सगळीकडे कर्नाटकाची चर्चा चालू असताना महाराष्ट्रात दोन व उत्तरप्रदेशात एका लोकसभेच्या जागेसाठी लौकरच मतदान व्हायचे आहे. गोरखपूर व फ़ुलपूर गमावणार्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी म्हणूनच ती एक जागा अग्निपरिक्षा ठरणार आहे. मागल्या वर्षभरात बहुतांश पोटनिवडणूका भाजपाने गमावल्या आहेत. त्याचा परिणाम असा झाला, की गुजरात, हिमाचल व त्रिपुरा ही राज्ये जिंकूनही भाजपाच्या विजयी घोडदौडीला गालबोट लागलेले आहे. प्रामुख्याने या बहुतांश जागा भाजपाने सार्वत्रिक निवडणूकीत जिंकलेल्या होत्या. म्हणूनच तिथला इवलासा पराभवही मोठा मानला गेला. फ़ुलपूर व गोरखपूर तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी रिकाम्या केलेल्या जागा होत्या. सहाजिकच तिथला पराभव मोठा मानला गेला. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील नव्या तीन लोकसभा पोटनिवडणूका, भाजपाच्या प्रतिष्ठेला हात घालणार्या आहेत. जितके कर्नाटकला महत्व आहे तितकेच याही मतदानाला म्हणूनच महत्व आहे. महाराष्ट्रापेक्षाही उत्तरप्रदेशातील खैराना जागेला महत्व द्यायला ह्वे. कारण मागल्या लोकसभेपुर्वी जे वाद निर्माण झालेले होते, त्यावर मात करून हुकूमसिंग यांनी दोन लाखाच्या फ़रकाने ही जागा जिंकलेली होती. त्यामुळेच तिथला आपला किल्ला राखणे, भाजपा व योगीसाठी निर्णायक महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा लोकसभा जिंकायची असेल तर उत्तरप्रदेश हे निर्णायक महत्वाचे राज्य आहे. योगींना म्हणून तिथे आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. याचे मुख्य कारण गोरखपूर व फ़ुलपूर जिंकल्यावर सपा-बसपा एकत्र येण्याची प्रक्रीया सुरू झाली असून त्यात आता अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलानेही उडी घेतली आहे. या जागेसाठी अखिलेश व अजितसिंग यांच्या प्रतिनिधींची बोलणी झाल्याचीही बातमी आहे. कर्नाटकात प्रचाराला गेलेल्या योगींनी त्यापेक्षा उत्तरप्रदेश संभाळणे अगत्याचे ठरावे.
२०१९ साठी विरोधकांच्या एकजुटीचा विचार आधीच सुरू झाला आहे आणि त्यात मतविभागणी टाळून मोदींना रोखण्याची योग्य रणनिती विविध पक्षांनी हाताळली आहे. फ़ुलपूर गोरखपूर येथे आधी बाजूला राहिलेल्या मायावतींनी अखेरच्या क्षणी समाजवादी उमेदवारांना पाठींबा देऊन, भाजपाला गाफ़ील ठेवलेले होते. हे दोन प्रादेशिक पक्ष एकमेकांचे कट्टर वैरी मानले जातात, ह्यावर विसंबून राहिलेल्या भाजपाला म्हणूनच मोठा दणका बसला. आताही खैरानामध्ये त्याचीच पुनरावृती करण्याचा या पक्षांचा मानस आहे. त्यात गैर काहीच नाही. पण त्याविषयी मायावती गप्प असून अजितसिंग अखिलेश यांच्यात बोलणी झाली आहेत. मायावतींच्या पक्ष सहसा पोटनिवडणूक लढवित नसल्याने त्यांची कुठलीही हालचाल झालेली नाही. पण म्हणून त्या मतदानातही निष्क्रीय रहातील असे कोणी म्हणू शकत नाही. शेवटच्या दोन दिवसात त्यांना समाजवादी वा अन्य कुठल्या उमेदवाराला पाठींबा देण्याची मुभा मिळत असते. सहाजिकच बाकीचे सर्व पक्ष आपल्या विरोधात एकवटणार, हे गृहीत धरून भाजपाला आपली रणनिती बनवावी लागणार आहे. गेल्या लोकसभा मतदानात इथे भाजपाचे हुकूमसिंग यांनी बाजी मारली होती आणि दोन लाखापेक्षा अधिक फ़रकाने विजयश्री खेचुन आणली होती. तेव्हाचे आकडे बोलके व स्पष्ट आहेत. नुसता दोन लाखाचा फ़रक नव्हता, तर भाजपा वगळून बाकी सर्व पक्षांच्या मतांची बेरीजही हुकूमसिंग यांनी पार केलेली होती. म्हणजेच मतविभागणीमुळे तिथे भाजपाला जागा जिंकता आली, असा दावा करण्यात अर्थ नाही. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की विरोधकांची एकजुट झाली म्हणून आपला पराभव झाला, असाही खुलासा पराभवानंतर भाजपाला करण्याची सोय उरणार नाही. कारण निम्मेहून अधिक मतांनी चार वर्षापुर्वी जागा जिंकलेली आहे. मतांच्या बेरजेचा सिद्धांत इथे लागू होत नाही.
२०१४ पासून भाजपाची निवडणूका जिंकण्याची रणनिती सोपी आणि स्पष्ट राहिलेली आहे. प्रत्येक जागी शक्य तितके अधिक मतदान घडवून आणणे व नव्या तरूण मतदारांना आपल्या बाजूने ओढण्यातून भाजपाने बाजी मारलेली आहे. पोटनिवडणूकात भाजप तिथेच कमी पडताना दिसतो आहे. सहा महिन्यांपुर्वी गुजरात विधानसभा सहाव्यांदा जिंकताना भाजपाला त्याच रणनितीने वाचवलेले होते. दिर्घकाळ सत्तेत राहिलेल्या पक्षाच्या विरोधात बारीकसारीक कारणाने लोकमत आकार घेत असते. काही प्रमाणात त्याचा हक्काचा मतदारही पाठ फ़िरवित असतो. अशावेळी जी त्रुटी निर्माण होते, ती भरून काढण्यासाठी नवा मतदार भरीस आणावा लागतो. अधिकचे मतदान त्यावरचा म्हणूनच उपाय असतो. कार्यकर्त्यांच्या मदतीने अधिकाधिक मतदान घडवून आणले, तर त्यातला मोठा हिस्सा आपल्या वाट्याला येऊन विजय सोपा होऊन जातो. हे सार्वत्रिक निवडणूकीत तापलेल्या वातावरणात सहजशक्य असते. पण पोटनिवडणूकीत त्या वातावरणाचा अभाव असतो. कार्यकर्ते व संघटना शिथील पडलेली असते. त्यामुळेच मतदान घटते आणि त्याचा मोठा फ़टका सत्ताधारी पक्षाला बसत असतो. हेच कॉग्रेसचे व्हायचे आणि आता भाजपाचे होताना दिसत आहे. गोरखपूर फ़ुलपूरला त्याचेच परिणाम दिसले. खैरानामध्ये त्याची पुनरावृत्ती व्हायचा धोका नाकारता येत नाही. किंबहूना तेच गृहीत धरून अजितसिंग व अखिलेश यांनी आपली रणनिती आखलेली आहे. मायावतीही त्यासाठीच दबा धरून बसलेल्या आहेत. अशा वेळी खैराना दोन लाखांनी जिंकलेली जागा असल्याच्या भ्रमात भाजपा असेल, तर ते पराभवाला आमंत्रण होऊ शकते. तो नुसता पराभव नसेल तर योगींच्या आसनाला लागलेली घरघर असेल. कारण दोन पराभव पोटात घातलेल्या पंतप्रधानांना आता २०१९ पुर्वी आणखी एक नाचक्की परवडणारी नाही. परिणामी ती योगींची अग्निपरिक्षा आहे.
एका लोकसभा जागेला इतके महत्व का असू शकते? उत्तरप्रदेशात ८० लोकसभा जागा आहेत आणि त्यापैकी ७३ जिंकून भाजपा बहूमतापर्यंत पोहोचला होता, पण भाजपासमोर एकमेव विरोधी पक्ष नाही. सपा व बसपा यांच्याखेरीज कॉग्रेस व रालोद असे दोन आणखी दुबळे पक्ष आहेत. त्यांची एकत्रित शक्ती भाजपापेक्षाही बलवान ठरू शकते. त्यांच्यात एकवाक्यता नाही वा हेवेदावे असण्यावर भाजपाला आता विसंबून रहाता येणार नाही. त्रिपुराच्या दणक्याने विरोधक सावध झाले आहेत, अधिक फ़ुलपूर-गोरखपूर निकालांनी विरोधकांना आशेचा किरण दाखवला आहे. त्यात कॉग्रेसला बाजूला ठेवूनही अनेक राज्यात विरोधकांची एकजुट प्रभावी ठरू शकते, इतका आत्मविश्वास या पक्षांना आला आहे. किंबहूना मायावतींनी दाखवलेला शहाणपणा राहुलनी दाखवला नाही, म्हणून अखिलेशच्या दोन जागांवरील यशाने इतर राज्यातील बिगर कॉग्रेसी नेत्यांना धीर आला आहे. त्यातच त्यांनी आता खैरानाची जागा भाजपाला पराभूत करून जिंकली, तर एकजुटीचे वारे विरोधकात संचारणार, हे वेगळे सांगायला नको. पण त्याची़च दुसरी बाजू अशी की खैराना चांगल्या मताधिक्याने भाजपा पुन्हा जिंकू शकला, तर मतविभागणीचा विरोधकांचा सिद्धांतच कुचकामी ठरवला जाऊ शकतो. त्यात अपयश आले, तर अखिलेश, अजितसिंग व मायावती एकमेकांवर दुगण्या झाडू लागतील. कॉग्रेस आपले गाडे पुढे रेटण्याचा अट्टाहास करू लागेल आणि २०१९ सालासाठी एकजुट होण्याच्या प्रयत्नांना खिळ बसू शकेल. एकट्या खैराना जागी मोठे मताधिक्य मिळवून योगी २०१९ सोपे करून टाकू शकतात. किंवा त्याच जागेच्या पराभवातून २०१९ सालासाठी मोदींचे काम अवघड करून टाकू शकतात. म्हणून दिसायला लोकसभे़ची एकच जागा असली तरी वर्षभरानंतरच्या लोकसभा निवडणूकीसाठी खैरानाची हीच एक जागा, अतिशय मोक्याची निर्णायक लढत आहे.
Bhau,
ReplyDeleteNamskar, Nivdnukiche Rajkaran Shikave Tar Te TumchyaKadun, Kiti Barkaine Abhyas Karayacha Asato He Aaj Samajale.
Dhanyavad...!!!
परफेक्ट
ReplyDelete