Friday, May 25, 2018

टाकावूतला टिकावू



मोदी सत्तेत येऊन आज चार वर्षे पुर्ण होत आहेत आणि त्याचा सोहळा साजरा करायला भाजपा उत्साहात असला तर नवल नाही. कारण जनसंघाच्या स्थापनेपासून आपल्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रस्थापित करायला धडपडालेल्या हयात वा दिवंगत लाखो कार्यकर्त्यांचे ते स्वप्न होते. मोदींनी ते चार वर्षापुर्वी पुर्ण केले. म्हणूनच त्या निकालानंतर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात आलेल्या मोदींनी जे पहिले भाषण केले, त्यात विजयाचे श्रेय अशा चार पिढ्यातील कार्यकर्त्यांना दिले होते. पण त्यांचे तेच शब्द आज कितीजणांच्या स्मरणात आहेत? बाकीच्यांचे सोडाच, खुद्द भाजपाच्याही अनेक नेत्यांना आपल्या पुर्वजांनी केलेल्या श्रमाचे कौतुक नाही. मग अन्य विरोधकांकडून मोदींच्या त्या भावनेची कदर होणे वा स्मरण होणे कसे शक्य आहे? चार वर्षाच्या मोदी सरकारचे प्रगतीपुस्तक तपासण्याची स्पर्धा सध्या बहुतेक माध्यमातून चालू आहे. त्याच्याही पुढे जाऊन पुढल्या वर्षी होणार्‍या लोकसभेत मोदींचा टिकाव कितपत लागेल, त्याचेही अंदाज बांधण्याचा खेळ आतापासून सुरू झाला आहे. त्यात मग भाजपा बहूमत टिकवेल काय किंवा विरोधकांची एकजुट मोदींना संपवून टाकेल काय, याचाही उहापोह सुरू झालेला आहे. पण मागल्या वेळी, चार वर्षापुर्वी मोदी मुळात जिंकलेच कशाला, त्याची प्रामाणिक मिमांसा मात्र अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे एकूणच अशा भाकितांचा खेळ हास्यास्पद होत गेल्यास नवल नाही. कालपरवा एकदोन वाहिन्यांनी आपापले मतचाचणीचे आकडे जाहिर करून टाकलेले आहेत. त्यात तथ्य असते, तर चार वर्षापुर्वी आजच्या दिवशी मोदींचा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथविधीच होऊ शकला नसता. म्हणूनच अशा चाचणीकर्त्यांनी आपले आजचे आकडे उत्साहात मांडण्यापेक्षा, चार वर्षापुर्वी आपले अंदाज कशाला पुरते कोसळले, त्याचा अभ्यास करणे शहाणपंणाचे ठरेल.

मतचाचण्यात थोडा घोळ होऊ शकतो, पण एक्झीट पोल फ़ारसे चुकत नसतात. मात्र २०१४ साली एखादा अपवाद सोडला तर कोणालाही एनडीएला बहूमत मिळण्याचा अंदाज वर्तवता आला नव्हता. पण मोदी तर थेट एकपक्षीय बहूमत मिळवून गेले होते. २७५ सोडाच, त्यांनी एनडीएला ३४० पर्यंत नेवून ठेवलेले होते. सहाजिकच आपले अंदाज व अभ्यास कुठे चुकला, त्याचा अभ्यासकांनी अंदाज घ्यायला पाहिजे. विरोधक हात उंचावून उभे राहिले वा पेट्रोलच्या किंमती किती भडकल्या, या आधारावर मतचाचण्यांची भाकिते मांडली जाऊ शकत नाहीत. लोकशाहीत बहुमताच्या आकड्याला महत्व असते आणि तत्वज्ञानाला काडीची किंमत नसते. सहाजिकच कोणत्याही विचारसरणीचे तुम्ही समर्थक असलात, म्हणून सामान्य माणसाला राजकीय अस्थिरता नको असते. कुठले सरकार येणार आणि ते आपल्या आयुष्यावर कोणते परिणाम घडवणार, याला सामान्य लोक महत्व देत असतात. तसे नसते तर तत्वज्ञान ऐकून अनेक महिलांनी आपल्या व्यसनी नवर्‍यांना लाथा मारून हाकलून लावले असते व मुजोर मालकाला धुळ चारून कष्टकर्‍यांनी या देशात कधीच क्रांती घडवून आणली असती. सामान्य लोक कोणता पर्याय व्यावहारी आहे, त्याकडे अगत्याने बघतात. कुठल्याही विहीरीतले वा नळाचे पाणी शुद्ध असतेच असे नाही. त्यापेक्षा बाटलीबंद पाणी नक्कीच शुद्ध मानता येते. हे सत्य दुष्काळात व त्सुनामीत फ़सलेल्यांनाही ठाऊक असते. पण ते बाटलीबंद पाणी त्याच्या खिशाला परवडणारे व उपलब्ध असावे लागते. नसेल तर त्याच्या प्रतिक्षेत घशाला कोरड पडून तो मरणाच्या जबड्यात स्वत:ला झोकून देत नाही. भारतीय मतदाराला उत्तम पर्यायातून निवड करण्याची श्रीमंती अजून मिळालेली नाही. त्यामुळे त्याला दोनतीन टाकावूतून उपयुक्त कोणती सुविधा आहे, त्यानुसार निवड करावी लागते आणि त्याच आधारावर चार वर्षापुर्वी निवडणूक निकाल लागलेला आहे.

मतचाचण्या होतात, तेव्हा लोकांना विविध पर्याय प्रश्नरूपाने सांगितले जातात आणि त्यातून लोक आपली निवड प्रश्नकर्त्याला सांगतात. पण जेव्हा प्रत्यक्ष निवड करायची वेळ येते, तेव्हा प्रश्नकर्त्याने मांडलेले पर्याय उपलब्ध असतातच असे नाही. म्हणजे असे, की आज हात उंचावून एकत्र आलेले राजकीय पक्ष एकास एक उमेदवार उभे करणार हे गृहीत आहे आणि त्यानुसार मतचाचण्यात प्रश्न सादर केलेले असतात. तशी उत्तरे दिलेली असतात. उदाहरणार्थ दिल्लीला गेल्यास कुतूबमिनार बघणार का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी मिळत असते. पण मुळातच सहल हैद्राबादला गेली, तर कुतूबमिनारच्या ऐवजी चारमिनार बघणे भाग असते. त्याचे उत्तर सहलीचे गाव निश्चीत झाल्याशिवाय देता येत नसते. जी राजकीय परिस्थिती २०१९ मध्ये निर्माण झालेली असेल, त्यानुसारच निर्णायक कलाटणी देणारा मतदार आपले मतदान करीत असतो. प्रामुख्याने आपली मते नेहमी स्थितीनुसार बदलणारा मतदार खराखुरा निवाडा देणारा पंच असतो. त्याची मते आतापासून निश्चीत करता येत नाहीत. म्हणूनच अनेक मतचाचण्या फ़सत जातात. चार वर्षापुर्वी मोदी हा लोकांना उपलब्ध असलेल्या टाकावूपैकी उपयुक्त पर्याय वाटलेला होता आणि तेव्हाही आजचे बहुतांश जाणकार त्याच्या नावाने नाके मुरडत होते. पण लोकांनी तोच पर्याय निवडला. तर त्याला आज उत्तम पर्याय निरूपयोगी ठरला, असे निष्कर्ष काढून लोकांची निवड बदलता येत नसते. अच्छे दिन कुठे आहेत, असा प्रश्न करून मोदींना नाकर्ते ठरवणार्‍यांना त्याचेच भान रहात नाही. मनमोहन सोनियांची जोडी इतकी भयानक होती, त्यावर पर्याय म्हणून लोकांनी मोदींना मते दिली. ते उत्तम सर्वगुणसंपन्न म्हणून मोदींना पंतप्रधानपदी बसवलेले नव्हते. सहाजिकच मोदींना पाडायचे तर त्यापेक्षा सोनिया राहूल हे दोघे मोदींपेक्षा चांगले म्हणायची वेळ तर आणली गेली पाहिजे?

मागल्या चार वर्षात मोदी सरकारच्या कामगिरीची झाडाझडती घेताना हाच मोठा निकष आहे. चार वर्षापुर्वी सोनिया व मनमोहन यांच्या तुलनेत अशा चाचण्यातून मोदी यांची जी लोकप्रियता दिसून येत होती, त्यात आज किती घट झाली आहे, हा निकष जरूर आहे. तेव्हा सुत्रे हाती असूनही मनमोहन व सोनियांची लोकप्रियता किती होती? तेव्हाही मोदी उमेदवार असून अधिक लोकप्रिय होते आणि आज चार वर्षे कारभार हाकल्यावरही तेच अधिक आघाडीवर आहेत. त्यातून एकच निष्कर्ष काढता येतो. मोदींच्या कारभाराविषयी लोक भलतेच खुश नाहीत. पण त्यांना हटवावे इतकेही नाराज नाहीत. कालपरवा कर्नाटकातले मतदान झाले आणि मोदी तिथे मुख्यमंत्री म्हणून येणार नसल्याचे ठाऊक असूनही लोकांनी अधिक जागा भाजपाला दिल्या, त्याला लोकप्रियता म्हणतात. पण राहुल सोनियांनी प्रचार करूनही कॉग्रेसला आपल्या जुन्या मतात वा लोकप्रियतेत होणारी घट टाळता आलेली नाही. जो मतदार मोदींसाठी व त्यांच्या शब्दावर पक्षाला अधिकची मते आजही देतो, तोच मतदार खुद्द मोदींच्या हाती राजसत्ता सोपवायची, तर कसा कौल देईल? चार वर्षात अनेक विधानसभा भाजपाने जिंकल्या, तो मोदींच्या शब्दावर मतदाराने व्यक्त केलेला विश्वास आहे. मग ज्याच्या शब्दाखातर मुख्यमंत्री स्विकारले जातात, त्यालाच निवडताना मतदाराचा कौल कसा असू शकतो? अर्थातच मोदीद्वेषाने भारावलेत त्यांना पटणारे हे तर्कशास्त्र नाही. त्यांना मोदींच्या पराभवाचे डोहाळे लागलेले आहेत आणि अन्य काहीही समजून घेण्याची मनस्थिती त्यांच्यापाशी नाही. सहाजिकच अशा चाचण्या व निष्कर्ष त्यांना आवडतात. म्हणून त्यांना गुजरातच्या पराभवात नैतिक विजय शोधता येतो आणि कर्नाटकात पुरोगामी मतांची बेरीजही दिसू शकते. चार वर्षानंतरही मोदींनी लोकप्रियता टिकवून धरल्याचे सत्य, त्यांना पचण्याचे काही कारण नाही. चाचणीचा इतकाच अर्थ आहे.

2 comments:

  1. लोकनीतीcsds नावाच्या संस्थेचातो पोल आहे त्यांचे सर्व पोल मागच्या लोकसभेपासुनच चुकलेत आता कर्नाटकचा तरexitpoll पन चुकलाय त्यांचा चॅनल दाखवतात कारन पुरोगामी वगैरे लोक आहेत त्यात म्हनुन पन त्यांनाच विश्वासाहरता नसेल तर पोलना कशी असेल?

    ReplyDelete
  2. होय भाऊ, मोदींच्या नावानेच तर महाराष्ट्रातील सुशिक्षित वर्गाने वेगळा विदर्भ हवा असे म्हणणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून स्वीकारला .बाळासाहेब देवरस यांचे प्रिय गंगाधरराव यांना सन्मान मिळाला .त्यांच्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गजांचा बळी दिला गेला हेही उघड आहे .महाराष्ट्रात सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या लोकनेते गोपीनाथरावांचा फोटोही भाजपच्या मंचावर नसावा यातच सर्व काही आले .

    ReplyDelete