२०१४ च्या लोकसभा निवडणूका ऐन रंगात आलेल्या असताना एकामागून एक वृत्तवाहिन्यांची स्पर्धा चालली होती. भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी कोणाला मुलाखत देतात यासाठी ती स्पर्धा होती. ते मुलाखत देत नाहीत म्हणून अनेक नावाजलेले संपादकही रडकुंडीला आलेले होते. आज त्यापैकी बहुतेक संपादक अडगळीत जाऊन पडले आहेत. अशीच एक मुलाखत मोदींनी एबीपी या नेटवर्कला दिलेली होती आणि एबीपी माझाच्या राजू खांडेकर यांच्यासह अन्य दोन संपादकांनी ती मुलाखत घेतली होती. त्यापैकी एकाने नेमका प्रश्न मोदींना विचारला होता. तुम्ही सत्तेत आल्यावर लोकांना भयभीत होऊन जगावे लागेल काय? मोदींनी त्याचे नकारार्थी उत्तर दिले होते. कोणाला कशालाही घाबरण्याचे कारण नाही. असे ठामपणे सांगितल्यावर क्षणभर थांबून मोदी म्हणले होते, ‘लेकीन कुछ लोगोंको तो घबराना चाहिये.’ ज्यांच्या मनात चोरी असेल आणि जे कायदा मोडतील, त्यांनी नक्कीच घाबरलेच पाहिजे, वगैरे. पण मुळात असा प्रश्न विचारण्याची काय गरज होती? यापुर्वी देशाच्या कुठल्या नेत्याला वा पक्षप्रमुखाला असा प्रश्न विचारला गेला नव्हता. मग मोदींनाच असे प्रश्न कशाला विचारले जात होते? तर अमर्त्य सेन यांच्यापासून अनंतमुर्ति यांच्यापर्यंत अनेक तथाकथित बुद्धीमंत कलावंत असल्या वल्गना करीत सुटले होते. मोदी निवडून आले व पंतप्रधान झाले, तर आम्हाला देश सोडून पळ काढावा लागेल. किंवा आम्ही या देशात राहू शकणार नाही, अशी मुक्ताफ़ळे राजरोस उधळली जात होती. तोच संदर्भ पकडून हा प्रश्न विचारला गेला होता. चार वर्षांनी त्याचे स्मरण शरद पवार यांनी करून दिले. पैसे लुटून देशातून पळ काढणारे भाजपाचेच समर्थक असल्याचा आरोप त्यांनी एका भाषणात केला. म्हणून लोकसभा प्रचाराच्या काळातील ही मुलाखत आठवली. मुद्दा इतकाच की मोदी निवडून आल्यावर भाजपा समर्थक देशातून पळणार होते काय?
तेव्हा पुरोगामीत्वाची साक्ष देण्य़ासाठी व मोदींविषयी जनमानसात भय निर्माण करण्यासाठी अनेक शहाणे असली भाषा मिरवत होते. त्यात नोबेल विजेते अमर्त्य सेन होते, तसेच कानडी साहित्यिक अनंतमुर्ती वा कलाकार गिरीश कर्नाड यांचाही समावेश होता. त्यावरून तीव्र प्रतिक्रीया उमटल्या वा खिल्ली उडवली गेल्यावर त्यांनी आपले शब्द मागेही घेतलेले होते. पण मुळात असले काही बोलणे असहिष्णू नव्हते काय? जो माणूस कायद्याच्या कक्षेत घटनात्मक मार्गाने संसदेची निवडणूक लढवतो आहे आणि त्याला जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे, त्याच्याविषयी अशी विधाने करणे, कुठल्या घटनेचा सन्मान होता? यापैकी कोणाला इंदिराजी १९७७ नंतर लोकसभेच्या आखाड्यात उतरल्या, तेव्हा भिती वाटली नव्हती की देश सोडून जाण्याची भाषा यातला कोणी बोलला नव्हता. मग मोदींविषयी तसे बोलण्याचे कारण काय होते? मोदी म्हणतात, तशी त्यांच्या मनात चोरटी काही भावना होती काय? नसेल तर ते कोणाचे प्रवक्ते म्हणून असली भाषा बोलत होते काय? त्यापैकी कोणाला आपले शब्द पाळण्याची हिंमत झाली नाही. पण मोदींचे शब्द खरे ठरले आहेत. त्यांच्या राज्यात नीरव मोदी वा विजय मल्ल्या यांच्यासारख्यांना देश सोडून पळून जाण्याची गरज भासलेली आहे. हेच किंवा असेच लोक युपीए वा सोनिया मनमोहनांच्या कालखंडात निर्भयपणे भारतात जगत होते. देश लुटत होते आणि धमाल करीत होते. त्यांना कुठल्या कायद्याची भिती नव्हती, की सरकारचा धाक वाटला नव्हता. मग अमर्त्य सेन वा तत्सम लोक मल्ल्या वा नीरव यांचे प्रवक्ते म्हणून असली विधाने करण्यात पुढाकार घेत होते काय? मल्ल्या सारख्यांना मोदी जिंकले तर देशाची लुटमार करून सुखनैव जगता येणार नाही, याची भिती वाटली होती आणि त्याचाच उच्चार सेन इत्यादी मंडळी करीत होती काय? कारण तसे बोलणारे कोणी पळालेले नाहीत. पण नीरव, मल्ल्या फ़रारी झाले आहेत.
यातून एक गोष्ट साफ़ होते, की मोदींच्या राज्याची वा सत्तेत येण्य़ाची भिती अन्य कुणाला नव्हती. अगदी अमर्त्य सेन वा अनंतमुर्ति अशा कुणाही बुद्धीमंतांना त्यात भयभीत होण्याचे काहीही कारण नव्हते. पण मोदी जे ध्येय घेऊन आखाड्यात उतरले होते, त्यामुळे अफ़रातफ़री व लुट करणार्यांना आधीपासून कापरे भरलेले होते. हा माणूस सत्ता हाती आल्यास कधीतरी आपली पापे शोधून काढणार आणि आपल्याला गजाआड टाकणार, याची भिती त्यांना सतावत होती. म्हणूनच या लोकांना युपीएची सत्ता व मनमोहन व चिदंबरम सत्तेत कायम रहायला हवे होते. पण राजकारणात मल्ल्या वा नीरव मोदींना कोण विचारतो. म्हणून त्यांनी असे बुद्धीमंत ‘अष्टपैलू हिरे’ प्रदर्शनात मांडलेले असावेत. आपल्या वतीने बोलायचे काम त्यांनी अशा पुरोगामी बुद्धीमंत कलावंतांवर सोपवलेले असावे. अन्यथा या महाशयांनी इतकी टोकाची विधाने कशाला करायला हवी होती? तर असेही लोक मागल्या दाराने चोरीला मोकळीक देणार्या सत्तेचे समर्थक होते. ज्या कारकिर्दीत मल्ल्या व नीरव मोदी अशा भामट्यांना देश लुटण्याची मोकाट संधी देण्यात आलेली होती, तिचा धोका देशाला ओरडून सांगावा असे अमर्त्य सेन यांना महान अर्थशास्त्री असूनही वाटले नाही. त्यावर दोन शब्द बोलायला त्यांना हिंमत झाली नाही. मग त्यांचे अर्थज्ञान काय चुलीत घालायचे होते? मोदींच्या कारकिर्दीत आपले भिन्न मत बोलायची हिंमत करणारे रिझर्व्ह बॅन्केचे तात्कालीन गव्हर्नर मनमोहन काळात बॅन्कींग क्षेत्रातील बेताल लूटमारीविषयी एकही जाहिर शब्द बोलायला कशाला धजावले नव्हते? नोटाबंदीवर अक्कल पाजळणार्यांना नीरव किंवा मल्ल्यासारखे भामटे बॅन्का पोखरून काढत असल्याचा थांग लागलेला नव्हता काय? त्यांची कॉलर पकडायची सोडून हे महानुभाव मोदी सत्तेत आल्यास देश सोडून पळण्याची मुक्ताफ़ळे मग कशाला उधळीत होते?
आता हे घडून गेल्यावर पवार साहेब म्हणतात, पळाले ते भाजपाचे समर्थक आहेत. मग भाजपाचे वा मोदींचे विरोधक तेव्हा याच भामट्यांच्या विरोधात अवाक्षर कशाला बोलत नव्हते? अशा भाजपा समर्थकांना युपीएच्या काळात बॅन्कांना लुटण्याची मोकळीक कशाला देण्यात आलेली होती? मल्ल्यासाठी मनमोहन खास कर्जाचे आदेश कशाला देत होते? मनमोहन असे कही करीत असतील, तर सोनियांना पवारांनी तेव्हाच हे कशाला दाखवून दिले नाही? मनमोहन भाजपा समर्थकांना बॅन्केतून हवे इतके बुडीत कर्ज देत असल्याची चुगली केली असती, तरी साहेबांना सोनियांनी थेट पंतप्रधानपदी बसवले असते आणि सिंग यांना बाजूला केले असते. राहुल बजाजना ‘पंतप्रधान लाभले’ असते. पण साहेबही तेव्हा चिडीचुप बसले होते आणि आयपीएलच्या सामन्यात रंगून गेलेले होते. तेव्हा ललित मोदी व श्रीनिवासन हे खिसेकापू म्हणून कौशल्य अजमावित आहेत, त्याचा अभ्यास पवार करीत असावेत. ललित मोदीला करोडो रुपये उडवण्यासाठी आयपीएल कमिशनर नरेंद्र मोदींनी नेमलेले नव्हते. खुद्द साहेबांनीच नेमले होते ना? भाजपाच्या समर्थकाला त्या पदावर नेमून कोणते पुरोगामी कार्य साहेबांनी केले, त्याचा तरी खुलासा करावा. आयपीएलचा अंतिम सामना संपला त्या अपरात्री ललित मोदीची कमिशनर पदावरून उचलबांगडी नरेंद्र मोदींनी केली की साहेबांनी केली? जिभेला हाड आहे काय, असे म्हणायची पाळी आणू नये. मग बोलणारा नोबेल विजेता असो की जाणता नेता असो. बाकीची अक्कल पाजण्य़ापेक्षा त्यांनी जे पळाले, ते युपीएच्या कारकिर्दीत देशात निर्धास्तपणे का राहिले होते आणि का भयभीत झालेले नव्हते, त्याचा खुलासा करावा. त्यानंतर मोदी सरकारवर कोणतेही बिनबुडाचे आरोप करावेत. मोदींना खोटारडे फ़ेकू म्हणायला काहीही हरकत नाही. पण तुम्ही सत्यवचनी हरिश्चंद्राचे अवतार असल्याची तर आधी साक्ष द्याल की नाही?
Bhau, you are great. One request. Please comment on yesterday's interview held at Pune. We all will be eagerly waiting for the same.
ReplyDeleteNice
ReplyDeleteनीरव मोदीला बेकायदेशीर कर्ज देता येणार नाही असे सांगणाऱ्या अलाहाबाद ब्यंकेच्या दुबे या अधिकऱ्याला पी. चिदंबरमनी Terminat का केले ?[जर पळून जाणारे (नीरव मोदी) भाजप समर्थक असतील तर]
ReplyDeleteहरिश्चंद्राच्या औलादी हा शब्द जास्त समर्पक ठरला असता.
ReplyDeleteभाऊ, सामान्य जनतेला या गोष्टी कळाल्या पाहीजेत जेणेकरुन मोदीं ना पुढील २/३ टर्म पुर्ण करता येतील देशांची घडी नीट बसवतां येईल. अमर्त्य , पवार, कर्नाड यांपासून देशातला धोका आहे हे गोरगरीबांना कळले पाहीजे ( जे खूप कठीण आहे)
ReplyDeleteफार सुंदर भाऊ
ReplyDeleteफारच छान लेख!
ReplyDelete