२०११ सालात तामिळनाडूत विधानसभा निवडणूक झाली होती. तेव्हा जयललिता आपल्या बळावर सत्ता मिळवण्याच्या स्थितीत नव्हत्या. देशात युपीएचे राज्य होते आणि त्यात द्रमुक सहभागी होता. तामिळनाडूत द्रमुक व मित्रपक्षांनी २००९ मध्ये बाजी मारलेली होती आणि म्हणूनच लोकसभेतही जया अम्माच्या अण्णा द्रमुकची बाजू खुप लंगडी होती. अशावेळी सत्तेपर्यंत पोहोचण्याला महत्व असते. बहूमत गाठून सत्ता मिळवण्यासाठी व आपले अस्तित्व जपण्यासाठी अम्मानी विजयकांत नामक एका अभिनेत्याच्या किरकोळ पक्षाची मदत घेतली होती. या विजयकांतनी आधीच्या निवडणूकीत डीएमडीके असा नवा द्रविडी पक्ष काढून जी मतविभागणी केली’ त्याचा लाभ द्रमुकला मिळाला होता. तर फ़टका अम्माला बसला होता. अधिक द्रमुकने कॉग्रेसशी युती करूनही बाजी मारलेली होती. विजयकांत याला आपली एक जागा जिंकण्यापलिकडे मोठे यश मिळाले नव्हते. पण राज्यभर त्याच्या बाजूने दोनतीन टक्के मते पडतात, हे गणित समोर आलेले होते. तसेच जया अम्मालाही आपली त्रुटी लक्षात आलेली होतीच. विजयकांतची दोनतीन टक्के मते सोबत आली, तर अण्णा द्रमुकला कमी जागा लढवून बहूमताचे आमदार जिंकता येतील; हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच जयललिता यांनी विजयकांत यांच्याशी युती केली आणि चांगल्या ४०-४५ जागा त्याला सोडल्या. आपण जिथे जिंकूच शकत नाही अशा जागा इतरांना सोडून जिंकण्याची शक्यता असलेल्या ४०-५० जागा मिळवण्याची संधी साधण्याला राजकारण म्हणतात. जया अम्माने तोच शहाणपणा दाखवला आणि त्याचा लाभ उठवला होता. त्यांच्या पक्षाला कमी जागा लढवून स्पष्ट बहूमत मिळाले आणि त्यांच्याच सोबत युती केलेल्या विजयकांत यांच्या पक्षाला दुसर्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या होत्या. मैत्रीचा हात पुढे करणार्या पक्षाची ही कुवत शिवसेनेला ओळखता आली पाहिजे.
रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्ति बाळा नांदगावकर युतीची शक्यता लक्षात घेऊन मातोश्रीवर पोहोचले. त्याचा व्यापक अर्थ उद्धव ठाकरे यांनी समजून घेतला, तर त्यांना त्यात दुरगामी राजकारणाच्या शक्यता शोधता व साधता येऊ शकतील. त्यासाठी तामिळनाडूचे सहा वर्षापुर्वीचे उदाहरण बोलके आहे. विजयकांतला २५ टक्के जागा सोडण्यार्या जयललितांनी आपल्यासाठी बहूमताची बेगमी केलीच होती. पण त्याचवेळी या नुसत्या बेरजेने द्रमुकला तिसर्या क्रमांकावर फ़ेकून दिलेले होते. परिणाम असा झाला, की बहूमताचे सरकार अम्माने बनवले. पण त्यात विजयकांत सहभागी झाले नाहीत आणि त्यांनीच विरोधी नेतेपदाचा मान घेतला. पर्यायाने विरोधी पक्ष इतकीही द्रमुकला मान्यता राहिली नाही. विजयकांतची कुवत स्वबळावर दोनचार जागाही जिंकण्याची नव्हती. पण त्याने जयललिताशी हातमिळवणी करून २८ आमदार पदरात पाडून घेतले होते. तर जया अम्माने स्वपक्षाला बहूमत मिळवून घेतले होते. मग २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत तोच विजयकांत आपल्या पक्षासह भाजपाच्या गोटात गेला आणि अन्य किरकोळ पक्षही भाजपाच्या आघाडीत सहभागी झाले. कॉग्रेस कुठेच नव्हती आणि तिरंगी लढतीमध्ये तामिळनाडूच्या बहुसंख्य लोकसभा जागाही जया अम्माला मिळाल्या. विजयकांतला एकही जागा जिंकता आली नाही. २०११ मध्ये विजयकांतला हाताशी धरण्यातून जयललिता पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. मग त्यांनी आपले बस्तान असे बसवले की २०१६ सालात त्यांना विजयकांतचीही गरज उरली नाही. स्वबळावर निवडणुका लढवून जयललिता सलग दुसर्यांदा सत्तेत आल्या. पण त्यांनी पाच वर्षापुर्वी विजयकांतशी तडजोड केली नसती, तर त्यांना इतके सावरता आले असते काय? विजयकांतच्या पक्षाची तेव्हा काय औकात होती? पण त्याने अम्माना आपल्या पायावर उभे करून दिले, असा इतिहास आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी जयललिता यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक खटले दाखल केले आणि त्यामुळेच अम्मांना दिर्घकाळ तुरूंगात खितपत पडावे लागलेले आहे. आजही त्यांच्या विरोधातल्या अनेक खटल्यातून मृत्यूनेच त्यांची सुटका केली. पण साथीदार म्हणून आरोपी असलेल्या शशिकला नटराजन आजही त्याच चिखलात फ़सलेल्या आहेत. त्यांना अशा कर्दमात ढकलणार्या स्वामींशी त्या़च जयललितांनी एकदा संगनमत केले होते. वाजपेयी सरकारने द्रमुकच्या करूणानिधी सरकारला बडतर्फ़ करावे, अशी अम्माची मागणी होती. ती अमान्य झाल्यावर अम्मा व सोनियांची भेट स्वामींनी घडवून आणली होती. त्यानंतरच अम्माने राष्ट्रपती भवनात जाऊन वाजपेयी सरकारचा पाठींबा काढून घेतला. त्यामुळे विश्वास ठराव आणावा लागला आणि अखेरीस अवघ्या तेरा महिन्यांचा कालावधी झाला असतानाही, वाजपेयी सरकार कोसळले होते. तेव्हाही हे सर्व घडवून आणणार्या स्वामींनी अम्मावरचे खटले मागे घेतले नव्हते. पण आपला करुणानिधीवर असलेला राग काढण्यासाठीचा डाव करताना अम्माने स्वामींशी हातमिळवणी केलेली होती. सांगायचा मुद्दा असा, की राजकारणात कोणीही कधी कायमचे शत्रू नसतात आणि कोणी कायमचे मित्र असू शकत नाहीत. आताही युती तुटल्याचा सुगावा लागताच शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी नेता भाजपाने विचारणा केल्यास पाठींब्यासाठी विचार करण्याची भाषा उगाच बोलत नाही. कारण राजकीय क्षेत्रात विजयाला मोल असते. हटवादीपणा करून पत्करलेल्या पराभवाची किंमत कोणी करीत नाही. त्या प्रसंगात कुणाला पाणी पाजायचे आहे, त्याला प्राधान्य असते आणि शिवसेनेसाठी याक्षणी तरी भाजपाला धडा शिकवण्याला प्राधान्य देण्याखेरीज गत्यंतर नाही. अशावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे सहकार्याचा हात पुढे करत असतील, तर त्यातल्या अमाप शक्यतांकडे बघता आले पाहिजे.
इतक्या वादावादीनंतरही भाजपाने युतीचा विषय काढला तर प्रतिसाद देणार्या उद्धव ठाकरे यांनी, मनसेच्या पुढाकारकडे संयमाने व दिर्घकालीन राजकीय लाभाची संधी म्हणून बघण्याची गरज आहे. यात मनसे हा पक्ष मुळातच शिवसेनेचा एक हिस्सा आहे. त्यांची कल्पना व विचार जवळपास समान आहेत. २००९ च्या विधानसभेत परेल येथून बाळा नांदगावकर निवडून आल्यावर एका वाहिनील तात्काळ प्रतिक्रीया देताना म्हणालेले वाक्य मोलाचे आहे. ‘कसला आनंद? मी जिंकलोय, पण माझी आई (शिवसेना) पराभूत झालीय.’ या एका वाक्यातून मनसे व शिवसेना यांच्यातले नाते किती घट्ट व भांडण किती फ़ुसके आहे, त्याचा खुलासा होतो. या परिस्थितीत शिवसेनेचे प्राधान्य धाकट्या भावाकडे पाठ फ़िरवण्यात असू शकत नाही. तर आपल्या अस्तित्वालाच खणून काढू बघणार्या जुन्या मित्राच्या मस्तवालपणाला पायबंद घालण्याला सेनेने प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी नाक मुठीत धरून कोणी मनसेकडे जायला सांगितलेले नाही. खुद्द मनसेच त्यासाठी पुढाकार घेत आहे आणि तिला प्रतिसाद देणे, ही काळाची गरज आहे. कारण आज नुसत्या जागावाटपाच्या निमीत्ताने जवळ आलेल्या या दोघा भावामध्ये मुळातच असलेली आपुलकी नव्याने आकाराला येण्यास त्यातून गती मिळू शकते. भविष्यात मराठी अस्मितेच्या एकाच प्रादेशिक पक्षाला त्यातून चालना मिळू शकते. केवळ त्यांच्या जवळ येण्यानेही मराठी मतामध्ये असलेली उदासिनता कमी झाली, तरी मतदानावर प्रभाव पडून निकालांना कलाटणी मिळू शकते. अशावेळी आपले अहंकार व व्यक्तीगत हेवेदावे गुंडाळून ठेवण्याला राजकारण म्हणतात. ते सामंजस्य राजने दाखवलेले असेल, तर त्याला प्रतिसाद नाकारण्याला मराठी जनता कपाळकरंटेपणा समजेल. शिवाय तेच भाजपाला हवे असेल, तर पराभव कोणाचा होईल? राजकीय बेरजेला व्यक्तीगत वजाबाकीने पराभूत करायचे काय?
sunder
ReplyDeleteहा मुद्दा आपण अत्यंत सुस्पष्टपणाने विशद केलेला आहे व त्याबाबत काळजी पूर्वक विचार करून निर्णय घेण्याची वेळ व संधी उद्धवजी पर्यंत पोहोचलेली आहे आता पहायचे आहे शिवाजी महाराजांचा आदर्श व धूर्तपणा कितपत आचरणात आणवला जातोय ते !
ReplyDeleteजर भाजपा मनसे युती झाली तर ??
ReplyDeleteBhau Ekdam Sahi..
ReplyDeleteAaplya ya lekhane kahi prakash jarur padla aasel parantu Shivseneche Neta andhlya Drutrashtracha dole mhanun kam karanarya maya jalat phaslela aahe...
Tyachya Sanj/gn/aya pramanech gumrah honar yat Maharashtrachya jantya rajache chele che hat guntalele aahet...
Vinash kali viparit Buddhi..
Aase na howo ani kunitari Sena netyala aapla lekh wachnya chi buddhi dyavi..
Tasech Shat pratishat Shivsena ya rogachi lagan zali asanar..
श्री महेशजींनी भाजप व मनसे युती बाबत शक्यता अजमावली आहे पण त्याने कोणाचाच विशेष फायदा होईल असे मला तरी वाटत नाही, भाजप कदाचित शिवसेनेचा शत्रू म्हणून मनसेला मित्र करून घ्यायला तयार होईलही पण त्यात मनसेचेच नुकसान अधिक संभवते ? ......वा नामशेष होण्याची भिती आहे, त्या पेक्षा शिवसेनेशी युती झालीच तर दोघांचाही फायदा वाटतो, भाऊ त्यावर अधिक प्रकाश पाडू शकतील.
ReplyDeleteखूप चांगले विश्लेषण.
ReplyDelete