समाजवादी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे भाजपा विरोधात एकजुट करण्याचे प्रयास चालू आहेत. अगदी कट्टर विरोधी असलेल्या मायावतींशीही हातमिळवणी करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. पण त्यांच्याच पक्षात सर्व काही आलबेल आहे असे कोणी म्हणू शकत नाही. तसे निवडणुकीपुर्वीही त्यांच्या पक्षात सर्वकाठी सुरळीत नव्हते. ऐन निवडणुकीचे वेध लागले असताना अखिलेशच्याच पुढाकाराने पक्षात दुफ़ळी माजली. त्यांचे सख्खे काका शिवपालसिंग यादव यांना धडा शिकवण्यासाठी मुख्यमंत्री सज्ज झाले आणि पक्षात दुफ़ळी माजली. कारण पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पिताजी उर्फ़ नेताजी मुलायम सिंग यांनीच पुत्राला सोडून भावाला समर्थन दिले होते. पुढे सर्व आमदार पुत्राच्या बाजूने गेल्यामुळे पित्याला माघार घ्यावी लागली आणि निवडणुका पार पडण्यापर्यंत पक्षात शांतता नांदवण्याचा प्रयत्न झाला. आता पक्षाचा पराभव होऊन सत्ता हातची गेल्यावरही त्या वैमनस्याचा शेवट झालेला नाही. कारण शिवपाल यादव यांनी वेगळ्या पक्षाची चुल मांडण्याची घोषणा केलेली आहे. त्याचे प्रमुख अखिलेशचे पिता मुलायमच असणार आहेत. म्हणजेच जुने नाटक नव्या नावाने पुन्हा रंगणार आहे. एका बाजूला देशात तमाम डाव्या किंवा पुरोगामी पक्षांच्या एकजुटीचा विषय चालू असताना, त्यातले बुजूर्ग असलेल्या मुलायम सिंग यांच्याच गोटातली एकजुट टिकू शकलेली नाही. ह्याला शुभशकून म्हणावे की अपशकून, हा ज्याचा त्याचा विषय आहे. कारण उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून, तिथे मुलायमच सर्वात ज्येष्ठ नेता आज उरलेले आहेत. पण त्यांच्याच पक्षाला अजून जुन्या भांडणातून सावरणे शक्य झालेले नाही. मग देशातील पुरोगामी नेतृत्व कोणी करायचे? कारण उत्तरप्रदेश वगळून अशी युती कामाची नाही, की त्यातून काहीही साध्य होण्याची शक्यता नाही.
तसे बघायला गेल्यास पंचवीस वर्षापुर्वी समाजवादी पक्षाची मुलायमनी स्थापना केली, तेव्हा तेही तरूण होते आणि जुन्या समाजवादी जनता दलीय नेत्यांशी त्यांना जुळवून घेणे साध्य झाले नव्हते. विश्वनाथ प्रताप सिंग तेव्हा जनता दलाचे प्रमुख नेता होते आणि जुन्या जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांनी पक्षात फ़ुट पाडली होती. त्यात मुलायम सिंग चंद्रशेखर यांच्या सोबत गेले होते. त्याचेही कारण होते. विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे पंतप्रधान होते आणि डाव्यांसह भाजपाच्या पाठींब्यावर त्यांनी सरकार स्थापन केलेले होते. त्याच काळात अयोध्येतील राम मंदिरासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी दुसर्यांदा रथयात्रा काढलेली होती. ती यात्रा रोखावी, असा मुलायमचा आग्रह होता. ती उत्तरप्रदेशात रोखून मुस्लिमांचे आपणच कैवारी असल्याचे त्यांना सिद्ध करायचे होते. पण पंतप्रधानांनी तशी संधी मुलायमना दिली नाही. तर समस्तीपूरला रथयात्रा आलेली असताना बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना ती संधी दिली. त्यामुळे मुलायम पंतप्रधानांवर नाराज होते. या राजकीय पार्श्वभूमीवर जनता पक्ष फ़ुटला होता. भाजपाने अडवाणींच्या अटकेमुळे सरकारचा पाठींबा काढून घेतला आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांना विश्वासदर्शक ठराव आणावा लागला. त्यापुर्वीच चंद्रशेखर यांनी काही खासदारांना हाताशी धरून ती फ़ुट घडवली आणि जनता दलाचे सरकार कोसळले. मग चंद्रशेखर यांनी राजीव गांधींचा पाठींबा घेऊन नवे संयुक्त सरकार बनवले. त्यांच्या समाजवादी जनता दलाच्या गटात मुलायम सहभागी झालेले होते. पुढे चंद्रशेखर सरकारही गडगडले आणि उत्तरप्रदेशात मुलायमची सत्ताही निकालात निघाली. पुढल्या निवडणूकीत भाजपा बहूमताने उत्तरप्रदेशात सत्तेवर आला. तेव्हा समाजवादी जनता दल गुंडाळून मुलायमनी नव्याने समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. तोच आजचा अखिलेशने बळकावलेला समाजवादी पक्ष होय.
ह्या पक्षाची स्थापना झाली तेव्हा अखिलेश शाळकरी मुलगा होता आणि मुलायमना नव्या पक्षाच्या स्थापनेत खरा हातभार लावला, तो त्यांच्या विविध भाऊबंदांनी! त्यात शिवपाल यादव किंवा चुलतभाऊ रामगोपाल यादव यांचा समावेश होता. तेव्हापासूनच मुलायमचा पक्ष घराण्याची मालमत्ता बनण्य़ाची प्रक्रिय़ा सुरू झालेली होती. पण त्यात अखिलेशचा हिस्सा नगण्य होता. मात्र हळुहळू पक्षाचा विस्तार होत गेला, तसतशी यादव घराण्याची त्यातील उपस्थिती वाढत गेली. लौकरच बाबरी मशीद पाडली गेली आणि त्यामुळे भाजपाचे तात्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना राजिनामा द्यावा लागला. त्यामुळे आलेल्या निवडणुकीत स्वबळावर मुलायमना राज्यात निवडणूका जिंकणे शक्य नव्हते. म्हणूनच नव्याने जीव धरणार्या बहुजन समाज पक्षाला मुलायमनी सोबत घेतले. तरीही त्या आघाडीला बहूमत मिळाले नाही आणि भाजपा वगळून सर्व पक्षांनी पुरोगामी आघाडी बनवली. त्यात मुलायम पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि बसपालाही प्रथमच सत्तेची चव चाखता आली. मात्र त्या सरकारला टिकू द्यायचे नाही, असा चंग बांधलेल्या भाजपाने बसपाच्या महत्वाकांक्षी स्थानिक नेत्या मायावतींना चिथावण्या देऊन मुलायम सरकार पाडले. आज महाराष्ट्रात जशी शिवसेना सत्तेत राहूनही सरकारवर सातत्याने टिका करीत असते, तशीच खेळी तेव्हा मायावती खेळत होत्या. त्यांना मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवून मुलायम सरकार पाडण्यात भाजपाला यश मिळाले आणि त्याच्याच बाहेरील पाठींब्यावर मायावती प्रथमच उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. लौकरच तेही सरकार भाजपाने पाठींबा काढून घेतल्याने कोसळले आणि मायावतींसह मुलायमही वनवासात गेले. पुढली दहाबारा वर्षे उत्तरप्रदेशात कोणालाही एकहाती बहूमत मिळवता आले नाही, की सरकार पुर्णवेळ चालवता आले नाही. या सर्व काळात मुलायमना त्यांच्या भावांनी साथ दिली.
अशा पार्श्वभूमीवर २००७ सालात मायावती व मुलायम हे उत्तरप्रदेशचे दोन प्रमुख नेते म्हणून उदयास आले आणि भाजपाचे जवळपास सर्वच नेतृत्व लयास गेले. पक्षाची संघटनाही विस्कळित होऊन गेली. त्याचा लाभ उठवताना मुलायमनी पक्षाचा विस्तार केला होता. त्यात आधीपासूनचे सहकारी म्हणून त्यांचे भाऊ प्रमुख नेते होते, तर नव्याने राजकारणात आलेला सुपुत्र अखिलेश आपला पाया घालत होता. २००७ सालात मायावतींना स्वबळावर बहूमत मिळाले आणि पुढल्या काळात मुलायमना नव्याने पक्ष उभारणी करताना भावांना बाजूला सारून पुत्राकडे पक्षाची सुत्रे सोपवावी लागली. त्यापैकी एकाने दिल्लीत आपले बस्तान बसवले होते, तर दुसरा म्हणजे शिवपाल मात्र राज्यातच आपले बस्तान पक्के करत होता. अशा पार्श्वभूमीवर २०१२ साली राज्याच्या निवडणूका समाजवादी पक्षाने जिंकल्या. तेव्हा नेताजी मुख्यमंत्रीपदी आपली वर्णी लावतील, अशी शिवपालची अपेक्षा होती. पण थोरल्या भावाने ती पुर्ण केली नाही, तेव्हापासून शिवपाल नाराज होते आणि संधी मिळताच पुतण्याला साफ़ करायचा त्यांचा मनसुबा होता. त्याला दुसर्या काकाच्या दगाबाजीमुळे काटशह मिळाला. अशा कौटुंबिक कलहाने मग समाजवादी पक्षाला ग्रासले होते. त्याची लोकसभा मतदानात प्रचिती आली. खरेतर तेव्हाच मुलायमनी हा बेबनाव मोडून काढत घरातली व पक्षातली भाऊबंदकी संपवली असती, तर त्यांच्या पक्षाची इतकी दुर्दशा झाली नसती. पण तसे होणे नव्हते आणि आता पक्षाच्या हातून राज्याची सत्ता गेल्यावरही घरातील भांडणांचा प्रभाव संपलेला नाही. पराभवानंतर एकत्र येऊन नव्याने उभे रहाण्याचा विचार व्हायला हवा होता. पण जुनेच वैर आता पुन्हा उफ़ाळून आले आहे. सता गमावलेल्या अखिलेशला संपवण्याचा चंग धाकट्या काकाने बांधला असून, त्याचे पहिले पाऊल म्हणून नव्या पक्षाची घोषणा करून टाकलेली आहे.
No comments:
Post a Comment