सीमेवर आणि काश्मिरात भारतीय सैनिकांचे प्राण घेतले जात असताना पाकिस्तानशी कला वा क्रिडाविषय कुठलेही संबंध असू नयेत, असा आग्रह दिर्घकाळ शिवसेनेने धरलेला होता. पण आंतरराष्ट्रीय विषयात इतक्या सहजपणे कुठलेही निर्णय घेता येत नसतात, किंवा संबंध तोडता येत नसतात. म्हणूनच दोन देशातील क्रिकेटच्या मालिका रद्द झालेल्या असल्या तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत-पाक सामना टाळता येत नसतो. तरीही तसा आग्रह यावेळी शिवसेनेच्या पलिकडे अनेक गोटातून धरला गेला होता. पण त्याविषयी भारत सरकारला काही ठाम निर्णय घेता आला नाही. पाकिस्तानला भारताशी क्रिडा वा कला विषयक संबंध हवेत, म्हणजे तिथल्या कलाकारांना व खेळाडूंना पैसे हवे आहेत. त्यापलिकडे त्यांना विषयाशी कर्तव्य नाही. कुठलाही पाकिस्तानी जितका मनपुर्वक भारताचा द्वेष करीत असतो, तितकाच पाक कलाकार वा खेळाडूही भारताचा द्वेष करीत असतो. त्याला अन्य कारणे आहेत, तसाच न्युनगंडही कारणीभूत आहे. आपली कुवत नाही वा आपल्यात भारताशी दोन हात करण्याची क्षमता नाही, हे खरे दुखणे आहे. पण आपला छोटेपणा वा कोतेपणा मान्य केला तरच त्या देशाला व तिथल्या लोकांना त्यातून बाहेर पडता येऊ शकेल. नुसता भारताचा द्वेष करून त्यांना आपली स्थिती सुधारता येणार नाही. पण तसे काही घडणे अशक्य आहे. त्याचे एकमेव कारण धर्मांध मानसिकता हेच आहे. पाक हा मुस्लिम देश आहे आणि आपला धर्म इस्लाम म्हणूनच आपण वेगळा देश असल्याच्या हट्टातून त्या देशाची निर्मिती झालेली आहे. सहाजिकच पाकिस्तानचा पराभव किंवा अपयश म्हणजे आपल्या धर्माचे अपयश, अशी तिथल्या सामान्य माणसाची पक्की समजूत करून देण्यात आलेली आहे. परिणामी त्या लोकसंख्येमध्ये हा न्युनगंड जोपासला गेला आहे. त्याची प्रचिती पदोपदी येत असते. तशीच ती परवाच्या क्रिकेट सामन्यातही आली.
हा सामना होणार किंवा नाही, याची आधी चर्चा रंगलेली होती. तसा कुठला राजकीय निर्णय झाला नाही आणि अखेर सामना झालाच. तर त्यात निसर्गाने व्यत्यय आणला. पावसामुळे चॅम्पियन चषकाच्या स्पर्धेतील हा सामना अटीतटीचा होणार अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण नेहमीप्रमाणे त्यावर विरजण पडले. या सामन्यापुर्वी पाकिस्तानचे एकाहून एक वेगवान गोलंदाज विराट कोहलीला कशी शिकार करणार, त्याच्या गमजा मारीत होते. त्यातही काही नवे नाही. दिड दशकापुर्वी विश्वचषक स्पर्धेत सचिनसाठी आपण खास चेंडू राखून ठेवल्याच्या गमजा तेव्हाचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर बोलायचा. पाकिस्तानात रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार्या शोएबला पहिल्याच षटकात सचिनने षटकार हाणला. त्याच्या दुसर्या षटकात विरेंद्र सहभागने दुसरा षटकार हाणल्यावर हा महान गोलंदाज पुढली बारापंधरा षटके गोलंदाजीलाच आला नाही. हे पाकिस्तानचे शौर्य आहे. जी कथा क्रिकेटची आहे, तशीच्या तशी पाकिस्तानी सेनेचीही आहे. भारताची भंबेरी उडवण्याच्या गमजा करणार्या पाकिस्तानी सेनेला प्रत्येक युद्धात मोठी हानी पत्करावी लागली आहे आणि नामुष्की होऊनच त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. पण म्हणून त्यांची खुमखुमी कधी संपलेली नाही. कारण ही खुमखुमी म्हणजेच त्यांचे राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रीय ओळख आहे. नुसत्या फ़ुसक्या फ़ुशारक्या मारण्यापलिकडे पाकिस्तान काहीही करू शकत नाही. त्याचीच प्रचिती गेल्या रविवारच्या सामन्यातही आली. भारताचे तीन गडी बाद करताना त्यांची षटके संपली आणि बदल्यात भारतीय धावांचा डोंगर चढताना त्यांची अवघी फ़लंदाजी ढेपाळून गेली. क्रिकेट असो किंवा रणमैदान असो, तिथे आमनेसामने लढायची कुवतही या देशाकडे नाही. पण नुसती तोंडाची वाफ़ दवडण्यात त्यांची मस्ती चालू असते.
आज नेमकी तीच त्रुटी ओळखून भारतीय सेनेने पाकची कोंडी केलेली आहे. काश्मिरच्या नियंत्रण रेषेवर सध्या पाकसेनेला भारतीय तोफ़ांचा भडीमार सहन करावा लागत आहे. सीमेलगत किंवा नियंत्रण रेषेवर भारतीय सेनेची आगळीक काढली गेल्यास त्याला चोख उत्तर दिले जाते आहे. पण तिथेच न थांबता भारतीय सेनाही इतका मोठा प्रतिहल्ला करीत असते, की पाक नागरिकांना सीमेलगत वा नियंत्रण रेषेलगत जगणेही अशक्य झाले आहे. पण गंमत अशी आहे, की आपली बाजू लंगडी पडते याचीही कबुली देण्य़ाचा प्रामाणिकपणा त्यांच्यापाशी नाही. नऊ महिन्यापुर्वी भारताने सर्जिकल स्ट्राईक केला व त्याची जाहिर वाच्यता केली, तर तो फ़टका सहन करूनही पाक सेना निमूट बसली. कारण आपल्या हद्दीत येऊन भारतीयांनी आपल्याला मारले, हे कबुल करण्याचेही साहस त्यांच्यात नाही. तीच आता पाकसेनेची मोठी अडचण होऊन बसली आहे. पाक सेनेच्या गमजा तिथल्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी असतात, तोवर ठिक आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे अस्तित्व सेनेमुळेच टिकून असल्याचे भासवता येते आणि नागरी सत्तेवर शिरजोरी करता येते. अशी पाकसेना भारतीय सेनेकडून सीमेवर मार खाते, असे पाक जनतेला कळले तर त्यांनाही आपल्या क्रिकेटपटूंसारखे तोंड लपवून पळावे लागेल. जगात कुठेही पराभूत होऊन पाक संघ माघारी मायदेशी जातो, तेव्हा त्यांना उजळमाथ्याने विमानतळाच्या बाहेरही पडता येत नाही. वेगवेगळ्या मार्गाने त्या खेळाडूंना निसटावे लागते. कारण या पराभूत लढवय्यांचे जोड्याने स्वागत करायला पाकिस्तानी नागरिक सज्ज असतात. सीमेवर पाक सेनेला असाच मार खावा लागल्याचे मान्य केल्यास, पाक सेनापती व जनरल्सनाही लोकांचे जोडे खावे लागतील ना? म्हणूनच आजकाल रोज सीमेवर भारतीय सेनेकडून मार खाल्ला, तरी पाकसेनेला तक्रारही करायची सोय राहिलेली नाही.
दिड वर्षपुर्वी भारताने प्रथमच अशी सर्जिकल स्ट्राईकची यशस्वी कारवाई म्यानमारमध्ये केलेली होती. उल्फ़ा अतिरेक्यांनी तेव्हा सीमा सुरक्षा दलाच्या काही जवानांची हत्या घडवुन आणलेली होती. हे उल्फ़ा अतिरेकी म्यानमारमध्ये दडी मारून बसल्याची खबर भारताला मिळालेली होती. तर भारतीय कमांडो पथकाने म्यानमारच्या हद्दीत जाऊन या अतिरेक्यांचा शोध घेतला आणि त्यांना ठार मारले होते. तेव्हा म्यानमारकडून कुठलीही प्रतिक्रीया येण्यापुर्वीच पाकिस्तानातून प्रतिक्रीया आली होती. असे काही म्यानमारमध्ये चालून गेले, म्हणून पाकिस्तानी हद्दीत खपवून घेणार नाही. पाक हद्दीत भारताने अशी सर्जिकल स्ट्राईकची कृती केल्यास थेट अणूयुद्धाला आरंभ होईल, असा इशारा देण्यात आला होता. पण त्याची काय गरज होती? भारताने पाकला तशी धमकी दिलेली नव्हती आणि कारवाई तर म्यामनारमध्ये झालेली होती. पण चोराच्या मनात चांदणे म्हणतात, तसा त्या बातमीने पाक सेनाधिकार्यांना घाम फ़ुटला होता. त्यांनी थेट अणूबॉम्बची धमकी देताना म्हटले होते, की आमचे अणूबॉम्ब दिवाळीचे फ़टाके नाहीत. पण ती पोकळ धमकी होती. सप्टेंबर महिन्यात भारताने पाक हद्दीत जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला व त्याची माहिती माध्यमांना देऊन टाकली होती. पण पाकिस्तानने साधी प्रतिक्रीयाही दिली नाही. उलट हल्ला झालाच नाही व आपला कोणी दगावलाही नसल्याचे खुलासे केले होते. कारण पराभव पचवण्याची हिंमतही त्यांच्यापाशी नाही, की लढण्याचे साहस नाही. अशा लोकांना कितीही मारले म्हणून ते लढाईला सामोरे येण्याची शक्यता नसल्याचे भारतीय सेनेने आता ओळखलेले आहे. म्हणूनच क्रिकेटप्रमाणेच आजकाल पाकला चोपले जाते आहे. पण शोएब अख्तरप्रमाणेच त्यांचे सेनाधिकारी प्रतिहल्ला करण्याची भाषा विसरून हल्लाच झाला नसल्याचे खुलासे देत बसले आहेत. उद्या बलुचीस्तान गमावण्याची पाळी आली तरी त्यांच्याकडून काही होईल अशी अपेक्षा कोणी करू नये.
भाउ इथ काय पाकप्रेमी कमी नाहित.त्यांच्या fb पोस्ट वाचुन कोणाचही रक्त खवळेल.उदा.लष्कर प्रमुखाना पगार मिळतो त्यांनी जास्त बोलु नये.जीपला बांधलेल्या दगडफेक्याच्या परवडीचा?लेख कहर म्हनजे सेनेला मोदीची सेना म्हनने.अस वाटत पाकी बरे डायरेक्ट दुश्मन.हे असलले घरभेदी फार भयंकर कारन समाजसेवी,पत्रकार,लेखक,स्त्रीवादी असे मुखवटे लावलेत
ReplyDeleteआता तर सौदी डिफेन्स मिनीस्टरही खुलेआमपणे पाकिस्तानला त्यांचे सेवक म्हणून हिणवू लागलेत. त्यामुळे तिकडूनही त्यांची कोंडी झाली आहे
ReplyDeletehttp://defencenews.in/article/Pakistani-Are-Our-Slaves-says-Saudi-Defense-Minister-262563?utm_source=NotifyVisitors&utm_medium=browser_push_notification&utm_campaign=PakistaniAreOurSlavessaysSaudiDefenseMinister