Wednesday, May 10, 2017

बुडत्याचा पाय खोलात

kapil kejriwal के लिए चित्र परिणाम

ब्लॅकमेल ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. कोणीही आपल्याला तेव्हाच ब्लॅकमेल करू शकतो, जेव्हा आपण कुठल्या तरी भानगडीत फ़सलेले असतो. आपल्या हातून अनवधानाने कित्येक गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि त्याविषयी आपण सहसा बोलतही नाही. त्यात गुन्हा वा लज्जास्पद असे काही असेल, तर आपण शक्य तितके त्यावर पांघरूण घालत असतो. कुणाला त्याचा थांगपत्ता लागू नये याचीही काळजी घेत असतो. अशी माहिती अन्य कोणाला समजली, तर त्याच्या फ़ायद्यासाठी अशी व्यक्ती त्याच माहितीला हत्यार बनवत असते. म्हणजे त्या माहितीचे काही धागेदोरे आपल्याला सांगून हुलकावण्या देत असते. मग ती माहिती जगाला समजू नये, म्हणून आपला जीव कासावीस होऊ लागतो. अशा कृतीला ब्लॅकमेल करणे म्हणतात. पण अशा गोष्टी करणारे इतके चतुर असतात, की अपुरी माहिती जगासमोर आणुन ते आपल्याला घाबरवत असतात आणि हुलकावण्याही देत असतात. असा कोणी बदमाश काहीतरी जाहिरपणे बोलतो आणि आपली पाचावर धारण बसते. मग त्याचे तोंड बंद करण्यासाठी आपण किंमत मोजू लागतो. त्यात आणखी एक प्रकार वेगळाही असतो. त्यात ज्याचे पाप आहे त्याला आणि बोलणार्‍यालाच वास्तव ठाऊक असते. पण त्यातही आरोपकर्त्याला किती नेमकी माहिती आहे व किती माहिती खरी आहे, याविषयी आपण साशंक असतो. अशावेळी आपण त्याला दाद देत नाही. असा माणूस मग हुलकावण्या देत अर्धवट माहितीच समोर आणत असतो. थोडीथोडी माहिती जाहिर करून अशा बदमाश आपल्याला त्याच्या जाळ्यात ओढत असतो. एकप्रकारे उंदरामांजराचा त्यात खेळ चालतो. सध्या केजरीवाल आणि त्यांचाच शिष्य म्हणवून घेणारा मजी मंत्री कपील मिश्रा, तोच खेळ खेळत आहेत. त्यापैकी कपीलने केलेल्या आरोपात किती तथ्य आहे? केजरीवाल कितीसे फ़सलेले आहेत?

कपील मिश्रा या आम आदमी पक्षाच्या बडतर्फ़ मंत्र्याने रविवारी केजरीवाल या मुख्यमंत्र्यावर मोठा खळबळजनक आरोप करून धमाल उडवून दिली. तोच मुळात एक सापळा आहे. हा गृहस्थ स्वत:ला केजरीवाल यांना शिष्य मानतो. केजरीवाल काय करतील व कुठली चाल खेळतील, हे मी नेमके ओळखून आहे. म्हणूनच अतिशय सावधपणे मी पावले टाकतो आहे, असा या कपीलचा दावा आहे. तो गुरूकडून कोणती विद्या शिकला त्याचे उत्तर यातच सामावलेले आहे. केजरीवाल नेहमी आपण सर्वात इमानदार असल्याचा दावा करीत आले. पण तसे करताना त्यांनी अन्य राजकारणी व आपल्याच काही सहकार्‍यांनाही कुठल्या ना कुठल्या सापळ्यात अडकवलेले आहे. त्यांनी नेहमी लोकांनाही स्टींग ऑपरेशन करण्याचे आवाहन केलेले आहे. अगदी त्याच पद्धतीने त्यांनी आपल्या अनेक सहकारी व अनुयायांनाही आपल्या जाळ्यात ओढून बांधून ठेवलेले आहे. आपल्या विरोधात कोणीही काहीही कधी बोलू नये, याची खबरदारी केजरीवाल कायम घेत आले. पण इतके सर्व करताना काहीजण तरी विश्वासातले ठेवावे लागतात. ज्याला केजरीवालची टोळी वा चांडाळचौकडी असे कपील संबोधतो, अशा लोकांना तरी विश्वासात घेणे भाग आहे. अण्णा आंदोलन चालू असताना स्वामी अग्निवेश वा कासमी नावाचे मौलाना, यांना केजरीवालनी अशाच छुप्या कॅमेराचा वापर करून नामोहरम केलेले होते. आपल्या विरोधात जाऊ शकतील वा आव्हान देऊ शकतील, अशा लोकांना प्रसंगी ब्लॅकमेल करायची सज्जता केजरीवालनी सातत्याने राखलेली होती. कपील मिश्रा तीच विद्या या गुरूकडून शिकलेला आहे. आपण गुरूची विद्या गुरूला दक्षिणा म्हणून देणार असल्याचे सांगण्यातला मतितार्थ त्यातच सापडू शकतो. कपील मिश्रा आता आपल्या गुरूला ब्लॅकमेल करतो आहे. ते नाटक समजून घ्यायचे, तर कपीलची विधाने काळजीपुर्वक तपासली पाहिजेत.

केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांचा एक मंत्री सत्येंद्र जैन रोख दोन कोटी रुपये मुख्यमंत्र्याला देताना आपण बघितले आहे, अशी ग्वाही कपील देतो. पण शुक्रवारी कपील मुख्यमंत्री निवासात आलेलाच नव्हता, असा केजरीवाल यांच्या निकटवर्तियांचा दावा आहे. त्याने कुठला वार व कुठली वेळ ते सांगावे, असा हे अनुयायी आग्रह धरीत आहेत. त्यावर कपीलचे उत्तर सोपे आहे. केजरीवाल टोळी जे पुरावे नष्ट करू शकते, असा कुठलाही पुरावा माध्यमात सांगणार नाही. ती माहिती थेट सीबीआय वा तपास संस्थेलाच देऊ, हा कपीलचा खुलासा आहे. पण त्याचवेळी हे अनुयायी अधिक तपशील कशाला मागतात? इतके कशाला? असाही कपीलचा प्रश्न आहेच. त्याचा अर्थच दोन कोटी रुपये कॅशचा त्याचा दावा विश्वासार्ह नाही. पण त्यात तथ्य जरूर आहे. कपील ते सिद्ध करू शकणार नाही. पण हा आरोप खरा असल्यानेच केजरीवाल टोळीची झोप उडालेली आहे. दोन कोटीचा कुठलाही पुरावा नसला, तरी त्या पैशाची कुठे व कशी विल्हेवाट लावली, त्याचे धागेदोरे कपीलपाशी असू शकतात. याची केजरीवाल गोटात भिती आहे. पण त्याहीपेक्षा अन्य बाबतीतले पुरावे काय असू शकतात, त्याची भिती मोठी आहे. सत्येंद्र जैन हे जमिनीचे व मालमत्तेचे व्यवहार करणारे व्यापारी होत आणि त्यांच्याच हाती नगरविकास खाते सोपवून केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप टिकणारा आहे. त्यातले कोणते पुरावे कपीलपाशी आहेत, त्याची भिती केजरीवाल यांना सतावते आहे. अशी अनाकलनीय भितीच त्या गोटात निर्माण करण्याचा सापळा कपील मिश्राने लावलेला आहे. त्याचा जितका इन्कार वा प्रत्यारोप केजरीवाल गोटातून होईल, तितके तेच त्यात फ़सत जाणार आहेत. म्हणूनच केजरीवाल त्यात एकही शब्द बोलायला राजी नाहीत, तर आपल्या अन्य सहकार्‍यांना पुढे करून हा मुख्यमंत्री तोंड लपवून बसला आहे.

ब्लॅकमेल करताना ठराविक माहिती पुढे आणली जाते आणि तिचा इन्कार करण्याच्या नादात संबंधित व्यक्ती अधिकाधिक गुरफ़टत जाते. त्यातून त्याला माघार घेता येणार नसते. म्हणूनच मौन हे सर्वोत्तम साधन असते. केजरीवाल म्हणून मौनव्रती झाले आहेत. त्यांना कपील कोणता गेम खेळतोय, ते नेमके कळलेले आहे. कुठली  कुठली माहिती वा पुरावे कपीलने गोळा करून मग दगा दिला, त्याची चिंता केजरीवाल गोटाला सतावते आहे. त्यातले किरकोळ धागेदोरे कपील एक एक करून जाहिर करतो आहे. तर त्यातले मोक्याचे धागेदोरे मात्र गुलदस्त्यात ठेवतो आहे. पण याच निमीत्ताने सत्येंद्र जैन यांना आयकार खात्याने दिलेल्या नोटिसांचा बोलबाला सुरू झाला आहे. केजरीवाल यांच्या नातलगाची जमिन खरेदी समोर आलेली आहे. पंजाब वा दिल्ली पालिका उमेदवारीसाठी पैसे मागण्यात आल्याचा गवगवा झाला आहे. याखेरीज विविध टेंडर्स वा सरकारी कामाच्या कंत्राटात कुठे कोणी पैसे वसुल केले; त्याचीही चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकरणातील महत्वाचे पुरावे कपीलपाशी नसतील असे आज छातीठोकपने कोणी सांगू शकत नाही. दोन वर्षे मंत्रीपदी असलेला कपील शर्मा सरकारच्या अनेक फ़ायलॊ राजरोस मिळवू शकत होता आणि त्याच्या झेरॉक्स प्रतीही काढून घेऊ शकत होता. मग त्याने कुठली कागदपत्रे जमा करून ठेवलीत, याची भिती केजरीवाल टोळीला सतावणारच ना? याला ब्लॅकमेल म्हणतात. केजरीवाल टोळीने आता एका एका प्रकरणाचा इन्कार करावा आणि मग त्याचेच पुरावे कपील जाहिर करणार आहे. ब्लॅकमेलर आपल्याच सापळ्यात कसे फ़सतात, त्याचा उत्तम नमूना काही वर्षापुर्वी तरूण तेजपाल याच्या निमीत्ताने गाजला होता. त्याची आज आठवण येते. कपील मिश्राला पुढे करून कोणीतरी केजरीवालचा तरूण तेजपाल करतो आहे, अशी शंका येते, तेजपालचे नेमके काय झाले होते? ते उद्या तपासू या. (अपुर्ण)

1 comment:

  1. "इन्कार" शब्द का वापरलाय आपण. चांगले पत्रकार सुद्धा आता हिंदीच्या आधीन होणार का? नाकारणे हा साधा शब्द सुचू नये का आपल्याला?

    ReplyDelete