तामिळनाडू हे आजच्या भारतातील पैसा व सत्ता यांच्या माजोरीपणाचे माहेरघर झाले आहे. मागल्या डिसेंबर महिन्यात जयललिता यांचे निधन झाले आणि त्यांचा सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्ष हा एकखांबी तंबू असल्यामुळे, तिथे पर्यायी नेतृत्व निर्माणच होऊ शकलेले नव्हते. पाया पडून आपले हेतू साध्य करणार्यांचा गोतावळा, त्या पक्षाचे स्वरूप असल्यामुळे नजर खाली असेल, तर नेता कोण हे बघायची सवय मोडून जाते. पाय बघूनच मान झुकवली जात असते. सहाजिकच सतत जयललितांच्या सोबत असलेल्या शशिकला या मैत्रीणीच्या समोरही नजर वर करण्याची कुवत नसलेल्यांचा पक्ष, म्हणून हा पक्ष टिकून राहिला होता. पण त्याची लोकप्रियता एका व्यक्तीभोवती असल्याने तिच्याच निधनानंतर पक्षात पेचप्रसंग निर्माण झाला. एका नेत्याने बंड करून बघितले, तेव्हा बाकीचे बंडाला पाठींबा देतील अशी त्याची अपेक्षा होती. पण तिथेच पन्नीरसेल्व्हम यांची फ़सगत झाली. कारण त्यांच्या पक्षात तीन प्रवाह कार्यरत होते. एक थोडाफ़ार विचार करू शकणारे सेल्व्हम यांच्यासारखे लोक होते, दुसरा गट जयललिता वा शशिकला यांच्या पाया पडून आपला कार्यभाग साधून घेणारा होता. तर तिसरा घटक पैशाचा होता. जयललितांच्या नावाने जमा केलेली मालमत्ता व पैसा, शशिकला यांच्या कुटुंबाने विविध स्थानी गुंतवलेला आहे. म्हणूनच पैशाची शक्ती त्यांच्या हाती केंद्रीत झाली आहे. शशिकला यांनी अम्माच्या मृत्यूनंतर सत्ता व पक्ष यावर आपली हुकूमत स्थापित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तो फ़सला आणि आज त्याच तुरूंगात जाऊन पडल्या आहेत. पण पैशाच्या बळासमोर अन्य कुणाचा टिकाव लागताना दिसत नाही. पैशाने कायदा, लोकशाही व अधिकारही विकत घेता येतो, यावर अशा लोकांची किती पक्की श्रद्धा असते, त्याचे नवनवे दाखले शशिकला सध्या जगाला देत आहेत.
सेल्व्हम यांनी बंड केल्यावर शशिकलांनी सर्व आमदारांना उचलून एका ठिकाणी नेवून बंदिस्त केले. पण त्यांनाच तुरूंगात जाण्याची पाळी आल्यावर त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मदतीने पक्षासह सत्तेवर कब्जा राखलेला आहे. त्यांची कठपुतळी म्हणून पलानीसामी हे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाकत आहेत आणि पक्षाची सुत्रे शशिकला यांनी आपल्या हातीच राखलेली आहेत. त्यांचा थेट प्रतिनिधी म्हणून दिनाकरन नावाचा भाचा काम बघतो आहे. त्याला पैशाची मस्ती किती आहे, त्याचे दाखले गेल्या तीनचार पहिन्यात सतत समोर येत आहेत. आधी त्यालाच जयललितांच्या मतदारसंघात पक्षाची उमेदवारी देण्यात आलेली होती. ती जागा जिंकण्यासाठी त्याने अक्षरश: पाण्यासारखा पैसा ओतला. हा पैसा इतका ओतला, की त्याचा गवगवा व्हायचे थांबले नाही आणि निवडणूक आयोगाला तिथले मतदान स्थगित करावे लागलेले होते. कोट्यवधी रुपये एका पोटनिवडणूकीसाठी ओतले गेले आणि उघड दिसू नये, म्हणून विविध कंपन्यांमार्फ़त मतदाराला भेटवस्तु पाठवण्यात आल्या. त्याचा बोभाटा झालाच. त्यामुळे पक्षाची नाचक्की झाली होती. पण विषय तिथेच संपला नाही. पक्षात फ़ुट पडल्यामुळे निवडणुक चिन्हावर दोन्ही गटांनी दावे केलेले आहेत आणि त्याची सुनावणी निवडणूक आयोगाकडे चालू आहे. तिथे कोणाला झुकते माप मिळू शकते, हे कोणी सांगू शकत नाही. पण शशिकला व दिनाकरन यांना जगातला प्रत्येक माणूस व अधिकारी विकावू असल्याची इतकी खात्री होती, की त्यांनी आयोगातील काही वरीष्ठ अधिकार्यांनाही कोट्यवधीची लाच देऊ केल्याचे प्रकरण बाहेर आले. त्यात दिनाकरन याचा दलाल पन्नास कोटी रुपये घेऊन आयोगाच्या कार्यालयात पोहोचला होता. त्याला तिथेच अटक झाल्यावर बभ्रा झाला आणि त्याच प्रकरणात दिनाकरनलाही अटक झालेली होती.
पक्ष, सत्ता, प्रशासन व लोकशाही पैसे फ़ेकून विकत घेता येते, असा आत्मविश्वास असल्याशिवाय कोणी इतके मोठे धाडस करू शकत नाही. लोक कायदा पोलिस वा अटक अशा गोष्टींना घाबरत असतात. पण शशिकला व त्यांची मनारगुडी टोळी कुणालाही घाबरत नाही. कितीही भयंकर प्रसंग आला तरी त्याला पैशाच्या बळावर उत्तर देता येते, अशी त्यांची श्रद्धा आहे. म्हणून तर बंगलोरच्या तुरूंगातही शशिकलांनी आपला प्रताप दाखवला आहे. बंगलोर ही कर्नाटकची राजधानी असून तामिळनाडूप्रमाणे तिथे शासकीय कारभारात शशिकला ढवळाढवळ करू शकत नाहीत. असा अनेकांचा समज आहे. पण तिथेही या पाताळयंत्री बाईने गोंधळ घालून दाखवला आहे. मागले काही महिने त्या बंगलोरच्या त्या तुरूंगात असून, त्याविषयी फ़ारशी बारमी बाहेर आलेली नव्हती. पण आता एका ज्येष्ठ तुरूंग अधिकार्यानेच अकस्मात तिथे भेट दिली आणि शशिकलांना तिथे कशी राजेशाही वागणूक दिली जाते आहे, त्याचे चित्रणच केले आहे. रुपा नावाच्या या अधिकारी महिलेची तुरूंग प्रशासनात नेमणूक झाली होती. तिने विविध तुरूंगाना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. पण शशिकला जिथे आहेत तिथल्या अधिकार्याने त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. तर रुपा यांनी परस्पर तिथे आकस्मिक भेट दिली तेव्हा त्यांनाच चकीत व्हायची वेळ आली. त्यांनी विनाविलंब तिथल्या घडामोडींचे चित्रणच करायचे आदेश दिले आणि शशिकला कुठल्या थराला राजकारण व पैशाची मस्ती घेऊन गेल्या आहेत, त्याचा तपशीलच बाहेर आला आहे. त्यांना तुरूंगात खास आचारी व अन्य सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या सवंगडी म्हणून वागणार्या अन्य सहयोगी कैदी महिलांचीही तिथे चैन चालू असल्याचे उघडकीस आले आहे. कर्नाटकात अण्णाद्रमुकची सत्ता नाही वा राजकारणही नाही. मग शशिकलांना इतकी खास वागणूक कशामुळे मिळू शकली?
रुपा नामक या महिला वरीष्ठ अधिकार्याने दिलेला अहवाल आता उघड झाला असून, या सुविधांसाठी शशिकलांच्या वतीने दोन कोटी रुपयांची किंमत मोजल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सरकार वा राज्य कुणाचेही असो, तुम्हाला प्रशासनातील अधिकारी विकत घेऊन, हवा तसा कायदा अ नियम वाकवता येत असतात. जयललितांचे निधन झाल्यावर पक्ष व सत्तेची सुत्रे शशिकला यांच्याकडे आली. अधिक पैशाचे घबाडही त्यांच्यापाशीच असल्याने त्या किती मुजोर झाल्या आहेत, त्याचा हा पुरावा आहे. आधी पोटनिवडणूकीत त्यांची पापे चव्हाट्यवर आली आणि नंतर निवडणूक आयोगात भ्रष्टाचाराचे प्रकरण भोवले. अशा गुंत्यात फ़सल्यानंतर तरी त्यांना कायद्याच धाक बसायला हरकत नव्हती. दोन खटले अंगावर असताना आणि तुरूंगात खितपत पडलेले असताना तरी, आणखी काही वाकडे करण्यापासून माणसाने परावृत्त व्हायला हवे ना? पण शशिकला वा त्यांची मनारगुडी माफ़िया नातलग मंडळी जगातून ओवाळून टाकलेलीच माणसे असावीत. अन्यथा त्यांनी तुरूंग प्रशासनाला खिशात टाकण्याचा असा उद्योग केला नसता. पण पैसा व सत्ता ह्या देखील नशा असतात आणि त्या इतर कुठल्याही नशेपेक्षा अधिक भयंकर असतात. पैसा व सत्ता सारासार विचार करायची मोकळीक देत नसतो आणि विवेकबुद्धीची मुस्कटदाबी करीत असतो. एकदा त्या नशेच्या आहारी गेले, मग कशाचेही भय वाटत नाही की शिक्षा वगैरेची पर्वा उरत नाही. शशिकला व त्यांच्या कुटुंबियांची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. म्हणून तर अधिकाधिक गुन्हे बिनदिक्कत करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. शिक्षा होईल तेव्हा बघू, अशी ही मानसिकता आहे. सराईत बलात्कारी वा खुनी शार्पशूटर अशा मनोवृत्तीचे असतात. त्यापेक्षा आज तामिळनाडूवर राज्य करणार्या मनारगुडी कुटुंबाची माफ़ियावृत्ती किंचीतही भिन्न नाही. लाजलज्जा हा शब्दही अशा लोकांनी कधी ऐकलेला नसावा.
पाकिस्तानमधील मोजक्या मंडळींमध्ये हा प्रकार पाह्यला मिळत होता. नन्तर बिहारमध्ये सीवान जेल आणि महाराष्ट्रात कलानी. पण शशिकला बाईंनी या सगळ्यांवर कडी केली.पब्लिकली low profile असुनही! कमालीचं निर्लज्ज वर्तन.
ReplyDelete