तुम्ही काही लोकांना काही सर्वकाळ फ़सवू शकता आणि सर्व लोकांना काही काळ फ़सवू शकता. पण सर्वांना सर्वकाळ मुर्ख बनवू शकत नाही. अशी एक प्रसिद्ध उक्ती आहे आणि त्याचाच अनुभव आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या निकटवर्तिय सहकार्यांना येऊ लागला आहे. कारण गेल्या पाच वर्षात त्यांनी एकेकटे गाठून अनेकांना राजरोस उल्लू बनवले आहे. पण आता सर्वच लोक एकत्र येऊन त्यांच्या थापा तपासू लागले आहेत. त्या देवाणघेवाणीत यांच्या भुरटेगिरीचा चेहरा समोर येऊ लागला आहे. तेव्हा आपण चुका केल्याची निर्लज्ज कबुली देण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. कारण आता दूरचे नव्हेतर आपलेच जवळचे केजरीवाल यांच्या थापेबाजीवर सवाल करू लागले आहेत. त्यातून शनिवारी पहाटे या माणसाने आपणही चुका केल्या असून, कांगावा सोडून काम करावे लागेल, अशी कबुली दिलेली आहे. खरे तर पंजाब व गोव्यातही आम आदमी पक्षाचा दारूण पराभव होणार, याची निदान केजरीवाल यांना आधीपासून खात्री होती. पण त्याचे खापर आपल्याच माथी फ़ोडले जाऊ नये, म्हणून त्यांना कांगावा करावा लागत होता. त्यांच्या निकटच्याही काही लोकांना खापर आपल्याच माथी फ़ुटण्याच्या भयाने पछाडले होते. म्हणूनच त्यांनी नेहमीप्रमाणे कांगावा करण्याचाच पवित्रा घेतला होता. पण असे कांगावे दिल्लीच्या सामान्य जनतेसमोर चालून गेले, तरी घरच्या वा पक्षातल्याच लोकांपुढे चालणार नव्हते. अशाच निकटवर्तियांनी मानगुट पकडल्यानंतर आपणही चुकतो, असा नवा साक्षात्कार या अवतार पुरूषाला झालेला आहे. म्हणून तर दिल्ली महापालिकेचे निकाल लागल्यानंतर तात्काळ मतदान यंत्राच्या गडबडीचे निदान केलेल्यांनी, आता कांगावा सोडून काम करावे लागेल असे जाहिरपणे सांगितले आहे. याचा अर्थ गेली दोन वर्षे निव्वळ कांगावा चालू होता, इतकाच निघतो.
दिल्ली महापालिकांचे निकाल लागण्यापर्यंत किंवा पंजाब गोव्याच्या प्रचारापासून सतत केजरीवाल किंवा त्यांचे निकटवर्तिय एकच जपमाळ ओढत होते. आजवर देशात कुठल्याही सरकारने सत्तर वर्षात जितके काम केले नाही, तितके आम आदमी पक्षाच्या सरकारने अवघ्या दोन वर्षात करून दाखवले आहे. त्यात किंचीतही तथ्य असते तरी भाजपा दिल्लीत पालिकेमध्ये इतके मोठे यश मिळवू शकला नसता. कारण आपच्या अशा अपुर्व कामाच्या विरोधात भाजपाने दाखवलेला नाकर्तेपणा कुठल्याही कारणास्तव आकर्षक नव्हता. तरीही दिल्लीकर भाजपाला इतकी मते देऊन गेला, म्हणजेच सवाल भाजपाच्या कर्तॄत्वाचा नसून आपच्या दिवाळखोरीचा होता. केजरीवाल यांनी इतके अराजक माजवले होते, की त्याच्या तुलनेत भाजपाचा पालिकेतील गैरकारभारही सामान्य दिल्लीकराला सुविधा वाटत होती. ती गमावण्याच्या भयामुळे त्या मतदाराने केजरीवाल यांच्याकडे पाठ फ़िरवली होती. पण ते सत्य पत्करण्याचा वा मान्य करण्याचा प्रामाणिकपणा या माणसाकडे नव्हता, की त्याच्या सहकार्यांमध्ये नव्हता. म्हणून त्यांनी मतदान यंत्राचा कांगावा सुरू केला होता. महिनाभर त्यात अनेकजणांची दिशाभूलही झाली. पण गल्लीबोळात वावरणारे व लोकंशी संवाद करणारे आपचेच कार्यकर्ते इतका धादांत खोटेपणा स्विकारू शकत नव्हते. ज्या लोकांमध्ये कार्यकर्ता वावरतो, त्या लोकांनाच खोटारडा संबोधण्यापर्यंत त्याची मजल जाऊ शकत नाही. कारण हा कार्यकर्ता लोकांमध्ये रहातो आणि त्यातून त्याची सुटका नसते. तो केजरीवाल यांच्याप्रमाणे सुरक्षेच्या बंदोबस्तामध्ये आलिशान सरकारी बंगल्यात वास्तव्य करीत नाही. म्हणूनच लोकांनी आपल्या पक्षाला व केजरीवाल यांच्या कांगाव्याला नाकारले, हे कार्यकर्त्याला ठाऊक होते. त्याचाच उदगार नंतरच्या बैठकीत झाला आणि या कांगावखोर महापुरूषाचा मुखवटा गळून पडला आहे.
ज्या बळावर केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून चैन मौज करीत आहेत आणि देशाच्या पंतप्रधानालाही आव्हान देण्याची नाटके करीत आहेत, त्याच दिल्लीच्या बहूमताला ग्रहण लागले आहे. ज्या आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रीपद मिळालेले आहे, त्यांनीच आपल्या नेत्याला जाब विचारण्यास आरंभ केला आहे. कारण त्याला केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपद वा पोरकट आरोपांच्या आतषबाजीपेक्षाही आपल्या आमदारकीची फ़िकीर असते. नेत्याच्या फ़ुशारकीसाठी अशा आमदारांचे पाठबळ आवश्यक असते. पण त्या फ़ुशारकीवर आमदारकी मिळायला हवी आणि टिकायला हवी. ज्याप्रकारे महापालिकेचे मतदान झाले आहे, त्याकडे बघता आम आदमी पक्षाच्या ६७ आमदारापैकी ५० आमदारांना मतदाराने नाकारल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळेच कालपर्यंत नेत्याचा जयघोष करणार्या आमदारांचा धीर सुटला आहे. त्यांनीच अरविंद केजरीवाल व अन्य पक्षनेत्यांना धारेवर धरण्याचा पवित्रा घेतला आहे. तिथे मग केजरीवाल यांना एका गोष्टीचा साक्षात्कार झाला. सामान्य जनतेला उल्लू बनवणे सोपे असले, तरी आपल्या पाठीशी ठामपणे दिर्घकाळ उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांना मुर्ख बनवणे घातक असते. ज्या चांगल्या कामाचा हवाला देऊन मते मागितली होती, तीच कामे झाली नव्हती, हे कार्यकर्त्यालाही पक्के ठाऊक होते. म्हणूनच तो आता विभागातल्या मतदाराचा प्रतिनिधी म्हणून केजरीवालना जाब विचारायला पुढे आलेला आहे. परदेशी वृत्तपत्रात पत्राकाराला खिशात टाकून कौतुकाचे लेख छापून आणणे सोपे आहे. पण जे अनुभवास येत नाही, त्या सुविधा या मुख्यमंत्र्याने केल्याचे स्थानिक मतदाराने कसे मान्य करावे? त्याच मतदाराने धडा शिकवला आहे आणि तो शिकायला केजरीवाल तयार नसतील, तरी आमदारकी टिकवायला उत्सुक असलेले आमदार मात्र त्यातला धडा नेमका शिकले आहेत. त्यांनीच कांगावखोरीचा बुरखा फ़ाडून टाकला आहे.
आमच्याकडूनही चुका झाल्या. आम्हाला मतदाराने नाकारले आहे. म्हणूनच पळवाट शोधून वा कांगावा करून उपयोग नाही, तर काम करावे लागेल; असे शनिवारच्या वक्तव्यात केजरीवाल यांनी कबुल केले आहे. पण चुका कोणत्या त्याचा कुठलाही खुलासा केलेला नाही. त्या चुका शेकड्यांनी आहेत आणि त्याची गणती एका लेखातून होऊ शकत नाही. केजरीवाल किती भुरटा माणूस आहे त्याची साक्ष ताज्या वक्तव्यातही मिळते. चुका झाल्या म्हणताना कोणत्या चुका, त्याचा ओझरताही उल्लेख नाही. कारण त्या चुका कारभारातल्या नाहीत, तर राजकीय आहेत आणि त्या करण्याच्या हव्यासातून राज्यकारभाराचा विचका उडालेला आहे. चुका संगतवार सांगायच्या तर त्या करण्याची कारणेही द्यावी लागतील. त्यामागची प्रेरणाही सांगावी लागेल आणि त्यात आपला उरलासुरला चेहराही विस्कटून जाईल, याची या भामट्याला खात्री आहे. म्हणूनच नुसता चुकांचा उल्लेख करून बाकीच्या तपशीलाकडे पाठ फ़िरवलेली आहे. आजही दिल्लीकर पुर्वी इतकाच मुर्ख व भाबडा असल्याची खात्री किती असावी? चुक झाली माफ़ करा, म्हणून विषय संपवण्याची घाई या वक्तव्यातून लपून रहात नाही. सर्व खोटे उघडे पडल्यावरही खोटे बोलण्य़ाचा वा लोकांची दिशाभूल करण्याचा हव्यास संपलेला नाही. चुका कोणाकडूनही होतात. त्यासाठी लोक कोणाला फ़ाशी देत नाहीत. प्रसंगी माफ़ही करतात. पण ज्या चुका जाणिवपुर्वक करून जनतेची दिशाभूल करण्याचा अट्टाहास केला जातो, त्याला लोक माफ़ करत नाहीत. केजरीवाल असा सवयीचा थापाड्या व लबाड माणुस आहे. म्हणूनच आता समोर येऊन उभे ठाकलेले संकट इतक्या सहजासहजी निकालात निघणारे नाही. जवळपास शून्यातून नवी सुरूवात करावी लागेल आणि त्यासाठी सर्व अधिकार व सत्तापदांवरून बाजूला होण्याची हिंमत करावी लागेल. त्याचा मागमूस कुठे दिसतो आहे काय?
No comments:
Post a Comment