Tuesday, October 24, 2017

मोदींची इंदिरानिती?

indira cartoon के लिए चित्र परिणाम

अर्धशतकापुर्वीची गोष्ट आहे. नेमके सांगायचे तर ४८ वर्षापुर्वीची! तेव्हा इंदिराजी नवख्या होत्या आणि चहुकडून त्यांना घेरले जात होते. एका बाजूला विरोधकांची एकजुट तर दुसरीकडे पक्षातल्या जुन्या खोडांनी त्यांची कोंडी केलेली होती. अशा सर्वांना शिंगावर घेताना इंदिराजींनी अजब रणनिती आखली होती. आधी त्यांनी पक्षातल्या विरोधक प्रतिस्पर्ध्यांना शह देण्य़ासाठी मोठ्या खुबीने विरोधकातल्या काही अतिशहाण्या उतावळयांचा वापर करून घेतला. तेव्हा राष्ट्रपती निवडणूकीचे वेध लागले होते आणि त्यांना नको असलेलाच उमेदवार कॉग्रेसच्या हायकमांडने निवडला होता. त्याचा अर्ज इंदिराजींनी भरला, पण पक्षाच्या खासदारांना त्याच उमेदवाराला मते देण्याची सक्ती करणारा व्हीप म्हणजे आदेश काढण्यास त्यांनी नकार दिला. त्याच्याही आधी पक्षांतर्गत वाद उफ़ाळला होता. आधी त्यांनी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडून खाते काढून घेतले आणि त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून कायम ठेवलेले होते. त्याला वैतागून मोरारजींनी राजिनामा दिलेला होता आणि त्यानंतर तात्काळ इंदिराजींनी चौदा बॅन्काचे राष्ट्रीयीकरण केले. पाठोपाठ संस्थानिकांचे तनखे बंद करणारा अध्यादेश जारी केला होता. त्याला अर्थातच कॉग्रेसमधील जुन्याजाणत्यांचा पाठींबा नव्हता. पण यातून पक्षाचे शुद्धीकरण करण्याची संधी इंदिराजींना साधायची होती. सहाजिकच त्यातून कॉग्रेसमध्ये दुफ़ळी माजणार म्हणून विरोधातले बहुतेक पुरोगामी लहानमोठे पक्ष सुखावले होते आणि त्यांनी इंदिराजींच्या या समाजवादी भूमिकेचे गुणगान सुरू केलेले होते. परिणामी राष्ट्रपती निवडणूकीत पक्षातल्या ढुढ्ढाचार्यांना झुगारून देण्याच्या पवित्र्याचे विरोधातील पुरोगाम्यांनी स्वागत केले आणि असे तमाम पक्ष व नेते इंदिराजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. त्यांना वाटलेले होते, यातून कॉग्रेस अधिक दुबळी होईल. पण प्रत्यक्षात काय झाले?

तात्काळ कुठलीही निवडणूक नव्हती आणि कॉग्रेसचे दोनतीन डझन खासदार बाजूला झाले तर इंदिराजींना पंतप्रधानपद गमवावे लागले असते. अशा स्थितीत विरोधक पुरोगाम्यांना खुश करून इंदिराजींनी त्यांचा पाठींबा मिळवला व सरकार टिकण्याची आधी व्यवस्था केली. मग राष्ट्रपती निवडणूकीत त्यांनी उपराष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांना अपक्ष उभे रहायला भाग पाडले व त्यांचे समर्थन केले. सहाजिकच त्यात विरोधकांची मते आपल्या बाजूने झुकवण्याचा डाव इंदिराजी खेळल्या होत्या. त्यात त्यांना यश मिळाले आणि कॉग्रेस फ़ुटली. पण इंदिराजींचा राष्ट्रपती निवडून आल्याने बहुतांश कॉग्रेस आमदार खासदार त्यांच्या बाजूने टिकले. काही किरकोळ मंडळी वयोवृद्ध नेत्यांच्या सोबत बाजूला झाली. अशा स्थितीत पुरोगामी विरोधकांच्या मदतीवर इंदिराजींनी काही महिने सरकार तगवले आणि बदल्यात पुरोगामी विरोधकांकडून आपली जाहिर कौतुकेही करून घेतली होती. जणू अशा पुरोगामी विरोधी पक्षांच्या इंदिराजी अनभिषिक्त नेत्या होऊन गेलेल्या होत्या. अशा स्थितीत डिसेंबर १९७१ या वर्ष अखेरीस इंदिराजींनी ‘आपले हक्काचे राष्ट्रपती’ गिरी यांच्या सहीने अकस्मात लोकसभा बरखास्त करणारा अध्यादेश जारी केला. त्यातून लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घोषित केल्या. त्यामुळे विरोधकांची तारांबळ उडाली. कालपर्यंत ज्या इंदिराजींचे गुणगान पुरोगामी विरोधक करत होते, त्यांनाच निवडणूकीच्या भयाने घेरले. कारण तशी त्यांची अपेक्षा नव्हती आणि आगामी निवडणूका दिड वर्ष पुढे असल्याच्या भ्रमात पुरोगामी आपला डाव खेळत होते. पण अकस्मात निवडणूका दाराशी आल्या, तेव्हा त्यांची बोबडी वळली. कारण आता समोर कॉग्रेसचे म्हातारे नव्हते तर पुरोगाम्यांनीच मसिहा बनवलेल्या इंदिराजी उभ्या होत्या. त्यांच्या विरोधात बोलायचे काय व लढायचे कसे, ही या पुरोगाम्यांसाठी समस्या होऊन बसली.

ती निवडणूक इंदिराजींचे देशातील नेतृत्व अधिक बलवान व भक्कम करायला कारणीभूत ठरली. कारण कॉग्रेस फ़ुटली असली तरी इंदिराजींनाच लोक कॉग्रेस समजत होते आणि लोकांचा ओढा त्यांच्याकडेच होता. अशा इंदिराजींनी पुरोगामी पक्षांशी युती आघाडी केलेली नव्हती. नऊ राज्यात कॉग्रेसला पराभूत करून सत्तेवर कब्जा करणार्‍यात हेच पुरोगामी पक्ष आघाडीवर होते. म्हणजेच त्यांनी पुरोगामीत्वाच्या थोतांडाच्या आहारी जाऊन इंदिराजींचे गुणगान करून आपलेच हातपाय तोडून घेतलेले होते. बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण वा संस्थानिकांची तनखेबंदी यासाठी इंदिराजींचे गुणगान वर्षभर केलेल्या पुरोगाम्यांना, मग निवडणूक काळात त्याच इंदिराजींना लक्ष्य करणे वा त्यांच्याविरोधात प्रचार करणे अवघड होऊन गेले. परिणामी त्या मध्यावधी निवडणूकीत कॉग्रेस म्हणून इंदिराजींना भरपूर मते मिळाली व जुनी कॉग्रेस कायमची निकालात निघाली. पण त्याचवेळी मरगळल्या कॉग्रेसला पुरोगाम्यांची मते मोठ्या प्रमाणात पडून पुरोगामी पक्षांचा पुरता बोजवारा उडाला. यातली इंदिराजींची रणनिती समजून घेतली पाहिजे. त्यांनी स्वपक्षातील विरोधकांना संपवायला विरोधकांची मदत घेताना, त्याच प्रभावी विरोधकांना आपले गुणगानही करायला भाग पाडले होते. उतावळेपणाने दोन वरवरच्या निर्णयांना समाजवाद समजून मुर्ख पुरोगाम्यांनी इंदिराजींची तळी उचलून धरली. पण त्यांनाच जगासमोर आपला मसिहा म्हणून सादर केलेले होते. आज नेमकी तशीच काहीशी स्थिती राहुलच्या बाबतीत होत आहे आणि तशी रणनिती राहुल वा कॉग्रेसने आखलेली नाही. ती खेळी मोदी वापरत असावेत अशी शंका आहे. आपल्या विरोधातील पुरोगामी मंडळी व पक्षांना राहुलचे नेतृत्व स्विकारायला भाग पाडणे, असा त्यामागचा डाव असू शकतो. ज्याप्रकारे आजकाल डावे व समाजवादी नेते प्रवक्ते राहुलचा खुळेपणा वा सोनिया व वाड्रा यांच्यावरील आरोपाचे समर्थन करताना दिसतात, तेव्हा १९६९-७० सालचे स्मरण होते.

हे तमाम पुरोगामी कुठलीही संधी मिळाल्यावर मोदी वा भाजपाला लक्ष्य करायला टपलेले आहेत आणि त्यात मुद्दा काय आहे व परिणाम काय होतील, याचेही भान त्यापैकी कोणाला उरलेले नाही. म्हणून असेल, पण तमाम पुरोगामी कुठल्याही विषयात राहुलचे वाहिन्यांवर किंवा जाहिर वक्तव्यातून समर्थन करताना आपल्याला दिसतात. त्याचा जनमानसावर काय परिणाम होतो? त्यातून भाजपा विरोधात हे पक्ष आहेत किंवा नाही, याच्याशी जनतेला पर्वा नसते. ते कोणाच्या बाजूने उभे आहेत वा कोणाचे समर्थन करीत आहेत, तितकेच लोकांच्या लक्षात रहात असते. जसे तेव्हा इंदिराजींचे गुणगान लोकांच्या लक्षात राहिले, तसेच आता पुरोगाम्यांचे नेतृत्व राहुल यांच्याकडे असल्याची एक धारणा रुजत चालली आहे. ती पुढल्या काळात पुसून काढणे या पुरोगामी पक्षांना शक्य होणार नाही. उद्याच्या निवडणूकांमध्ये भाजपा राहुल, सोनिया वा वाड्रा यांच्या भ्रष्टाचारावर झोड उठवणार आहे आणि तेव्हा त्यात पुरोगामी पक्षही सहभागी असल्याचे बेछूट आरोपही केला जाणार आहे. मग त्यासाठी जे दाखले वा पुरावे दिले जातील, त्यासाठी आजकाल चाललेल्या खुळ्या समर्थन वक्तव्यांचा उपयोग होणार आहे. प्रामुख्याने जिथे भाजपापेक्षाही कॉग्रेसच प्रमुख विरोधक असेल, तिथे या पुरोगामी पक्षांना राहुल विरोधात कसे बोलता येईल? उलट कॉग्रेस व पुरोगामी पक्ष म्हणजे एकाच माळेचे मणी असल्याचा गदारोळ मोदी करतील आणि तेव्हा त्याचा इन्कार करणेही पुरोगाम्यांना अशक्य होणार आहे. थोडक्यात त्यांनी जो भ्रष्टाचार केलेलाच नाही व त्यात सहभाग नसला, तरी त्याचा खुलासा ऐन निवडणूकीत पुरोगाम्यांकडे मागितला जाईल. किंबहुना पुरोगाम्यांना मत म्हणजे पुन्हा राहुल वा कॉग्रेसी भ्रष्टाचाराला समर्थन, असाही अपप्रचार भाजपा करू शकेल. त्यासाठीच आज पुरोगाम्यांना या सापळ्यात ओढलेले असू शकते.

टाईम्स नाऊ किंवा रिपब्लिक या वाहिन्यांनी सध्या गांधी घराणे व कॉग्रेस यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरेच जगाच्या वेशीवर टांगण्याचा सपाटा लावलेला आहे. ती माहिती अर्थातच या वाहिन्यांना सरकारी गोटातून मिळत असणार याचा कोणी इन्कार करू शकत नाही. हा गौप्यस्फ़ोट झाल्यावर होणार्‍या चर्चेतून कॉग्रेसने अंग काढून घेतलेले आहे. पण तशा चर्चा चालतात आणि त्यात अगत्याने पुरोगामी पक्ष प्रतिनिधींना बोलावले जात असते. त्यामध्ये त्यांना कॉग्रेसच्या पापावर टिकेची झोड उठवणे अशक्य नाही. पण हे मुर्ख त्यातही भाजपाला सवाल करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत असतात. त्यातून कॉग्रेसच्या पापावर पांघरूण घालण्याची त्यांची लाचार अवस्था समजणेही अशक्य आहे. की जाणिवपुर्वक भाजपा-मोदींनी या दोन वाहिन्यांवर ते काम सोपवलेले आहे? आणखी वर्षभर असा खेळ चालू राहिला, तर आगामी लोकसभा निवडणूकीत हे भ्रष्टाचाराचे मुद्दे मोठे होणार आहेत. त्यातून कॉग्रेसचे नाक कापले जाणारच. पण त्यात काहीही संबंध नसताना पुरोगामी पक्षांनाही भागिदार ठरवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एकप्रकारे त्यातून विरोधकांचे नेतृत्व राहुलकडे सोपवण्याची सक्तीच मोदींनी पुरोगाम्यांवर केलेली नाही काय? इंदिराजींनी आपल्या पक्षातल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पुरोगाम्यांच्या मुर्खपणाचा सराईतपणे वापर करून घेतला होता. नरेंद्र मोदी आपल्या विरोधातील पुरोगाम्यांना नामोहरम करण्यासाठी राहुलचा खुबीने वापर करून घेत आहेत. कारण कॉग्रेस वा राहुल हे मोदींसाठीचे आव्हान नसून, अशा प्रकारचे कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर होऊ शकत नाहीत, ते पुरोगामी पक्ष हे भाजपासाठी भविष्यातले आव्हान ठरू शकले असते. पण तेच कॉग्रेसला पाठीशी घालण्यात पुढे झाले, तर मोदींचा खराखुरा विरोधकच निकालात निघतो ना? म्हणूनच चालले आहे त्याला मोदींची इंदिरानिती संबोधणे भाग आहे.

1 comment:

  1. सध्या गुजरात मध्ये तेच चालु आहे खर म्हनजे हार्दिक अल्पेश यांनी त्यांच्या वर्गाचा बराच पांठिबा मिळवला होता पन आता ते काॅंगरेस सोबत जातायत त्यांचे मतदार बिथरनार कारन त्यांनी काॅंगरेस सोबत राजकीय युती करन्यासाठी आंदोलन केले नव्हते.उद्या मोदीजी नी काॅंगरेसचा नवा भ्रष्टाचार बाहेर काढला तर काय होइल त्या तीन तरुणांचे?

    ReplyDelete