Thursday, February 15, 2018

ओवायसी कुठे चुकला?

Image result for sunjuan kashmirattack

काश्मिरात सुनजुवान येथील सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या जिहादी हल्ल्यात सात जवान शहीद झाले. त्यासाठी पाकिस्तानला चोख उत्तर कधी देणार, असे सवाल विचारले जात असतानाच मुस्लिम नेते असाउद्दीन ओवायसी यांच्या वक्तव्याने वेगळा वाद सुरू झाला. शहीद झालेल्या सातपैकी पाच जवान मुस्लिम होते आणि त्याविषयी कोणीच काही बोलत नाही, असा ओवायसी यांचा आक्षेप आहे. मारले जाणारे अतिरेकी वा देशद्रोही मुस्लिम असतात, याचा नेहमी गवगवा होतो. पण देशाची सुरक्षा करण्यासाठी मुस्लिम सैनिक जवान शहीद होतात, तेव्हा कोणी उल्लेख करत नाही. हा त्यांचा आक्षेप हेतूपुर्ण व राजकीय आहे, याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. ओवायसी नेहमी आपल्या धर्मांध राजकारणासाठी अशा संवेदनाशील विषयांना फ़ोडण्या देत असतात. पण त्याच नाजूक विषयाकडे जणिवपुर्वक वा अजाणतेपणी केले जाणारे एक दुर्लक्ष महत्वाचे आहे. जवान शहीद झाले इतकेच म्हटले जाते. पण त्यात जवान सैनिक मुस्लिमही असतात, हे तितक्याच ठामपणे सांगण्याने काय बिघडणार आहे? किंबहूना काश्मिरचा प्रश्न हा प्रादेशिक नव्हेतर जणू मुस्लिमांवरचा अत्याचार आहे, असा आभास उभा करणार्‍यांना चपराक मारण्यासाठी तरी शहीद होणारेही मुस्लिमच आहेत, तेही अगत्याने दाखवायला काय हरकत आहे? सवाल मुस्लिमांचा नाही, की काश्मिरचा नाही, तर पाकिस्तानवादी गद्दारांचा आहे. त्यात खराखुरा भारतीय मुस्लिम सहभागी नाही, याची साक्ष असे मुस्लिम शहीद देत असतात, ते अधिक ठळकपणे मांडले जायला काय हरकत आहे? प्रामुख्याने यावेळी काश्मिरातील तीन मुस्लिम सैनिक शहीद झालेले आहेत आणि त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कारासाठी लोटलेली गर्दी हा नजरेत भरणारा फ़रक आहे. त्या अंत्ययात्रेत लोटलेला मुस्लिम काश्मिरी जमाव, हा लक्षणिय बदल आहे. तो कितीसा ठळकपणे मांडला गेला?

ओवायसी यांनी असा विषय मांडताना सैनिकात जातीधर्माचा भेदभाव निर्माण करण्याचा हेतू भले बाळगलेला असेल. पण त्यासाठी त्यांच्यावर धर्मांध मुस्लिम नेता म्हणून प्रत्यारोप करण्यापेक्षा, त्या सैनिक मुस्लिमांनी कशासाठी बलिदान केले, असा उलटा प्रश्न कशाला फ़ेकला जात नाही? त्यांना मारणारे वा त्यांच्याकडून काश्मिरी भूमित मारले जाणारे घातपातीही मुस्लिमच आहेत ना? मग ते जिहादी मुस्लिम कुठल्या धर्माचे पालन करतात, असा प्रश्न ओवायसी यांना विचारला पाहिजे. ओवायसी वा तत्सम मुस्लिम नेते कुठल्या धर्माचे अनुयायी आहेत? जे देशासाठी शहीद होतात, त्या मुस्लिमांच्या धर्माची व्याख्या कोणती आणि त्याच भारतीय सैनिक मुस्लिमांना ठार मारण्यासाठी हल्ला करतात, त्या जिहादी मुस्लिमांच्या धर्माची व्याख्या कोणती? त्यापैकी कोणत्या इस्लामचे अनुकरण ओवायसी करतात? जे कोणी भारतीय सैनिक असलेल्या मुस्लिमांवर हल्ले करतात, अशा जिहादी मुस्लिमांना खरा धर्म शिकवण्यासाठी ओवायसी काय प्रयत्न करतात? त्यांच्यासारखे जे कोणी मुस्लिमांचे तारक व संरक्षक म्हणून कायम मिरवत असतात, त्यांनी जिहादींकडून मुस्लिम मारले जातात, यावर किती आवाज ऊठवला आहे? असे प्रश्न ओवायसींना विचारण्यात काही अडचण आहे काय? मग ते प्रश्न विचारायचे सोडून त्यांच्यावर नुसत्याच प्रत्यारोपांचा भडीमार कशाला केला जातो? यापुर्वी काश्मिरात जे जिहादी मारले जायचे, त्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी लोटल्याची चित्रणे समोर आलेली होती. दाखवली गेली आहेत. पण शहीद झालेल्या सैनिक पोलिसांच्या अंत्ययात्रेला कोणी मुस्लिम राजकीय नेता वा मंत्री फ़िरकल्याचे दाखवले गेले नाही. यावेळी प्रथमच ती गर्दी व ते अलोट प्रेम मुस्लिम भारतीय सैनिक व काश्मिरी शहीद पोलिसांच्या वाट्याला आलेले आहे. म्हणून त्यांचे मुस्लिम असणे अगत्याचे व महत्वाचे आहे.

देशातले हिंदू, मुस्लिम वा शीख, ख्रिश्चनांचे नेते म्हणून आपल्यासमोर ज्यांना पेश केले जाते, त्यांना त्या त्या धर्म समाज घटकात खरोखर किती मान्यता असते? असे लोक खरेच किती लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करीत असतात? या प्रश्नांची कधीही उत्तरे मागितली जात नाहीत की दिली जात नाहीत. कारण हा सगळाच बाजार असतो अणि त्यात ग्राहकाला भुलवण्याच्या खेळी चालू असतात. त्यामुळे असे भुरटे लोक विशिष्ठ समाजाचे धर्माचे मक्तेदार नेते म्हणून पुढे केले जातात. त्यांच्या कुठल्याही विधानांवरून गदारोळ माजवला जातो. प्रत्यक्षात बहुतांश समाज त्यापासून पुर्णपणे अलिप्त असतो. त्यात सर्व धर्माचे लोक येतात. आताही मल्याळी सिनेमात कुठल्या नटीने भुवया उडवल्या आणि त्यामागे वाजणारे गाणे मुस्लिम धर्माच्या भावना दुखावणारे म्हणून बंदी घालण्याची मागणी पुढे आलेली आहे. कित्येक दशके हेच गाणे केरळात घरगुती समारंभात गायले गेले, तेव्हा तिथल्या कोणा मुस्लिमाच्या धर्मभावना दुखावलेल्याचे पुढे आले नाही. कोणी तक्रार केली नाही. मजेची गोष्ट अशी की केरळातील या जुन्या गाण्याने आता मुंबईतल्या रझा अकादमीच्या भावनाही दुखावल्या आहेत. दूर तिकडे मध्यपूर्वेत असलेल्या ज्यु धर्मियांचा सूड घेण्यासाठी इथे मुंबईत येऊन पाकिस्तानचा अजमल कसाब मृत्यूचे तांडव करतो. इतक्या वर्षात मुंबईतल्या कुणा मुस्लिमाला इथे असलेल्या ज्यु धर्मियांचा सूड घेण्याची इच्छा झाली नाही. भावना दुखावणे वगैरे काही मुठभर धार्मिक, सामाजिक वा मानवाधिकारी नेते चळवळ्यांचा पोटभरू धंदा झालेला आहे. त्यांच्यापलिकडे बहुसंख्य सर्वधर्मिय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असतात. त्यांच्या भावनांचे असे खोटे चेक फ़ाडणार्‍यांना चव्हाट्यावर आणण्याची हीच वेळ असते. म्हणून ओवायसी काय म्हणाले, त्याविषयी गदारोळ करण्यापेक्षा त्यांनाच काही योग्य प्रश्न विचारून गप्प करणे योग्य असते.

अशा धर्माचे अवडंबर माजवणार्‍यांना म्हणूनच विचारले पाहिजे, की काश्मिरी मुस्लिमांवर पोलिस, कायदा वा सेनादलाकडून अत्याचार होत असतील, तर त्यातलेच काही मुस्लिम त्या सुरक्षा दलात कशाला भरती होतात? तेव्हा त्यांचा धर्म काय शिकवतो? ते स्वधर्मियांना गोळ्या घालायला वा गोळी खावून मरायला कशाला पुढे येतात? कारण त्यांच्यासह कुठल्याही भारतीयाला धर्मापेक्षा देश मोठा वाटतो. मग तो हिंदू असो वा मुस्लिम असो. तसे नसते तर तीन शहीद काश्मिरी मुस्लिमांच्या आपल्या गावात अंत्ययात्रेत अभिवादन करायला अशी हजारोची गर्दी लोटली नसती. ती गर्दी साक्ष देत असते, की हुर्रीयत आमचा प्रतिनिधी नाही, की तिच्या फ़ुटीर प्रवृत्तीला खतपाणी घालणारा मणिशंकर अय्यर आमचा हितचिंतक नाही. ती गर्दी सांगत असते, की आम्हाला धर्माच्या नावाने पाकिस्तानात जायची अजिबात इच्छा नाही आणि पाकिस्तान आमचा खरा शत्रू आहे. ती गर्दी आणखी एक आक्रोश करून सांगत असते, की काश्मिरीयतच्या नावाने सैनिकांवर दगडफ़ेक करणारेही आमचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. म्हणून ओवायसी सारख्यांना ठणकावून विचारले पाहिजे, पाच शहीद सैनिक मुस्लिम दिसतात आणि त्यांच्या हौतात्म्याचे श्रेय धर्मनेता म्हणून घ्यायचे असेल, तर त्यांच्यावरच दगड फ़ेकणार्‍यांच्या पापाचाही धनी हो. नसेल तर दगडफ़ेके मुस्लिमांनाही गोळ्या घालण्याची मागणी कर. ज्यांच्यामुळे या पाच मुस्लिमांना शहीद व्हावे लागले, त्यांनाही गोळ्या घालण्याची मागणी ओवायसीने करायला हवी. त्यासाठी त्याच्यावर दबाव आणायला आपल्याला कोणी रोखले आहे? तो त्याचा लबाड हेतू सोडणार नाही. पण आपण स्वत:ला देशप्रेमी म्हणत असू, तर आपण आपला देशप्रेमाचा अजेंडा पुढे रेटण्यात कशाला कमी पडत असतो? ओवायची वा तत्सम लोकांनी काय करावे, हे सांगण्यापेक्षा आपण काय करायचे ते आधी ठरवा.

2 comments:

  1. उत्तम विश्लेषण भाऊ.
    सलाम तुमच्या लेखणीला.

    ReplyDelete
  2. भाऊंच्या पद्धतीने उलट प्रश्न केले तर ओवैसी आणि त्याच्या (ला)वारिस पिलावळीची बोबडी वळेल..!!

    ReplyDelete