Wednesday, May 23, 2018

भारतीय नॉस्ट्राडेमस

सैया जी बहुत ही कमात है के लिए इमेज परिणाम

कधीकाळी म्हणाजे चार वर्षापुर्वी पियुष गोयल हे बहुतेक वाहिन्यांवर भाजपाचे प्रवक्ते म्हणून झळकत होते आणि तात्कालीन युपीए सरकाराचे अर्थंमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांच्या अर्थकारणावर सडकून टिका करायचे. सध्या योगायोग असा, की विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली उपचारार्थ सुट्टीवर गेलेले असून, गोयलच अर्थमंत्री म्हणून काम बघत आहेत. त्याचा अर्थ चिदंबरम यांनी कॉग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी उचलली असा होत नाही. पण अधूनमधून चिदंबरम प्रवक्तेपद संभाळत असतात. आपला विषय नसलेल्या कामात लुडबुडणे, हा त्यांचा जुनाच स्वभाव आहे. २००८ सालात कसाब टोळीने मुंबईवर हल्ला केला, तेव्हा तात्कालीन गृहमंत्री शिवराज पाटिल यांना हाकलून चिदंबरम यांना गृहमंत्री करावे लागलेले होते. पण गृहखात्यापेक्षाही चिदंबरम आर्थिक विषयावरच अधिक बोलायचे. आताही पेट्रोलच्या किंमती खुपच वधारल्याने लोकांमध्ये चलबिचल निर्माण झालेली आहे, तेव्हा चिदंबरम यांनी जादूची कांडी फ़िरवून त्या किमंती २५ रुपयांनी खाली आणल्या जाऊ शकतात असे विधान केलेले आहे. इतकी सहज स्वस्ताई करणे शक्य असेल, तर अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी त्याचा अवलंब कशाला केला नव्हता? त्यांच्या काळात इंधनाच्या किंमती पार कोसळलेल्या होत्या आणि फ़ुकटातच पेट्रोल वगैरे मिळत होते काय? चिदंबरम यांना जे शक्य वाटते आहे, ते मोदी सरकारला का शक्य नाही? आणि चिदंबरम यांना जे शक्य वाटते आहे, तेच त्यांनी त्यांच्या अधिकारात कशाला केलेले नव्हते? की चिदंबरम यांना आमिरखान हा भारतीय नॉस्ट्राडेमस वाटतो? नॉस्ट्राडेमस नावाचा कोणी पाश्चात्य देशातला भविष्यवेत्ता असून, त्याने हजारो वर्षापुर्वी भविष्यात काय घडणार ते लिहून ठेवलेले होते, असे म्हणतात. चिदंबरम यांना आमिरखान त्याचीच भारतीय आवृत्ती वाटते की काय? नसेल तर त्यांनी इतकी गंमतीशीर विधाने केलीच नसती.

पेट्रोल डिझेलच्या किंमती आभाळाला जाऊन भिड्लेल्या आहेत. त्याचे कारण त्यावर केंद्र सरकार ज्या पद्धतीची करवसुली करते, त्यातच दडलेले आहे. पण यातले बहुतांश कर मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर लागू केलेले नाहीत. कॉग्रेसच्या आमदनीत आणि पुढे चिदंबरम अर्थमंत्री असलेल्या युपीएच्या कालखंडातही तीच वसुली चालू होती. तेव्हा लोकांच्या पगार व उत्पन्नाच्या तुलनेत पेट्रोल व डिझेल खुपच स्वस्त होते आणि राजीखुशीने लोक आपल्या खिशातले पैसे काढून सरकारच्या तिजोरीत भरणा करीत होते काय? किंबहूना आज जे २५ रुपये सरकारने घेऊ नयेत असा चिदंबरम यांचा सल्ला आहे, तीच जादूची कांडी त्यांनी त्याच्याच कारकिर्दीत फ़िरवली असती, तर मोदींना लोकसभेत यश मिळाले नसते, की मोदींच्या चुका दाखवण्याचा नसता उद्योग चिदंबरमना करावा लागला नसता. जो हिशोब चिदंबरम सांगत आहेत, ती करवसुली त्यांच्या काळातही अखंड चालू होती आणि त्याचेच प्रतिबिंब तेव्हाच्या अनेक वर्तमानपत्रे व माध्यमातही पडत होते. म्हणून तर आमिरखान याने २०१० सालात निर्माण केलेल्या ‘पिपली लाईव्ह’ नावाच्या चित्रपटात एक गाजलेले गाणे समाविष्ट होऊ शकले. ‘सय्याजी बहूतजी कमात है, दायन महंगाई खाये जात है’ अशा स्वरूपाचे गाणे खुप गाजले होते आणि चित्रपटही खुप चालला होता. मग ते गाणे वा त्यातली वर्णने काय २०१८ मध्ये मोदी सरकारच्या कालखंडात होऊ घातलेल्या इंधन दरवाढीची होती काय? असतील तर आमिरखानला भारताचा नॉस्ट्राडेमसच म्हणायला हवे. कारण त्या चित्रपटातील प्रसंग व घटनाक्रम आज चाललेल्य तक्रारीशी जुळणारा आहे. पण टिकेचा सूर असा आहे, की देशात प्रथमच महागाई असह्य झाली असून, पेट्रोल डिझेलच्या किंमतीही प्रथमच आकाशाला जाऊन भिडलेल्या आहेत. अन्यथा युपीएचा कालखंड म्हणजे स्वस्ताईचा सुकाळच असावा ना?

सोयाबी्न, तुरीच्या किंमती वा शेतकर्‍यांच्या आत्महत्या किंवा बाजारातील महागाई व त्यामुळे सामान्य नागरिकाचे खेडूताचे असह्य झालेले जीवन हे आमिरखानच्या चित्रपटात आलेले वर्णन व घटनाक्रम तात्कालीन असेल, तर चिदंबरम धडधडीत खोटेपणा करीत असावेत. नसेल तर आमिरखान हा आठदहा वर्षे पुढल्या घटनांवर चित्रपट निर्माण करणारा नॉस्ट्राडेमस असला पाहिजे. पण त्या दोन्ही गोष्टी खर्‍या नसून, आज इंधनवाढीचा चाललेला गाजवाजा राजकीय तमाशा आहे. त्यासाठी मोदी सरकारला झोडपून काढायला अजिबात हरकत नाही. पण आज जी स्थिती आहे, त्यापेक्षा आधीच्या कालखंडात फ़ारच सुखवस्तु जीवन होते, असा आभास निर्माण केला जातो, ती निव्वळ बदमाशी आहे. कुठलीही सत्ता कधीच लोकांच्या सर्व अपेक्षा पुर्ण करू शकत नसते आणि सर्वांना समाधानी करणे कोणालाही शक्य नसते. त्यामुळेच काही त्रुटी प्रत्येकाच्या कामात रहात असतात. पण त्यातल्या त्यात कमी त्रासदायक असेल, त्याला लोक निवडत असतात. मोदींची लोकप्रियता त्यापेक्षा अधिक नव्हती वा नाही. कॉग्रेस, युपीए वा पुरोगामी तमाशापेक्षा सुसह्य सरकार, इतकीच मोदी सरकारची महत्ता आहे. हे सरकार अतिशय कल्याणकारी वा निर्भेळ स्वच्छ असल्याचा दावा कोणी करणार नाही आणि केला तरी तो खोटाच असेल. पण नागड्यापेक्षा लंगोटी लावलेला सभ्य म्हणावे, इतकाच फ़रक असतो आणि लोकांना त्यातून पर्यायाची निवड करावी लागत असते. आमिरखानच्या चित्रपटाच्या गीतामध्ये महागाईचे इतके वर्णन आठ वर्षापुर्वी आलेले असेल आणि त्यातही पेट्रोल डिझेलचा उल्लेख आलेला असेल, तर आज आभाळ कोसळून पडल्याचा गदारोळ निव्वळ भंपकपणा आहे. त्यासाठी भाजपाने युपीएच्या काळातील किंमतीचा आलेख दाखवण्याची गरज नाही, की कॉग्रेस व पुरोगाम्यांनी किंमतवाढीसाही गळा काढण्याचे कारण नाही.

राहुल गांधी आ्ज आपल्या पिढीजात पक्षाचा नव्याने जिर्णोद्धार करायला कंबर कसून उभे रहात आहेत आणि अन्य पुरोगामी नेते पक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे ठाकलेले आहेत. पण राहुलच्या आजीने १९८० सालात लोकसभा निवडणूकीही कॉग्रेसचा जिर्णोद्धार केला होता. त्याचे यापैकी एकालाही स्मरण नसावे याचे मोठे नवल वाटते. तेव्हा जनता पक्षाचा बोर्‍या वाजला होता आणि इंदिराजींच्या पाठींब्यावर पंतप्रधान होऊन पराभूत झालेले चरणसिंग सरकार हंगामी म्हणून कार्यरत होते. तेव्हा पुन्हा लोकसभा जिंकण्यासाठी इंदिराजींनी उत्तर भारतात ३८ वर्षापुर्वी दिलेली घोषणा आज त्यांच्या नातवालाही आठवत नाही, की चरणसिंगांच्या वंशजांना देखील स्मरत नाही. ती घोषणा होती, ‘खा गये शक्कर पी गये तेल, चरणसिंग के दोनो बैल.’ चरणसिंगांच्या लोकदल पक्षाचे चिन्ह नांगरधारी बैलजोडी असे होते. सांगायचा मुद्दा इतकाच, की आज ज्यांचे वय तिशीच्या आतले आहे, त्यांचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. पण जे त्यावेळी राजकारणात व पत्रकारितेत होते, अशा सर्वांनाच त्या घोषणेचे स्मरण उरलेले नाही. देशात जणु पहिल्यांदाच इंधनाच्या किंमती भडकल्या अशा आभास उभा केला जात आहे. तेव्हा देशात इंधनाचा खप आजच्या दहा टक्के सुद्धा नव्हता तेव्हाही हीच बोंब होती आणि आज त्याच्या शंभरपटीने वहाने व पन्नास पटीने इंधनाचा खप वाढल्यावरही तेच रडगाणे आहे. सत्ताधारी असोत वा विरोधी असोत. प्रत्येकजण आपल्या परीने लोकांच्या डोळ्यात धुळफ़ेक करण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालत आहे. याचा अर्थ मोदी सरकार फ़ारच कार्यक्षम आहे वा होईल ती दरवाढ निमूट सह्न करावी; असा होत नाही. पण यापुर्वी खुप छानछान परिस्थिती होती आणि भारतवर्षातून सोन्याचा धूर निघत होता, असल्या भाकडकथा ऐकवल्या जाऊ नयेत. राजकारणात कोणीही साधूसंत नसतात. आपापले उल्लू सिधा करण्यालाच राजकारण म्हणतात. लाचार जनतेला दोनचारातला कमीत कमी नालायक निवडण्य़ाचेच स्वातंत्र्य असते. त्यालाच लोकशाही संबोधले जाते.
https://www.youtube.com/watch?v=F2PCy-Z7pTs

1 comment:

  1. पेट्रोल आणि डीझेल च्या दरवाढी बद्दल हल्ली खूप गदारोळ चालु आहे. आणि त्याला समर्पक आपला लेख आहे. आता एकच तुलना माझ्या मनात आली कि, पूर्वी पेट्रोलियम पदार्थाची पन्नास पैसे ते एक दोन रुपयांनी जरी दरवाढ झाली कि कमीत कमी आमच्या भागातील पंप एक दोन दिवस तरी बंद राहत. त्यानंतर दोन दोन तास नंबर लाऊन पेट्रोल मिळत असे, आता तशी परिस्थिती नाही . तसेच ग्यास बद्दल, सिलेंडर संपल्यावर तर दोनदा तीनदा रिक्षा करून नंबर लावावा लागे. काही वेळा रजा टाकून अथवा घरच्या कोणालातरी रांगेत उभे करावे लागे.तेव्हा दोनेक दिवसात ग्यास मिळे. मात्र हे आपले सर्व लोक विसरतात असे वाटते

    ReplyDelete