खर्या लढवय्याची ताकद त्याच्या पराभव पचवण्याच्या क्षमतेतून समोर येत असते. ज्यांच्यात तितकी कुवत नसते, असे लोक आपल्या अपयशाला झाकण्यासाठी विविध पळवाटा शोधत असतात. चार वर्षापुर्वी राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करणार्या नरेंद्र मोदींनी आपल्या विरोधकांची तीच लंगडी बाजू वेळोवेळी जगासमोर आणलेली आहे. त्यामुळे आता आपले नाकर्तेपण झाकायला अन्य काही पर्याय शिल्लक राहिला नाही, तर विरोधकांनी मतदान यंत्रात गडबड असल्याचा आरोप केला होता. सर्वप्रथम बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी तसा आरोप केला आणि हळुहळू सर्वच विरोधकांनी तो सूर आळवायला आरंभ केला. त्यातून मोदी बाजूला पडले व अशा विरोधकांनी निवडणूक आयोगालाच आपला शत्रू करून टाकले आहे. मतदान यंत्राच्या विरोधातला हा आक्षेप इतका टोलाला गेला, की ते आव्हान स्विकारण्याला पर्याय नव्हता. कुठलेही यंत्र किंवा तंत्र पुर्णपणे निर्दोष असू शकत नाही. कुठल्याही नियमाला अपवाद असतातच. त्याचप्रमाणे मतदान यंत्र निर्दोष राखण्याचा व बनवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात किरकोळ काही यंत्रे दोषी निघू शकतात. आयोगाने वा त्याच्या समर्थकांनी ती गोष्ट कधी नाकारलेली नाही. पण असा अपवाद पुढे करून, सर्वच यंत्रे दोषी वा कुठल्या तरी पक्षासाठी पक्षपात करणारी असल्याचा आरोप बेताल होता व आहे. राजकारणात असे आरोप होत असतात. त्याची फ़िकीर अन्य राजकीय पक्ष करीत नाहीत. पण निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून तिने आता असे राजकीय आव्हान पत्करले आहे. यंत्रांवर आरोप करणार्यांना प्रतिआव्हान दिलेले आहे. येत्या शुक्रवारी सर्वच राजकीय पक्षांना मतदान यंत्राची चाचणी करून दोष सिद्ध करण्याचे आव्हान आयोगाने दिले आहे. त्यात आता मोदी विरोधकांचे पितळ पुरते उघडे पडण्याची शक्यता आहे. किती पक्ष ते आव्हान स्विकारतात ते बघायला हवे.
पंजाबमध्ये आपल्याला अपुर्व यश मिळणार अशी केजरीवाल यांना खात्री वाटत होती. ते शक्यही होते. पण त्यांच्या काही बांडगुळांनी पंजाबात जाऊन काही उचापती अशा केल्या, की तिथे असलेले पक्षाचे संघटन विस्कळीत होत गेले आणि लोकमतही दुरावत गेले. खरे तर त्यामुळेच अपेक्षेइतके मोठे यश केजरीवाल त्या राज्यात मिळवू शकले नाहीत. त्याची चाहुल मतचाचणीत लागलेली होती. पण आपल्या विरोधात जाणारे मत वा गोष्ट निदर्शनास आली, की त्याच्यावर भाजपाचे कारस्थान असल्याचा आरोप करण्याला केजरीवाल यांनी रणनिती बनवून टाकले होती. हळुहळू अन्य पक्षांनीही तीच रणनिती अंगिकारली. त्याचा कुठलाही तोटा भाजपा वा मोदींना झाला नाही. कारण त्यांना दोषारोप करून माध्यमात स्थान मिळवण्यापेक्षाही जनमानसात आपले स्थान बळकट करण्यात रस होता. त्याच्या परिणामीच अन्य पक्षांचा पराभव शक्य होता. यातली मोदींची खरी शक्ती वा बलस्थान ओळखूनच त्याला पराभूत करणे शक्य होते. ते बलस्थान यशाने हुरळून जाण्यापेक्षाही पराभव पचवण्यातले आहे. लोकसभेतील अपुर्व यश मिळाल्यानंतर आणि चार राज्यात विधानसभेत सत्ता मिळवल्यानंतर दिल्लीत भाजपाचा झालेला दारूण पराभव मोदींसाठी मोठे आव्हान होता. कारण तो पराभव भळभळत्या जखमेसारखा होता. पण तो नाकारण्यापेक्षा स्विकारून, आपले दोष दुरूस्त करण्यातून भाजपा सावरणार होता. मोदींनी तीच वास्तववादी भूमिका घेतली. म्हणूनच त्यांना त्या व तशा पराभवावर मात करणे शक्य झाले. दिल्लीनंतर त्यांना बिहारमध्ये महागठबंधन राजकारणाला सामोरे जावे लागले. त्यातूनही पराभवच पदरी आला. त्यात एक धडा होता आणि तोच शिकल्यामुळे त्यावर मात करण्याचा मार्ग मोदींना सापडला. तो धडा होता आपली मते व लोकप्रियता आणखी वाढवणे, असा होता आणि त्यात मतदानयंत्राचा काडीमात्र हिस्सा नव्हता.
केजरीवाल यांच्यापाशी तो संयम वा वास्तविकता नाही. म्हणूनच त्यांना पराभव पचवता आला नाही. त्यांनी यांत्रिक मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगालाच आव्हान दिले. आता ते आव्हान आयोगाने स्विकारले असून सर्वच पक्षांना यंत्रतील दोष दाखवून, त्यामुळे मतदानावर कशा विपरीत परिणाम होऊ शकतो, ते सिद्ध करण्याचे खुले आव्हान दिलेले आहे. केजरीवाल यांनी तर ४८ तासात आपण यंत्रात गफ़लत करून दाखवू; अशी फ़ुशारकी मारली होती. केजरीवाल हे सामन्य राजकारणी नाहीत, त्यांनी आधी इंजिनियरची पदवी घेतलेली होती आणि नंतर प्रशासकीत स्पर्धा परिक्षा देऊन सरकारी अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे. सहाजिक़च अन्य राजकीय नेत्यांपेक्षा त्यांचे यांत्रिक व तांत्रिक ज्ञान अधिक असल्याची समजूत होते. पण जो इंजिनीयर असतो, त्याने समजुतीपेक्षाही वास्तवावर अधिक विश्वास दाखवला पाहिजे. यंत्राविषयी आयोगाने केलेले खुलासे स्पष्ट आहेत. त्यात प्रत्येक यंत्र निर्दोष असल्याचा कुठलाही दावा नाही. एखाद्या यंत्रात दोष निघूही शकतो. पण तसे उघडकीस आले मग दुसरे यंत्र कामाला जुंपले जाते, असाही खुलासा केला होता. त्याखेरीज कुठल्याही रिमोट वा अन्य हस्तक्षेपाने मतदानाच्या प्रक्रीयेत गफ़लत होऊ शकत नाही, अशी हमी आयोगाने दिलेली आहे. ती हमी खोटी पाडून दाखवण्याचे आव्हान आता अशा आरोपकर्त्यांना पत्करणे भाग आहे. कारण यंत्रातली चिप निर्णायक असते व एकदा वापर झालेली चिप पुन्हा वापरली जात नाही. मुदत संपताच नष्ट केली जाते, असे आयोगाने वारंवार स्पष्ट केले आहे. सहाजिकच आता आयोग व अन्य आरोप करणारे पक्ष, यांच्यात संघर्ष पेटला आहे. ते आव्हान पेलून आरोपकर्ते सामोरे गेले नाहीत, तर जनमानसातली त्यांची उरलीसुरली विश्वासार्हताही संपुष्टात येणार आहे. त्यातून मोदींचे पारडे अधिकच जड करण्यास विरोधकांचाच हातभार लागणार आहे.
मतदान यंत्रातल्या गडबडीने भाजपा उत्तरप्रदेशात इतके मोठे यश मिळवू शकला, हा मुळात मायावतींचा आरोप होता. नंतर त्याविषयात त्यांनी मौन धारण केले. पण समाजवादी, कॉग्रेस व केजरीवाल यांनी तो मुद्दा उचलून धरला. दिल्ली महापालिकेत नंतर होणार्या मतदानासाठी यंत्र वापरू नये, असा आग्रह त्यांनीच धरलेला होता आणि ती मागणी कॉग्रेसने उचलून धरली होती. सोनिया गांधी तर विरोधकांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रपतींनाही त्याच कारणास्तव भेटायला गेल्या होत्या. सहाजिकच आता त्या प्रत्येकाला हे आव्हान पेलण्याचे प्रतिआव्हान मिळालेले आहे. यंत्रातील गडबडीची शंका घेऊन आरोप करणे सोपे असले, तरी तो सिद्ध करणे अशक्यप्राय बाब आहे. म्हणूनच आता त्याच पक्षांची तारांबळ उडालेली आहे. त्या महापालिका मतदानापुर्वीच दिल्लीच्या कॉग्रेसमध्ये फ़ाटाफ़ुट सुरू झाली होती आणि आता केजरीवालना त्याच दुखण्याला सामोरे जावे लागते आहे. कारण त्यांच्याच पक्षातले अनेकजण यंत्रापेक्षा आपापले पक्ष नेतृत्वच सदोष असल्याचे सांगायला पुढे सरसावले आहेत. मग यापैकी कोणालाही यंत्रातले दोष दाखवून देण्याची सवड तरी कुठे उरली आहे? सत्य असे निर्दय असते, ते दुबळे असल्याचा ठाम समज करून डावपेच खेळत गेल्यास, सत्य अधिक अक्राळविक्राळ रुप धारण करून समोर येत असते. तेव्हा ते कुणाला दयामाया दाखवत नाही. मोदी विरोधकांची आता तशीच कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाचे आव्हान पेलण्याची कितीजणांची तयारी असेल, ते आठवद्याभरात दिसणारच आहे. पण तिथे नामुष्की झाली व निवडणूक आयोग आपली मतदान यंत्रे निर्दोष असल्याचे अशा मार्गाने सिद्ध करू शकला, तर विरोधी पक्षाला पुढल्या काळात पळवाटाही शिल्लक रहाणार नाहीत. त्यांना मोदी विरोधात पक्षाची संघटना उभारून व लोकांमध्ये जाऊनच नवी विश्वासार्हता मिळवावी लागेल. अन्यथा निवडणूकीच्या मैदानात उतरण्यापुर्वीच त्यांचा पराभव झालेला असेल.
भाऊ; ई व्हीएम हॅक करता येत नैही हे मी दहा निवडणुकांच्या अनुभवाने सांगूइच्छितो।
ReplyDelete