Tuesday, December 6, 2016

संभाजी ब्रिगेडचे स्वागत

Image result for sambhaji brigade logo

गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या विविध जिल्हे व शहरात आपल्या मराठा अस्मितेचा प्रभाव पाडणार्‍या संभाजी ब्रिगेड या संघटनेने आता राजकारणात प्रवेश केला आहे. तशी ही संघटना राजकारणापासून दूर नव्हती. कारण अधूनमधून तिचा संबंध विविध राजकीय नेत्यांशी व पक्षांशी जोडला जात होता. पण त्यात अंधुकता होती. शिवाय या संघटनेचे मार्गदर्शक वा संयोजक मानले जाणारे पुरूषोत्तम खेडेकर, यांच्या पत्नीच दोनतीनदा तरी भाजपच्या आमदार राहिलेल्या आहेत. त्यामुळे या संघटनेची नेमकी राजकीय भूमिका कोणती व बांधिलकी कुठल्या बाजूला, त्याचे कधी स्पष्टीकरण होऊ शकलेले नव्हते. ज्या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या संघटनेने आपला आकार धारण केला, त्याच संस्थेने यापुर्वी वेगळा धर्म स्थापन करण्याचाही प्रयास केला होता. शिवधर्म असे त्याचे नाव होते. त्यात बहुतांश मराठा बुद्धीमंतांना एकत्र आणून एक वेगळी मांडणी महाराष्ट्रात करण्याचाही प्रयास झाला होता. पण राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रात प्रभावी असलेल्या मराठा नेतृत्वाने, त्यांची फ़ारशी डाळ शिजू दिली नाही. तर त्यांना सतत खेळवले हे नाकारण्यात अर्थ नाही. त्या आरंभीच्या उत्साहात धर्माच्या स्थापनेनंतर वेगळी राजकीय चुलही मांडण्याचा प्रयास झालेला होता. शिवराज्य पक्ष नावाचा तो प्रयास फ़ारसा मुळ धरू शकला नाही. शिवधर्मही फ़ारसा मजल मारू शकला नाही. त्यापैकॊ संभाजी ब्रिगेड वगळता बाकी प्रयासांना फ़ारसे काही करता आले नाही. पण ह्या माध्यमातून संघ वा हिंदूत्ववादाला शह देण्याचे काही राजकारण होत असल्याची शंका व्यक्त होत राहिली. आपल्या आक्रमक मराठा अस्मितेमुळे आणि त्याला असलेल्या ब्राह्मणविरोधी झालरीमुळे, ब्रिगेड गाजत राहिली. तरीही कुठला राजकीय ठसा कुठल्याही क्षेत्रात उमटू शकला नाही. त्यातच जे पारंपारिक कॉग्रेसी मराठा नेतृत्व होते, तेही विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष उदयास येतो आहे.

अर्थात तो पक्ष अकस्मात पुढे आला वा स्थापन झाला, असे मानण्यात अर्थ नाही. विद्यमान काळात त्याची दोन कारणे संभवतात. पहिले कारण मध्यंतरीच्या कालखंडात राज्यभर उठलेले मराठा क्रांती मोर्चाचे वादळ आहे. मराठा अस्मितेला इतका प्रतिसाद स्वातंत्र्योत्तर काळात कधी मिळाला नाही. कित्येक नेत्यांनी आपापल्या मराठा संघटनांच्या माध्यमातून केलेल्या कुठल्याही प्रयासांना मराठा समाजाकडून इतका प्रतिसाद मिळालेला नव्हता. सर्व मराठा संघटना एकत्र येऊन मराठा आरक्षणाची मागणी करण्याचे सोहळे झाले; त्यालाही असा उत्स्फ़ुर्त पाठींबा मराठा समाजातून मिळू शकला नव्हता. पण कोपर्डी येथील मराठा मुलीवरच्या बलात्कारानंतर कुठल्याही मराठा संघटनांनी वा नेत्यांनी आवाज उठवला नसताना; प्रतिक्रीया म्हणून हे क्रांती मोर्चे निघू लागले. त्यामुळे अशा भावनात्मक व अस्मितेच्या विषयावर मराठा समाज एकजूट होऊ शकतो; याचा साक्षात्कार घडून आला. पण कुठल्याही जुन्या वा प्रस्थापित मराठा नेत्यांना वा संघटनांना त्यात नेतृत्व नाकारण्यात आलेले होते. आता ते वादळ हळुहळू मावळले आहे. त्यामुळेच मराठा क्रांती मोर्चाचे पुढे काय, असाही प्रश्न होताच. त्याचा लाभ उठवण्याचा संभाजी ब्रिगेड वा मराठा सेवा संघाने विचार केला असू शकतो. त्यात गैर काहीच नाही. लोकपाल चळवळीचा लाभ उठवून केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी राजकारणात आपले बस्तान बसवलेले आहे. त्याप्रमाणेच ब्रिगेडही मराठा मोर्चाचा लाभ उठवू बघत असेल, तर त्यांना चुकीचे म्हणायचे कारण नाही. प्रत्येक पक्ष व राजकीय संघटना अशाच कुठल्या तरी वादळातूनच उदयास आलेल्या आहेत. मग तशी संधी ब्रिगेडला नाकारण्याचे काही कारण नाही. बहूधा त्या मुळच्या सामाजिक संघटनेला मोर्चातूनच स्फ़ुर्ति मिळालेली असावी. पण राजकीय पक्ष आणि संघटना यात मूलभूत फ़रक असतो, हे विसरून चालणार नाही.

मराठा मोर्चाचा जातीय वा सामाजिक अस्मिता म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण कुठलाही राजकीय मराठा नेता, आपले पुरोगामी मुखवटे उतरवून त्या जमावाचे नेतृत्व करायला पुढे सरसावला नाही. त्यामुळेच अन्य जाती समुदायाप्रमाणे अस्मितेचे नेतृत्व करण्याच्या बाबतीत राजकीय पोकळी दिसून आलेली होती. शिवाय कॉग्रेस राष्ट्रवादी हे मराठ्याचे छुपे राजकीय नेतृत्व सध्या बिखरून गेलेले आहे. त्यामुळेही पोकळी निर्माण झालेली आहे. त्यातूनही ब्रिगेडला पुढाकार घेण्याची कल्पना सुचलेली असू शकते. पण समाजकारण व राजकारण यातला फ़रक नाकारून निवडणूकीच्या आखाड्यात उतरता येत नसते. उघडपणे जाती वा धर्माचे राजकारण करता येत नाही. आणि करता आले तरी त्यातून राजकीय यश मिळणे दुरापास्त असते. कारण मतदारसंघ विविध समाजघटकांमध्ये विखुरलेला असतो. त्यातला मोठा समाजघटक एकजीव होऊन मतदान करू शकला, तरच संख्याबळावर मात करता येत असते. पण सहसा मोठा समाजघटक एकजीव होऊन मतदान करत नाही, ही त्यातली त्रुटी आहे. शिवाय मराठा समाजाने आजवर सतत सर्वसमावेशक सामंजस्य दाखवलेले आहे. नेत्यांनी कितीही राजकीय आवेश आणला, तरी समाजाने कधीही जातीय अस्मिता डोळ्यापुढे ठेवून मतदान केल्याचे आढळून आलेले नाही. आपल्या पंखाखाली वा सोबत अन्य लहानसहान समाजांना घेऊन जाण्याचा, मोठेपणा मराठ्यांनी दाखवला आहे. प्रचलित राजकारणातले प्रवाह ओळखून काळानुसार मराठा समाज वाटचाल करत राहिला आहे. तसे नसते तर महाराष्ट्र इतक्या प्रगतीपथावर जाऊ शकला नसता. ही स्थिती लक्षात घेतली, तर मराठा अस्मितेवर वा जातीय बळावर मराठ्यांचा पक्ष उभा करणे, हे ब्रिगेडसाठी मोठे आव्हान असेल. कारण मराठा समाज नुसता मोठेपणाचा आव आणणारा नाही, तो मनाचा मोठेपणाही दाखवणाराही आहे ना?

थोडक्यात मराठ्यांना प्राधान्य, पण विविध लहानमोठ्या समाजांना सोबत घेऊन जाण्याला कितपत प्राधान्य दिले जाते; त्यावर या नव्या पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल. आजवरची ब्रिगेडची भूमिका कडवी आणि हिंदूत्वाला झुगारणारी राहिली आहे. पण आज हिंदू समाजातील हिंदूत्वाच्या अस्मितेची पताकाच मुळात उच्चभ्रू म्हणून मराठ्यांच्या खांद्यावर आलेली आहे. कारण मोठ्या संख्येने मराठाच मध्यमवर्ग म्हणून विकसित झाला असून, राज्यात भाजपा वा शिवसेनेला खेडोपाडी मिळालेले यश त्याचा पुरावा आहे. मराठा मोर्चा नंतरही नगरपालिका मतदानात त्याच दोन पक्षांना मिळालेला प्रतिसाद हिंदूत्वाला झुगारणारा नाही, तर प्रतिसाद देणारा आहे. याचेही भान ब्रिगेडला ठेवावे लागेल. थोडक्यात भाजपाने कॉग्रेसी प्रभावाखालून मराठा समाज आपल्याकडे आकर्षित करताना घेतलेल्या भूमिकेत ब्रिगेडला यावे लागेल. त्यासाठी कुठली वैचारिक मांडणी या नव्या पक्षाने केलेली आहे? ती बघावी लागेल. प्रामुख्याने मराठा मोर्चाचे वादळ सुरू झाल्यापासून ‘फ़ुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र’ ही भाषा कुठल्या कुठे अस्तंगत होऊन गेलेली आहे. मोर्चामध्ये भगवे ध्वज सर्वत्र झळकत व फ़डकत होते. त्याकडे बघता ब्रिगेडला हिंदूत्वाला झुगारून आपला राजकीय पवित्रा पुढे रेटता येणार नाही. त्याविषयी या पक्षाचे ओणते आकलन आहे, ते बघावे लागेल. कारण राजकीय पक्षाला नुसती नोंदणी वा संघटना करून भागत नाही. त्याला आपला हक्काचा मतदार जमवावा लागतो आणि त्याला चुचकारताना अनेक तडजोडी कराव्या लागत असतात. त्या बाबतीत काय सज्जता केलेली आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या नव्या पक्षाला द्यावी लागणार आहेत आणि शोधावीही लागणार आहेत. आवेशाचा गणवेश उतरून मतदाराला झुलवावे लागणार आहे. कारण इथे मतांची शक्ती काम करते. त्या आखाड्यात उडी घेणार्‍या या नव्या पक्षाला शुभेच्छा व स्वागत!

4 comments:

  1. निवडनुक चिन्ह चांद-तारा

    ReplyDelete
  2. भाऊ किमान एकदा आपण या ब्रिगेडचा इतिहास तपासून पहायला हवा होता असं राहून राहून वाटलं .
    स्त्रियांविषयी अत्यंत घाणेरडं लिहीणाऱ्या खेडेकर आणि त्याच्या पक्षाचं समर्थन मी तरी करणार नाही .
    राहिला प्रश्न मराठा मोर्च्याचा . तर पहिला मोर्चा कोणी काढला आणि कोणी समर्थन दिलं हे एकदा जाणून घेतलंत तर बरं होईल .

    ReplyDelete
  3. सखेद आश्चर्य वाटले भाऊ :(

    ReplyDelete
  4. सखेद आश्चर्य वाटले भाऊ :(
    भाऊ किमान एकदा आपण या ब्रिगेडचा इतिहास तपासून पहायला हवा होता

    ReplyDelete