Saturday, March 10, 2018

मम्मीऽऽऽऽऽ पार्टी बचाव!

Image result for rahul cartoon manjul

त्रिपुरा व इशान्य भारतातील तीन राज्यात कॉग्रेसचा पुरता बोर्‍य वाजला, त्याची वरकरणी कॉग्रेसने काही प्रतिक्रीया दिलेली नाही. नेहमीप्रमाणे सत्ता व पैशाच्या बळावर भाजपाने मेघालयात सत्ता बळकावल्याचा गोव्याप्रमाणे आरोप केला आहे. कारण चिंता त्या इशान्येची नसून राहुलच्या उघड्या पडू लागलेल्या नेतृत्वाची अधिक आहे. भाजपाच्या या इशान्य दिग्विजयाची प्रतिक्रीया अन्य विरोधी पक्षात उमटू लागल्याने कॉग्रेसच्या तंबूत पुरती घबराट माजलेली आहे. त्यांना तीन राज्यात हाती आलेल्या भोपळ्याने जितके भयभीत केलेले नाही, त्यापेक्षा अधिक भिती मोदीविरोधी गोटातून सुरू झालेल्या मतप्रदर्शनाने चिंताक्रांत केले आहे. हे निकाल संपण्यापुर्वीच कॉग्रेसचे दिवाळे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मोदींच्या लोकप्रियतेवर आणखी एकदा शिक्कामोर्तब झाल्याने विरोधकांना एका गोष्टीचा साक्षात्कार झाला. यापुढे कॉग्रेस व पर्यायाने राहुलच्या पाठीशी राहिले तर आपलेही दिवाळे वाजायला वेळ लागणार नाही. पण हे सत्य बोलायचे कोणी व कसे? तर त्याची सुरूवात नेहमीच्या कलाकारापेक्षा वेगळयाच नेत्याने केली. नव्याने अस्तित्वात आलेल्या तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी त्याचे सूतोवाच केले आणि काही क्षणातच त्यांची भूमिका बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांनी उचलून धरली. दुसर्‍याच दिवशी द्रमुकचे विद्यमान कारभारी एम के स्टालीन यांनी त्याला दुजोरा देऊन टाकला. ती भूमिका अशी, की प्रादेशिक व लहान पक्षांनी आता मोदी विरोधात बिगरभाजपा बिगरकॉग्रेस तिसरी आघाडी उभी करावी. परस्पर या पक्षांनी घेतलेला पवित्रा म्हणजे राहुल नको असाच आहे. त्यामुळे मागल्या चार वर्षात सोनियांनी प्रयत्नपुर्वक संपादन केलेले नेतृत्व हातून निसटण्याची वेळ आली आहे. पण हे उघड बोलणार कुठे? आणि बोलणार कोण? पण सत्य इतकेच आहे, की नव्या कॉग्रेस अध्यक्षांनी सुत्रे हाती घेताच तीन महिन्यात ‘मम्मी मुझे बचाव’ असा टाहो फ़ोडलेला आहे.

संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू झाले, तेव्हा कोणीतरी सोनियांना राहुलच्या नेतृत्वाविषयी विचारले होते. तर त्या उत्तरल्या होत्या, आता राहुल माझा बॉस आहे. तेही खरेच असेल तर सोनियांनी पक्षाच्या अध्यक्षपदासोबत युपीएचे अध्यक्षपद का सोडले नव्हते? पक्षाध्यक्ष म्हणूनच त्या युपीएच्या प्रमुख झाल्या होत्या. मग त्या नियमाने युपीएचे नेतृत्वही राहुलकडे देणे भाग होते. पण मातेचा पुत्रावर तितका विश्वास नव्हता. म्हणून तर ते पद आपल्यापाशीच कायम राखले. कधीतरी हा हुकूमाचा पत्ता म्हणून वापरण्याची वेळ येणार, याची त्यांना पुत्रप्रेमापेक्षा अधिक खात्री असावी. आता त्यांनी तोच पत्ता बाहेर काढला आहे. चंद्रशेखर राव आणि ममतांनी वेगळा विचार सुरू करताच, त्याला शह देण्यासाठी सोनिया अकस्मात युपीए प्रमुखाच्या भूमिकेत परतल्या आहेत. त्यांनी पुढल्या आठवड्यात विरोधी पक्षांची बैठक युपीएच्या अध्यक्ष म्हणून बोलावली आहे. त्याचा अर्थ इतकाच, की अजून जे कोणी कॉग्रेसच्या गोटात राहिलेले लहानसहान पक्ष आहेत, त्यांना ममता वा राव यांच्यासोबत जाण्यापासून रोखायचे. खरेतर ही समस्या आज उद्या येणारच होती. कारण कॉग्रेसजनांसाठी राहुल महान नेते असले, तरी बाकीच्या पक्षांना त्यांचासोबत आत्महत्या करण्यात काहीही रस नाही. सहाजिकच राहुलच्या भरकटलेपणामागे ते पक्ष वा नेते जाण्याची अजिबात शक्यता नव्हती. तशा शंकाही पुर्वी व्यक्त केल्या गेलेल्या आहेत. पण गुजरात विधानसभेच्या निकालात कॉग्रेसला जीवदान मिळाले आणि त्याचे श्रेय प्रथेप्रमाणे राहुलना मिळताच, बाकीच्या पक्षांना कॉग्रेसची साथ सोडणे अशक्य झाले. राहुलवर ठपका ठेवणेही अशक्य होते. त्यामुळे मध्यंतरी दोन महिने निघून गेले. पण इशान्येचे निकाल आले. डाव्यांसह कॉग्रेसचा धुव्वा उडवून भाजपा जिंकला आणि अन्य पक्षांचा धीर सुटला. राहुल नको असे थेट सांगण्यापेक्षा त्यांनी बिगरकॉग्रेस असा पवित्रा घेतला.

तीन महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका चालल्या होत्या आणि त्यांचे निकाल यायचे होते. अशावेळी कॉग्रेसचा अध्यक्ष जाहिरपणे आपण आजीला भेटायला परदेशी जात असल्याचे सांगून निघून जातो, हे कुठल्याही अर्थाने राजकारणात बसणारे नाही. त्यात पुन्हा पक्षाचा धुव्वा उडाल्यावरही हा नेता हजर होत नसेल, तर मोदी विरोधासाठी अन्य पक्षांनी किती आत्मघात करून घ्यायचा? ज्याला स्वत:च्या पक्षाचे भवितव्य घडवता येत नाही, तो इतरांचे काय भले करणार? ही शंका अन्य पक्षांच्या मनात आधीपासून होती. पण ताज्या घटनाक्रमाने त्याला नवी चालना दिली. प्रामुख्याने राहुलच्या परदेशी जाण्याने व छछोर बडबडण्याने राजकारणाचे गांभिर्य संपून गेले आहे. यात आपली आहुती टाकण्यापेक्षा अन्य पक्ष वेगळा विचार करणारच. पण तो सुरू झाल्यावर सोनियांना जाग आली आहे. त्यांनी धावपळ करून बचावकार्य हाती घेतले आहे. त्यासंबंधी खुले मतप्रदर्शन वा वक्तव्य करणयापेक्षा त्यांनी युपीएच्या नावाखाली विरोधी पक्षांची बैठक बोलावून, आपण अजूनही कॉग्रेसच्या प्रमुख नेत्या किंवा बॉस असल्याचे संकेत देऊन टाकले आहेत. पण त्याचा दुसरा अर्थ असा, की चिरंजीवांचाही धीर सुटला असून राव व ममतांना रोखण्यासाठी राहुलनी मातोश्रींचा धावा केलेला असणार. त्यातून मग युपीएच्या नावाने बैठक बोलावण्याची शक्कल निघालेली आहे. मात्र त्यात हजर होणारे जे कोणी मुठभर विविध पक्षाचे नेते असतील, त्यांच्या गळ्यात राहुलना मारणे, आईला शक्य होईल असे दिसत नाही. कारण आता वेगळ्या विचारांना चालना मिळाली असून, त्याचे सुत्र बिगरभाजपा असे मर्यादित राहिलेले नाही. तर बिगरकॉग्रेस असाही शिक्का त्याच्यावर मारला गेलेला आहे. त्याला राहुल गांधींची कमाई म्हणता येईल. आईने जुळवून आणलेल्या राजकीय खेळाचा पोराने पुरता विचका करून टाकला आहे. आई तो कसा निस्तरते, हे बघावे लागेल.

युपीएच्या काळातील अनेक आर्थिक घोटाळे पुराव्यासह बाहेर येत असताना व तात्कालीन अर्थमंत्रीच गोत्यात सापडले असताना पक्षाध्यक्ष संदर्भहीन बडबड करत आहेत. तेवढेच नाही. तर इतका पेचप्रसंग असतानाही राहुल ऐनवेळी दोनतीन दिवसांसाठी पुन्हा परदेश वारीला निघालेले आहेत. संकटप्रसंगी जो नेता स्वपक्षाच्या मदतीला थांबू शकत नाही, त्याच्यावर इतर कुठला पक्ष वा नेता कितपत विश्वास ठेवू शकणार आहे? शिवाय नेता हा पक्षाला वा गटाला विजय मिळवून देणारा असावा लागतो. तिथे राहुल यांच्या खात्यात शून्य जमा आहे. त्यांच्या हाती पक्षाची व प्रचाराची सुत्रे आल्यापासून किमान डझनभर राज्यात पक्षाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. गुजरातची मोहिम यशस्वी झाली तरी हातातोंडाशी असलेले यश गमावण्यापेक्षा राहूल यांची मजल जाऊ शकली नाही. इशान्येकडे तर प्रचाराला राहुल फ़ारसे फ़िरकलेही नाहीत. अशा नेत्यावर केंद्रातील सत्ताबदलासाठी इतरांनी किती विसंबून रहावे, हा प्रश्न आहे. त्याच्याच उत्तराच्या शोधात सगळे पक्ष चाचपडत असून त्यामुळेच चंद्रशेखर राव यांना पुढाकार घ्यावा लागला आहे. मायावती व अखिलेश यांनीही उत्तरप्रदेशात आपली स्वतंत्र जमवाजमव आरंभलेली आहे. उरलेसुरले ममता, डावे किंवा द्रमुक वगैरे दुरावले, तर कॉग्रेसला स्वबळावर आगामी लोकसभेत निम्मे जागाही लढवणे शक्य उरणार नाही. हे राहुलना उमजत नसले तरी सोनियांना कळते आहे. म्हणूनच त्यांनी अकस्मात युपीएच्या नावाने विरोधकांची बैठक बोलावली आहे. किंबहूना राहुल आपला बॉस नसून आजही कॉग्रेसी राजकारणाची सुत्रे आपल्याच हातात असल्याचा सिग्नलच दिला आहे. पण त्याचा अर्थच गडबडल्या पोराने घाबरून मम्मी बचावचा नारा दिला असल्याची शंका घेतली जाणे स्वाभाविक आहे. मात्र इतर विरोधक आता सोनियांना तरी किती प्रतिसाद देतात, ते बघावे लागेल. कारण पोरकटपणाचा खुप अतिरेक झाला आहे.

3 comments:

  1. एकदम सुसंगत तर्क आहे. पण यामुळे काही फायदा होईल असे वाटत नाही. काँग्रेस नावाचे गारुड संपत आहे असेच राव आणि ममतांच्या वागण्यावरून वाटत आहे. तूर्तास पुढील खेळी पाहत राहू.

    ReplyDelete
  2. UP मध्ये सप बसप ने आघाडी केली त्यात पन काॅंगरेस ला घेतलेले नाही.आणि एक इतके दिवस राजवाड्यात बसलेल्या सोनिया आता मुलाखती देतायत.

    ReplyDelete
  3. जाणत्या (?) राजाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाजपाला रोखायचे तर कॉंग्रेसच खरा पर्याय आहे असे भाकीत केले होते. असे जर असेल तर हा तिसऱ्या आघाडीचा पर्याय काय दिवे लावणार आहे कोण जाणे?

    ReplyDelete