किसान सभा ही कम्युनिस्ट पक्षाची खुप जुनी संघटना आहे. स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट पक्षाला आजची लोकशाही मान्य नव्हती. किंबहूना त्यांना ब्रिटिशांकडून मिळालेले स्वातंत्र्यही मान्य नव्हते. स्वातंत्र्य चळवळ झाली व ब्रिटिश राज्यकर्ते निघून गेले. त्यानंतर आलेल्या एतद्देशीय राज्यकर्त्यांच्या सरकारला कम्युनिस्ट भांडवलशाही सत्ता म्हणायचे. सहाजिकच ती सत्ता उलथून पाडणे हे त्यांचे राजकीय उद्दीष्ट होते. मात्र त्यातही अनेक मतभेद होते. जे काही लोक इतके कट्टर ग्रंथप्रामाण्यवादी नव्हते, त्यांनी लोकशाही पत्करली होती आणि निवडणूकांनाही सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. तर काही कडव्या कम्युनिस्टांनी सशस्त्र उठाव करून शेती व अन्य उत्पादन साधनांवर सामाजिक मालकी सिद्ध करण्यासाठी रक्तपातही सुरू केला होता. तो नव्या सत्तेने निष्ठूरपणे मोडून काढला. पण त्यातून शेतकरी वर्गात काम करण्याची नवी प्रेरणा कम्युनिस्टांना मिळाली. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने आदिवासी वा ग्रामीण भागात आपले तत्वज्ञान रुजवून क्रांतीकडे वाटचाल करण्याचे ध्येय घेऊन अनेकजण कामाला लागले. तेव्हापासूनची ही किसान सभा आहे. आज ती विस्मृतीच्या गाळात सापडली होती. याच संघटनेने कम्युनिस्ट चळवळ व पक्षाला अनेक दिग्गज दिलेले होते. आज त्याचे स्मरण त्यांच्याच वारसांना राहिलेले नाही. आदिवासी जागृती करण्यासाठी त्यांच्यात जाऊन राहिलेल्या व संघटना उभारणार्या गोदूताई परुळेकर आजच्या पिढीला ठाऊकही नाहीत. पण १९७० च्या दशकात त्यांच्या अनुभवावर आधारीत ‘माणूस जेव्हा जागा होतो’ पुस्तकाने शहरी अभिजन वर्गाची झोप उडवून दिली होती. नुकताच आठवड्यात नाशिक ते मुंबई शेतकर्यांचा मोर्चा आणला गेला, त्याने अशा सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या फ़क्त नेत्यांपुरत्या नाहीत, तर समाज ढवळून काढणार्या आंदोलनाच्या स्मृती आहेत.
आज जो मोर्चा किसान सभेने योजला आहे, त्याचे स्वरूप बघितल्यावर अनेक लहानमोठ्या पक्षांनी व राजकीय संघटनांनी त्याला आपापल्या परीने पाठींबा दिला आहे. गंमतीशीर गोष्ट म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही त्याला पाठींबा दिला आहे आणि सत्तेतला दुसरा भागिदार भाजपानेही या मोर्चाच्या विरोधात अवाक्षर उच्चारलेले नाही. दुसरी बाजू अशी, की स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्या विविध पक्षांच्या बोलघेवड्या विस्कळीत आघाडीने पुढाकार घेऊन हा मोर्चा काढलेला नाही, किंवा त्यासाठी आरंभापासून कुठलाही प्रयत्नही केला नाही. पण मोर्चा निघाला आणि पायपीट करीत मुंबईला येऊन पोहोचला. खेड्यापाड्यातून पंढरीच्या वारीला जाणार्या दिंड्या उत्स्फ़ुर्त असतात, तसाच काहीसा हा प्रकार आहे आणि त्यात फ़क्त कम्युनिस्ट पक्षाच्या ग्रामीण नेतृत्वाने पुढाकार घेतला होता. त्यात नुसत्या शेतकरी विषयक मागण्या नाहीत, तर तळागाळातल्या विविध समाजघटक व ग्रामीण जनतेला भेडसावणार्या समस्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. कुठलीही मागणी सरसकट नसून कुठलीही मागणी तात्काळ सोडवावी किंवा पुर्ण करावी, असाही आग्रह दिसत नाही. ही लक्षणिय बाब आहे. ग्रामिण जनतेमधला सुप्त रोष जागवण्याचे अभियान म्हणून त्या मोर्च्याकडे बघता येईल. म्हणूनच पुरोगामीत्व मिरवून नेहमी माध्यमात झळकणार्यांनाही तो एक धडा आहे. अर्थात असे मिरवणारे आता त्या मोर्चाला चार शहाणे शब्द शिकवायला त्या व्यासपीठावर येतील वा आलेही असतील. पण तो मोर्चा त्यापैकी कुणाच्याही बौद्धीक हस्तक्षेपामुळे निघालेला नाही वा त्यातून या मोर्चाने प्रेरणा घेतलेली नाही. तर आपल्या उपजत इच्छाशक्तीच्या बळावर आणि उत्स्फ़ुर्त जाणिवेवर तो मोर्चा निघालेला आहे. ज्या खुप आधीच्या पिढीने कम्युनिस्ट आंदोलनाचे व चळवळीच्या सामर्थ्याचे बीज पुर्वी पेरलेले आहे, त्याला फ़ुटलेला हा नवा अंकूर आहे.
या मोर्चातले अनेकजण अनवाणी पायाने चालणारे आहेत, तर अनेक घरातल्या महिलाच त्यात सहभागी झालेल्या आहेत. त्यांना झेंडे व टोप्या कोणी पुरवल्या वा वाटेमध्ये खाण्यापिण्याची सोय कोणी केलेली नाही. जिथे मुक्काम पडेल तिथे आपलेच चार घास शिजवून पोटाची आग विझवत हा मोर्चा वेदनेची मशाल तेजस्वी करीत मुंबईला धडकला आहे. मागल्या कित्येक दशकात असा मोर्चा बघायला मिळालेला नाही. अर्थात गर्दी, सहभागी झालेल्यांची संख्या हा या मोर्चाचा निकष नाही, तर उत्स्फ़ुर्तता ही त्याची मोजपट्टी आहे. सहा दशकांपुर्वी शेकाप, कमुनिस्ट व रिपब्लिकन अशा आघाडीने भूहिन व अल्पभूधारक यांच्या विविध मागण्या घेऊन केलेले आंदोलन आजच्या पिढीला ऐकूनही माहित नसेल. दादासाहेब गायकवाडांच्या रिपब्लीकन नेतृत्वाखाली झालेले ते मोठे आंदोलन होते. पुढे १९७० च्या दशकात दुष्काळामुळे ग्रामीण भागात लक्षावधी लोकांना परागंदा व्हायची वेळ आली, तेव्हाही असेच आंदोलन मोर्चा पुरोगामी पक्षांनी काढलेला होता. मुंबईत तेव्हा विराट बैलगाडी मोर्चाही आणलेला होता. अशा मोर्चा वा आंदोलनाने सरकार पाडण्याची कुठलीही स्वप्ने तेव्हा बघितली गेली नव्हती. तसले डावपेचही खेळले जात नव्हते. आजच्याही मोर्चात कोणाला सरकार कोसळून पडेल वा नतमस्तक होईल, अशी अपेक्षा दिसत नाही. पण अशा शक्तीप्रदर्शनाने सत्ता प्रशासनाला खर्याखुर्या समस्यांची जाणिव होईल, जाग येईल ही अपेक्षा जरूर असते. तेव्हाही तेच होते आणि त्याची प्रचिती आजच्या मोर्चात येत आहे. म्हणून त्या मोर्चाने जुन्या उत्साहवर्धक आठवणी जागवल्या. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदल घडवण्याचा जमाना अलिकडल्या काळात संपुन गेला होता, त्याची सुरूवात पुन्हा या मोर्चापासून होऊ शकली, तर पुरोगामी विचाराला नव्याने धुमारे फ़ुटू लागतील, अशी आशा नक्कीच बाळ्गता येईल. फ़क्त या मोर्चाचा ‘नवा एल्गार’ होऊ नये हीच अपेक्षा!
कम्युनिस्ट वा समाजवादी विचारांच्या संघटना वा राजकीय पक्ष हे कधीच सत्तेच्या मागे धावणारे नव्हते आणि त्या कालखंडात आघाड्य़ांच्या माध्यमातून अशा लोकांकडे सतेचा हिस्सा आला, तरी त्यांच्या वागण्या बोलण्यातून कधीच सत्तेचा दर्प आलेला नव्हता. राजकारणातील साधनशूचिता म्हणजे पुरोगामी चळवळ, अशी एक सार्वजनिक धारणा होती. जसजशी ती धारणा संपत गेली वा तसा अनुभव येईनासा झाला, तिथून पुरोगामी चळवळ व विचारांना ओहोटी लागत गेली. सत्तेशिवाय एसेम जोशी, कॉम्रेड डांगे, दादासाहेब गायकवाड, कृष्णराव धुळूप वा उद्धवराव पाटील अशा दिग्गजांकडे जी नैतिक शक्ती होती, तिला प्रचंड बहूमत पाठीशी असतानाही यशवंतराव, वसंतराव असे दांडागे मुख्यमंत्रीही वचकून होते. ती स्थिती आज पुर्ण विस्मृतीत गेलेली आहे. त्या नेत्यांपाशी कुठले सत्तापद वा घटनात्मक पद नव्हते. पण असे अधिकार वा सत्तापदे भोगणारे, त्या ॠषीतुल्य पुरोगाम्यांच्या धाकात असायचे. त्यांची तपस्या अशा उत्स्फ़ुर्त मोर्चे आंदोलनातून आलेली होती. त्या शक्तीची प्रतिके म्हणून सत्तापद त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे. त्यांच्याकडून अभय मागायचे. आज तसे मोर्चे राहिले नाहीत की स्वबळावर उठाव करणारी जनशक्ती पुरोगामी विचाराच्या मागे उरली नाही. कारण नंतरच्या पिढ्यांनी ती तपस्या वा त्यातून आत्मसात झालेल्या पुण्याईचा पुरता जुगार करून टाकला. अनेक नावाजलेले किंवा ‘नाव कमावलेले’ पुरोगामी नेते जाणते आज बघायला मिळतात. पण त्यांच्यापाशी ती पुण्याई शिल्लक राहिलेली नाही की तिचा वारसाही टिकलेला नाही. कारण त्यांनीच आपले व्यक्तीगत स्तोम माजवताना पुरोगामी चळवळ व विचारांचा बळी देऊन टाकला. या नाशिक मुंबई मोर्चाने ती तपस्या पुन्हा सुरू केल्यासारखे वाटले. त्यातून नवे तपस्वी एसेम, डांगे किंवा धुळूप उद्धवराव उदयास येतील, अशी अपेक्षा म्हणूनच आहे. काळच त्याचे उत्तर देईल.
Bhau
ReplyDeletetumhi kahihi mhana pan ha sagla paishacha khel aahe. Oppostion kade prachand paisa aahe aaj paryant khallela aani toch asha vagveglya morchyanchya rupane udhalala jatoy.
Kejriwal jase mob jamwat hota tyache ganit nantar ughad zale ki ti gardi bhadotri hoti. Tasech ha kay kinwa ajun konta morcha ha tyapeksha vegla nahi.
Usfurtapane yethe kahihi hot nahi. its all managed orchestra.