हेरगिरी वा गुप्तचर विभाग याविषयी सामान्यत: लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात. जेम्स बॉन्ड किंवा राम्बो असे चित्रपट बघितलेले असतात किंवा तत्सम कथा कादंबर्या वाचलेला वर्ग आपल्या काही कल्पना डोक्यात घेऊनच बातम्या चाळत वाचत असतो. त्यामुळेच पाकिस्तानी वकिलातीतला असा कोणी पाकहेर पकडल्याच्या बातमीने तशाच काही चमत्कारीक समजूती समोर आल्यास नवल नाही. त्याचे कारण वर्तमानपत्रातून येणार्या बातम्या अधिक गोंधळ माजवणार्या असतात. गुप्तहेर वा गुप्तचर हे कसे काम करतात, याविषयी बरेचसे अज्ञान त्याला कारण आहे. मुळात असा विभाग कुठल्याही देशाला स्थापन करावा लागतो, त्याचे कारण समजून घेतले पाहिजे. जी कामे आपल्याच देशाच्या वा अन्य कुठल्या देशाच्या कायद्यानुसार उरकता येत नाहीत, ती बेकायदा कामे करून घेण्यासाठी गुप्तचर खात्याची सरकारला गरज भासत असते. नेमक्या शब्दात सांगायचे तर बेकायदा कामे पार पाडण्यासाठी सरकारला एक बेकायदा कृत्ये उरकणारे खाते चालवावे लागते. त्याला गुप्तचर खाते म्हणतात. उदाहरणार्थ हा जो कोणी पाकिस्तानी हेर पकडला गेला आहे, त्याला पकडल्यावरही निमूट सोडून द्यावे लागले. कारण त्याला राजनैतिक सवलत होती. त्याला इथले कुठले कायदे पकडू शकत नाहीत, की शिक्षा देऊ शकत नाहीत. कारण तो परदेशी मुत्सद्दी आहे आणि त्याचा सन्मान राखणे कायद्याने आवश्यक मानले आहे. कारण तो सभ्यपणे व कायद्याच्या चौकटीतच वागेल, अशीही अपेक्षा असते. तो तसे वागण्याची कुठली हमी नसते. तरीही त्याच्यावर पाळत ठेवणे अशक्य असते. मग त्याच्या नकळत हे काम कोणाला तरी करावे लागते आणि ते बेकायदाच असते. ते काम इथले गुप्तचर करीत असतात. कालपरवा दिल्ली पोलिसांनी पाक वकिलातीत असलेल्या मेहमूद अख्तरला पकडले. पण त्याची कुंडली कोणी तयार केलेली होती?
हा इसम इथे काय उचापती करतो आहे, त्यावर स्थानिक पोलिस नजर ठेवत नाहीत. ते काम गुप्तचर विभाग करीत असतो. कोणीही नवी व्यक्ती परदेशी वकिलातीत दाखल झाली, मग त्याची ओळखपत्रे व प्राथमिक माहिती भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाला मिळत असते. त्यातला खरेखोटेपणा, छाननी गुप्तचर विभाग करीत असतो. ते काम स्थानिक पोलिस करू शकत नाहीत. कारण हाती आलेली माहिती संबंधिताच्या मायदेशीही जाउन तपासून बघणे आवश्यक असते. तशी साधनसामग्री सुविधा स्थानिक पोलिसांकडे नसतात. पण गुप्तचरांकडे अशी साधने असतात. तशा मार्गाने अशा व्यक्तीचे मायदेशीचे वा अन्यत्र ‘गाजवलेले कर्तृत्व’ तपासले जाते. तसेच त्याचे इथले वागणे वावरणेही नजरेखाली असते. तो माणूस कोणाला भेटतो, कोणाशी त्याची जवळीक आहे. कोणाशी त्याचे कुठले व्यवहार चालू आहेत. त्याच्याशी इथला कोणी काय व्यवहार करतो, यावरही नजर ठेवली जात असते. अशा व्यक्तीला इथे पाठवले जाते, ते दोन देशातील संबंध चांगले होण्यासाठी अजिबात नाही. तर त्याच्या देशाचे हित जपण्यासाठी वा त्याच्या देशाच्या हिताला बाधा आणणार्या गोष्टी रोखण्यासाठीच, तशी व्यक्ती पाठवलेली असते. थोडक्यात कुठल्याही वकिलातीत काम करणार्यांमध्ये मोठ्या संख्येने गुप्तहेर वा हेरगिरी करू शकणार्यांचा भरणा असतो. काही डझन लोक वकिलातीमध्ये काम करतात, ते सगळेच मुत्सद्दी नसतात. त्यातले अर्धेअधिक हेरगिरीतलेच जाणकार असतात. त्यामुळेच अशा लोकांवर बारीक नजर ठेवली जात असते. आताही तीन वर्षे दिल्लीच्या पाक वकिलातीमध्ये काम करणार्या मेहमूद अख्तर याला आज पकडले असले, तरी त्याच्यावर कितीकाळ पाळत ठेवलेली असेल, हे सांगता येणार नाही. त्याला संशयही येऊ नये अशा पद्धतीने पाळत ठेवली, तरच त्याचे सर्व धागेदोरे हाती येत असतात.
आपण आज अख्तरकडे शत्रू म्हणून बघतो आहोत. पण महिन्याभरापुर्वी जो सर्जिकल स्ट्राईक पाक हद्दीत जाऊन आपल्य सैनिक कमांडोंनी केला, त्यासाठी पाकमध्ये कार्यरत असलेल्या भारताच्या काही हस्तकांनी दिलेली बहुमोल माहिती उपयुक्त ठरली, हे विसरता कामा नये. एकाच वेळी सात जागी भारतीय कमांडोंनी प्रतिहल्ला केला होता आणि त्यात अनेक जिहादी व पाकसैनिक मारले गेले होते. ही नेमकी माहिती तिथे असलेल्या भारतीय हस्तकांनीच दिलेली होती. असे हस्तक गोळा करण्याचे व त्यांना काळजीपुर्वक हाताळण्याचे काम कोणाला तरी करावे लागत असते. गद्दार प्रत्येक देशात आणि समाजात असतात. काही असंतुष्ट असतात, त्यांना देशद्रोहाला प्रवृत्त करण्याचे काम मोठे जिकीरीचे असते. अनेकदा त्यांच्या नकळत वा काही प्रसंगी त्यांना आमिष दाखवून जाळ्यात ओढावे लागत असते. अख्तर तेच काम करत होता आणि आपलेही अनेक हेर पाकिस्तानात तेच काम करीत असतात. दुर्दैव असे, की काही नाकर्त्या लोकांमुळे गेल्या दोन दशकात भारताचे जगातील व देशांतर्गत गुप्तचेर जाळे विस्कळीत होऊन गेले. वाजपेयींच्या आधी इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना त्यांनी भारतीय हेरखात्याला पाकिस्तानातला गाशा गुंडाळायला भाग पाडले होते. त्यानंतरच आपण इथे घातपात व दहशतवादाची मोठी किंमत मोजलेली आहे. कारगिलमध्ये राजरोस घुसखोरी होऊ शकली आणि आपल्याला ताकास तुर लागला नाही. त्याला गुप्तचर खाते नव्हेतर नाकर्ते दिवाळखोर राजकारणी जबाबदार होते. त्यांच्या राजकीय आदर्शवादाने गुप्तचर खात्याचा गळा घोटला गेला आणि मग त्याची किंमत जिहादी हिंसेतून भारतीय जनतेला मोजावी लागली. सांगण्याचा हेतू इतकाच, की हेरगिरी व हेरखात्याचे काम हा सनसनाटी बातम्यांचा विषय नाही. ते अतिशय कुशल व जीवावरचे काम असते.
वरकरणी दोन देश मित्र वा शत्रू असतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक देश आपापले हितसंबंध जपण्यासाठी दुसर्याच्या विरोधात कारस्थाने करीतच असतो. त्यासाठीच अशा गुप्तचर खात्याचा वापर होत असतो. अमेरिकेची पाकिस्तानशी असलेली दोस्ती सगळ्यांना माहिती आहे. पण ओसामाचा बंदोबस्त करताना पाक हेरखाते दगाबाजी करत असल्याचे लक्षात आले. मग अमेरिकन हेरखात्याने त्यांनाही अंधारात ठेवून ओसामाचा सुगावा लावला होता आणि एकदिवस पाकला अंधारात ठेवून ओसामाचा काटाही काढला होता ना? त्यासाठी अमेरिकन स्वयंसेवी संस्थांच्या निधीवर आरोग्यसेवेचे काम करणार्या पाकिस्तानी स्वयंसेवी संस्थांना वापर हेरखात्याने कुशलतेने करून घेतला होता. तितकेच नाही तर पाक माध्यमे व पत्रकारांनाही त्यात कामाला जुंपले होते. पण यापैकी अनेकांना आपण अमेरिकन हेरखात्यासाठी काम करतोय याचाही पत्ता नव्हता. आज त्यापैकी एक स्वयंसेवी डॉक्टर पाकिस्तानी तुरूंगात खितपत पडला आहे. ही बाब लक्षात घेतली तर गुप्तचर, परकीय हेर किंवा त्यांच्यासाठी काम करणारे लोक; यांच्याविषयीचे आपले गैरसमज दूर होऊ शकतील. भारतातही अनेक स्वयंसेवी संस्थांचे पेव फ़ुटलेले आहे. त्यातले अनेकजण नेमके काय करतात आणि त्यांना परदेशी आर्थिक मदत कशाला मिळते, याचा अंदाज येऊ शकतो. पाकिस्तानी वकिलातीमध्ये काम करणार्या या मेहमूद अख्तरचे प्रकरण तुलनेने किरकोळ आहे. यापेक्षा मोठमोठी प्रकरणे आज राजरोस चालू आहेत. ते पाकिस्तान-चीन वा अन्य कुणा देशाच्या शत्रूला कशी मदत करतात, ते उलगडून सांगणेही अवघड आहे. कारण त्यांचे काम देशद्रोही भासणारे नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे. कदाचित काही लोकांचे कृत्य उदात्तही दिसणारे असू शकते. पण त्यांचा बोलविता धनी असाच कुठेतरी परदेशी बसलेला असतो. कारण हा सगळा शह काटशह देण्याचा खेळ असतो.
मस्तच भाऊ
ReplyDeleteमला वाटतय देशाची सुरक्षा गेली ऊडत,मी तरबॉर्डर वर जाऊन लष्काराची कारवाई रेकॉर्ड करील,ताजमहल अँटक ची ब्रेंकीग न्युज बनवील,दहषतवाद्याशी इंटरव्यू घेईल,मला फक्त अतातायी पना पाहीज्,माझ चँनेल चा टीआर पी वाढला पाहीजे,मग माझे देशभक्त , नागरीक मेले तरी चालतील ,आणि कोण माझ वाकड करील,अभिव्यक्ती स्वांतत्र झिंदाबाद,सोषल मिडीया ऊदोउदो.ndtv support...
ReplyDelete