Sunday, June 3, 2018

कोडग्या कोडग्या लाज नाही

tejpal bail के लिए इमेज परिणाम

‘सर्वसाधारणपणे फ़क्त राजकारणी भ्रष्टाचारी असतो आणि इतर व्यवसाय तुलनेत अधिक पवित्र असतात असा अनेकांचा समज असतो. न्यायालये, वकील मंडळी, पत्रकार, लेखक-कवि-नाटककार, कलावंत, विचारवंत, नोकरशहा, उद्योगपती, लष्करी अधिकारी, असे समाजातील अनेक गट राजकीय व्यक्तीला खलनायक ठरवण्याच्या खटपटीत असतात.’... ‘सध्या तरी भारतात न्यायालयीन शुचिर्भूततेचा इतका दरारा तयार झाला आहे की, जामिन नाकारला जाणे याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला आहे, असा समज करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी एखाद्या संस्थेला वा व्यक्तीला लक्ष्य केले की, त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत, असेही मानण्य़ाची प्रथा पडली आहे. "शोध पत्रकारिता" हा या व्यवसायातील शहाजोगपणाचा नमूना ठरू पहात आहे. पत्रकारांनी व्यवस्थेवर अंकुश ठेवावयास हवा, परंतु पत्रकारितेवर तो कोण ठेवणार? अजून तरी प्रेस कौन्सिल, न्यायालये किंवा पत्रकारांच्या संस्था याबाबत कोणतेही मापदंड निर्माण करू शकलेले नाहीत’  - कुमार केतकर

मोदी राष्ट्रीय राजकारणात आल्यापासून किती विकास झाला किंवा त्यांनी असे देशाचे काय भले केले, असले प्रश्न विचारले जातात. पण या काळात मोदींनी काही केले नसले, तरी विरोधकांनी मात्र बेशरमपणाचा कळस केलेला आहे. नुसता निर्लज्जपणाचा अतिरेक केलेला नाही, तर त्याची लेखी कबुलीही देण्य़ापर्यंत त्यांचा बेशरमपणा गेलेला आहे. तसे नसते तर या एका वर्षात लागोपाठ केजरीवाल यांच्यापासून थेट दिग्विजय सिंग यांच्यापर्यंत अनेकांनी माफ़ीनामे लिहून देण्याची त्सुनामी कशाला आली असती? मोदींचे राष्ट्रीय क्षितीजावर आगमन झाले, तेव्हाच केजरीवाल यांनी अण्णांना टांग मारून आम आदमी नावाचा राजकीय पक्ष सुरू केलेला होता. त्या पक्षाचा आडोसा घेऊन माध्यमातील पुरोगामी संपादक पत्रकारांनी मोदीविरोधातली आघाडी सुरू केलेली होती. जितके म्हणून भाजपाला बदनाम करता येईल, तितके करताना मोदींचा बाल बाका झाला नाही. पण अशा अनेक संपादकांना मग वाहिन्यांच्या कंपन्यांनी हाकलून लावण्याची पाळी आली. अशाच वाहिन्या व संपादकांनी केजरीवाल यांना मोठे करून ठेवले आणि त्यांची पुंजी काय होती? तर बेछूट आरोप करायचे. एकेदिवशी केजरीवाल उठले आणि त्यांनी देशातल्या अनेक राजकारण्यांना भ्रष्ट घोषित करून टाकले. या लोकांना भ्रष्ट असल्याने पराभूत करण्याचे आवाहनही केले. सहसा अशा आरोपांची दखल संबंधित लोक घेत नाहीत वा त्याला उत्तरही देत नाहीत. पण अरुण जेटली वा नितीन गडकरी अशा भाजपा नेत्यांनी त्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले आणि आरोपकर्त्याला कोर्टात खेचलेले होते. मात्र यातून सहीसलामत निसटून गेले ते संपादक-पत्रकार. त्यांनी केजरीवालचा आडोसा घेऊन आपले राजकीय हेतू साध्य करून घेतलेले होते. आज आपल्यापाशी पुरावे नाहीत म्हणून आता केजरीवाल घाऊक माफ़ीनामे लिहून देत आहेत. याला बेशरमपणा नाही तर काय म्हणायचे?

हा एकविसाव्या शतकातला मोठा धंदा होऊन बसला आहे. पत्रकारितेची वस्त्रे पांघरायची आणि बदनामीच्या धमक्या दिल्यागत काम करायचे. जाणीवपुर्वक अर्धवट किंवा अपुरी माहिती देऊन नामवंत व्यक्तींना बदनाम करायचे. अशा टपोरी लोकांना धडा शिकवण्यात कामसू माणसाने किती वेळ वाया घालवायचा, याला मर्यादा असतात. त्यामुळेच असे लोक खुप सोकावले आहेत. तरूण तेजपाल वा कोब्रा पोस्ट हे त्यातले म्होरके आहेत. वास्तवात अशी माणसे किती पक्की बदमाश आहेत, त्याचे अनेक पुरावेही समोर आलेले आहेत. एका मुलाखतीमध्ये पुण्यप्रसून वाजपेयी ला केजरीवाल आपल्या मुलाखतीतला कुठला भाग ठळकपणे दाखवावा, त्याचेही मार्गदर्शन करत असल्याची एक क्लिप आहे. थोडक्यात कॅमेरा वा रेकॉर्डींग यांच्या मदतीने कृत्रीम पुरावे निर्माण करायचे, हा उद्योग झाला आहे. त्यात मग आरोप करणाराही तितकाच बेछूट असावा लागतो. एकदा त्याने आरोप केले आणि ते ठळक माध्यमात झळकले, मग विरोधी पक्षांनी त्याची पुनरावृत्ती करत रहायचे, हा धंदा होऊन गेला. अलिकडेच द वायर नावाच्या वेबसाईटने असाच उद्योग केला आणि अमित शहांच्या मुलाने बदनामीचा खटला घातल्यावर त्याच्या संपादकांना घाम फ़ुटला आहे. हे लोक कसे बदमाश असतात, त्याचा आणखी एक भक्कम पुरावा आहे. पाच वर्षापुर्वी सोनिया गांधींचा जावई रॉबर्ट वाड्रा याच्या हरयाणातील जमिन घोटाळ्याचा तपशीलवार लेख एका महिला पत्रकाराने एका नामवंत दैनिकाला पाठवलेला होता. पण जावई सोनियांचा म्हटल्यावर संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी नऊ महिने तो लेख दडपून ठेवला. जेव्हा त्या महिलेने तीच माहिती केजरीवालना दिली व त्यांनी गौप्यस्फ़ोट केला; तेव्हा वरदराजनची पळापळ झाली. त्यानेही विनाविलंब तो दडपलेला लेख छापून टाकला. अशी ही बदमाशी आहे. त्यातला राजकीय हेतू साफ़ होतो. आज वायरचाही संपादक वरदराजनच असावा हा योगायोग नाही.

तर आता या रांगेत कॉग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजयसिंग येऊन उभे राहिले आहेत. त्यांच्यावरही नितीन गडकरी यांनी एक बदनामीचा खटला भरलेला होता, नुकतीच सिंग यांनी दिलगिरी व्यक्त करून माफ़ी मागितली. त्यानंतर गडकरींनी खटला मागे घेतला आहे, तो गडकरींचा सभ्यपणा झाला. पण दुसरीकडे तो दिग्विजयसिंग यांचा बेशरमपणा नाही काय? आपल्या राजकीय हेतूसाठी अन्य कुणावर बेछूट आरोप करणे, म्हणजे बदमाशी नाही काय? पण मुद्दा एका आरोपकर्त्यापुरता नाही. त्याचाच आडोसा घेऊन ज्या पत्रकार माध्यमांनी अशी बेछूट बदनामी केली, त्यांचे काय? तेही तितकेच गुन्हेगार नाहीत काय? कारण आरोपकर्त्याने नुसते आरोप केलेले होते. पण त्याचा गवगवा ज्याने केला, तोच खरीखुरी बदनामी करीत नाही काय? चाकू बनवणारा नव्हेतर भोसकणारा गुन्हेगार असतो. म्हणून असे पत्रकारी मुखवटे लावून वावरणारा गुन्हेगार आज अक्राळविक्राळ रूप धारण करून बसला आहे. थोडक्यात राजकीय गॅन्गवॉरची एक सुपारीबाजी होऊन गेलेली आहे. कोब्रा पोस्ट नामक एका अशाच वेबसाईटने आता काही माध्यमे पैसे घेऊन हिंदूत्ववादी भूमिकाच कशी बातम्यातून पुढे रेटत असतात, त्याचा गौप्यस्फ़ोट केला आहे. त्यात तथ्य नसेल असेही नाही. पण मग मागल्या पंधरा वर्षात तीच माध्यमे पैसे घेऊन मोदीविरोधी आघाडी चालवित नव्हती काय? गुजरात दंगलीनंतरच्या काळात कुठल्याही वाहिनीवर तिस्ता सेटलवाड ही सुपरस्टार असल्यासारखी कशाला झळकत होती? मोदी, संघ वा भाजपाला शिव्या मोजण्यापलिकडे तिच्यापाशी अशी कुठली अमुल्य माहिती होती? पण तिला पुढे करून हा उद्योग सगळीच माध्यमे करीत होती ना? तेव्हा या माध्यमांना कोण पैसे पुरवित होता? त्याचा गौप्यस्फ़ोट या वेबसाईटला करावा असे वाटले नव्हते. फ़ार कशाला या वेबसाईट व त्यातल्या पत्रकारांनी कधी एकदा तरी पुरोगामी पक्ष वा नेत्यांचा पर्दाफ़ाश केलेला आहे काय?

टहलका वा कोब्रापोस्ट या लोकांनी नेहमी भाजपा व संघालाच लक्ष्य करावे आणि कधीही त्यांना पुरोगामी पक्ष वा संघटना नेत्यांचा कुठलेही गुपित सापडू नये, यातून त्यांचा बोलविता धनी कोण आहे, त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. तो असा, की अशा काही लोकांना कॉगेस किंवा भाजपाविरोधी लोकांनी आर्थिक मदत देऊनच कामाला जुंपलेले आहे. वाड्रा याची कथा दडपुन ठेवणे आणि अमित शहांचा पुत्र जय शहाविषयी दडपून खोटे लिहीणे, यातून त्यामागचा हेतू साफ़ होऊन जातो. विविध वाहिन्या व वर्तमानपत्रांचीही आपण यातून झाडाझडती घेऊ शकतो. ज्यांनी जय शहाची सोळाशे पटीने एका वर्षात कमाई झाल्याची थाप रंगवून सांगितली, त्यांनी कधी सुनंदा पुष्करच्या शंकास्पद मृत्यूविषयी कुठला गौप्यस्फ़ोट करण्याची तसदी घेतली नाही. त्यांनी कधी तसा गौप्यस्फ़ोट झाल्यावरही त्याचा पाठपुरावा करण्याचे कष्ट उपसले नाहीत. अगदी अशी प्रकरणे थेट कोर्टात जाईपर्यंत या माध्यमांनी त्या विषयाला हात लावलेला नाही. दोन वर्षापुर्वी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचेही खापर मोदी सरकारवर फ़ोडून दलितांच्या दुखण्यासाठी टाहो फ़ोडणार्‍या माध्यमांनी नुकत्याच केरळात हत्या झालेल्या केविन नामक दलित ख्रिश्चन तरूणाचा खुनाविषयी तिथल्या मार्क्सवादी सरकारला जाब विचारल्याचे आढळून येणार नाही. कोब्रा पोस्टवाले कधी तेजपालच्या भानगडी चव्हाट्यावर आणायला पुढे सरसावले नाहीत. मोदी व शहा यांच्याशी संबंधित कुठल्या तरूणीविषयीच्या चोरट्या संभाषणांच्या ध्वनिफ़ितीचा कल्लोळ यांनीच माजवला होता. पण तेजपालचे पाप चव्हाट्यावर आले, तेव्हा यापैकी सगळेच बिळात दडी मारून बसले होते. आजही त्यावर यातला कोणी अवाक्षर बोलणार नाही. अशा लोकांनी व त्यांच्या आहारी गेलेल्या मुख्यप्रवाहातील संपादक पत्रकार मंडळींनी पत्रकारितेची विश्वासार्हता संपवून टाकली. त्यांना बाजूला ठेवून देशाचा पंतप्रधान थेट जनतेशी संपर्क साधू शकला आहे.

शोधपत्रकारिता किंवा गौप्यस्फ़ोट करणारी सनसनाटी पत्रकारिता, आता गुन्हेगारीच्या नीचतम पातळीला गेली आहे. त्यातले म्होरके आम आदमी प्क्षात पुरोगामीत्व मिरवत असतील, तर त्यांची प्रतिष्ठा कितीशी शिल्लक असेल? हे लोक प्रसार माध्यमातील शार्पशूटर वा सुपारीबाज होऊन गेलेले आहेत. त्यांना घाबरून जगणार्‍यांनी आजवर शरणागती पत्करली होती. कारण आयुष्यात काहीतरी लहानसहान चुका माणसाकडून होत असतात. त्याच शोध घेऊन त्याला बदनामीचा धाक घालणे, हाच अशा बदमाशांचा धंदा होऊन गेला. नरेंद्र मोदी हा पहिला नेता असेल, ज्याने त्यांच्या बदनामीच्या मोहिमेला वा गुन्हेगारीला दाद दिली नाही. उलट त्याला संपवताना असेच पत्रकार व त्यांची हत्यारे बोथट होऊन गेली आहेत. त्यातूनच मग जेटली वा गडकरी अशांना धीर आला असून, त्यांनीही अशा बदमाशांच्या विरोधात हत्यार उपसले. आता त्यांचे बोलविते धनी समोर येऊ लागले आहेत. पण तिथे थांबून चालणार नाही. अशा बदमाशांचे मुखवटे टरटरा फ़ाडून जोवर मुख्य प्रवाहातील माध्यमेच आघाडी उघडत नाहीत, तोवर माध्यमांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होण्याची अजिबात शक्यता नाही. तिथून अशा लोकांना माध्यम समुहांच्या मालकवर्गाने हाकलून लावल्याने त्यांनी लहानसहान वेबसाईट वा डिजिटल माध्यमातून तोच धंदा चालू केला आहे. सोशल माध्यमांचा आडोसा घेतला आहे. परिणामी हळुहळू सोशल माध्यमांची प्रतिष्ठा व विश्वासार्हताही लयाला गेली आहे. २०१४ च्या दरम्यान सोशल माध्यमांनी मुख्यप्रवाहातील अशा बदमाशांना संपवले होते. आता हीच नवी माध्यमे त्या रोगाची बळी होत आहेत. तर त्यांचीही अवस्था वेगळी होणार नाही. मात्र या गडबडीत सामान्य लोक अधिक चिकित्सक व जाणते होऊन गेले आहेत. त्यांना नुसता भुलभुलैया उभा करून सुपारीबाजी करण्याचे दिवस संपले आहेत. पण म्हणतात ना? कोडग्या कोडग्या लाज नाही. कालचे बोलणे आज नाही.

6 comments:

  1. एका मुलाखतीमध्ये राजदीप सरदेसाईंला केजरीवाल आपल्या मुलाखतीतला कुठला भाग ठळकपणे दाखवावा, त्याचेही मार्गदर्शन करत असल्याची एक क्लिप आहे....

    भाऊ, तो पत्रकार बहुधा पुण्यप्रसून वाजपेयी होता.

    ReplyDelete
  2. भाऊ हे लोक किती बदमाश आहेत याचा पुरावा आजदेखील उपलब्ध आहे .तो दिवस १६ मे २०१४ चा आहे ज्या दिवशी लोकसभेचे निकाल येत होते ते विडिओ आज पहिले कि दिसत कि स्क्रीनवर तीन ऑपशन दिसतात ते देखील सर्व वाहिन्यांच्या . nda ,upa आणि AAP .दिवसाच्या शेवटी फक्त ४ खासदार येणाऱ्या पक्षाला मुख्य लढतीत का दाखवत होते ?त्याचे कारण आहे कि काँग्रेस तर येणार नव्हती पण मोदी येऊ नयेत म्हणून AAP ला ४०० जागा लढायला लावल्या होत्या .दिल्लीतील आंदोलनाचा फायदा होऊन AAP ला १०० जागा मिळतील असे सर्वजण सांगत होते म्हणजे परत secular फोर्सेस ची माळ ओढत केजरीवाल काही वाटा देऊन परत upa च सरकार यावं ,पण त्या दिवशी आप चा कॉलम काही भरला गेला नाही सगळे तिकडेच बघत होते ,सगळं डाव फसला ,मग शाह UP मध्ये वर्षभर काय करत होते याची बोलणी सुरु झाली ते जमिनीवर काम करत होते बाकीचे काँगेसशी पत्रकार tv वर AC त बसून AAP वर बाजी लावत होते . त्यावर आता कोणी बोलत नाही २०१९ साली परत असेच काहीतरी करणार ते

    ReplyDelete
  3. कालचे बोलणे आज नाही ??आहे ना भाऊ!!,
    महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत असे तेव्हाचे सत्ताधारी म्हणत , आताचे सत्ताधारी महाराष्ट्रापेक्षा मोदी मोठे आहेत अशी दवंडी पिटतात ..
    व्यक्ती बदललेत ,व्यक्तिमत्व नाही !!

    ReplyDelete
  4. भाऊ, मला असा प्रश्न पडतो कि जर बदनामी झाली म्हणुन कोर्टात जो खटला दाखल केला जातो तो माफी मागितली कि परत का घेतला जातो. असे केल्याने कोर्टाचा कालापव्यय होत नाही का. केस कोर्टात लावून धरली पाहिजे आणि योग्य तो दंड वसूल केला गेला की अशा प्रवृत्तीस आळा बसेल

    ReplyDelete
  5. भाऊ, ही कोब्रापोस्टची बातमी आम्हीसुद्धा वाचली. पण ह्या बातमीचा अर्थ आम्ही खूप वेगळा लावला आणि कोब्रापोस्टच्या छुप्या ऑपरेशनबद्दल आम्हाला समाधानाच वाटले. ते एव्हढ्यासाठी की, आचार्य अटल ह्यांनी पैसे देऊ केल्यावर टाईम्स ऑफ इंडिया सारख्या (सध्याच्या) भाजप-द्वेष्ट्या वृत्तपत्राचा सुद्धा विकाऊपणा सिद्ध झाला. अटलने हे तर उघड केले की तो स्टिंग ऑपरेशन करत होता. पण ह्यातून ह्या वर्तमानपत्रांचा विकाऊपणा भरपूर सिद्ध झाला -- नावा-गावासकट. आता हे सत्य बाहेर आले की आजपर्यंत हे शहाजोग काँग्रेसचा डंका वाजवत आहेत ते पैश्यांच्या लोभाने, तत्त्वांच्या बांधिलकीमुळे नाही.

    बूंदसे गयी हुई वो इज्जत हौदसे कैसे वापस आयेगी?

    ReplyDelete
  6. लोकशाहीचा ४ था स्तंभ हा आधीच्या ३ स्तंभांना सगळ्यात जास्त घातक ठरत आहे !

    ReplyDelete