‘समाजात जेव्हा एखादा वरिष्ठवर्ग अभिजनवर्ग असतो तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. त्याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाबाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना, ते जाणूनबुजून असभ्यरितीने वागतात. सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करताना या कृत्रिम सभ्यतेवर आणि कृत्रिम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रिम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्विकारल्या जातात. पण याचा अर्थ असा नव्हे की, सभ्यतेचा दंडकच झुगारून देण्यात आलेला असतो. समाजातील व्यक्ती एकमेकाची कदर करीत, सामंजस्याने, सुसंवादाने एकत्र राहायचे असले तर समाजात सभ्यतेचे दंडक असावेच लागतील. समाजात असे दंडक आहेत याचा अर्थच असा की, समाजातील बहुसंख्य माणसे बहुसंख्य प्रसंगी ते दंडक पाळतात. शिवाय याचा अर्थ असा की, जबाबदारीने वागणारा माणूस हे सर्व दंडक प्रसंगी पाळायचा सतत प्रयत्न करीत असतो.’ (प्रा. में पुं रेगे.- ‘नवभारत’ जाने-फ़ेब्रु १९९७)
दोन दशकापुर्वी रेगे सरांनी युती सरकार सत्तेत असतानाच्या काळात लिहीलेल्या लेखातला हा उतारा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या खास शैलीत विरोधी टिकेचा समाचार घेत, त्याला तेव्हा ‘शिव्याशाही’ म्हणायचीही फ़ॅशन होती. किंबहूना बाळासाहेब ठाकरी म्हणून जी भाषा बोलतात वा लिहीतात, ती विद्रुप मराठी असल्याचा आपल्या अभिजनांचा निष्कर्ष होता. त्याला पोषक असा लेख असल्याने तेव्हा महाराष्ट्र टाईम्स व महानगर अशा दैनिकांनी त्याचे अगत्यपुर्वक पुनर्मुद्रणही केलेले होते. आज वीस वर्षानंतर बाळासाहेबांची ती ठाकरी शैली इतर अनेक माध्यमांनी आत्मसात केलेली आहे आणि जगात नेहमी असेच घडत आलेले आहे. जे लोक आधी कशाला तरी नावे ठेवत असतात, ते स्वत:ला अभिजन मानणारे असतात आणि ते कधीही नाही नवे अनुकरणीय करीत नाहीत. उलट नवे काही करणार्यांची निंदानालस्ती करीत असतात. मग जेव्हा त्या नव्याचा समाजात स्विकार होऊ लागतो, तेव्हा तेच नाविन्य स्विकारून आपणच त्याचे जनक असल्याच्या थाटात हे अभिजन संस्कृतीच्या गप्पा मारत असतात. उपरोक्त उतार्यामध्ये रेगेसरांनी अशा अभिजन वर्गाची लबाडी उघड करून मांडलेली आहे. ती भाषा काहीशी क्लिष्ट असल्याने विस्तारपुर्वक समजावणे भाग आहे. यातले खाचखळगेही समजावणे भाग आहे. त्यात कुठेही रेगेसरांनी अभिजन वर्गाकडून सभ्यतेची निर्मिती होत असल्याचा दावा केलेला नाही, तर अभिजनांनीच असभ्य म्हणून शिव्याशाप दिलेल्या कृती व गोष्टी नंतरच्या काळात सभ्य म्हणून स्विकारल्याचा दावा केलेला आहे. याचा साधासरळ अर्थ इतकाच आहे, की त्यांच्या तथाकथित संस्कृती व सभ्यतेचा जनमानसावरील पगडा कमी होऊ लागला, मग असे लबाड लोक त्यांनीच नाकारलेल्या गोष्टी सभ्य ठरवून पुन्हा त्यावर हुकूमत प्रस्थपित करायला धडपडू लागतात.
हा अभिजन वर्ग कसा ओळखावा? आजकाल त्त्याला पुरोगामी सेक्युलर वा उदारमतवादी अशी अनेक नावे आलेली आहेत. त्या वर्तुळात मुठभरांचाच समावेश होत असतो. बाकी सामान्य जनतेला त्यात कुठेही स्थान नसते. हे लोक स्वयंघोषित अभिजन असतात आणि त्यांनीच मान्यता दिलेले वा स्विकारलेले आणखी काही लोक अभिजन व्हायच्या आकांक्षेने त्यांच्यामागून फ़रफ़टत असतात. शाहू महाराज किंवा महात्मा फ़ुले यांच्या काळात गेलात, तर प्रस्थापिताला आव्हान देऊन फ़ुल्यांनी नवे विचार मांडायचे धाडस केलेले होते. तर त्यांना धर्मबुडवे किंवा समाजद्रोही वगैरे ठरवणारा वर्ग कोण होता? त्यात तेव्हाचे जाणकार, बुद्धीमंत, लेखक किंवा प्रतिष्ठीतांचा समावेश होता. अर्थात इतर सामान्य समाजाला तेव्हा शिक्षणाच्या सुविधा मिळालेल्या नव्हत्या. ब्राह्मण वर्गच प्रामुख्याने लिहीतावाचता येणारा होता. त्यामुळे बहुतांश बुद्धीजिवी किंवा लेखक वगैरे ब्राह्मण जातीतून आलेले होते. अशा वर्गाला आपली थोरवी कधीही दाखवता किंवा सांगता येत नसते. त्यामुळे असे लोक नेहमीच इतरांच्या कुठल्याही नव्या वेगळ्या कल्पना विचारांची हेटाळणी करण्यातून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा धडपडीत असतात. अशा नव्या गोष्टी विचारांना सामान्य जनतेतून वाढता पाठींबा मिळू लागला, म्हणजे या मुठभरांची तारांबळ उडत असते. त्यामुळे असे अभिजन वर्गातले लोक निक्षून नव्या विचार व कल्पनांना हाणून पाडण्यासाठी एकत्र येत असतात व एकजुटीने तुटून पडत असतात. आपल्याच मूल्यांना व नियमांना धाब्यावर बसवून हिडीस वागत असतात. उतार्याच्या आरंभी रेगेसर त्याची ग्वाही देतात. अभिजन वर्गातले लोक आपल्यातल्या लोकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना दिसतात. म्हणजे काय? तर आपल्यातल्याच कोणी शेण खाल्लेले असेल, तर त्याला श्रीखंड ठरवण्यापासून त्याचा इन्कार करण्यापर्यंत कसलेही युक्तीवाद तावातावाने केले जातात.
विद्यमान कालखंडात पुरोगामी सेक्युलर म्हणून जी जमात ओळखली जाते, त्यांना आजच्या काळातले अभिजन वर्ग म्हणता येईल. त्यांनी एखाद्या समारंभात सभेत जाऊन धिंगाणा केला, तर त्याविषयी बोलताना राज्यघटनेने मतभिन्नतेचा दिलेला अधिकार पुढे करून युक्तीवाद होतील. पण तसेच कुणा संघ वा शिवसैनिकाकडून झाले, मग त्याला धुडगुस असा शब्द वापरला जाईल. त्याच्याही पुढे जाऊन लोकशाहीची गळचेपी म्हटले जाईल. पण तसाच काहीसा प्रकार अभिजनांच्या टोळीकडून झाला, मग मात्र सारवासारव सुरू होत असते. मंचावरून न्यायमुर्ती कोळसे पाटिल थेट अपशब्द वापरतात, तेव्हा कोणी भाषा कशी असावी यावर चर्चा करणार नाही. तर त्याल क्षोभ म्हणून हारतुरे घातले जातात. पण तसेच काही शब्द संघाच्या व्यक्तीकडून उच्चारले गेल्यास तात्काळ त्याला फ़ासावर लटकावण्यासाठी अवघी माध्यमे कंबर कसून पुढे येतात. जॉन दयाल नावाचे एक विचारवंत म्हणून वाहिन्यांवर दाखवले जातात. पण त्याच चर्चेमध्ये कोणी हिंदू संत महाराज असला तर त्याचा उल्लेख हिंदूधर्मिय म्हणून केला जातो. पण ख्रिस्तधर्मिय असून व धार्मिक आवेशात बोलत असूनही दयाल यांना धर्माचे लेबल लावले जाणार नाही. कारण असे दयाल, सबा नकवी, रेहमानी कधी चुकून आपापल्या धर्मातले दोष सांगणार नाहीत. उलट त्याची तळीच उचलून धरतील. पण आजच्या युगातले ते अभिजनांचे प्रतिनिधी असतात. मग त्यांच्या धर्मांधतेविषयी अतिरेकी सभ्यतेची वागणूक सुरू होत असते आणि त्याच चर्चेत कोणी हिंदू संत वा हिंदूत्ववादी असला, मग त्याची चामडी लोळ्वण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली जात असते. असा पक्षपात करत येईल, त्यालाच मग आजच्या अभिजन वर्गात प्रवेश वा स्थान असते. कारण आजचा अभिजन वर्ग म्हणजे कालबाह्य झालेल्या सनातनी वृत्तीचीच नवी आवृत्ती आहे.
फ़ुले शाहूंच्या काळात सनातनी वृत्तीचे लोक जसे वागत होते, त्यापेक्षा तसूभरही आजच्या पुरोगामी लोकांची भाषा किंवा वर्तन वेगळे दिसणार नाही. मध्यंतरी प्रणबदा मुखर्जी हे माजी राष्ट्रपती संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तेव्हा त्यांच्याकडे संशयाने बघितले जात होते. कारण अभिजन वर्गाने बहीष्कृत मानलेल्या संघटनेच्या मंचावर प्रंणबदा गेलेले होते. यापुर्वी गंगाधर पानतावणे किंवा असेच काही मान्यवर पुरोगामी त्या मंचावर गेलेले आहेत. त्यांना पुरते बहिष्कृत करण्यात आले. अभिजन वर्ग असा असतो. शंभर दोनशे वर्षापुर्वीच्या सनातनी वर्गासारखाच आजही वागत असतो. त्यात प्रवेश मिळाला, मग विविध बंधने येत असतात आणि तिथल्या असभ्य परिणामांना सामोरे जाण्याची क्षमता असावी लागते. पण ही मंडळी कशी लबाड असते, तेही समजून घेतले पाहिजे. ते ज्याला संस्कृती वा सभ्यता म्हणतात, त्यापैकी कशाचीही निर्मिती हा वर्ग करीत नाही. मुले पळवणार्या कुणा टोळीसारखा हा अभिजन वर्ग दुर्लक्षित वर्गाने निर्माण केलेल्या व लोकप्रिय होणार्या गोष्टी उचलून त्याला सभ्यता म्हणून मान्यता देत असतो. त्याचे श्रेय उकळत असतो. उपरोक्त उतार्यात रेगेसरांनी तेच नेमक्या शब्दात सांगितलेले आहे. समाजातील कृत्रिम सभ्यता व कृत्रिम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. ह्याचा अर्थ काय? कृत्रिम सभ्यता वा असभ्यता कोणी निर्माण केली? सामान्य समाजातील लोक कधीच संस्कृती किंवा सभ्यतेचे हवाले देत नाहीत वा त्यासाठी कोणाला फ़ैलावर घेताना दिसणार नाहीत. उलट सामान्य समाजातील कोणी अभिजन वर्गाला न रुचणार काही केले वा बोलला, तर हाच अभिजन वर्ग त्याच्यावर तुटून पडलेला दिसतो. कालपरवा गोपाळ शेट्टी किंवा भाजपाचे अन्य कोणी महाराज काही बोलल्यावर अभिजन बुद्धीवादी त्यांच्यावर तुटून पडलेला दिसतो. पण त्याच्या उलट परिस्थिती सहसा अनुभवास येत नाही. मग ही कृत्रिमता कोण आणतो?
अमूक एक सोवळे नाही किंवा सुसंस्कृत सभ्य नाही, म्हणून जे लोक कायम नाके मुरडत असतात, तेच समाजात नेहमी कृत्रिम सभ्यता व असभ्यता निर्माण करत असतात. पण जेव्हा त्यांना एकूण लोकसंख्या जुमानत नाही व तथाकथित असभ्यतेलाच मान्यता मिळत जाते, तेव्हा अभिजन वर्गाची तारांबळ उडून जाते. त्यामुळेच आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी अभिजन वर्ग साळसूदपणे सभ्यतेच्या व्याख्या ढिल्या वा सैल करून त्यांनीच नाके मुरडलेल्या गोष्टींना स्विकारू लागतो. याच्या उलट काही होताना दिसणार नाही. ज्याला त्याच अभिजन वर्गाने जीवापाड सभ्य म्हणून जपलेले असते, त्यापैकी कुठल्या गोष्टी असभ्य मानल्या जाणार्या घटकाने स्विकारल्या, असे होत नाही. म्हणजेच मुळात कुचंबणा झालेल्या सभ्यता वा संस्कृतीवर खरे आघात अभिजन वर्गाच्या बाहेरून होत असतात आणि अभिजनवर्गच आपले नियम व्यख्या सैल करून आपले स्थान टिकवण्यासाठी आटापीटा करीत असतो. जेव्हा समाजमनावर धर्मशास्त्राचा पगडा होता, तेव्हा सनातनी वृत्तीचे लोक त्याच धर्मशास्त्राचा आधार घेऊन पापपुण्याच्या कल्पना सांगून लोकांना ओलिस ठेवत होते. पण जेव्हा तो धर्माचा पगडा कमी होत गेला, तेव्हा वैज्ञानिक पांडित्य सांगून पुन्हा समाजाला ओलिस ठेवायला तीच सनातनी वृत्ती पुढाकार घेत असते. म्हणूनच फ़ुले शाहूंच्या कालखंडातील शास्त्रीबोवा किंवा धर्ममार्तंडांचे वर्तन व आजच्या पुरोगाम्यांचे सनातनी वर्तन यात कमालीचे साम्य साधर्म्य आढळून येईल. कुठलाही सनातनी आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी समाजाला नेहमीच पापपुण्य असल्या गुंत्यात गुरफ़टून टाकत असतो. आजचे पुरोगामी त्याच मार्गाने वाटचाल करताना दिसतील. अमूक एक योग्य वा पुण्य आणि तमूक म्हणजे पाप वा अयोग्य असला भेदभाव कोणाकडून होत असतो? असा भेदभाव करण्याचा अधिकार या अभिजन सनातन्यांना दिला कोणी?
गोपाळ शेट्टी काही बोलले तर त्यावर काहुर माजवणारे तितक्याच बेछूट घोषणा करणार्या कन्हैया किंवा मेवाणीच्या बाबतीत चिडीचुप होऊन जातात. जाब विचारलाच तर त्यावर पांघरूण घालण्यासाठी कसरती करू लागतात. हा भेदभाव पक्षपात करायचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नसतो. आपणच देशाच्या वा समाजाच्या सभ्यतेचे मक्तेदार असल्याचा टेंभा मिरवून असे लोक पुढाकर घेत असतात. त्यांना कुठला कायदा वा राज्यघटना तसा अधिकार देत नाही. पण समाजातील नितीमूल्यांचा आधार आपणच असल्याची त्यांची समजूत असते आणि त्यालाच पुर्वीच्या भाषेत सनातनी वा आजच्या भाषेत पुरोगामी वा अभिजन वर्ग मानले जाते. म्हणूनच मग ते सराईतपणे नक्षली हिंसेचे समर्थन करताना वंचितांची लढाई अशी शाब्दिक कसरत करतात. उलट कुठे जमावाने कुणाला गोमासाच्या संशयाने ठार मारले, तर त्याचे खापर हिंदूत्वावर फ़ोडायला हिरीरीने पुढे येतात. दोन्हीकडे जीवघेणी हिंसा होत असते आणि मानवी जीवाचाच बळी पडलेला असतो. पण एका हत्येला वंचितांच न्याय अशी उपाधी देऊन पुण्यकर्म ठरवले जाते आणि दुसरीला पाशवी हिंसाचार ठरवून निंदानालस्ती आरंभली जाते. काश्मिरात कायदा राबवणार्या पोलिस सैनिकांवर दगड मारणार्यांना आझादीचे पाईक ठरवून कौतुक चालते. भीमा कोरेगाव नंतर मुंबई महाराष्ट्रातल्या दंगल सादृष घटनाक्रमाला प्रक्षोभ असे नाव दिले जाते. पण तसे़च काही मनसे वा शिवसैनिकांकडून झाल्यास त्याला गुंडगिरी ठरवून हिणवले जाते. याचा निकष काय असतो आणि तो कोणी ठरवलेला असतो? तर तसा कुठलाही निकष कधी नसतो. आपला परका बघून तसा पक्षपात केला जात असतो आणि तो करायचा अघोषित अधिकारही सनातनी पुरोगामी म्हणून त्यांनी परस्पर घेतलेला असतो. त्यातही आणखी गंमत आहे. पुरोगामी सनातनी कधी वास्तविक युक्तीवाद करू शकत नसतात.
अलिकडल्या काळात राष्ट्रवाद राष्ट्रप्रेम असल्या शब्दांची टिंगल मनसोक्त चालते. त्यातून आपले पुरोगामीत्व सिद्ध करता येत असते. हार्दिक पटेल, मेवानी वा कन्हैया अशा लोकांची भाषा वा कृतीला राष्ट्रद्रोह म्हटले, की हे़च पुरोगामी तोंड वर करून काय विचारतात? राष्ट्रवादाची व्याख्या कोणती? कोणी ठरवली? किंवा कुठल्याही कृतीला राष्ट्रवादी वा राष्ट्रद्रोह ठरवण्याचा अधिकार कुणा संघटनेला कोणी दिला? असले प्रश्न तात्काळ फ़ेकणार्यांना तरी उलटे प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणी व कधी दिला? ख्रिश्चन वा मुस्लिम स्वातंत्र्य लढ्यात होते काय? असले प्रश्न विचारण्याचा अधिकार संघ वा हिंदूत्ववादी लोकांना नसतो. मग तोच अधिकार पुरोगाम्यांना कोणी दिला आहे? स्वातंत्र्य संग्रामात संघाचा सहभाग किती व कोणता, असले प्रश्न विचारण्याचा अधिकार अशा पुरोगाम्यांना तरी कोणी कधी दिला? इतरांच्या हक्क वा अधिकाराची कागदपत्रे तपासायला कायम सज्ज असलेल्या पुरोगाम्यांना, प्रश्न विचारण्याचा अधिकार कुठून मिळतो? यातली तफ़ावत लक्षात घेतली पाहिजे. इतरांना सवाल करून प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार पुरोगाम्यांनाही कोणी दिलेला नाही. जगातल्या कुठल्याही देशातल्या अशा सनातनी वृत्तीला कोणी कुठला अधिकार दिलेला नसतो. पण आपल्या बुद्धीचे कौशल्य वापरून इतर मोठ्या लोकसमुदायाच्या मनात न्युनगड अपराधगंड निर्माण करायचा आणि त्याच बळावर हुकूमत गाजवण्याला सनातनीवृत्ती म्हणतात. ती वृत्ती आजच्या युगात प्रामुख्याने उदारमतवादी, पुरोगामी व सेक्युलर गोतावळ्यात ठळकपणे दिसून येते. पण कायम सभ्य व सुसंस्कृत असल्याचा टेंभा मिरवणार्या या वर्गाइतका असभ्य व असंस्कृत वर्ग इतर कुठलाही नसतो. प्रेमाच्या नावाखाली द्वेष व मत्सर करण्याचा मक्ता जणू त्यांनी घेतलेला असतो. म्हणूनच कुठल्याही समाज देशातील संस्कृती तिथल्या अभिजन वर्गामुळे विकसित होत नसते. तर तो वर्ग त्यावर अवैध कब्जा करून बसलेला असतो.
परखड लेख.वायर नावाच असच एक जमाते पुरोगामी पोर्टल आहे तिथे हे अभिजन वर्ग काय ज्ञान पाजळतात बघु म्हनल तर तुमच महनन खर ठरत.मोदींच्या वेबसाइटवर संविधान हा आपला पवित्र ग्रंथ आहे आणि ते १२५ कोटी लोकांचे PM आहेत अस लिहीलय.तर या कब्जेवाल्यांना ते ही बघवेना म्हने संविधानाला आम्ही शिव्याघालु बदल करु कारन ते मानवनिर्मीत आहे जरा कल्पना करा घटनेत काही बदल नसताना इथ मोर्चे निघतात ह्च जर विधान भाजपन केल असत तर? आणि म्हने भारतात विविधता असताना मोदी सर्व लोकांना एकच कसे काय ठरवु शकतात.म्हनजे भारताच्या pm नि वेबसाइटवर लिहायच की मी १०० कोटी हिंदुचा १७ कोटी मुस्लिम न 2 कोटी ख्रिस्तींचा pm आहे? आणि तस लिहिल तर हेच लोक काय म्हनतील? इतकी बदमाशी चालुय
ReplyDeleteहमीद अन्सारी नावाचे पुरोगामी गृहस्थ आता पुढे आलेत पुस्तक घेउन,म्हने मोदींनी माझा अपमान केला संसदेत.ते पा्रलमेंटरीयन झाले नाहीत अजुन,त्यांना समोर मतदार दिसतो.मोदी राजकारनी आहेत त्याना मतदार दिसनार,तुम्ही तर नाही ना मग आधी सुरुवात का केलीत? रीटायर व्हायच्या आदल्या दिवशी अल्पसंख्य लोक असुरक्षित आहेत हा साक्षात्कार कसा काय झाला उपराष्ट्रपतींना आणि तस बोलन पदाला शोभत का? ते बोलुन तुम्ही पन मतदारालाच चुचकारत होता ना? दुसर्या दिवशी मोदींनी सडेतोड उत्तर दिल की झोंबत
ReplyDeleteभाऊ या सनातनी पुरोगाम्यांच्या ताब्यात आतापर्यंत देशातील मुख्य मीडिया होता त्यामुळे गेली 70 वर्षे काँग्रेसचे राज्य सुखेनैव या देशावर चालू होते त्यामुळे संघ, सावरकर यांची महात्मा गांधींच्या हत्येवरून यथेच्छ बदनामी केली गेली गुजरातच्या दंग्यांवरून मोदींची कोंडी केली गेली,दिल्लीतील शिखांचे हत्याकांड पद्धतशीर दाबून टाकण्यात आले मात्र social मीडिया आले आणि या लोकांचा खोटारडेपणा उघडा पडला राजदीप बरखा कुमार केतकर शेखर गुप्ता या लोकांचे महत्त्व पूर्णपणे संपुष्टात आले जनतेला फसवणे आत्ताच्या social मीडियाच्या काळात अजिबात शक्य राहिले नाही त्यामुळे या सनातनी पुरोगाम्यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे
ReplyDelete