Saturday, November 18, 2017

अपप्रचाराला ‘हार्दिक’ शुभेच्छा

hardik CD के लिए चित्र परिणाम

गुजरातची निवडणूक आता ऐन रंगात आली असून, त्यात राजकीय चिखलफ़ेकीला सुरूवात झाली आहे. पटेलांचा नेता म्हणून दोन वर्षात पुढे आलेला तरूण हार्दिक पटेल ,याच्याशी संबंधित एक चित्रण व्हायरल झाल्याची बातमी आलेली होती. त्यात आपण नाही आणि आपल्याला बदनाम करण्यासाठीच हे चित्रण सादर झालेले असल्याचा दावा या तरूण नेत्याने केलेला होता. इतक्यात आता आणखी एक तशीच आक्षेपार्ह सीडी समोर आलेली आहे आणि तिचा गाजावाजा सुरू झालेला आहे. मात्र यातून काय राजकारण साध्य केले जाईल, ते समजत नाही. आता अशा चिखलफ़ेकीने जिंकण्याचे वा कोणाला हरवण्याचे दिवस मागे पडलेले आहेत. असे कोणाला खोटे चित्रण वा आरोपातून हरवता आले असते, तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊच शकले नसते. तब्बल बारा वर्षे त्यांच्यावर नानाविध आरोप झाले आणि देशातल्या तमाम माध्यमांना त्यासाठी कॉग्रेसने कामाला जुंपलेले होते. तसा अपप्रचार करणारे नुसते पराभूत झाले नाहीत, तर त्यांच्याशी हातमिळवणी करणारे पत्रकार, संपादक व माध्यमेही नेस्तनाबूत होऊन गेलेली आहेत. अर्थात काही काळ त्या आभासाचा काही लोकांना राजकीय लाभ जरूर मिळाला. मात्र त्यातला खोटेपणा जसजसा समोर येत गेला, तसतसा लोकांचा अशा अपप्रचारावरचा विश्वास उडून गेला आहे. नुसते आरोप आता उपयोगाचे राहिलेले नाहीत आणि एखाद्या व्यक्तीवर असे खळबळजनक आरोप झाले तर लोक आधी त्याच्यापेक्षाही आरोपांकडे संशयाने बघत असतात. म्हणूनच ताज्या सीडीने हार्दिक पटेल याचे कुठलेही राजकीय नुकसान होण्याची शक्यता नाही. उलट तसा कोणी आगंतुक प्रयत्न केला असेल, तर त्यालाच फ़टका बसण्याची अधिक शक्यता आहे. अर्थातच हार्दिक भाजपा विरोधात तावातावाने सध्या बोलत असल्याने, त्याच पक्षावर अशा सीडीचे खापर फ़ोडले जाणेही शक्य आहे.

यातलॊ एक गंमत लक्षात घेतली पाहिजे. भाजपाचा कुठलाही नेता या संबंधात हार्दिकला सवाल करण्यासाठी पुढे आलेला नाही आणि येणारही नाही. पण कॉग्रेसचे नेते मात्र हार्दिकच्या बचावाला पुढे आलेले आहेत. कारण हार्दिक भाजपाच्या विरोधात बोलत असून, त्याने भाजपाला पराभूत करण्याचा विडाच उचलला आहे. पण त्याखेरीजही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती हार्दिकच्या जुन्या सहकार्‍यांची! त्यापैकीच एक असलेला अश्विन सांकडीया याने हार्दिकला सीडी खोटी वा बनावट असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान दिलेले आहे. हार्दिक हा चोविस वर्षाचा तरूण असून पटेलांचे आरक्षणासाठी आंदोलन उभे राहिले, त्याचा तो लोकप्रिय चेहरा होता. पण त्याच्या शिवायही अनेक तरूणांनी त्यात पुढाकार घेतलेला होता आणि त्यांना हार्दिक इतकी प्रसिद्धी मिळाली नाही. किंवा हार्दिकने नंतरच्या काळात आपल्या अशा सहकार्‍यांना फ़ारसे महत्व दिलेले नाही. अवघ्या पटेल नाराजीचा आपणच एकमेव नेता असल्याच्या थाटात हार्दिकने श्रेय घेतलेले आहे. त्यातून नाराज झालेले वा असंतुष्ट असलेले अनेक तरूण नेते असू शकतात. त्यांना विश्वासात न घेता हार्दिकने परस्पर राजकीय निर्णय घेतल्याने, त्यांचा असंतोष उफ़ाळून आलेला असेल, तर असे सहकारीही त्याला संपवण्याची खेळी खेळू शकत असतात. ज्या प्रकारच्या सीडी व चित्रण समोर आणले गेलेले आहे, ते हार्दिकच्या जवळच्या वा विश्वासातल्या कोणाकडून तरी केले गेलेले असणार, हे उघड आहे. मे महिन्यातले चित्रण असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच जोवर पटेल आंदोलनात फ़ाटाफ़ूट झालेली नव्हती, त्यावेळचे चित्रण असू शकते. जितक्या आवेशात हार्दिकचा जुना नाराज सहकारी अश्विन त्याला खोटेपणा सिद्ध करण्याचे आव्हान देतो आहे, त्यातून त्याच्या सत्त्यतेला आव्हान दिले जाणे अशक्य वाटते. म्हणूनच कायदेशीर आव्हान देण्यापेक्षा हार्दिकने भाजपाच्या माथी खापर फ़ोडून अंग झटकलेले आहे.

आणखी एक गोष्ट विसरता कामा नये. ही तथाकथित अश्लिल सीडी सोमवार मंगळवारी समोर आली आणि फ़िरवली जाऊ लागली. पण तशी काही सीडी व चित्रण असल्याची माहिती सर्वात आधी खुद्द हार्दिक पटेलनेच जगाला सांगितली होती. दहाबारा दिवसांपुर्वीच हार्दिकने आपल्या अपप्रचारासाठी अश्लिल सीडी उघड केल्या जाण्याची शक्यता वर्तवली होती. असे चित्रण आहे किंवा बनवण्यात आलेले आहे, ते हार्दिकला कुठून आधी कळले होते? त्याचा कुठलाही खुलासा त्याने अजून केलेला नाही. पण त्याला आधी ठाऊक होते हे निश्चीत! मग त्याला हे कोणी सांगितले होते? कोणी धमकावलेले होते काय? असेल तर हार्दिकनेही त्यांची नावे जगजाहिर केली तर बिघडणार नाही. त्यामुळे असे अपराधी वॄत्तीचे लोक अधिक उघडे पडतील. पण हार्दिक तसे काही करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. तो पोलिसात वा कोर्टात जाऊन अशा कृतीला आव्हानही देण्याच्या तयारीत दिसत नाही. ही बाब त्याच्या सच्चेपणाची ठरू शकत नाही. एकतर त्याने ते चित्रण खोटे असल्याचे म्हटलेले आहे. त्यात तथ्य असेल तर हा खोटेपणा करणार्‍यांना पोलिसात खेचण्याला कसला खर्चही येत नाही ना? पण त्याविषयी हार्दिकलाच खात्री नाही. म्हणून त्याने सगळा विषय झटकण्यातच धन्यता मानलेली आहे. पण म्हणून तो विषय संपता कामा नये. भारतीय राजकारणात ही विकृती प्रतिष्ठीत होण्याच्या आधी उखडून टाकली गेली पाहिजे. म्हणूनच गुजरात सरकारने व त्याचे नेतृत्व करणार्‍या भाजपाने त्याविषयी पोलिस तपासाला प्राधान्य देऊन आपली बाजू साफ़ करण्याचीही गरज आहे. त्याचा फ़ोरेन्सिक तपास झाला तर त्यात किती तथ्य आहे आणि हे कोणाचे पाप आहे, त्याचाही खुलासा होऊ शकेल. भाजपालाही त्यातून आपले पाप नसल्याचे प्रमाणपत्र मिळू शकेल. पण भाजपा त्यासाठी पुढाकार घेणार नसेल, तर त्याचेही वागणे संशयास्पद मानावे लागेल.

हे असले चित्रण निवडणूक काळात समोर आणणे वा राजकारणासाठी डाव म्हणून त्याचा उपयोग करणे; हे गुन्हेगारी वृत्तीचे लक्षण आहे. भले मोदींच्या विरोधात अशा गोष्टींचा सर्रास वापर त्यांच्या विरोधकांनी केलेला आहे. छुप्या कॅमेराचा वापर करून गेल्या दहाबारा वर्षात खुप घाणेरडे राजकारण खेळले गेलेले आहे. आज त्यातले अनेक भुरटे पत्रकार प्रतिष्ठीत म्हणून राजकारणातही आलेले आहेत. काही तर त्यांनीच निर्माण केलेल्या सापळ्यात फ़सलेलेही आहेत. पण कोणाचेही गाफ़ील पकडून वा चोरून चित्रण, ही खाजगी जीवनातील बाब असते आणि त्याचा राजकीय हेतूने वापर करणे ही गैरलागू आहे. मग ते मोदी शहा असोत किंवा हार्दिक पटेल सारखे त्यांचे विरोधक असोत. राजकारण व निवडणूकांचे पावित्र्य त्यात विटाळले जात असते. त्यातून खुप गाजावाजा करता येतो. पण राजकीय लाभ फ़ारसे मिळत नाहीत. कारण राजकारणातल्या तथाकथित चाणक्यांना भले त्याची चटक लागलेली असेल. पण लोक त्याला कंटाळलेले आहेत. म्हणूनच आजकाल अशा गौप्यस्फ़ोटांना लोकांचा फ़ारसा प्रतिसादही मिळेनासा झालेला आहे. हार्दिक पटेल तर कोवळा पोरगा आहे आणि त्याला बदनाम करून भाजपाला मते मिळतील, अशा भ्रमात मोदी असतील, असे वाटत नाही. मात्र त्याचे खापर भाजपाच्या माथी मारून कॉग्रेस आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहे. हार्दिक भाजपाचा विरोधक असला म्हणून कॉग्रेसने त्याचे पाप आपल्या माथी घेण्याचीही काही गरज नाही. सुदैवाने अशा राजकारण्यांपेक्षा सामान्य मतदार अधिक प्रगल्भ झालेला आहे. म्हणूनच ह्या तमाशांना मनोरंजनाच्या पलिकडे लोक किंमत देताना दिसत नाहीत. कारण अशा प्रचार वा अपप्रचारापासून ९० टक्के सामान्य मतदार दूरच असतो. तो आंबटशौकी नाही तसाच अपप्रचारालाही बळी पडणारा राहिलेला नाही, हे भारताचे सुदैव म्हटले पाहिजे.

4 comments:

  1. महत्वाच म्हणजे हा प्रसार-माध्यमांच्या प्राइम टाइम चर्चासत्राचा विषय झाला आहे !

    ReplyDelete
  2. एक पक्ष की ज्याच्या विरोधात हा हार्दिक उभा आहे तो पक्ष या सीडी प्रकरणाकडे लक्ष देत नाहीये, आणि दुसरीकडे तो पक्ष ज्याची साथ हा हार्दिक देतोय तो पक्ष सीडी प्रकरणी त्याचा बचाव केल्याचा बनाव करतोय.
    तेव्हा या सीडी प्रकरणात कुणाचा बरे "हात" असेल?

    ReplyDelete
  3. सिडीमागे "हात"च असावा.

    ReplyDelete
  4. cd मागे कोण असेल याची उत्तर संजय जोशी चांगल्या प्रकारे देऊ शकतील.

    ReplyDelete