Saturday, October 21, 2017

ताजमहाल आणि बुलेट ट्रेन

Image result for tajmahal

महिनाभरापुर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आलेले होते आणि त्यांच्याच सरकारने भारताला ८० हजार कोटींचे कर्ज देऊ केल्याने, बुलेट ट्रेन हा महत्वाकांक्षी प्रकल्प इथे हाती घेण्यात आला आहे. त्यावरून किती वादळ उठले होते, हे आज नव्याने व विस्ताराने इथे कथन करण्याची काही गरज नाही. कारण या बुलेट ट्रेनमध्ये कितीही आधुनिकता व भव्यता सामावलेली असली, तरी ती आजच्या प्राधान्याची गोष्ट नाही, असे इथल्या जाणकार बुद्धीमंतांचे मत आहे. कुठल्याही जमान्यात वा समाजात अशाच लोकांना विद्वान म्हणून मान्यता असते. त्यांनी नाके मुरडावीत आणि तीच गोष्ट भविष्यकाळात महान वारसा असल्याचे सिद्ध व्हावे, असाच जणु परिपाठ आहे. सहाजिकच बुलेट ट्रेनला विरोध हा अपेक्षितच होता व आहे. गंमतीची गोष्ट अशी असते, की अशी जी नाके मुरडणारी मंडळी असतात, त्यांचे भविष्यातले वारस मात्र त्याच पुर्वजांनी नावे ठेवलेल्या गोष्टींचे गुणगान केल्याचाही इतिहास आहे. फ़ुले शाहू आंबेडकरांना त्यांच्या समकालीन बुद्धीमंतांनी कधीच गौरवलेले नव्हते. पण आजच्या विद्वानांना पदोपदी त्यांचेच दाखले आठवत असतात. नेमके असे बुलेट ट्रेनचे कडवे विरोधक आज अगत्याने ताजमहाल नामक वास्तुचे कौतुक सांगायला पुढे सरसावलेले आहेत. मग त्यांना एक साधासरळ प्रश्न विचारणे भाग आहे, की ताजमहाल व बुलेट ट्रेनमध्ये नेमका कोणता गुणात्मक फ़रक आहे? जेव्हा कधी त्या शहाजहान नामे बादशहाने त्या वास्तुचे निर्माण केले, तेव्हाच्या जमान्यात अशी वास्तु हा समाजासाठी प्राधान्याचा विषय होता काय? तेव्हाची जनता सुखीसमाधानी व आनंदी जीवन जगत होती आणि अधिकच्या उरलेल्या पैशातून हे जागतिक आश्चर्य बादशहाने उभारलेले होते काय? बादशहाच्या अमर प्रेमाचे प्रतिक म्हणून ताजमहाल उभारणे, ही सामाजिक गरज होती काय? नसेल तर तिचे इतके कौतुक कशाला?

मोगलांच्या कालखंडात देशातील जनता खुशीत व आनंदात जगत होती आणि देश सुजलाम सुफ़लाम होता. सहाजिकच बादशहाच्या तिजोरीत अधिकचा महसुल गोळा व्हायचा, तर त्याची विल्हेवाट कशी लावावी, याची फ़िकीर बादशहाला पडालेली होती. अशी कुठे ऐतिहासिक दस्तावेजामध्ये नोंद आहे काय? नसेल तर त्याने वास्तव्यही करायचे नाही, अशी ही भव्यदिव्य वास्तु कशाला उभारली? त्यासाठीचा पैसा कुठून गोळा केला? त्यासाठी अधिकचा महसुल वसुल केला किंवा कसे? असे कुठलेच प्रश्न आजच्या शहाण्यांना का पडत नाहीत? त्यांना आजच्या गरीब दीनदुबळ्या जनतेची चिंता इतकी अहोरात्र सतावत असते. त्यांना चार शतकापुर्वीच्या जनतेच्या दुर्दशेची फ़िकीर कशाला नसते? किंबहूना तो महान ताजमहाल बांधताना लोकांकडे राजाचे साफ़ दुर्लक्ष झालेले असेल, तर त्याने उभारलेल्या वास्तुकडे अन्यायाचा कलंक म्हणून बघण्याची बुद्धी अशा जाणत्यांना कशाला होत नाही? आज जगातल्या कुणा संस्थेने त्याच वास्तुला मानवी संस्कृतीचा अमोल ठेवा ठरवलेले आहे म्हणून? तेवढेच असेल, तर मानवी गरजा म्हणून बुलेट ट्रेनवर हल्ले कशाला होतात? अशा भव्यदिव्य वास्तु वा बांधकामांचा सामान्य माणसाच्या जीवनातील गरजांशी काय संबंध असू शकतो? भारतीय अर्थव्यवस्थेला न परवडणारी बुलेट ट्रेन आणि चार शतकापुर्वीचा ताजमहाल यात नेमका कोणता गुणात्मक फ़रक आहे? पण गंमत अशी दिसेल, की जे लोक बुलेट ट्रेनवर तुटून पडतात, तेच चार शतकापुर्वीच्य तशाच उधळपट्टीला मानवी संस्कृती म्हणून समर्थनाला पुढे सरसावतात. कारण स्पष्ट आहे, ह्या लोका्ना लोकांच्या गरजांशी कर्तव्य नसावे किंवा मानवी संस्कृती म्हणजे काय त्याचाही थांगपत्ता नसावा. अशा कर्तृत्वहीन लोकांना केवळ कशाला तरी नाक मुरडूनच आपली थोरवी सिद्ध करायची असते. तसे नसते तर इतका विरोधाभास या लोकांच्या बडबडीत आढळला नसता.

मोगलांची राजवट जनतेसाठी सुखावह नव्हती, याचे शेकडो दाखले इतिहासात उपलब्ध आहेत आणि बहुतांश मोगल बादशहा ऐयाश होते, असेही शिया मौलवींनी खुलेआम सांगितले आहे. त्यांना आपल्या जनतेच्या दुर्दशेची फ़िकीर नव्हती, किंवा हा बादशहा कोणी महान प्रेमवीर वगैरे नव्हता. आपल्या सहकार्‍याची सौंदर्यवती पत्नी आवडली, तर त्याचा मुडदा पाडून त्याने तिला आपली बेगम बनवले. नंतर तिचा इतका उपभोग घेतला, की बाळंतपणे काढतानाच तिचा दु:खद देहांत झालेला होता. त्यानंतरही त्याने तिच्याच बहिणीशी काही दिवसात निकाह लावून आपल्या अजरामर लैंगिक हव्यासाची साक्ष दिलेली होती. अशा बादशहाने जनतेच्या पैशातून उधळपट्टी करून जी वास्तु उभारली; तिला प्रेमाचे प्रतिक ठरवणारे युक्तीवाद म्हणूनच बोगस असतात. ती एक उत्तम व अपुर्व वास्तु असल्याचा दावा मान्य आहे. पण प्रेमाचे प्रतिक ठरवून चाललेले समर्थन निव्वळ भंपकपणा असतो. शिवाय लाखो हजारो लोकांच्या जीवनावश्यक गरजा पायदळी तुडवून केलेली ती उधळपट्टी असल्याचा आक्षेप कोणी घेत नाही. हा आणखी एक विनोद आहे. त्यातून असे शहाणे राजेशाहीच्या शोषक मानसिकतेचेही समर्थन करतात. त्याचे कारण त्यांना ताजमहालशी कर्तव्य नसते किंवा बुलेट ट्रेनच्या खर्चाविषयीही काही घेणेदेणे नसते. त्यांना आपल्या राजकीय भूमिका पुढे रेटण्यासाठी एखादा मुद्दा हवा असतो. त्यासाठी मग उत्तरप्रदेशातील भाजपाच्या कुणा नगण्य आमदाराने केलेले विधान म्हणजे जगबुडी आल्यासारखा गदारोळ केला जातो. त्यातून काहीही सिद्ध होणार नसल्याची त्यांनाही खात्री असते. ताजमहाल पाडला जाणार नाही किंवा भाजपाही तस मुर्खपणा करणार नाही, हे पक्के ठाऊक असते. पण त्या निमीत्ताने आपल्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याची ही केविलवाणी धडपड असते. म्हणून मग असे वाद उकरून काढले जातात.

आणखी एक मजेची गोष्ट आहे. ताजमहाल जगातले आश्चर्य म्हणून त्याबद्दलची आपुलकी ठिक आहे. पण अशा वाचाळवीरांना खरेच त्याचे कौतुक असते काय? तसे असते तर याच लोकांनी भग्नावशेष झालेल्या बाबरी मशीदीच्या पतनासाठी दोन दशके छाती बडवून आक्रोश केला नसता. बाबरीकडे जगातला कोणीही मुस्लिम सुद्धा ढुंकून बघत नव्हता. किंवा जगातल्या कोणा संस्थेने तिला कुठला ऐतिहासिक वारसा म्हणून मान्यता दिलेली नव्हती. मग तेव्हा नेमकी हीच मंडळी गळा काढून कशाला आक्रोश करीत होती? तर त्यांना यापैकी कशाविषयी आस्था नाही. त्यांचा राजकीय अजेंडा हिंदूंच्या नावाने शंख करण्याचा आहे. जेव्हा तसा विषय नसेल, तेव्हा हिंदुत्व मानणारे सरकार आहे म्हणून जनतेच्या गरजांचा विषय पुढे करून बुलेट ट्रेनच्याही विरोधात आरोळ्या ठोकायच्या, असा अजेंडा आहे. त्यात म्हणून बाबरी, बुलेट ट्रेन वा ताजमहाल असे विषय येत रहातात. ते कोण बोलला यालाही महत्व नसते. संगीत सोम हा कोणी भाजपाचा महत्वाचा नेता नाही. त्याला साधे राज्याच्या मंत्रीमंडळातही स्थान देण्यात आलेले नाही. पण तरीही त्याचे कुठल्या नगण्य कार्यक्रमातील वाक्य उचलून काहूर माजवले जाते. त्यात बुद्धी वा तारतम्य किंचीतही नसते. अर्थात त्यात नवे काहीच नाही. जगाच्या इतिहासात कुठल्याही समाजात व देशात असेच होत राहिले आहे. स्वत:ला बुद्धीमंत वा अभ्यासक म्हणवून घेणार्‍या तोतयांना नेहमी असेच कांगावे करून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावे लागत असते. त्यांच्यापाशी कुठले कर्तृत्व नसते, की पराक्रम गाजवण्याची क्षमता नसते. सहाजिकच इतरांना नावे ठेवून किंवा चिखलफ़ेक करून त्यांना आपले चेहरे लोकांसमोर पेश करावे लागत असतात. असे विषय निघाले, तरच या भंगारातील अशा वस्तुंना बाजारात किंमत येणार असते ना? नाहीतर बुलेट ट्रेन काय, बाबरी काय किंवा ताजमहाल काय; यांना कशाचेही सोयरसुतक नसते.

6 comments:

  1. Bhau khup chhan lekh aani ek England chi pm ne bhartiyana shubhechha dilya "SHUBHA DIPAWALI" Hyavar aaple kahi mat mandal ka please

    ReplyDelete
  2. मुळात, मुस्लीम जगाच्या इतिहासात सकारात्मक नोंद घेतली जावी, असले काही निर्माण करण्याची सुतराम शक्यता नाही. ताजमहाला वरील नक्षीतील देवतांची चित्रे व बंद असलेले ४ मजले वेगळेच सुचवतात.

    ReplyDelete
  3. Barobar chimatit pakadalay... Bhau...! Dhanyavad...

    ReplyDelete
  4. भाऊ अत्यंत समर्पक लेख...
    आपण बुलेट ट्रेन व ताजमहालचा कम्प्यारिजन आपल्या विवेकी, प्रासंगिक आणि तात्विक शक्तीचा एक अफलातून नमुना आहे. म्हणुनच एवढा प्रचंड प्रतिसाद आपल्या लेखांना मिळतो व आपले लेख वाचायला मिळणे हे एक आमच्या पिढीचे परम भाग्यच आहे.
    आपले लेख इतर भाषात विशेषता साऊथ इंडियन भाषा मध्ये प्रसिद्ध होतात का? असतील तर त्याची माहिती द्यावी. कारण ह्या प्रांतात मुरलेला स्वार्थी पणा मोडुन काढून राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय आवश्यकता या प्रमाणे साऊथ इंडियन मतदारांचे स्वार्थी पणा पासूनचे परिवर्तन होऊन त्यांना राष्ट्रीय पक्षाला लोकसभे साठी मतदानाची बुद्धी/ कर्तव्य असणं हे मुरले पाहिजे.. म्हणजे राष्ट्रीय व राष्ट्रहितवादी पक्षांना केवळ नाॅर्थ (N) वेस्ट(W) व मध्य(M) भारतीय मतदारावर जास्त अवलंबून राहावे लागणार नाही. व काही वेळा प्रादेशीक कारणाने या NWM मतदारांनी जर स्थानिक व नेतृत्व यामुळे जर राष्ट्रीय पक्षाला साथ दिली नाही तर होणारे सत्ता परिवर्तन काही प्रमाणात थांबवुन या खंडप्राय देशाला दिशा मिळेल व अशा मुळे देशाच्या होणार्या प्रगतीचा फायदा पुर्णता सर्व भारतीयांना मिळेल.. व अशा स्वार्थी राजकारणा मुळे निर्माण होणार्या आघाडी सरकार व त्यातुन होणारी पुर्ण भारतवासियांची होणारी वेठबिगारी व भ्रष्टाचार थांबवता येइल..
    परंतु आपले लेख इतर प्रदेशीक व हिंदी मध्ये भाषांतरित करुन प्रसिद्ध होणं आवश्यक आहे.. हे माझ्या परीने सांगुन पण भाजपच्या थिंक टँक पर्यंत पोहचत नाही किंवा एवढी फिकीर गेल्या लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादा मुळे पडलेली दिसत नाही.. किंवा आमच्या सारख्या सामान्य माणूसांचे असे विचार त्यांना महत्वाचे वाटत नसतील..
    सोनिया गांधी सारख्या नवख्या व विदेशी सुमार बुद्धी च्या स्रीने (यांना कोणता थींक टँक असे मार्गदर्शन करायला मदत करतो आहे हे पण शोधून काढणे आवश्यक आहे) पण विचार करुन गोविंदा (मध्यम अभिनेता) व अझरुद्दीन ला (सारख्या मॅच फिक्सींग मुळे कलंकिताला) पण उमेदवारी देऊन एक एक जागा जिंकुन आघाडी सरकारने सलग दहा वर्षे राज्य केले तसेच गेल्या पंचवीस वर्षांत 18 वर्षे राज्य केले.. परंतु भाजप किंवा इतर काँग्रेस इतर पक्षांना सलग दहा वर्षे सोडा पण पाच वर्षे सुद्धा राज्य करता आले नाही (प्रमोद महाजन व आडवानी यांनी केलेली घाई आठवा)..

    तसेच एक बाबरी मशीद पाडली तर त्याचा एवढा गदारोळ (लोकशाहीत बरोबर आहे व हे लोकशाही मुरल्याचे/ अशा गोष्टी उचलून धरुन लंगुचालनाचे उदाहरण आहे) परंतु अशा अल्पसंख्याकानी पाडलेली करोडो मंदिरे व घरेदारे आपले देशवासि सहज विसरतात... व आशा टिकेला साथ देतात व ईमोशनल blackmailing करतात
    आपल्या लेखा बद्दल धन्यवाद. त्रीवार वंदन)
    एकेएस

    ReplyDelete
  5. My two pennies though it is difficult to convince biased minds: 1. In the era of Taj Mahal, there was NO democracy it was dictatorship. Incidentally today we are in democracy. If the citizens had choice then, they would have perhaps voted for basic infrastructure than a personal monument. I find it funny but disturbing that citizens are criticized for demanding priority to basic infrastructure than elite infrastructure. 2. Please decide if Bullet Train is infrastructure or monument? Taj Mahal was never an infrastructure project. You can not compare apples with oranges. If Bullet Train is infrastructure, we certainly have to prioritize it specially because we are seeking loan. If it has monumental value, we can have better indigenous options we dont have to borrow ideas from other countries. 3. Yes culture is very important aspect of life and we are proud to have magnificient culture and architecture from the past. But the logic that one must justify Bulet Train for liking Taj Mahal is sheer stupidity.

    ReplyDelete