चारपाच वर्षापुर्वी आमिर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ मालिकेने खुप धमाल उडवून दिलेली होती. अन्य कुठल्याही मनोरंजक कथानाट्यापेक्षाशी सत्य घटनांशी निगडित समस्याप्रधान सामाजिक विषयांना हात घालणार्या या मालिकेने, देशात फ़ार मोठी जागृती केल्याचा गवगवा झालेला होता. माध्यमातूनही आमिरचे खुप कौतुक चालले होते. त्यात भ्रुणहत्या हा विषय खुप खळबळजनक ठरला होता. त्यानंतर मराठवाड्यात डॉ. सुदाम मुंडे यांच्या इस्पितळात अशा गर्भपाताच्या घटना राजरोस चालू असल्याचे उघडकीस आले आणि त्या डॉक्टरला पळ काढावा लागला होता. लिंगपतास करून मुलींना गर्भातच मारले जाते, याचा तो गाजावाजा एकप्रकारे लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा नक्कीच होता. मात्र तितकी खळबळ माजली आणि पुढे काय प्रगती झाली, ते कोणी सांगू शकत नाही. खरेच प्रगती झाली असती, तर सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे कालपरवा उघडकीस आला, तो अमानुष प्रकार घडलाच नसता. एका महिलेचा गर्भपात करत असताना मृत्यू झाला आणि तिच्या माहेरच्या लोकांनी पोलिसात धाव घेतली. म्हणून अंगावर शहारे आणणार्या गोष्टी उजेडात येत आहेत. यातलाही डॉक्टर फ़रारी झाला होता. पण पोलिसांनी चतुराई दाखवून त्याला बेळगाव येथून अटक केली आहे. त्याला कोर्टानेही कोठडीत पाठवून दिले आहे. अधिक तपास होईलच. पण दरम्यान संशयित जागी शोध घेता १७ मृत अर्भकांचे कुजलेले अवशेष सापडल्याचे वृत्त आहे. अजूनही अनेक जागी असे मृतदेह गाडलेले असू शकतात. त्यांचा सवडीने शोध लागेलच. त्यात अनेक संबंधित डॉक्टर्सही सापडतील. कारण दिसतो, तितका हा प्रकार सोपा वा छोटा नक्कीच नाही. या घटनेनंतर स्थानिकातही संतप्त प्रतिक्रीया उमटलेली आहे. सवाल इतकाच, की ह्या स्थानिकांना इतके दिवस खरेच यापैकी काहीच ठाऊक नसेल का?
अशा गोष्टीची कोणी जाहिरात करीत नसतो. चोरट्या मार्गाने जे उद्योग चालतात, त्याची माहिती एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पोहोचत असते. त्यामुळेच जिथे असे उद्योग चालतात, त्यांची माहिती आसपासच्या लोकांना जरूर असते. पण सहसा कोणी त्याविषयी सामाजिक जबाबदारी म्हणून वाच्यता करायला पुढे येत नाही. निनावी फ़ोन करूनही अशी माहिती पोलिस वा माध्यमांना पाठवली, तरी गवगवा होऊ शकतो. अशी बातमी आली, तर भले तात्काळ कुठली कारवाई होणार नाही. कदाचित त्यापुर्वीच गुन्हे करणारे आपला गाशा गुंडाळून फ़रारी होऊ शकतात. पण निदान राजरोस चाललेला गुन्हा काही काळ तरी थांबू शकतो. दुसरी सुखरूप जागा शोधल्याखेरीज असे लोक आपला घातक व्यवसाय चालवू शकत नाहीत. म्हणजेच थोड्या प्रमाणात तरी अशा गोष्टींना पायबंद घातला जाऊ शकतो. पण तसे सहसा होत नाही. आपल्या आसपास अशा गोष्टी घडत असूनही काणाडोळा करण्याला शहाणपणा मानले जाते. त्यामुळेच असे गुन्हेगार सवकतात. बिनदिक्कत लोकांच्या जीवाशी खेळू शकतात. म्हैसाळला एका विवाहितेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. अती रक्तस्त्रावामुळे तिला प्राण गमवावे लागले असे समजते. आता त्याच प्रकरणात तिच्या पतीलाही आरोपी म्हणून अटक करण्यात आलेली आहे. म्हणजेच पतीच्या आग्रहापोटीच तिचा सक्तीने गर्भपात केला जात असणार हे उघड आहे. गर्भपातही करण्याला ठराविक कालमर्यादा आहे. गर्भाचे वय जितके कमी तितकी, ही शस्त्रक्रीया सुखरूप पार पडते. पण गर्भाचे वय वाढत जाते, तशी ही क्रिया प्राणघातक ठरणार असते. म्हणूनच त्यावर कालमर्यादा घातलेली आहे. अलिकडेच एका बलात्कारीतेला गर्भ राहिला, तेव्हा तो काढण्यासाठी सुप्रिम कोर्टापर्यंत मामला गेला आणि अपवाद म्हणून कोर्टाने त्या शस्त्रक्रीयेला जाणत्यांचे मत घेऊनच परवानगी दिलेली होती.
सुप्रिम कोर्ट इतकी काळजी घेत असेल, तर ही प्रक्रीया किती किचकट व घातक असू शकते, याचा अंदाज यायला हरकत नाही. पण मुलगी नको वा अन्य कुठल्याही कारणास्तव गर्भ काढून टाकण्याची कृती नेहमीच घातक असते. ती गर्भवतीसाठी एक इजाच असते. तिच्या शरीराची एकप्रकारे हानी होत असते. रक्तस्त्राव ही गंभीर शारिरीक हानीच असते. शिवाय एकदा गर्भ राहिला, मग तो काढून टाकणे ही अनैसर्गिक कृती आहे. त्यामुळेच त्यातून त्या महिलेच्या देहाची हानी अपरिहार्य असते. मग ती कृती कायदेशीर असो वा बेकायदा असो. गर्भपात करायची पाळी येणेच घातक आहे. त्यामुळेच त्यावर विविध स्वरूपाचे निर्बंध घातलेले आहेत. जितके निर्बंध अधिक वा कडक; तितकी मग त्या कृत्याची मिळणारी किंमत वाढत असते. त्यामुळेच मग डॉक्टरी पेशातील अनेकांना पैशाचा मोह अशा गुन्ह्याला प्रवृत्त करत असतो. मात्र नावाजलेले डॉक्टर्स त्यापासून दूर रहातात आणि झटपट श्रीमंतीचा उद्योग म्हणून फ़ालतू डॉक्टर्स असे व्यवसाय करत असतात. परिणामी गर्भवतीला आपण एका नाकर्त्या वा अपात्र व्यक्तीच्या हाती सोपवत असतो. तो डॉक्टर असण्यापेक्षाही यमदूत असण्याचीच शक्यता अधिक असते. नाही तरी एक संस्कृत वचन आहे. वैद्यराज नमोस्तुभ्यम यमराज सहोदर:! वैद्य हा यमराजाचाच जुळा भाऊ आहे, असे गंमतीने त्यात म्हटले आहे. पण म्हैसाळचा हा डॉक्टर खिंद्रापुरे वा मराठवाड्यातला डॉ. मुंडे त्याचे साक्षात नमूने आहेत. अशा यमराजाच्या तावडीतून कुणाही गर्भवतीला वाचवणे, ही फ़क्त कायद्याची वा पोलिसांचीच जबाबदारी नाही. ती आपलीही तितकीच जबाबदारी आहे. नागरिक म्हणून आपण समाजाला निरोगी मनाचे बनवण्यात हात आखडता घेणार असू; तर कायदा कितीही कठोर असून उपयोग नाही. एक जागरूक नागरिक जितके मोठे काम करू शकतो, तितका निर्जीव शब्दातला कायदा प्रभावी नसतो.
डॉ. मुंडे यांच्या प्रकरणात गदारोळ झाल्यानंतरही अशा घटना घडतात, कारण कायदा अपुरा नाही, की पोलिस यंत्रणा निकामी नाही. नागरिक म्हणून आपल्या सामाजिक जबाबदारीत आपणच सगळे कुठेतरी कमी पडत असतो. या मृत्यूमुखी पडलेल्या गर्भवती महिलेच्या पतीने कुठल्या वर्तमानपत्रात जाहिरात बघून, तिला इथे शस्त्रक्रियेला नेलेले नव्हते. त्यालाही कुठून तरी हलक्या दबल्या आवाजात अशा गोष्टींचा सुगावा लागलेला असतो. जेव्हा दहापंधरा लोकांना अशा गोष्टी ठाऊक असतात, तेव्हा एक कोणीतरी त्याचा उपयोग करायला तिथे पोहोचत असतो. म्हणजेच तिथे जाणार्यांच्याही अनेक पटीने अधिक लोकांना असा गुन्हा घडत असल्याची पक्की माहिती असते. पण आपल्या अशा गप्प रहाण्यानेच या गुन्हेगारांची हिंमत वाढत असते. एकप्रकारे आपल्या तटस्थपणाचा आशीर्वादच त्या कृत्यांना मिळत असतो. कायद्याचा अंमलदार वा यंत्रणेपर्यंत ह्या गोष्टी घेऊन जाण्याची जबाबदारी नागरिकांची असते. निदान त्याविषयी बभ्रा करणे तरी आपल्या हाती असते. आता म्हैसाळच्या भागात नागरिकांनी संतप्त निदर्शने केल्याचीही बातमी आलेली आहे. पण त्याच परिसरात कोणालाच अशी पापे खिंद्रापुरेच्या इस्पितळात चालल्याचे ठाऊक नव्हते, असे कोणी छातीठोकपणे सांगू शकणार नाही. तिथे अनेक कर्मचारी वा कामगार काम करत असतात. अशा मृत अर्भकांची विल्हेवाट लावणारे कोणालाही खबर लागू देणार नाहीत, असेही नाही. पण त्या गोष्टी कळल्यानंतरही चिडीचुप बसणारे लोक ९९ टक्के असतील, तर गुन्हेगारांना चाप कसा लागणार? आपल्या घरापर्यंत गुन्हेगारीची झळ येईपर्यंत प्रतिक्षा करायची काय? हा त्रयस्थपणा सोडून जितके नागरिक अशा गोष्टींचा बोभाटा करायला पुढे येतील, तितका त्याला लगाम लागू शकेल. पोलिस, कायदा वा कोर्टावर विसंबून हे सामाजिक गुन्हे थांबणारे नाहीत.
८/३/२०१७
No comments:
Post a Comment