गेल्या दोन वर्षात सातत्याने कॉग्रेस पक्षाने मोदी सरकारला विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांच्या फ़रारी होण्याविषयी शेकडो प्रश्न विचारून सतावलेले आहे. कारण त्या दोघांवर पैशाच्या मोठा अफ़रातफ़री व घोटाळे केल्याचे आरोप आहेत. यातला ललित मोदी अजून तरी नेमक्या कुठल्या घोटाळ्यात आहे, त्याचा खुलासा झालेला नाही. पण विजय मल्ल्या मात्र पोलिसांच्या जाळ्यात ओढला जाण्याच्या अखेरच्या क्षणी भारत सोडून पळालेला माणूस आहे. त्याच्या विरोधात अनेक कोर्टात विविध खटले चालू आहेत आणि त्याला इथे येऊन हजर होण्याचे आदेशही फ़र्मावण्यात आलेले आहेत. सहाजिकच त्याला फ़रारी आरोपी म्हणता येईल. ललित मोदीच्या विरोधात कुठला तसा आदेश नाही. तरीही त्यांच्या अटकेविषयी किंवा पळून जाण्याविषयी सतत प्रश्न विचारून मोदी सरकारच त्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप, कॉग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी सातत्याने केलेला आहे. वास्तविक मल्ल्याचे सर्व घोटाळे कॉग्रेसचे युपीए सरकार सत्तेत असताना झालेले आहेत आणि त्याला हे घोटाळे करण्यासाठी कॉग्रेसी मंत्र्यांचेच पाठबळ मिळाल्याचे अनेक कागदपत्रातून सिद्ध होते. पण आपण ज्याला चोरी करू दिली, त्याला तुम्ही पळून जाण्यास कशाला मदत केलीत, असा उलटा प्रश्न मात्र कॉग्रेसवाले व त्यांचे श्रेष्ठ नेते राहुल गांधी नेहमी विचारत राहिलेले आहेत. आता त्याच कॉग्रेसचे मल्ल्याला आश्रय देणारे किंवा मदत करणारे अर्थमंत्री चिदंबरम, यांच्यावर गडबडीची सावली पडली आहे आणि त्यातला त्यांचा साथीदार असलेला सुपुत्र कार्ती चिदंबरम चौकशीच्या घोटाळ्यात अडकला आहे. असा हा सुपुत्र अकस्मात परदेशी निघून गेला असून, तोही मल्ल्याप्रमाणेच लंडनच्या आश्रयाला गेला काय, याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे चिदंबरमना उत्तर द्यावे लागणारच आहे. पण बाकीच्या कॉग्रेस पक्षाचे काय?
याच आठवड्यात कार्ती चिदंबरम याची चेन्नईतील अनेक कार्यालये व कंपन्यांवर आयकर खात्याने धाडी घातल्या. त्याचे अनेक व्यवहार गडबडीचे असल्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्याचा खुलासा करण्यापेक्षा चिदंबरम यांनी नेहमीप्रमाणे राजकीय सुडबुद्धीचा आरोप मोदी सरकारवर केला. चिदंबरम अर्थमंत्री असताना विविध कंपन्या व त्यांचे गैरव्यवहार करण्यासाठी अर्थखात्याचा आशीर्वाद आवश्यक होता. तो देण्याच्या बदल्यात चिदंबरम पुत्राला त्या कंपन्यांनी दक्षिणा दिल्याचे अशी कागदपत्रे सांगतात. तीच कागदपत्रे व त्याला दुजोरा देणारी माहिती देण्यासाठी या धाडी घातल्या गेल्या होत्या. माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या अशा तपशीलाचा संगतवार इन्कार करणे, चिदंबरम यांना अवघड असायचे कारण नाही. पण त्यांनी त्यालाच बगल देऊन आपण अर्थमंत्री असताना सर्वच कागदपत्रे आपल्यापर्यंत येत नव्हती. खात्यातील विविध अधिकार्यांनी परस्पर काही केले असेल, तर त्याची जबाबदारी आपली नाही, असे सांगत हात झटकले आहेत. याचा अर्थ सुपुत्राच्या व्यवहाराचे खुलासे देण्यासाठी कुठलाही सज्जड पुरावा त्यांच्यापाशी नाही, हेच सिद्ध होते. किंबहूना चाललेली चौकशी नेमकी व योग्य असल्याचीही त्यांना खात्री आहे. म्हणूनच कशाचाही इन्कार करणे त्यांना साधलेले नाही. त्यापेक्षा त्यांनी राजकीय पळवाट शोधण्याचा उपाय योजला आहे. त्यामुळे अर्थातच त्यांच्या सुपुत्राचे निरपराधीपण सिद्ध होणार नाही. ते शक्यही नाही. कारण आता त्याच कार्ती चिदंबरमच्या विरोधात चौकशी यंत्रणेने गुन्हा दाखल केला असून, तो आरोपी ठरला आहे. नेमक्या अशा मुहूर्तावर या सुपुत्राने मायदेशातून प्रयाण करावे, ही बाब सुचक नाही काय? आपल्यावर गंभीर आरोप असताना भारत सोडून जाण्यामागचा हेतू पुत्राला कळत नसेल, तरी चिदंबरम यांना तरी कळायला नको काय? त्यांना अशावेळी त्यांनीच योजलेले उपाय आठवत नाहीत काय?
ललित मोदी भारत सोडून पळाला, तेव्हाही त्याच्या विरोधात कुठलाही गुन्हा नोंदला नव्हता आणि आजही कुठला गुन्हा नोंदलेला नाही. त्याच्याविषयी संशय होता. त्याची पुरेशी चौकशी होऊ शकली नाही आणि त्याला निसटण्याचे मार्ग उपलब्ध करून देण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पण तसे असूनही गृहमंत्री पदावर आरुढ झालेल्या चिदंबरम यांनी ललित मोदीच्या विरोधात काय केले होते? तो लंडन येथे होता आणि त्याला तिथून निसटण्याची संधी मिळू नये, म्हणून चिदंबरम यांच्या गृहखात्याने ललितचा पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ललितच्या वकीलाने कोर्टात जाऊन दाद मागितली आणि ललितचा पासपोर्ट परत करावा लागला होता. मग चिदंबरम यांनी ब्रिटन सरकारला इशारे देण्यापर्यंत मजल मारली होती. ललितला ब्रिटनबाहेर प्रवासाची कागपत्रे दिल्यास भारत-ब्रिटन संबंध बिघडू शकतात, असा इशारा देण्यापर्यंत चिदंबरम गेलेले होते. अशा पित्याला आपलाच सुपुत्र पळून जाण्याचा अर्थ कळत नाही, असे कोणी म्हणू शकेल काय? कार्ती चिदंबरम यांच्या परदेशी जाण्याच्या दुसर्या दिवशी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याचा अर्थ कुणा जुन्या निष्ठावंताने त्याला गुन्हा नोंदला जाणार आल्याची पुर्वकल्पना दिलेली असावी. नेमकी अशीच स्थिती विजय मल्ल्याच्या बाबतीत होती. त्याच्या विरोधात गुन्हा कोर्टात गेल्यावर त्याचा पासपोर्ट जप्त झाला असता. पण तसे होण्याच्या काही तास आधीच मल्ल्या विमानात बसला होता. थोडक्यात त्यालाही गुन्हा नोंदला जाण्याची पुर्वसुचना मिळालेली होती. चिदंबरमपुत्र आणि विजय मल्ल्या यांच्या पलायनात किती नेमके साधर्म्य आहे, त्याचा यातून अंदाज येऊ शकतो. आपण पळालो नसून भारतात परत येणार असल्याचे तेव्हा मल्ल्या सांगत राहिला आणि आज कार्तीही फ़रारी झाला नसल्याची ग्वाही चिदंबरम देत आहेत.
आणखी आठवडाभरात पुत्र माघारी येणार असल्याचे चिदंबरम सांगत आहेत. तो खरेच परतला तर गोष्टच वेगळी. कारण अजून त्याच्या विरोधात कुठल्या कोर्टात प्रकरण गेलेले नाही वा त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची वेळ आलेली नाही. सहाजिकच अजूनही तो माघारी परतला तर त्याला तात्काळ अटक होण्याची बिलकुल शक्यता नाही. पण अपेक्षेपेक्षा त्याने माघारी परतण्यास विलंब लावला तर काय होईल? त्याच्यावरचे आरोप गंभीर असून मिळालेले पुरावेही सज्जड आहेत. सहाजिकच त्याचे प्रकरण कोर्टात नेऊन त्याला कस्टडीत घेण्याची मागणी करण्याचा दिवस दूर नाही. अशावेळी कार्ती भारतात नसेल, तर त्याला माघारी बोलावले जाईल आणि तसा आदेशही कोर्टातून मिळवला जाईल. एकूण काय, तसे झाल्यास मल्ल्या आणि कार्ती चिदंबरम एकाच माळेचे मणी असल्याचे जगाला दिसून येईल. ज्या देशातून मल्ल्यासारखा बदमाश फ़रारी होतो, तिथून कार्ती फ़रारी झाला, तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही. पण कार्ती म्हणजे आणखी कोणी एक गुन्हेगार, भामटा उद्योगपती नाही. तो कॉग्रेसच्या एका ज्येष्ठ नेता व माजी वरीष्ठ मंत्र्याचा सुपुत्र आहे. त्याच्यावर कॉग्रेसच्या राज्यात केलेल्या अफ़रातफ़रीचे आरोप आहेत. देशाची व जनतेची लूट केल्याचा आरोप आहे. ज्या संदर्भात त्याच्यावर आरोप आहे, त्यात शीना बोरा प्रकरणातल्या हत्याकांडाचे धागेदोरे गुंतलेले आहेत. अशा बाबतीत चिदंबरम फ़सल्यास, कॉग्रेस पक्ष व त्याचे उपाध्यक्ष काय बोलणार आहेत? मल्ल्यासाठी मोदी सरकारला जाब विचारणार्यांना कार्ती चिदंबरम प्रश्नावर उत्तरे देण्याची नामुष्की येणार आहे. त्याचे उत्तर काय असू शकेल? मोदींनी चिदंबरमच्या सुपुत्राला देशातून फ़रारी होण्याची मोकळीक दिली, असा आररोप केला जाणार आहे काय? की तशी नामुष्की राहुल व कॉग्रेस पक्षावर यावी म्हणूनच कार्तीला मोदी सरकारने निसटू दिले आहे?
Sammanya mansala hya prakaranna madhil shevatchya don te teen vakyat je lihile ahe te manje ek mother ashcharyach ahe. Bhau lekh Apratim ahe. Dhanyawad
ReplyDeleteएकंदरीत, ही प्रकरणे म्हणजे, " तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो" अशीच दिसत आहेत. एकमेका सहाय्य करू अवघे ( आपापसातले) विश्वची उद्धारू, अशी एकमेकांची पाठराखण राजकारणी सर्वच पातळीवर करीत राहतात.
ReplyDeleteभाऊ एकदम बरोबर आपण पोल खोल केला आहे. मध्यमे खुबीने बेमालूम पणे दिशाभूल करत आहेत. 19.5.2017 आर्णब गोस्वामीच्या शो मध्ये स्वत: आर्णब भाजपच्या संविद पात्राला विचारत होता की मोदी सरकारने मल्या ला परदेशात का जाऊ दीली... त्यांची शोध पत्रकारीता किती बेगडी आहे हे उघडे पडले आहे. कारण बँकानी कोर्टात 9 वेळा मल्याचा पासपोर्ट जप्त करण्यासाठी आज॔ दाखल केला परंतु कोर्टाने फेटाळून लावला. (अर्थात कोर्टाच्या गळ्यात कोण घंटा बाधणार? व कोण ताशेरे/ सस्पेंड ओढणार करणार? ) हे या टाॅपच्या व सोकाॅल्ड निस्पुह आर्णब च्या शोधपत्रितेला हे माहित नाही हे भाऊ तुम्हाला पटते काय? व कदाचित आपल्याला माहित असेल. परंतु सामान्य माणसाची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व करत असतात व आपण सुद्धा अशा पत्रकारांचे उदात्तीकरण करतात हे न पटणारे आहे. व कनफुज करणारे आहे.
ReplyDeleteएवढ्या सर्व दिव्यातुन मोदी निवडणूका मागुन निवडणूका जिंकत आहेत हे अनबिलीव्हलेबल आहे.
खरच मेरा भारत कधीकधी महान.
Aks