल्याने पवार पुरोगामी पक्षांच्या आघाडीत सहभागी व्हायला राजी नव्हते. तेव्हा जनता दल, शेकाप, रिपब्लिकन, कम्युनिस्ट यांच्यासह पुरोगामी पत्रकारांनी मध्यस्थी केली आणि नवी पुरोगामी आघाडी उभी केली. त्यामुळे शिवसेना भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याचा डाव यशस्वी झाला. मात्र पुढल्या पाच वर्षात ही पुरोगामी आघाडी बनवण्यात पुढाकार घेणारे पक्ष शिल्लक उरले नाहीत. दोन्ही कॉग्रेसने मिळून १५ वर्षे अव्याहत सत्ता भोगली आणि शिवसेना सत्तेपासून वंचित राहिली. पण संपली नाही की कमजोर झाली नाही. उलट सेनेला संपवण्याच्या नादात चार दशके अथक प्रयास करणारे महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी पक्षच नामशेष होऊन गेले. आज घडीला जनता दल, कम्युनिस्ट ह्या पक्षांना विधानसभेत स्थान नाही. शेकाप व मार्क्सवादी एकदोन जागा मिळवून तग धरून आहेत. पण शिवसेनेच्या स्थापनेपासून तिला संपवण्याचा विडा उचललेले बहुतांश पक्ष आज नामशेष होऊन गेले आहेत. कधीकाळी कॉग्रेसला भांडवलदारांचा उजवा किंवा प्रतिगामी पक्ष म्हणून कडाडून विरोध करता करता, तेच डावे पक्ष कॉग्रेसला वाचवताना आत्मसमर्पण करून गेले. आज त्यांचे नामोनिशाण उरलेले नाही आणि त्यांच्याजागी कॉग्रेसच पुरोगामी म्हणून तोतयेगिरी करीत असते. मागल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला पन्नासावे वर्ष लागले आणि प्रथमच ही संघटना स्वबळावर संपुर्ण महाराष्ट्रात लढली. तिने एकट्याने लढून ६३ आमदार निवडून आणले. कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्यापेक्षा अधिक मते मिळवली आणि आज विधानसभेतला दुसर्या क्रमांकाचा पक्ष असे तिचे स्थान आहे. सवाल इतकाच आहे, की सेनेच्या उदय काळात सेनेला प्रतिगामी ठरवून तिला संपवताला सिद्ध झालेल्या विचाराधिष्ठीत पुरोगामी पक्षांचे आज काय शिल्लक उरले आहे? महाराष्ट्रातच नाही, तर देशभराती्ल स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे पक्ष र्हास पावले आहेत.
आज पन्नास वर्षे उलटून गेल्यावर तरूणांची झुंड म्हणून जमलेल्या एका जमावाचे राज्यव्यापी पक्षात रुपांतर झाले आहे. विविध क्षेत्रात ते काम करीत आहेत, आपले संघटन बांधून शिवसेना मिरवत आहे. पण वैचारिक आढ्यतेने त्याच अर्धशतकात सेनेला संपवायला निघालेले तेच पक्ष व संघटना कुठे आहेत? ज्या कम्युनिस्ट पक्षाशी सेनेचा पहिला संघर्ष मुंबईत झडला, त्याचा तर आज देशभरातून लोकसभेतही सदस्य उरला नाही. या पुरोगामी म्हणवणार्या पक्षांना जयललिता, ममता बानर्जी किंवा मुलायमसिंग, मायावती अशा व्यक्तीकेंद्री पक्ष वा संघटनांच्या मागून फ़रफ़टावे लागते आहे. अगतिक होऊन त्याच कॉग्रेसच्या तोतया पुरोगामीत्वावर शिक्कामोर्तब करावे लागते आहे. पण एकाही पुरोगामी विचारांच्या वारसाला आपल्या पुर्वजांचे काय चुकले, याचा फ़ेरविचार करण्याची इच्छा झालेली नाही. केजरीवाल किंवा कन्हैयाकुमार यांच्यासारखा कोणीही भुरटा येतो आणि हे त्याच्या मागे उद्धारकर्ता म्हणून अगतिक होऊन धावू लागतात. म्हणूनच शिवसेनेच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीचा तिच्या राजकीय यशापयशापेक्षा, तिच्या विरोधात खंबीरपणे उभ्या ठाकलेल्यांच्या र्हासाचा अभ्यास अधिक उपयुक्त व मनोरंजक ठरू शकेल. इथे नुसता त्याचा धावता आढावा घेतलेला आहे. पण देशभरच्या पुरोगामी चळवळीचा र्हास आणि शिवसेनेची वाटचाल, हा संयुक्त विषय बारकाईने अभ्यासाचा आहे. प्रामाणिकपणे झाला तर कदाचित पुरोगामी विचार व चळवळीच्या पुनरूत्थानाला त्याचा थोडाफ़ार हातभार लागू शकेल.
चपराक दिवाळी २०१६
जबरदस्त भाऊ मोदीजी विशेष अंका नंतर तशीच ऊंची असलेले लिखाण जुना काळ समोर चित्रपटा सारखा उभा राहिला भविष्यात सेना किंवा भाजपा हेच सत्ताधारी व विरोधकही हेच फक्त उद्धव साहेबांनी थोड धिराने घ्यायला हवे
ReplyDeleteभाऊ मला आपल्या ब्लॉग पर्यंत पोहचायला जरा वेळ लागला, परंतु इथे वाचन करून खरी वास्तुस्तिथी समजून घेण्यास खूप मदत होत आहे. धन्यवाद....!
ReplyDeletevery nice bahukaka
ReplyDeleteसखोल अभ्यास आणि उत्कृष्ट लिखाण!!!
ReplyDeleteबऱ्याच गोष्टी तपशीलवार समजल्या.
Khup sundar
ReplyDeleteसखोल अभ्यास आणि उत्कृष्ट लिखाण!!!
ReplyDeleteबऱ्याच गोष्टी तपशीलवार समजल्या.
छान भाऊ.
ReplyDeleteएका ग्रंथाचा विषय एका लेखात मांडण्याच्या कौश्यल्यासाठी भाऊंना मानल.भाऊ,सलाम.
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteलेख जबरदस्त आहे. बाळासाहेबांनी नेहमी स्वत:चं अस्तित्व वेगळं राखण्यावर भर दिला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव यांचं कालचं विधान अनाकलनीय आहे. मोडी जर पवारांबरोबर जाऊ शकतात तर आम्ही ममतासोबत का जाऊ नये, असं ते विधान आहे. एरवी यांत खटकण्यासारखं काही नाही. पण आज मोदींनी १००० व ५०० च्या जुन्या नोटा रद्द करून काळ्या पैशाविरुद्ध आघाडी उघडली आहे. अशा वेळेस ममताबरोबर जाण्याच्या गप्पा कशासाठी? उगीच स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड कशाला मारून घेत आहेत उद्धव? गुपचूप राहून कार्यभाग साधायला हवा ना? भले जिल्हा सहकारी बँकांत पैसा नसला तरी त्याविरुद्ध जनमत प्रक्षुब्ध नाहीये. उलट जनता मोदींच्या बाजूने उभी आहे. ममतांच्या बरोबर जाणे म्हणजे जनतेच्या मते काळ्या पैशाची पाठराखण करणे असा अर्थ होऊ घातला आहे. म्हणून वादग्रस्त वक्तव्यं टाळलेली बरी.
संघ वैचारिक भूमिका घेतो आणि भाजप राजकारण करतो. अशी विभागणी शिवसेनेत नाही. यावर उद्धवना गांभीर्याने विचार करायला पाहिजे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
बरोबर आहे
Deleteहे असे विश्लेषण कुठे हि वाचायला मिळाले नव्हते।
ReplyDelete