पालिका निवडणूकीच्या तोंडावर युतीची बोलणी होत असताना युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण ज्यांना दोन्हीकडून बोलणी करयला पाठवले गेले, त्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली होती, की दोन्ही बाजूंना युती मोडायची होती. सवाल इतकाच होता, की युती संपल्याची घोषणा कुठल्या गोटातून केली जाईल? प्रजासत्ताकदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा करून विषय संपवला. कारण विधानसभेप्रमाणे जागांच्या घोळात अडकून त्यांना वेळ घालवायचा नव्हता. भाजपाने ११४ जागा मागून युती नको असल्याचा संदेश दिला होता आणि म्हणूनच ६५ जागांची ऑफ़र देऊन सेनेने युती मोडायचा संकेत देऊन टाकला. मग फ़क्त घोषणा बाकी होती आणि ते काम उद्धव ठाकरे यांनी उरकून घेतले. पुढे प्रत्यक्ष प्रचारात एकमेकांवर चिखलफ़ेक करण्यात नवे काहीच नाही. त्याची झलक लोकांनी विधानसभा व कल्याण डोंबीवली प्रचारात बघितलेली होती. यावेळी त्यात पडलेली नवी भर म्हणजे शिवसेनेचे मंत्री खिशात राजिनामे घेऊन फ़िरत असल्याची आहे. राजिनामे खिशात असण्याचा अर्थ, केव्हाही सेना सत्तेतून बाहेर पडेल असा होतो. सहाजिकच राजकीय अफ़वांना जोर चढला आणि अन्य विरोधकांनाही नवा जोम आला. राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या नेत्यांना अकस्मात बाळासाहेबांची शिवसेना अधिक स्वाभिमानी असल्याच्या आठवणी येऊ लागल्या. तर अनेकांना खिशातले राजिनामे हसण्यावारी नेण्याची गोष्ट वाटली. राजकारणात नेहमी संकेत दिले जात असतात आणि विश्लेषण करणार्यांनी असे संकेत ओळखण्याची गरज असते. पाच दिवसांपुर्वी अचानक तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्व्हम जयललितांच्या समाधीस्थळी पोहोचले आणि त्यांनी ध्यानधारणा केली. तेव्हा त्यांच्या पाठीशी किती आमदार वा नेते उभे राहिले होते? आज स्थिती काय आहे?
पन्नीरसेल्व्हम यांनी तेव्हा समाधीस्थळी काही मिनीटे शांत बसून ध्यानधारणा केली आणि जगाला सत्य सांगण्याचे आवाहन आपल्याला जया अम्माच्या आत्म्यानेच केले असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांची टवाळी सुरू झाली होती. कारण त्यांच्या पाठीशी एकही आमदार नव्हता. उलट सर्व शक्ती व पक्ष शशिकला यांच्याच मुठीत बंदिस्त होता. खुद्द सेल्व्हम यांनीच शशिकला यांचे नाव प्रत्येक वरीष्ठ पदासाठी सुचवलेले होते. मग अकस्मात त्यांना नवा कुठला साक्षात्कार झालेला होता? अम्माचा आत्मा बोलतो वगैरे झूट गोष्टी असतात. त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, हे सेल्व्हम यांनाही कळते. पण सामान्य जनता अशा शब्दांनी भारावते आणि त्यातून एक जनमताचा रेटा तयार होतो, याचेही त्यांना पुरेसे भान असणार. म्हणूनच त्यांनी समाधीस्थळी ध्यानधारणेचे नाटक रंगवलेले होते. पण त्यानंतर जनतेमध्ये जी प्रक्रीया सुरू झाली, तीच त्यांना अपेक्षीत होती. त्यांनी थेट शशिकला यांच्या विरोधात बंड पुकारले नाही वा पक्ष फ़ोडण्याची भाषा केली नाही. तर जया अम्माच्या प्रेमाने भारावलेल्या लोकांना आपल्या पाठीशी उभे करण्याचा पवित्रा घेतला होता. तसे करण्यात यश मिळाले, तर लोकांच रेटा बघून अनेक आमदार शशिकलाची साथ सोडून आपल्याकडे धाव घेतील, हीच त्यांची अपेक्षा होती. त्यासाठीच त्यांनी रंगवलेले नाटक एक संकेत होता. पण भल्याभल्या जाणकार विश्लेषकांनीही पन्नीरसेल्व्हम यांची टवाळी करण्यात धन्यता मानली. आज त्याच संकेताचे परिणाम समोर आलेले आहेत. अतिशय बलशाली वाटणार्या शशिकलांचे धाबे दणाणले असून, त्यांचे एक एक सहकारी त्यांची साथ सोडून सेल्व्हम यांच्याकडे जमा झाले आहेत. त्यामुळेच राजकारणात बोलल्या जाणार्या भाषेचे शब्द दुर्लक्षित करून, त्यातून कोणते संकेत दिले जात असतात, त्याचा वेध घेण्याची गरज असते. खिशातले राजिनामे म्हणूनच भिंगातून तपासण्याची गरज आहे.
शिवसेनेचे मंत्री राजिनामे खिशात ठेवूनच फ़िरतात, याचा अर्थ कुठल्याही क्षणी पक्षप्रमुखाने सांगितल्यास राजिनामे देऊन टाकू, अशी धमकी हा त्याचा साधसरळ अर्थ आहे. पण म्हणून सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार असा त्याचा अर्थ लावणेही गैरलागू आहे. कुठलाही मंत्री राजिनामा देतो, तेव्हा तो तात्काळ मंजूर होत नाही. कारण मंत्र्याचा राजिनामा राज्यपालाकडे दिला जात नसतो, तर मुख्यमंत्र्याकडे दिला जात असतो. त्यांनी तो पुढे पाठवला तरच मंजूर होतो. सिंचन घोटाळ्याचा खुप गाजावाजा झाला, तेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही आपल्या पदाचा राजिनामा तडकाफ़डकी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला होता. पण म्हणुन तो त्यांनी पुढे पाठवला नव्हता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलल्यावर निर्णय घेऊ, असेच चव्हाण यांनी तेव्हा म्हटले होते. मग बरेच नाटक झाले. साहेबांनी नेत्यांशी चर्चा केली आणि नंतरच राजिनामा राजभवनावर गेला होता. सहाजिकच शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजिनामेही खिशात आहेत, म्हणजे कधीही मुख्यमंत्र्यांना द्यायला सेना सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. पण त्याचा अर्थ सरकारमधून सेना बाहेर पडेल असा अर्थ होतो. पण सरकारचा पाठींबा काढून घेणार असाही होत नाही. ती वेगळी प्रक्रीया आहे. पक्षाच्या विधीमंडळातील नेत्याने वा पक्षप्रमुखाने राज्यपालांकडे जाऊन आपण सरकारचा पाठींबा काढून घेत असल्याचे पत्र द्यावे लागते. राजिनामे मंत्र्यांनी दिले म्हणून सरकार पडत नसते. पण तशी स्थिती निर्माण होते. आज सेना तीच धमकी देते आहे. ती सरकारमधून बाहेर पडायची धमकी जरूर आहे, पण पाठींबा काढून घेण्याची धमकी मानता येत नाही. बाहेरून पाठींबाही चालू राहू शकतो. पण तसा पाठींबा घेऊन फ़डणविस यांना कितीकाळ सरकार चालवता येऊ शकते? त्यांना अन्य आमदार गोळा करावे लागतील वा सेनेशी तडजोड करावी लागेल.
राजिनामे याचे अर्थ अनेक असू शकतात आणि राजकारणात ते तपासून बघावे लागतात. आपण आता सत्तेत समाधानी नाही, हे दाखवण्यासाठी सेनेची ती धमकी असू शकते. तशीच अन्य काही जुळवणी करू असाही अर्थ लावता येतो. कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख नेत्यांनी त्याचे आकडेही मांडायला आरंभ केला आहे, सेनेने पाठींबा काढून घेतल्यास विरोधकांची बेरीज १५० होते. म्हणजेच फ़डणवीस सरकारकडे बहूमत शिल्लक रहात नाही, असेही सुचावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन स्वाभिमानी असेल तर सेनेने बाहेर पडूनच दाखवावे, असे आव्हानही दिलेले आहे. म्हणजेच राजकारण गंमतीच्या पलिकडे गेलेले आहे. त्यातून मग उरलेले तीन पक्ष एकत्र येऊन पर्याय देऊ शकतील, असे अजिबात नाही. पण भाजपा सरकारला डळमळीत करण्याला वेग येऊ शकेल. बहूमतासाठी भाजपाला असे अगतिक करण्यातही शिवसेना आज राजकीय लाभ पाहू शकते. प्रसंगी बाहेरून पाठींबा कायम ठेवून सरकारच्या अस्तित्वाशी सेना खेळूही शकते. म्हणूनच अशा शब्दांचे अर्थ अनेक बाजूने समजून घेण्याची गरज असते. आगामी पालिका जिल्हा मतदानात भाजपा अपेक्षित यश मिळवू शकला नाही, तर मध्यावधीला सज्ज व्हावे; अशीच बाकीच्या पक्षांची आज स्थिती आहे. त्यामुळेच खिशातल्या राजिनाम्याकडे गंभिरपणे बघण्याची गरज आहे. मागल्या खेपेस मिळाले इतके यश भाजपा मध्यावधी मतदानात मिळवू शकणार नसल्याची खात्री पटली; तर उद्धव ठाकरे यांना सरकार पाडण्याचाही मोह होऊ शकतो. ती स्थिती भाजपासाठी सुखकारक नसेल. त्यात अनुभवाने शहाणे झालेल्या दोन्ही कॉग्रेसनी हातमिळवणी केल्यास भाजपाचे नाक कापले जाऊ शकते. त्यात आपलेही थोडे नुकसान झाले तरी बेहत्तर; असे उद्धवना वाटले तर नवल नाही. शिवसेना हळुहळू त्या मनस्थितीत गेली आहे, हे विसरता कामा नये.
विनाश काले विपरीत बुद्धि दुसर काय???
ReplyDelete