आनंद शर्मा नावाचे एक कॉग्रेस नेते आहेत. राज्यसभेत कॉग्रेसचे तमाम महत्वाचे नेते बसतात. त्यापैकीच हे एक आहेत. त्यांनी कधीकाळी युवक कॉग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. तसे अनेक माजी अध्यक्ष आजकाल कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून मिरवत असतात. तर अशा शर्मांनी इंदिराजींवर पुस्तक लिहीले आहे आणि त्याचेच प्रकाशन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पार पडले. या निमीत्ताने राष्ट्रपतींना आपला राजकीय कारकिर्दीचा जमाना आठवला आणि त्यांनी नव्या पिढीच्या कॉग्रेस नेत्यांना इंदिराजींची नव्याने ओळख करून दिली. तसे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी व अध्यक्षा सोनिया गांधी, अधूनमधून इंदिराजींची जगाला आठवण करून देत असतात. पण आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यापेक्षा त्यांना इंदिराजी महत्वाच्या वाटत नाहीत. तसे नसते तर प्रणबदांनी इंदिराजींच्या जुन्या कर्तबगारी व आठवणींना उजाळा दिला नसता. विपरीत काळामध्ये वा पराभवाच्या छायेत असताना इंदिराजींनी काय केले, त्याची आठवण अकरून द्यावी असे प्रणबदांना वाटावे, यातच आजच्या कॉग्रेसची दुरावस्था लक्षात येऊ शकते. आज कॉग्रेस चांगल्या स्थितीत असती, तर राष्ट्रपतींना जुन्या आठवणी काढण्याची गरज भासली नसती. त्यांनी एकदम १९७८ च्या आठवणी जाग्या केल्या. तेव्हा लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसचा दारूण पराभव झाला होता. खुद्द इंदिराजी रायबरेली मतदारसंघात पराभूत झाल्या होत्या आणि संपुर्ण उत्तर भारतातून कॉग्रेस जवळपास नामशेष झाली होती. राजस्थान पंजाबपासून बंगालपर्यंत कॉग्रेसचा कोणी खासदार लोकसभेत पोहोचू शकला नव्हता. अशा स्थितीत पक्षातही इंदिराजींच्या नेतृत्वाला आव्हान उभे राहिले होते. अशा स्थितीत इंदिराजींनी पक्षाचे पुनरुज्जीवन कसे केले, त्याच्या आठवणी जागवण्याचा अर्थ जरी आजच्या कॉग्रेस नेत्यांना उमजला तरी खुप झाले.
कॉग्रेस संपली असे तेव्हा मानले जात होते. पण इंदिराजी मनाने खचल्या नव्हत्या. पराभव त्यांनी पचवला होता. त्यांनी पक्षाचा व आपला राजकीय पराभव कशामुळे झाला, त्याचे चिंतन मनन केले होते. त्यातूनच त्याच चुका पुन्हा करू नयेत, हा धडा त्या शिकल्या होत्या. त्यासाठीच त्यांनी आणिबाणी लादण्यात आपली चुक झाल्याचे विनासायास मान्य करून टाकले होते. सहाजिकच त्यांच्यावरील जनतेचा राग कमी झाला होता. त्यामुळेच त्यांच्या विरोधात सुडबुद्धीने कारवाया करणार्या जनता पक्ष व त्याच्या नेत्यांविषयी जनमानसात घृणा निर्माण होण्यास हातभार लागत गेला. मात्र इंदिराजी कुठल्याही कारणास्तव वा निमीत्ताने जनता पक्षावर दुगाण्या झाडत बसल्या नव्हत्या. ज्यांना लोकांनी कौल दिला आहे, त्यांना कारभार करू देण्याची संधी इंदिराजींनी दिलेली होती. किंबहूना जनता सरकारने काही केले तरच ते चुकतील व आपण त्या चुकीचा लाभ उठवू; अशी इंदिराजींची रणनिती होती. कुठल्याही कारणास्तव त्यांनी संसदेत वा अन्यत्र जनता पक्षाची वा सरकारची कोंडी करण्याचे डावपेच खेळले नव्हते. जनता पक्षावर कुठलाही आरोप करण्यात वेळ घालवला नव्हता. उलट त्यांनी आपल्या पक्षाला व संघट्नेला मजबूत करण्याचे प्रयास आरंभले होते. त्यात पक्षाचे श्रेष्ठीच अडथळा होऊ लागले, तेव्हा इंदिराजींनी अशा ज्येष्ठ नेत्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचे प्रयत्न आरंभले होते. कारण तेव्हाही कॉग्रेसमध्ये सत्तापिपासू लोकांचाच भरणा होता. त्यांना घेऊन राजकीय झुंज देणे शक्य नव्हते. म्हणूनच पक्षात दुफ़ळी माजण्याचा धोका पत्करून इंदिराजींनी पक्षात फ़ुट पडू दिली व वेगळी इंदिरा कॉग्रेस सुरू केली. अल्पावधीतच झुंजणार्या व संघर्षाला सज्ज असलेल्या कार्यकर्त्यांचा गोतावळा त्यांच्याभोवती जमा झाला. त्याची प्रचिती काही महिन्यात आली. कारण इंदिराजींनी चार विधानसभा जिंकून दाखवल्या होत्या.
जनता पक्ष वा त्यांचे सरकार आपल्या विरोधात कुठल्या कारवाया करते आहे किंवा डाव खेळते आहे, त्यावर रडण्यापेक्षा इंदिराजी आपली पक्ष संघटना उभारण्यामागे लागल्या होत्या. त्यात देवराज अरस वा चेन्ना रेड्डी असे दक्षिणेतील नेते त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. दुभंगलेल्या कॉग्रेसपैकी इंदिराजींच्या कॉग्रेसला मतदाराने कौल दिला. तिथून उर्वरीत भारतातील कॉग्रेसचे लढवय्ये कॉग्रेसजन त्यांच्यामागे एकवटत गेले. दुसरीकडे त्यांनी जनता पक्षाला इतके मोकाट रान दिले होते, की इंदिराजींच्या पुनरागमनाची भितीही जनता पक्षाला वाटेनाशी झाली होती. त्यातून त्या पक्षात इतका बेबनाव आणि बेबंदशाही माजली, की त्यांनीच आपला पक्ष मोडकळीस आणण्याचे काम हाती घेतले. पर्यायाने इंदिराजींच्या पुनरागमनाची तयारी त्यांचे विरोधकच करू लागले होते. जनता सरकार पाडण्यासाठी इंदिराजींनी कुठलेच डाव खेळले नाहीत. त्यांच्या हातात देशाच्या राजकारणाची सुत्रे जनता पक्षाच्या नेत्यांनीच अलगद आणून सोपवली. आज राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या प्रणबदांना म्हणूनच तो काळ आठवला असावा. तेव्हा ते उमद्या वयातील राजकारणी होते आणि इंदिराजी कृतीतून करीत असलेल्या राजकारणाचे धडे गिरवत होते. म्हणूनच आज त्यांना इंदिराजींचा वारसा आठवला. आपण इंदिराजींची सून आहोत असे मध्यंतरी सोनिया गांधी अगत्याने म्हणाल्या होत्या. म्हणजे आपण खटले व कोर्टकचेरीला घाबरत नाही, असेच त्यांना सुचवायचे होते. तेव्हा इंदिराजीही खटल्यांना घाबरल्या नव्हत्या. तर त्यांनी कोर्टातही जाऊन सुडबुद्धीच्या राजकारणाचा कंबर कसून सामना केला होता. सोनियांची तितकी हिंमत झालेली नाही. म्हणून त्यांना नॅशनल हेराल्ड खटल्यात लपंडाव खेळावे लागत आहेत. सासूचे नाव घ्यायचे आणि पळपुटेपणाचे वर्तन करायचे. हा इंदिराजींचा वारसा होऊ शकत नाही, असेच प्रणबदांना सुचवायचे नसेल काय?
इंदिराजींचे नुसते नाव घेऊ नका, त्यांनी घडवलेल्या इतिहासाचे आकलन करा आणि मगच कॉग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य आहे, असेच यातून त्यांना सुचवायचे असावे. पण ते सुचवण्याची वेळ आली, याचा अर्थ़च समोर बसलेल्यांना इंदिराजींचा चेहरा ठाऊक आहे. पण त्यांचे कर्तृत्व उमजलेले नाही, याची प्रणबदांना खात्री झालेली असणार. म्हणून तर त्यांनी ते निमीत्त साधून हे खडेबोल ऐकवले आहेत. त्यांनी ज्या कालखंडाचे स्मरण करून दिले, तेव्हाही कॉग्रेसची स्थिती दुर्दशेची होती. पण सत्ता संपादन करण्यासाठी इंदिराजी अन्य पक्षांशी तडजोडी व आघाड्या करीत फ़िरल्या नव्हत्या. तर असलेल्या पक्षातही लढायची इच्छा गमावलेल्यांना बाजूला करून त्यांनी नव्याने पक्षाची उभारणी केली होती. आज त्यांची सून व नातू सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी आसुसले आहेत आणि त्यासाठी कोणाशीही कसल्याची तडजोडी करायला सज्ज आहेत. हा जमिन अस्मानाचा फ़रक आहे. प्रणबदांना तो प्रत्यक्ष जाणवतो आहे. इंदिराजी सत्तेच्या लाचार नव्हत्या की सत्तेसाठी अगतिक झालेल्या नव्हत्या. त्यांच्यामागे सत्ता फ़रफ़टत येत असे. त्यांना अन्य कुठल्या पक्ष वा नेत्यांच्या मिनतवार्या करून सत्ता मिळवण्याची लाचारी करावी लागली नव्हती. ठामपणे निर्णय घेण्याची आणि त्यामागे आपली सर्व शक्ती पणाला लावण्याची इंदिराजींची कुवतच, कॉग्रेसच्या पुनरुज्जीवनाला कारणीभूत झाली होती. ती कुवत वा क्षमता आजच्या नेतृत्वात नाही, असेच प्रणबदांना दाखवून द्यायचे आहे. म्हणून त्यांनी ३९ वर्षे जुन्या आठवणी जागवल्या. पण त्याचा नेमका आशय व अर्थ किती कॉग्रेसजनांच्या लक्षात आला असेल त्याचीच शंका आहे. तसे नसते तर राष्ट्रपती आपल्या घटनात्मक मर्यादांना विसरून अशा राजकीय इतिहासात शिरले नसते, की त्यांनी समोर बसलेल्या कॉग्रेसनेत्यांना आजच्या राजकीय वास्तवाचे स्मरण करून देण्याचा विचार केला नसता. पण त्याचा उपयोग किती होईल याची शंकाच आहे.
जनतेला अनेक भ्रष्ट नेत्यांवरील खटले लौकरात लौकर निकाली निघायला हवे आहेत. कित्येकजण या मुद्द्यावर मोदी सरकारवर टीका करीत असतात. पण मोदी आणि टीमने यात घिसाडघाई न करता न्याय व्यवस्थेला पाहिजे तेव्हढा वेळ देऊ केला आहे. मला वाटते मोदी शहा आणि कंपनी यांनी जनता पक्षाच्या पराभवातून धडा घेतला आहे.
ReplyDelete