Tuesday, October 24, 2017

मोदी ‘घाबरून गेलेत’

 modi in varanasi debate के लिए चित्र परिणाम

गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागोपाठ गुजरातचे दौरे केल्यामुळे भाजपाच्या हातून गुजरात गेल्याची चर्चा आजकाल वाहिन्यांवर जोरात चालू आहे. त्यात पुन्हा पाटीदारांचा नेता हार्दिक पटेल व अन्य दोन तरूण नेते अल्पेश व जिग्नेश, कॉग्रेसच्या तंबूत दाखल झाल्याने भाजपाच्या गोटात दाणादाण उडालेली आहे. त्याचाही गवगवा खुप चालला आहे. त्याच्या जोडीला म्हणून की काय, राहुल वारंवार गुजरातमध्ये दिसू लागल्याने नरेंद्र मोदींची झोप उडाल्याचेही वर्णन ऐकायला मिळत आहे. हा सगळा अनुभव नव्याने घ्यावा लागतो आहे. सातआठ महिन्यापुर्वी अशाच काही अनुभवातून वाहिन्यांचे संपादक पत्रकार व त्यांच्या पॅनेल चर्चेत सतत सहभागी होणारे जाणकारही गेलेले आहेत. तेव्हा गुजरातविषयी कोणी बोलत नव्हता. कारण गुजरातमध्ये तेव्हा कुठल्या निवडणूका नव्हत्या. हार्दिक वा अल्पेश ही नावे सुद्धा तेव्हा कोणाच्या तोंडी नव्हती. तेव्हाचे तरूण नेते वेगळे होते. ज्याच्या त्याच्या तोंडी तेव्हा अखिलेश यादव, राहूल गांधी व प्रियंका गांधी यांच्या तरूण नेतृत्वाचा बोलबाला होता. या तीन तरूण नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कसा घाम फ़ोडला आहे, त्याची रसभरीत वर्णने आपण दोनतीन आठवडे ऐकत होतो, बघतही होतो. पण आता त्यापैकी काहीही आपल्याला आठवत नाही, की वाहिन्यांवरील जाणकारांनाही त्याचे पुर्ण विस्मरण होऊन गेलेले आहे. तेव्हा राहुलचा दिसणारा हसरा चेहरा तसाच आजही हसतमुख आहे आणि सोबत अखिलेशच्या आत्मविश्वासाने बोलणारा हार्दिकही आपण बघू शकतो. तेव्हा ज्या काही घडामोडी उत्तरप्रदेश विधानसभा जिंकण्यासाठी चालू होत्या. तशाच गडबडी सध्या गुजरात विधानसभा जिंकण्यासाठी चालू आहेत. तेव्हाही नरेंद्र मोदी कसे भयभीत होऊन गेलेत, त्याची वर्णने चालू होती. आजही त्याचीच पुनरावृत्ती चालू आहे. शक्य झाल्यास चिकित्सकांनी मार्च २०१७ च्या पहिल्या आठवड्यातील बातम्या तपासून बघायला हरकत नाही.

उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक दिर्घकाळ चालू होती आणि मतदान पाचसहा फ़ेर्‍यांमध्ये व्हायचे होते. तिथेही मोदी सातत्याने जाऊन मोठमोठ्या सभा घेत होते. त्या निवडणूकीच्या चार फ़ेर्‍या संपून गेलेल्या होत्या आणि शेवटच्या दोन फ़ेर्‍यांमध्ये ९८ जागांसाठी मतदान शिल्लक होते. तेव्हा पुर्व उत्तरप्रदेशातल्या मतदानाच्या प्रचारासाठी मोदी वाराणशी या आपल्या लोकसभा मतदारसंघात पोहोचले होते. तिथे गेल्यावर त्यांनी तब्बल तीन दिवस तिथेच मुक्काम ठोकण्याचा निर्णय केला आणि त्यावरून काय काय मतप्रदर्शन व आडाखे बांधले गेले? त्याची प्रदिर्घ वर्णने आजही इंटरनेटच्या आवृत्त्यांमध्ये सर्वांना बघायला उपलब्ध आहेत. तीनशेहून अधिक जागांचे मतदान संपून गेलेले होते आणि ९८ जागांसाठी मतदान शिल्लक होते. अशावेळी पुर्व उत्तरप्रदेशात सलग तीन दिवस मोदींनी मुक्काम ठोकला, म्हणजे त्यांना पराभवाच्या भितीने घाम फ़ुटल्याचे हवाले एकाहून एक मोठे जाणकार अभ्यासक वाहिन्यांवरील चर्चेतून व वर्तमानपत्राच्या लेखातून देत होते. ‘मोदींचा वाराण्शीत तीन दिवस मुक्काम कशाला?’ अशा मथळ्याचे सर्व भाषेतील लेख आजही उपलब्ध आहेत. नोटाबंदी, बेकारी वा अर्थव्यवस्था डबघाईला गेल्यामुळे जनमत मोदी विरोधात गेलेले आहे आणि त्यातून पक्ष सावरण्यासाठी मोदींना वाराणशीत मुक्काम ठोकावा लागल्याचा अभ्यासपुर्ण निष्कर्ष जवळपास प्रत्येक विश्लेषकाने तेव्हा काढलेला होता. मोदींनी वाराणशीत मुक्काम ठोकणे वा उत्तरप्रदेशचे अधिकाधिक दैरे करणे, म्हणजे लोकमत गमावल्याचा निष्कर्ष होता. आज गुजरातमध्ये मोदी अधिक फ़िरत असल्याचा निष्कर्षही तसाच्या तसाच आहे. उत्तरप्रदेशात मोदी भयभीत झाल्यामुळे निकालावर काय परिणाम झाला होता? मोदी घाबरल्याची मोजपट्टी त्यांचे वाढते दौरे असतील, तर निकालाचाही निकष तसाच लावला पाहिजे ना? मोदी घाबरतात, तेव्हा त्यांचा पराभव होत नाही तर विक्रमी विजय मिळतो, हाही निकषच होत नाही काय?

थोडक्यात अभ्यासक व पत्रकार इत्यादिकांना मोदी जेव्हा भयभीत झाल्यासारखे वाटतात, तेव्हाच मोदींना विक्रमी यश मिळत असते. नुसते अभ्यासक नव्हेतर चाचण्या घेणार्‍यांनाही तेव्हाच्या मोदी घबराटीचा अंदाज येऊ शकला नव्हता. कुठलीही मतचाचणी निर्वेधपणे भाजपाला साधे बहूमतही द्यायला राजी नव्हती. उलट अनेकांना अखिलेश-राहुल युतीमुळे कोणालाच बहूमत मिळणार नाही, याची पक्की खात्री झालेली होती. मात्र निकाल समोर आले, तेव्हा अशा तमाम जाणकारांचे होश उडाले होते. मोदी भयभीत होतात, तेव्हा निवडणूकीचे निकाल विश्लेषकांना तोंडात बोट घालायची पाळी आणतात, असा मागल्या साडेतीन वर्षातला इतिहास आहे. आताही योगायोग असा आहे, की वाहिन्यांपासून चर्चेतल्या कुठल्याही बातम्यांमध्ये मोदींची घबराट उडून गेल्याची हमी दिली जात आहे. तेव्हा प्रियंका कशी उत्तरप्रदेशाच्य जनतेला भारावून टाकत होती, त्याची रसभरीत वर्णने आपण इतक्या विसरून गेलो काय? अखिलेशची पत्नी व प्रियंका यांचे ‘डेडली कॉम्बीनेशन’ हा शब्दही आपल्याला आज आठवेनासा झाला काय? ‘युपीके लडके’ म्हणून जागोजागी राहुल-अखिलेशचे झळकलेले पोस्टर बघूनच अमित शहा व नरेंद्र मोदींची बोबडी वळली नव्हती काय? इतके दणदणित पराभव मोदी पचवत आलेले आहेत ना? मग त्यांनी गुजरातमध्ये पराभवाला आणखी किती घाबरायचे? मेलेले कोंबडे आगीला भीत नाही म्हणतात, तशी मोदींची आज अवस्था झालेली आहे. त्यांना आणखी घाबरायला कुठली सीमाच राहिलेली नाही. पण मजेची गोष्ट अशी आहे, की तोच घाबरलेला भेदरलेला मोदी अवध्या देशाला धाक दाखवतो असाही एक चमत्कारीक आरोप चालू असतो. बहुधा मोदींनी निवडणूका जिंकण्यासाठी हाच एक निकष ठरवलेला असावा. आपण जितके म्हणून विरोधकांच्या प्रचाराला घाबरून जाऊ तितके यश पक्के; असा काही फ़ंडा त्यांनी मनाशी बांधला असेल काय?

उत्तरप्रदेशात कशाला? लोकसभेत देखील मोदींना आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालनी भयभीत करून टाकलेले होते. केजरीवाल जातील तिथे त्यांचे भव्यदिव्य स्वागत चालू होते आणि त्यामुळे मोदींना प्रतिदिन घाम फ़ुटत होता. माध्यमांवर किंवा तिथे वर्णने करणार्‍या अभ्यासक विश्लेषकांवर विश्वास ठेवायचा, तर विजयासाठी मोदींना अशा घबराटीची गरज आहे. दोनदाच तसे मोदी घाबरले नव्हते आणि त्यांना मोठे अपयश पदरात घ्यावे लागलेले होते. दिल्ली विधानसभेची निवडणूक आली आणि मोदी-शहा कधी नव्हे उतके निर्धास्त होते. कारण बहुतांश वाहिन्या, माध्यमे व जाणकारांनी भाजपाच्या विजयाची हमी दिलेली होती. तिथेच भाजपाचा दारूण पराभव झाला. काहीशी तशीच स्थिती बिहारच्या बाबतीत होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणूका लागल्या, तेव्हाही भाजपाला सहज सत्ता मिळणार असेच आडाखे सर्व माध्यमातून व्यक्त झाले होते. मग निर्भयपणे मोदी त्याला सामोरे गेले आणि त्यांचा घात झाला. थोडक्यात माध्यमांनी मोदी जिंकतील असे निर्वाळे दिले, मग मोठी गडबड होते. जिथे म्हणून मोदी वा भाजपाचा किल्ला मजबूत असल्याची हमी माध्यमातील जाणकार देतात, तिथे मोदींना धोका सुरू होत असतो. आताही गुजरातमध्ये मोदींची घबराट उडाल्याची वर्णने येत असल्याने कोणीही छातीठोकपणे भाजपाच्या विजयाचा निर्वाळा देऊ शकतो. कारण दर दोनचार दिवसांनी मोदी गुजरातचा दौरा करत असून ते भयभीत झालेले आहेत. राहुलनी गुजरातचे अखिलेश व प्रियंका सोबत घेतलेले आहेत. फ़क्त मतदान व्हायचे बाकी आहे. निकाल लागतील तेव्हा लागोत. नेहमीप्रमाणे राहुल गांधींचा दणदणित विजय होणार आहे आणि मोदींना लज्जास्पद पराभव होणार आहे. ज्या पराभवातून सत्ता मिळते तो पराभव कोणाला नको असेल? तशा पराभवाची चव काही न्यारीच असते ना?

10 comments:

  1. मोदी पूर्ण देश कांग्रेस मुक्त करायला निघालेत. सध्या विविध वाहिन्या वरील सर्वे नुसार भाजपा ला 125 च्या आसपास जागा मिळतील असे सांगत आहेत भाजपा ला 150 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत जस उत्तरप्रदेश निवडणुकी च्या वेळी राष्ट्रपति निवडणुकी साठी गरज होती म्हणून मोदी मेहनत घेत होते तसेच ते आत्ता घेत आहेत न्यूज़ वाल्यांना हे कस काय कळत नाही काय माहीत

    ReplyDelete
  2. आज काल विश्लेषकच भरकटलेत त्यांच काहीच खर होत नाही अगदी अमेरिकेतले पन.

    ReplyDelete
  3. अप्रतिम टोमणा

    ReplyDelete
  4. हा लेख मी जपून ठेवेन!

    ReplyDelete
    Replies
    1. जरूर.हा ऐतिहासिक दस्तावेज आहे.भाऊ दूरदर्शी आहेत.भविष्यात घडणाऱ्या घटना भाऊ आधीच वर्तवतात.

      Delete
  5. राहुलने कितीही रान उठवू द्या भाजप ११० पेक्षा कमी जागांवर किमान आल्याशिवाय राहात नाही

    ReplyDelete
  6. भाऊ अप्रतिम
    अशा मिडियावाल्यांच्या खोट्या आवईना (ओरडा ओरड भितीप्रत वातावरण निर्मिती ला लोक चांगलेच ओळखून आहेत...
    आणि हे खोटं पाडण्यासाठीच जणु प्रयत्न करत आहेत...) परंतु हे न कळण्यासारखे एवढे मोठे व विदद्वान संपादक, मालक व बुमर दुधखुळे नाहीत.
    या सर्वांना एक अजेंडा दिला जात असणार व त्यामागे काही राष्ट्रविरोधीि शक्ती निश्र्चीतच काम करत असणार.. व आपल्याच देशातील पिढ्यांन पिढ्या फितुर होणारे लाखो भारतीय तयार आहेत... अशांच्या जिवावर एवढी मोठी गुंतवणूक मिडियामध्य अनेक विदेशी शक्तींनी केलेली आहे. यामुळे गेल्या 5-6 लोकभा निवडणूका सुमार व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखाली सहज जिंकल्या आहेत...
    काही सुमार विकाऊ लोकांना हेरुन त्यानां मॅगेसेसे व इतर आवार्ड देऊन आपले मांडलिक करायचे व त्यांच्या कडुन आपल्या ला पाहिजे तसे पोपट पंची करुन जनता मतदारांची (लाॅजवासीयांची - कारण काही लाॅजप्रमाणे भाडे (टॅक्स) भरले/ला की निर्धास्त रहायचे व कधी मधी हम टॅक्स भर रहे है पर कुछ सुविधा नही है / सब चोर है सबको फासी देना चाहिये म्हणुन परत आपल्याच छंदात मश्गुल ( पुरुष मॅच सोशल मिडिया गाणी पिक्चर माॅल दारु गुत्ता/ बार तर बायका सिरियल नट्टा फट्टा किटी पार्टी पिकनिक यात मश्गुल) काही जण टॅक्स न भरतां धर्मशाळे प्रमाणे सर्व सुविधा घेऊन परत टिका टिंगल करायची)
    दिशाभूल करायची ही एक रणनीती भ्रष्टाचारी व राजेशाही डायन्यास्टी राजकीय पक्षांनी चालवली आहे..
    पण हे कोण करतय या मागील हात कोणाचा आहे ... हे काँग्रेस ईतर पक्षाचे सरकार येवुन पण आजुन शोधून काढता येत नाही व प्रयत्न पण होत नाही ही एक शोकांतिका आहे...
    आणि याची किंमत देशाला भोगावी लागणार आहे..
    एखादे आखलाक प्रकरण या खंडप्राय देशात तसेच एखादा जिवना आवश्यक कांदा , भाजी, पेट्रोल डिझेल महाग झाले की मिडियावाले अवास्तव तांडव करणार व सहज फिरणारे / काठावरचे मतदारांचे जनमत फिरवणार हे नित्याचेच झाले आहे व याचा परिणाम होऊन आघाडी सरकार स्थापुन परत त्या त्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करायचा परत मिडियात गुंतवणूक करुन जनमानस फिरवून देशाला दारिद्र्यात खितपत ठेवायचे हे ठरुन गेले आहे...
    परंतु आपण अनेक लेखात सांगितलेल्या प्रमाणे जनतेची दिशाभूल करणे अवघड झाले आहे .. तरी पण....
    केवळ भाषण बाजी व कितने करोड चाहिये सौ, हजार, पचास हजार करोड या प्रमाणे बोलत निवडणूक झिंकता येत नाहीत त्यासाठी प्रादेशिक पण लोकप्रिय कणखर व डायरेक्ट हाय कमांडशी संपर्क असलेले नेतृत्व प्रादेशिक जिल्हा व निदान तालुका पातळी वर तरी असणे आवश्यक आहे...
    आठवा काही मोठ्या / मध्यम मोठ्या शहरात मी बघीतलं आहे की हा नेता सोनिया/ राहुल गांधीच्या/ गांधी यांच्या जवळचा आहे हे पसरू द्यायचे व त्यानं मत फिरवून/ पैसे वाटत एक एक जागा जिंकायची...
    हे सर्व आजुन मोदींच्या भाजपला मोठ्या प्रमाणात जमलेले नाही...
    गुजरात मध्ये पण आणि बंगाल तामिळनाडू कर्नाटक ओरिसा इत्यादी राज्यात पण अजुनही नेते नाहित...
    एक ही लोक लुभावन लोकप्रिय निर्णय जो सामान्यांना तातपुर्ता दिलासा देयील ... (कारण एका पाच वर्ष टर्म मध्ये खंडप्राय व लोकसंख्येचा स्पोट झालेल्या परिवर्तन करता येणे अशक्य आहे) असा निर्णय 56 " ला पण घेताना अवघड आहे/ आला नाही (आणि आणखी ऊशीर केला तर मिडियावाले लोकसभा निवडणूकी करता घेतला म्हणुन बोथड करतिल) यातुनच आपला देश किती कठीण परिस्थितीतुन जातोय हे समजायची लायकी देशवासियांची आहे का? नक्कीच नाही पण असे निर्णय हात घाईच्या वेळी नक्कीच कामास येतात व वर्षानुवर्ष राज्य करता येते ... याच हात घाईत हात तरबेज आहे... म्म्हणुनच एवढे वर्षे देश दारिद्र्य, भ्रष्टाचार, घाण, अतिरेकी हल्ले, बेकारी, असुविधा, रोगराई, बलात्कार, अत्याचार, असंस्कृतता, घातपात, भिषण टंचाई, भिषण महागाई, भिषण आपत्ती, भिषण अपघात, शिक्षणाच्या असुविधा/कमतरता/न परवडणारी फि, शिक्षणाचे बाजारीकरण, चिनने तोडलेले देशाच्या सिमेचे लचके,न्याय व्यवस्थेचा बोजवारा, परदेशी व देशी भांडवलदाराची /व्यापार्यांची लुट, सहन करत राहिला व असे असुन सुद्धा परत परत सत्तेवर येत राहिला आणि परत परत राहिलं..
    कारण थोडासा हात ढिला करण/व सोशीक जनतेला आशिर्वाद देणे या देशावर रामा सारख्या देवाला पण शक्य झाले नाही / करू दिले नाही... मग मोदी काय चीज आहे? असे म्हणावेसे वाटते.. हे आवाहन मोदी सरकारला पेलते का हे बघणे आपल्या सारख्या सामान्यांच्या हातात आहे...
    AKS

    ReplyDelete
  7. भाऊ आपल्या मताशी पूर्णेपने सहमत आहे, पण एक शंका अशी आहे कि आता GST नंतर लोकांची काय प्रतिक्रिया असेल खास करून गुजराती लोकांची कारण हा समाज व्यापारासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या मनात GST विषयी राग आहे. आपल्याला काय वाटते ?

    ReplyDelete
  8. घोडामैदान लांब नाही भाऊ . बघुया तरी तुमचा होरा कितपत खरा ठरतोय .

    ReplyDelete
  9. काहीही म्हणा भाऊ पण आता सोशल मीडिया वर पण मोदीभक्त कमी होत चालले आहेत, जे थोडे फार उरले आहेत ते एका विशिष्ट समाजातील आहेत,

    ReplyDelete