गेल्या महिन्यात राहुल गांधी अमेरिकेच्या दौर्यावर गेलेले होते. तिथे त्यांनी विविध विद्यापीठात व सार्वजनिक जागी भाषणे केली व लोकांशी संपर्क साधला. त्यात लोकांशी जाहिर संवादही केला. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरेही दिली. त्यानंतर राहुल अगदी फ़ॉर्मात आलेले आहेत. अमेरिकेहून राहुल परतले, ते थेट गुजरातला येऊन धडकले आणि त्यांची धडक इतकी जबरदस्त होती, की मोदी-शहा या जोडगोळीलाही धडकी भरली असल्याच्या बातम्या सध्या झळकत आहेत. कारण आणखी दिड महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणूका व्हायच्या असून, त्यात दिर्घकाळ हातात असलेली त्या राज्यातील सत्ता भाजपा गमावणार, अशी अनेक जाणत्यांना खात्री वाटू लागली आहे. त्यातही काही गैर नाही. कारण कुठल्याही साम्राज्य वा सत्तेला अमरपट्टा मिळालेला नसतो. मग तो भाजपाला वा मोदींना मिळाला आहे, असा दावा कोणी करू शकत नाही. सहाजिकच निवडणूकांमुळे भाजपा चिंतेत असल्यास नवल नाही. पण भाजपाची चिंता राहुल गांधींमुळे आहे असे म्हटले जाते ही बाब लक्षणिय आहे. मागल्या पाचसहा वर्षात राहुलनी पक्षाचे नेतृत्व आपल्या हाती घेतल्यापासून एकही निवडणूक जिंकून दाखवलेली नसताना त्यांच्या कर्तृत्वावर जाणत्या पत्रकार माध्यमाचा इतकाच विश्वास असेल, तर त्याकडे गंभीरपणे बघायला हवे. ही नवी उर्जा राहुलनी कुठून मिळवली, तेही तपासणे भाग आहे, अमेरिकेत प्रश्नांची उत्तरे देताना राहुलनी भारतात राजघराणीच सत्ता राबवू शकतात, असे विधान केलेले होते. त्यासाठी त्यांनी अभिषेक बच्चन यांचा्ही उल्लेख केला होता. यातूनच राहुल यांच्या राजकीय जाणतेपणाची चाहुल लागलेली आहे. पण त्याहीपेक्षा त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी व्यक्त केलेले मत अतिशय व्यासंगी अभ्यासाचे लक्षण मानावे लागेल. बहुधा त्याच अभ्यासातून आता राहुलनी भारताचा दुसरा स्वातंत्र्यलढा पुकारलेला दिसतो.
परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना एन आर आय म्हणून ओळखले जाते. त्याचा अर्थ अनिवासी भारतीय! जे कोणी मुळचे भारतीय वंशाचे आहेत आणि परदेशी जाऊन स्थायिक झालेत, त्यांना अनिवासी भारतीय संबोधण्याची पद्धत आहे. सहाजिकच अशा भारतीयांचे नागरिकत्व अस्सल भारतीय नसले, तरी त्यांना भारताविषयी आस्था असते आणि मायदेशीची कुठली वार्ता आली तर ते अगत्याने तिची दखल घेत असतात. भारतातले कलाकार, लेखक वा मान्यवर त्या देशात गेल्यास त्यांचे अगत्याने स्वागत होते, त्यांचे जाहिर कार्यक्रम योजले जात असतात. राहुल गांधींचे बौद्धीक अशाच एका अनिवासी भारतीयांच्या गर्दीसमोर झालेले होते. तिथे अशा अनिवासी भारतीयांचे गुणगान करताना राहुल गांधींनी त्यांना महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकरांच्या पंगतीत नेवून बसवले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामागची मूळ प्रेरणाच अनिवासी भारतीयांची होती आणि तो स्वातंत्र्यलढा अनिवासी भारतीयांचाच होता; असाही निष्कर्ष राहुलनी त्या गर्दीसमोर बोलताना काढला. त्यासाठी राहुल यांची भारतात भाजपावाल्यांनी यथेच्छ टवाळी केली आणि विविध वाहिन्यांवर त्यासंबंधी चर्चाही रंगल्या. मग अनिवासी कोणाला म्हणावे आणि निवासी कोणाला म्हणावे, याचाही खुप उहापोह झाला. काहींनी ते मनावर घेतले तर अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. मात्र राहुल आपल्या सिद्धांताचे पक्के असावेत. म्हणूनच असेल त्यांनी ता मोदीमुक्त भारताचा नवा स्वातंत्र्यलढा पुकारलेला आहे. त्यासाठी अर्थातच त्यांना स्वदेशी कॉग्रेस संघटनेचा वा देशांतर्गत सज्ज आलेल्या कॉग्रेस पक्षाचा काय उपयोग असणार ना? स्वातंत्र्य अनिवासी भारतीयांनी मिळवले हे सिद्ध करायचे, तर आधी स्वदेशी कॉग्रेस नामशेष करून टाकायला हवी आणि अनिवासी भारतीयांच्या मदतीने नवे स्वातंत्र्य मिळवायला हवे ना? राहुलनी सध्या तेच काम हाती घेतलेले आहे.
मागल्या तीनचार वर्षात राहुल सातत्याने स्वपक्षाची संघटना मोडकळीस आणून मोदींच्या विजयाचे मार्ग मोकळे करून देत आहेत. त्यामागचे हे अनिवासी रहस्य कोणा राजकीय अभ्यासकाच्या लक्षात कसे आले नाही, हेही एक गुढ आहे. भारताला मोदींच्या गुलामीतून मुक्त करायचे तर दुसरा स्वातंत्र्यलढा आवश्यक आहे आणि तसा लढा देण्यासाठी स्वदेशी कार्यकर्ते व नेते उपयोगी नसल्यास अनिवासी नेतेच उभे करावे लागतील. ते करायचे तर त्यांना वाव हवा म्हणून असलेले स्वदेशी कॉग्रेसने नेते व कार्यकर्ते निकालात काढायला नको काय? किती बारकाईने राहुल गांधी अभ्यास व कृती करतात, त्याचा हा पुरावा आहे. २०१३ मध्ये जाणते अभ्यासू कॉग्रेसनेते जयराम रमेश खुप व्यथित झालेले होते. २०१४ ची लोकसभा निवडणूक जवळ येते आहे आणि राहूल २०१९ च्या लोकसभेची तयारी केल्यासारखी संघटना नव्याने बांधत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचेही जाहिरपणे सांगितलेले होते. त्याचा अर्थ आता उलगडतो आहे. रमेश यांना त्याचा अर्थ उमजला नव्हता. राहुलना नुसती नव्याने कॉग्रेस संघटना बांधायची नसून दुसरा स्वातंत्र्यलढाही लढायचा आहे. स्वातंत्र्यलढा तर निवासी भारतीयांकडून लढला जाऊ शकणार नाही. म्हणून आधी निवासी भारतीयांची संघटना मोडीत काढणे आवश्यक होते. ते काम मोदींनी हाती घेतलेले असेल तर राहुलना त्यांच्याशी सहकार्य करणेही भाग होते. सहाजिकच आधी भारताला नव्याने गुलाम करण्याची गरज होती आणि त्यासाठी मोदींची सत्ता येणे आवश्यक होते. राहुलनी दोन वर्षे अहोरात्र मेहनत घेऊन कॉग्रेसला दारूण पराभवाच्या खाईत लोटण्याचे काम केले आणि त्यानंतरही विविध राज्यात कॉग्रेसची संघटना जमिनदोस्त करायची कामगिरी पार पाडलेली आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयांच्या दुसर्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
म्हणून तर मोदी सरकारची तीन वर्षे उलटून जाण्यापर्यंत राहुलनी देशातच खुप परिश्रम घेतले आणि आता ते झपाट्याने कामाला लागलेले आहेत. त्याची सुरूवात त्यांनी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांपासून केली. तिथे त्यांनी आपल्या घराण्याची थोरवी सांगितली आणि भारताला घराणेशाहीची किती गरज आहे तेही पटवून दिले. आता अनिवासी भारतीयांची संघटना उभारली, मग भारताला दुसरे स्वातंत्र्य मिळाले म्हणून समजा. त्याचीही आता सुरूवात झालेली आहे. अनिवासी भारतीय जोमाने कामाला लागलेले आहेत. बिचार्या भारतीय जनता पक्षाला त्याची खबरही नाही. म्हणून तर त्यांना सोशल मीडियात दणका बसल्यावर त्याची पहिली जाणिव झालेली आहे. अमेरिकेतून राहुल गांधी मायदेशी परत येईपर्यंत ट्वीटरच्या खात्यावर राहुल यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि त्यांना मिळणारा प्रतिसादही मोदी आदींना मागे टाकून कुठल्या कुठे पुढे निघून गेलेला आहे. तर त्यात प्रामुख्याने परदेशी ट्वीटर खाती असल्याचा मुर्ख आरोप भाजपाने केलेला आहे. राहुल रशिया किंवा इंडिनेशियात निवडणूक लढवणार काय? असला खुळचट सवाल भाजपावाल्यांनी केलेला आहे. लढाई अनिवासी भारतीयांनी लढवायची असेल, तर ट्वीटरचे खातेदारही परदेशी नकोत काय? ते अनिवासी नकोत काय? राहुल यांच्या ट्वीटर खात्याची लोकप्रियता कजाखस्थान, रशिया वा इंडिनेशियात आहे, याचा अर्थच अनिवासी मोठ्या संख्येने राहुलच्या फ़ौजेत सहभागी झाले असल्याचा पुरावा समोर आला आहे. आता ही फ़ौज दिवसेदिवस जोरात कामाला लागली, की दुसर्या स्वातंत्र्यलढ्याचे रणशिंग राहुल गांधी फ़ुंकतील आणि मोदी भाजपा यांना पळता भूई थोडी होणार आहे. किंबहूना भाजपाची आताच बोबडी वळलेली आहे. तसे नसते तर भाजपावाल्यांनी राहुलच्या ट्वीटर खात्याचे अनुयायी परदेशी कसे, असला पोरकट सवाल ऐन गुजरात निवडणूकीच्या मुहूर्तावरव कशाला केला असता?
याला म्हणतात कुटील रणनिती! आपले अनुयायी भारतात नाहीत हे राहुलनी कॉग्रेसवाल्यांना कळू दिलेले नाहीत, की भाजपावाल्यांना त्याचा सुगावा लागू दिलेला नाही. त्यांनी नुसता ट्वीटर खात्याचा हिसका दाखवला आणि गुजरातच्या निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर होण्यापुर्वीच भाजपाची गाळण उडालेली आहे. लौकरच राहुलच्या गोटात इतरही अनिवासी भारतीय दाखल होतील. ते ऐकून वा नुसते बघूनही भाजपाला दरदरून घाम फ़ुटणार आहे. दाऊद इब्राहीम, सय्यद सलाहुद्दीन, विजय मल्ल्या सारखे दिग्गज जेव्हा अनिवासी भारतीय म्हणून राहुलच्या दुसर्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतील, तेव्हा भाजपाला खरी लढाई समजू शकेल. पण ती वेळ अजून आलेली नाही. आता कुठे त्याची तयारी सुरू झालेली आहे. नाहीतरी बोफ़ोर्स तोफ़ांच्या खरेदी प्रकरणात पाकिस्तानी बॅन्केच्या मदतीने दलाली परस्पर बाजूला केल्याची माहिती अलिकडेच समोर आलेली आहे. त्याला अनिवासी भारतीयांचा स्वातंत्र्यलढा म्हणतात. असे लढे हे नियमित सैन्याकडून लढले व लढवले जात नसतात. तिथे असे छुपे अनिवासी फ़रारी लोकच हाताशी धरावे लागत असतात. चिदंबरम वा मनमोहन यांच्यावर विसंबून कोणी अनिवासी भारतीयांचा स्वातंत्र्यलढा लढवू शकणार नसतो. त्यात फ़ार तर कन्हैयाकुमार वा खालीद उमर यांच्यासारखे भारताचे तुकडे पाडायला सिद्ध झालेल्यांना सहभागी करून घेता येत असते. तिथेही राहुलनी आधी आघाडी उघडून ठेवलेली आहे. संपुर्ण उत्तर भारतात त्यांनी कॉग्रेसची निवासी भारतीय संघटना जमिनदोस्त केली आहे. त्याला हिमाचल वा गुजरात यासारखे मोजकेच अपवाद राहिलेले आहेत. तिथली संघटना संपली, मग राहुल खुल्या मैदानात येऊन दुसरा स्वातंत्र्यलढा पुकारतील. त्यात रशिया, कजाखस्तान वा इंडिनेशियातून मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय सहभागी होत जाताना दिसणार आहेत.
kahi patrakar rahul la itake mothe ka kartayat kahi kalat nahi,tynachi kuwat nastana ugich modi virodh mhanun.
ReplyDeleteयावर काय बोलू
ReplyDeleteते prestitute आहेत.
ReplyDeleteहसून हसून पोट दुखले
ReplyDeleteहसून हसून पोट दुखले.. same here :D
ReplyDelete