राष्ट्रगीताचा सन्मान राखण्यासाठी उठून उभेच राहिले पाहिजे काय? तशी सक्ती कशाला हवी? मनात राष्ट्रभक्ती असेल तर तिचे प्रदर्शन कशाला करायला हवे? असे अनेक प्रश्न अतिशय समजूतदारपणे विचारले जात आहेत. कुठल्याही सारासार बुद्धी असणार्याला ते प्रश्न रास्त वाटतील. पण जे कोणी असे प्रश्न विचारतात, त्यांच्या सारासार बुद्धीचे काय, असाही एक प्रश्न आहे. त्याचे उत्तर कोणी द्यायचे? वादासाठी सध्या पुरता हा मुद्दा मान्य करू, की अशी कुठलीही प्रदर्शन वा भावनांच्या गोष्टींची सक्ती करण्याची गरज नाही. मनात भाव असला म्हणजे झाले. त्याची सक्ती कोणावरही असायचे काही कारण नाही. मग या ‘कोणावरही’ शब्द वा व्याख्येमध्ये कोणा कोणाचा समावेश होतो? त्याचाही खुलासा व्हायला हवा ना? की जे कोणी असे युक्तीवाद करतात, त्यांचाच अशा वर्गामध्ये समावेश होतो? म्हणजे त्यांच्यावर कुठली सक्ती असता कामा नये आणि त्यांनी मात्र इतरांवर कुठल्याही बाबतीत प्रदर्शनाची वा पुराव्याची सक्ती करण्याला आक्षेप असता कामा नये, असा दावा आहे? म्हणजे अशा मुठभरांना जेव्हा आवश्यक वाटेल, तेव्हा त्यांनी इतरांच्या भावना व आस्थेचे पुरावे मागितले तर ते दिलेच पाहिजेत. पण त्यांच्यावर तशी वेळ आल्यास सक्ती होता कामा नये. असे म्हणायचे आहे काय? किंबहूना कोणावर सक्ती असू नये, अशा व्याख्येमध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक माणूस बसू शकतो काय? कारण पाच वर्षापुर्वी त्याच्याही मनातल्या भावभावनांचे प्रदर्शन करण्याची त्याच्यावर लाखो मुखातून सक्ती करण्यात आली होती आणि अशी सक्ती करणारेच आजकाल सक्ती कशाला, अशी भाषा बोलत आहेत. मग तेव्हा अशा समजूतदार लोकांना सक्तीची भाषा कशाला सुचलेली होती? एका मौलवीने इस्लामी टोपी दिली तर मोदींनी ती परिधान करण्यास नम्रपणे नकार दिल्यावरून देशव्यापी वादळ कशाला उठले होते? त्यातले तमासगीर कोण होते?
मागल्या विधानसभा निवडणूकीच्या निमीत्ताने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी राज्यव्यापी सदभावना यात्रा काढून फ़िरत होते. अशाच एका सोहळ्यात मंचावर आलेल्या एका मौलवीने आपल्या खिशातून काढून मोदींना ‘टोपी घालण्याचा’ प्रयत्न केला. तर मोदींनी ती टोपी नाकारली होती. त्या प्रसंगाचे व चित्रणाचे नंतर दोनतीन वर्षे अगत्याने वाहिन्यांवरून किमान दोनचार लाख वेळा प्रक्षेपण झाले. त्यातून काय दाखवले जात होते? मोदी हे इस्लामचा अवमान करीत आहेत. जाहिरपणे मोदींना मुस्लिम धर्माची टोपी परिधान करायची नाही. म्हणजेच त्यांनी इस्लामची अवहेलना चालवली आहे, असा आरोप कितीदा झालेला होता? तो आरोप करणार्या लोकांमध्ये कोणाचा भरणा होता? तेव्हा वारंवार मोदी वा तथाकथित मोदीभक्त यात कुठल्या धर्माचा अवमान करायचा हेतू नसल्याचा खुलासा करत होते. पण कोणी ऐकून घ्यायला राजी होता काय? मोदी टोपी घालायला नकार देतात म्हणजेच इस्लाम धर्माचा अवमान करतात, असाच प्रत्येक आरोपकर्त्याचा दावा नव्हता काय? की तेव्हा संयमाची वा समजूतदारपणाची व्याख्या वेगळी होती आणि आजच व्याख्या बदलून गेलेली आहे? मोदी नावाच्या माणसावर इस्लामी टोपी घालण्याची तेव्हा सगळीकडून सक्ती चाललेली नव्हती काय? तेव्हा तशी सक्ती करणार्यांना मनातल्या भावभावनांचे जाहिर प्रदर्शन मांडण्याची गरज कशाला वाटलेली होती? आज राष्ट्रगीताच्या बाबतीत जो युक्तीवाद रंगला आहे, किंवा तो युक्तीवाद जे लोक करीत आहेत, त्यांची पाच वर्षापुर्वीची भूमिका काय होती? तेव्हा प्रदर्शन म्हणजेच सत्य होते. आता प्रदर्शनाची गरज संपलेली आहे? सामान्य लोकांची स्मरणशक्ती दुबळी असते यावर जबरदस्त विश्वास असणार्यांनाच बहुधा आपल्या देशात विचारवंत म्हणून ओळखले जात असावे. अन्यथा इतका विरोधाभास कशाला दिसला असता?
यातला बौद्धीक वर्चस्ववाद समजून घेतला पाहिजे. यात कुठलेही नियम वा कायदे अजिबात नसतात. ठराविक मूठभर मंडळी कुठल्याही समाजात अशी असतात, त्यांनी अशा नैतिकतेचे अधिकार परस्पर आपल्याकडे घेतलेले असतात. कोणी विचारले वा नाही, तरी ते आपली मते लोकांवर लादत असतात आणि आज ते सूर्याला सुर्य म्हणतात तर उद्या बेधडक त्याच सूर्याला चंद्रही ठरवण्यापर्यंत कोलांटी उडी मारू शकतात. त्याचाच आपल्या देशात बुद्धीवाद म्हणून डंका पिटला जात असतो. मग राष्ट्रगीताची सक्ती झाल्यावर युक्तीवाद बदलतो आणि मोदींनी इस्लामी टोपी घालण्याचा विषय आला, मग नेमक्या उलट्या टोकाला येऊन युक्तीवाद पालटत असतो. हे आता सामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. पण आपली बुद्धी लयास गेली हे त्याच शहाण्यांच्या लक्षात आलेले नाही. म्हणूनच ते अजूनही कोलांट्या उड्या मारून नवनव्या कसरती करीत असतात. पाच वर्षापुर्वीचा काळ वेगळा होता. तेव्हा निदान ठराविक लोक तरी यांच्या भोंदूगिरीला मानत होते. आता ती भोंदूगिरी साफ़ उघडी पडली असून, लोक त्यांच्या असल्या युक्तीवादाकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. म्हणून मग अशा राष्ट्रगीत वा राष्ट्रध्वजाच्या सन्मान अपमानाचे विषय वादविवादाचे बनवून आपले वर्चस्व टिकवण्याची केविलवाणी धडपड या लोकांना करावी लागते आहे. म्हणून मग नेहरू विद्यापीठात भारताचे तुकडे करण्याच्या वल्गनांना अविष्कार स्वातंत्र्य ठरवले जाते आणि राष्ट्रगीताची सक्ती त्यांना देशाचे तुकडे पाडणारी वाटते. कारण वास्तवाशी त्यांचा संबंधच राहिलेला नाही. समजूती वा वाटण्यावर त्यांचे ज्ञान कुंठीत होऊन गेलेले आहे. म्हणूनच ज्या ध्वज वा गीतासाठी लाखो सैनिक जीवावर उदार होऊन राखण करतात, त्याचा सन्मान राखण्यासाठी आपल्याच पायावर उभे रहाण्याचेही कष्ट अशा शहाण्यांना असह्य होतात. पण त्याच ध्वजाखाली राज्य करणार्या राज्यघटनेतले अधिकार त्यांना हवे असतात.
बुद्धी ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी नैसर्गिक देणगी आहे. पण मिळालेल्या साधने व वरदानाचा सदुपयोग करण्याची बुद्धी मात्र प्रत्येकाची सारखीच असेल अशी कोणी हमी देऊ शकत नाही. अशा लोकांना आपल्या दुटप्पीपणात व भामटेगिरीतही बुद्धीचा अविष्कार भासत असतो. तसे हे युक्तीवाद चालतात. त्यांना राज्यघटनेतले अधिकार दिसत असतात. पण त्याच घटनेने सोपवलेल्या जबाबदार्या मात्र बघता येत नाहीत वा पार पाडायच्या नसतात. म्हणून मग युक्तिवादाचा आडोसा घेणे भाग पडत असते. त्यांच्या सोयीचे असेल तेव्हा भावनांचे वा सन्मानाचे प्रदर्शन करण्याची सक्ती योग्य असते आणि जेव्हा अंगाशी येताना दिसते, तेव्हा त्यांना प्रदर्शन गरजेचे वाटू लागते. अन्य वेळी मोदी सरकार त्यांचे नसते आणि जेव्हा शेपूट कात्रीत सापडते, तेव्हा मात्र सरकारच्या जबाबदार्या सांगायच्या असतात. जपानचे पंतप्रधान येथे आले असताना मोदींनी त्यांना अहमदाबादच्या खुप जुन्या मशिदीत नेले, तर तो देखावा असतो. किंवा मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न असतो. पण त्याच मोदींनी टोपी नाकारली तर तो इस्लामचा अपमान असतो. मोदी हे नावडतीचे मीठ आहे. मग ते अळणी असणारच ना? किंबहूना आता या लोकांची दुर्दशा अशी झाली आहे, की त्यांना मोदी, देश, राष्ट्र, राष्ट्राभिमान, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचाही तिटकारा येऊ लागला आहे. तेही स्वाभाविक आहे. मोदी हात लावतील, ते अस्पृष्य असेल तर दुसरे काय होणार? असे लोक इतक्या टोकाला जातात, म्हणून तर मोदींचे काम सोपे झालेले आहे. अशा मुर्खांच्या वागण्यातूनच ते मोदींना जनतेच्या जवळ व भावविश्वात स्थान निर्माण करून देत असतात. मग तो इस्लामी टोपीचा विषय असो, किंवा राष्ट्रगीताचा मुद्द असो. अशा अप्रत्यक्ष मोदीभक्तांनीच या पंतप्रधानाला इतके दणदणित यश मिळवून दिलेले आहे. त्यांच्या राष्ट्रगीत विरोधाला शुभेच्छा!
No comments:
Post a Comment