Sunday, February 19, 2017

भाजपातला ‘मूकमोर्चा’?



गेले दोन आठवडे जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकीला जोर चढलेला होता. आधी बहुतेक पक्षात उमेदवारी मिळवण्याची साठमारी चालू होती. पुर्वीच्या काळात आपापल्या पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी हाणामार्‍या व्हायच्या. अलिकडे पक्षातल्या कोणाला उमेदवारी दिल्यामुळे कोण पक्ष सोडून प्रतिस्पर्धी पक्षात जाईल, अशा भितीने नेत्यांना पछाडलेले असते. त्यामुळेच प्रचाराला फ़ारशी सवड उरत नसते. आताही त्यापेक्षा काही वेगळे झालेले नाही. युती वा आघाडी होत नसल्याने प्रत्येक पक्षाला सर्व जागी उमेदवार मिळवताना मारामार झाली. कारण नुसते उभे करायला उमेदवार भरपूर असतात. पण जिंकू शकणारे व जनमानसात स्थान असलेले उमेदवार मिळवणे अवघड काम झालेले आहे. सहाजिकच प्रत्येक पक्षालाच प्रचारासाठी सवड कमी असते आणि मग गर्दी खेचणार्‍या नेते व वक्त्यांची तारांबळ उडत असते. प्रत्येक पक्षापाशी गर्दी खेचणारे वक्ते वा नेते विपूल प्रमाणात असतातच असे नाही. त्यामुळेच खास प्रचारक वक्ते मिळताना मारामार होते. अशा स्थितीत मग नावाजलेल्या नेत्याला प्रचाराला बोलावले, तर त्याच्या नावाला साजेशी गर्दीही जमावी लागते अन्यथा त्याची प्रतिष्ठा पणाला लागते. राज ठाकरे वा नरेद्र मोदी यांच्या सभांना लोक भरपूर गर्दी करतात. तशी ख्याती अन्य नेत्यांपाशी नाही. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियोजनबद्ध रितीने आपल्या सभा मोठ्या होतील याची काळजी घेतलेली आहे. उगाच सभांची संख्या अधिक करण्यापेक्षा मोजल्या भागात व मोजक्या सभांना हजेरी लावून आपली प्रतिष्ठा कायम राखली आहे. मात्र भाजपात सार्वत्रिक गोंधळ आहे. त्यांच्यापाशी आज केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस हाच एकमेव लोकप्रिय नेता असून, त्यालाच सर्वत्र पळवावे लागते आहे. अशा नेत्याची पुण्यात झालेली फ़टफ़जिती म्हणूनच शंकास्पद मानावी लागते.

शनिवारी मुख्यमंत्री पुण्यात ठरल्याप्रमाणे सभेसाठी हजर झाले. तिथे सभेसाठी सर्व पक्की सज्जता केलेली होती. भव्य पटांगण आणि मोठे व्यासपीठही उभारलेले होते. आसपास सजावटही उत्तम होती आणि काही हजार लोक बसू शकतील इतक्या खुर्च्याही रांगेने मांडलेल्या होत्या. त्यात कुठलीही उणिव राहिलेली नव्हती. मात्र सभा ही बाकीच्या साधनांनी गजवता येत नाही. सभेत नावाजलेला वक्ता प्रभाव तेव्हाच पाडू शकतो, जेव्हा समोर श्रोत्यांची गर्दी लोटलेली असते. पण मुख्यमंत्र्यांच्या या सभेला बाकी सर्व सज्जता असली तरी श्रोतेही असायला हवेत, याचे आयोजकांना स्मरणच राहिलेले नसावे. म्हणूनच मुख्य वक्ते फ़डणवीस तिथे येऊन पोहोचले, तरी मुठभर श्रोतेही जमा झालेले नव्हते. समोरचे सुसज्ज पण ओसाड पटांगण व मांडलेल्या रिकाम्या खुर्च्या बघून मुख्यमंत्री खिन्न झाले असतील, तर नवल नाही. कारण हा तरूण नेता दिवसात शेकडो किलोमिटर्सचे अंतर तोडून चारचार सभा घेतो आहे. घशाला कोरड पडण्यापर्यंत पक्षाची भूमिका मतदारापुढे नेतो आहे. पण ज्यांच्यापुढे भूमिका मांडायची त्या श्रोते मतदारालाही मुख्यमंत्र्यानेच जमवावे, अशी कोणाची अपेक्षा आहे काय? स्वबळावर भाजपाला शत-प्रतिशत यश देण्याच्या वल्गना करणार्‍यांचे ते काम नाही काय? ती जबाबदारी घ्यायची नसेल, तर स्वबळाच्या गमजा कशाला करायच्या? गर्दी जमवायला मोदी वा फ़डणवीस गावगल्ल्यांमध्ये फ़िरतील, अशा समजूतीने असली भाषा वापरली जात असते काय? नसेल तर पुण्याच्या सभेत मुख्यमंत्री पोहोचले तरी तिथे शंभरही श्रोते कशाला जमलेले नव्हते? त्या समारंभाचे आयोजन ज्यांनी केलेले होते, त्यांची ही जबाबदारी नव्हती काय? मग इतक्या मोठ्या पटांगणावर ठरल्या वेळी शंभरही लोक नसतील, तर आयोजनातला नाकर्तेपणाच दिसतो असे नाही, तर त्यात संशय घेण्यालाही वाव असतो.

कोणी जाणीवपुर्वक देवेंद्र फ़डणवीस यांना अपेशी ठरवण्याचे डावपेच भाजपामध्ये खेळतो आहे काय? राज्यात भाजपाचा दारूण पराभव व्हावा आणि त्या पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांच्याच माथी फ़ुटावे; अशी कोणाची खेळी चालू आहे काय? नसेल तर आधीपासून ठरलेल्या अशा भव्य सभेसाठी नियोजित प्रसंगी शंभरही माणसे जमली नाहीत, हे वास्तविक चित्र वाटत नाही. परिसरातले उमेदवार आणि त्यांच्यासोबत प्रतिदिन घरोघरी प्रचाराला फ़िरणारे घोळके एकत्रित केले, तरी हजारपाचशे लोकांची गर्दी त्या ठिकाणी दाखवता आलीच असती. संपुर्ण ओस पडलेले पटांगण आणि रिकाम्या हजारो खुर्च्या, हे दृष्य़ माध्यमातून गाजावे व फ़डणवीस यांचे नाक कापले जावे, असाच या मागचा ‘नियोजित’ हेतू नसेल, अशी कोणी हमी देऊ शकणार आहे काय? सभा जिथे ठेवतात, तिथे दाटीवाटीने लोकांची गर्दी केलेली दिसावी, असाच एकूण प्रयत्न असतो. त्यासाठी आधीच अंदाज घेऊन मैदान वा जागेचे आकार शोधलेले असतात. चारपाच हजारांची गर्दी जमण्याची अपेक्षा असेल, तर दोनतीन हजार खुर्च्या मांडल्या जातात. परिणामी खुर्च्यांच्या सभोवताली उभ्या लोकांची गर्दी दिसते आणि लोकांनी झुंबड केल्याचा आभासही निर्माण करता येतो. हे भाजपाच्या मुरब्बी चाणक्यांना ठाऊकच नाही, असे समजण्याचे कारण नाही. भर दुपारी उन्हातली सभा असेल, तर मुळातच गर्दी कमी होणार, म्हणूनच आकाराने छोटे मैदान घेऊन कमी खुर्च्या मांडूनही सभा साजरी करता आली असती. पण तसे झालेले नाही वा तसे होऊ दिलेले नाही. ही बाब मोठी गंभीर आहे. हे चुकलेले नियोजन असण्यापेक्षा पक्के ठरलेले नियोजनही असण्याची शक्यता आहे. सत्तेत आल्यापासून फ़डणविस यांनी आपल्या अन्य सहकार्‍यांना मागे टाकून, कामाचा झपाटा लावल्याने कोमेजलेल्या पक्षातल्याच असंतुष्टांना आता मुख्यमंत्र्यांना तोंडघशी पाडण्यात रस असल्याचाही हा परिणाम असू शकतो.

मुंबई पुण्यासह नाशिकपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अधिकाधिक सभा लावून प्रत्येक ठिकाणी गर्दी ओस पडलेली दाखवण्याचे कुठले षडयंत्र तर कार्यरत झालेले नाही ना, याचीच शंका घ्यायला जागा आहे. कारण पुण्यातली सभा फ़डणवीसांनी स्वत:च रद्द केली असली, तरी अन्यत्र जिथे सभा झाल्या, तिथे बहुतांशी तसाच किरकोळ प्रतिसाद आहे. हे माध्यमांतून झळकावे, असेच त्यामागचे नियोजन तर नाही ना? कारण इतक्या संख्येने सभा योजल्या जातात, तेव्हा यंत्रणा विभागली जात असते आणि गर्दी जमवणे अशक्य होत असते. ती उणिव छोट्या जागा व मैदाने निवडून भरून काढली जाऊ शकते. पण तसे झालेले नाही. मुद्दाम मोठी मैदाने पटांगणे निवडायची आणि रिकाम्या खुर्च्यांचे प्रदर्शन घडवायचे, असा काहीसा पुर्वनियोजित खेळ बहुतेक जागी झालेला आहे. उद्धव ठाकरेही सभा गाजवण्यासाठी प्रसिद्ध वक्ता नाहीत. पण त्यांच्या सभा भरगच्च होत असताना फ़डणवीस तोकडे पडतात, असे चित्र निर्माण करण्याचा हेतू आयोजकांनीच बेतलेला असू शकतो. की त्यात भाजापातील ‘मूकमोर्चा’ कार्यरत झालेला आहे? कारण फ़क्त मुख्यमंत्र्यांच्याच सभांचे थेट प्रक्षेपण होते वा त्यालाच प्रसिद्धी मिळते आहे. त्यात समोरची गर्दी कमी दिसावी, असेही नेमके व्यवस्थापन झालेले लपून रहात नाही. म्हणूनच पुण्यातल्या रद्द झालेल्या सभेकडे अपवाद म्हणून बघता येत नाही. खरेच असे काही नियोजन असेल, तर त्याचा चेहरा निकालात पडल्याशिवाय रहाणार नाही. कारण जे पाठीराखे वा उमेदवार आपल्यासाठीच्या सभेतला गर्दी जमवू शकत नाहीत, ते मोक्याच्या वेळी मतदारांना घराबाहेर काढून मतदानाला कसे हातभार लावणार? जागांसाठी अट्टाहास धरून युती मोडण्याची पाळी आणणारे लढवय्ये, सभेला गर्दी जमवताना कसे कमी पडतात? मुख्यमंत्री फ़डणवीसांना पुढल्या आठवड्यात याचाच गंभीर विचार करावा लागणार आहे. अशाच पक्षांतर्गत हितशत्रुंची कुंडली बनवावी लागणार आहे.

2 comments:

  1. TYAVAR MUKHYAMATRYANI SPASHTIKAR DILELE AAHE. SABHA 4.30CHI HOTI AANI TYANA NIROPE DUPARI 2.0 VAJTACHA MILALA HOTA.

    ReplyDelete
  2. भाजप मध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध त्याचेच काही मंत्री आणि आमदार आहेत

    ReplyDelete