Thursday, July 12, 2018

मुस्लिमांनाच हिंदूराष्ट्र हवे

संबंधित इमेज

दुष्काळात तेरावा, अशी एक मराठी उक्ती आहे आणि दुर्दैवाने कॉग्रेस पक्षाचे तीनतेरा झालेले असताना असे तेरावे, चौदावे एकामागून एक येतच असतात. दिग्विजय सिंग यांना जरा कुठे आवरले, तर मणिशंकर अय्यर थोबाड उघडतात. त्याला पक्षातून बाजूला केले तर शशी थरूर बोलू लागतात. एकूण अशा नेत्यांनी कॉग्रेसला पुरती बुडवून टाकण्याचा असा संकल्प केलेला आहे, की ब्रह्मदेवाचा बापही साक्षात अवतरला, तरी दुर्दशेतून कॉग्रेसला सावरणे अशक्य आहे. कॉग्रेसपाशी एकही नामवंत नेता आज असा उरलेला नाही, की जो आपल्या बळावर पक्षाची विस्कटलेली घडी सावरेल आणि संघटनेला संजीवनी देऊ शकेल. निसर्गात झाडावर पोसली जाणारी बांडगुळे जशी त्याच झाडाचा जीवनरस शोषून त्याला मारून टाकत असतात, तशा एकाहून एक नमूनेदार नेत्यांचा पक्षात मोठा भरणा आहे. शशी थरूर त्यापैकीच एक आहेत. सध्या त्यांना आपल्यावरच्या पत्नी मृत्यूच्या खटल्याने इतके भंडावून सोडले आहे, की त्याची चर्चा होऊ नये म्हणून थरूरना सतत कुठल्याही तरी वायफ़ळ वादामध्ये गुंतायचे कष्ट घ्यावे लागत असतात. अन्यथा तितका बेताल बडबडणारा हा माणूस नाही. पण माध्यमातून सुनंदा पुष्कर मृत्यू विषयात जामिन मिळालेला आरोपी असली चर्चा होऊ नये, म्हणून थरूर भलत्याच खुळचट विधानांचा आडोसा सतत घेऊ लागले आहेत. अन्यथा त्यांनी भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असली बाष्कळ भाषा केली नसती. पुन्हा म्हणजे २०१९ सालात भाजपाला बहूमत व सत्ता मिळाली, तर भारताचा हिंदू पाकिस्तान होईल असे त्यांनी म्हटलेले आहे. त्याचा अर्थ त्यांना तरी कळला आहे काय? त्यांच्या शब्दाचा जसाच्या तसा अर्थ घ्यायचा, तर आजवरचा भारत हा कॉग्रेसी पाकिस्तान होता की पुरोगामी हिंदूस्तान होता, असा प्रश्न पडतो. मग त्या कॉग्रेसी पाकिस्तानचा आशय समजून घेणे भाग पडते.

हिंदू पाकिस्तान म्हणजे हिंदूधर्मियांचे वर्चस्वाचा किंवा हिंदू धर्मांधतेचे राज्य असलेला पाकिस्तान, असेच थरूर यांना म्हणायचे आहे. पण असले विधान करण्यापुर्वी त्यांनी हिंदूंच्या धर्मांधतेचे राज्य जगाच्या पाठीवर कधी व कोठे अस्तित्वात होते, त्याचा तरी दाखला द्यायला नको काय? उदाहरणार्थ अलिकडल्या काळात हिंदू राष्ट्र म्हणून ज्याचा जगात उल्लेख व्हायचा, असा एकमेव देश नेपाळ होता. आता तिथलीही राज्यघटना बदलून गेली आहे आणि राजेशाही जाऊन आलेल्या लोकशाहीने तिथे धर्मनिरपेक्ष घटना आणलेली आहे. पण त्या धर्मनिरपेक्ष राज्यघटनेला घाबरलेला पहिला समाज घटक कोणता याची तरी माहिती थरूर वा तत्सम दिवट्या पुरोगाम्यांना आहे काय? मध्यंतरी नेपाळमध्ये नव्याने राज्यघटना बनवण्याचा प्रयोग झाला आणि त्याच्या विरोधात व बाजूने बरेच आवाज उठत होते. त्यात हिंदूधर्माला प्राधान्य देणारीच घटना असावी असा आग्रह काही गटांनी धरला आणि त्यात हिंदूंचाच भरणा होता, यात शंका नाही. पण नेपाळला धर्मनिरपेक्षतेतून बाजूला ठेऊन पुन्हा हिंदू राष्ट्र करावे, अशी मागणी करणारा एक भिन्न धर्मीय समाजघटक होता. त्या घटकाचे नाव मुस्लिम असे आहे. नेपाळमध्ये सेक्युलर घटना नको, कारण त्यापासून इस्लामला धोका असल्याचा दावा करीत, हे मुस्लिम गट व त्यांच्या संघटना रस्त्यावर आलेल्या होत्या. पण तिथे इस्लामी धर्माचे राज्य व्हावे, अशीही त्यांची मागणी नव्हती. तर मुस्लिमांना सुखरूप आपला धर्म पाळता यावा म्हणून पुन्हा हिंदू राष्ट्र व्हावे, अशीच काहीशी चमत्कारीक मागणी होती. पण असल्या बारीकसारीक गोष्टी लक्षात घ्यायला थरूर वा अन्य पुरोगाम्यांना वेळ कुठे असतो? त्यांना आपल्या पढतमुर्ख पांड्डित्याचे प्रदर्शन मांडण्यातून सवडच कुठे असते? त्यामुळे असली मुक्ताफ़ळे उधळण्यातच त्यांचे आयुष्य खर्ची पडत असते आणि त्यात कॉग्रेस पक्षाचा बळी जात असतो.

या नेपाळी मुस्लिमांना सेक्युलर घटना वा देशापेक्षाही ‘हिंदूराष्ट्र’ सुरक्षित कशाला वाटत होते? त्याचाही खुलासा एक मुस्लिम महिला नेत्या अनारकली मिया यांनी केला होता. तो असा, की सेक्युलर घटना म्हणजे ख्रिश्चन मिशनर्‍यांना खुलेआम धर्मांतराला आमंत्रण आहे आणि त्यापासून अल्पसंख्य मुस्लिम समाजाला धोका आहे. म्हणून हिंदूराष्ट्र बरे, कारण हिंदू धर्मांतराचा अट्टाहास करून मुस्लिमांचे हाल करीत नाहीत. अशा बातम्या आपल्या भारतीय माध्यमात शोधाव्या लागतात. त्या असतात खळबळजनक. पण त्या छापल्या जात नाहीत. कारण त्या हिंदूधर्मियांच्या निरपेक्षतेचे पुरावे असतात आणि ‘हिंदूराष्ट्र’ नावाच्या संकल्पनेला बळ देणार्‍या असतात. मग त्या दडपण्याला विचारस्वातंत्र्य मानले जाते आणि अविष्कार स्वातंत्र्याचा जयघोष करता येत असतो. ही घटना ३ वर्षे जुनी आहे. पण किती मराठी, हिंदी वा इंग्रजी वर्तमानपत्रे वा वाहिन्यांवर झळकलेली आहे? ठिपूस आढळणार नाही. पण त्याच वेळी हिंदूराष्ट्र म्हणजे कशी धर्मांधता आहे, त्याचे दाखले देण्यासाठी गोळवलकर किंवा सावरकर यांच्या जुन्या लेखन पुस्तकांची भिंगातून तपासणी केली जाते. शिळ्या कढीला ऊत आणला जातो. पण नेपाळमधल्या ताज्या घटनांना दडपून टाकले जाते. ही आजची पत्रकारिता व बुद्धीवाद झालेला आहे. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनीही काही वर्षापुर्वी हिंदूंच्या धार्मिक सौहार्दतेची ग्वाही देताना म्हटलेले होते, की भारत धर्मनिरपेक्ष देश राहू शकला, यामागे कुणा पुरोगामी पक्ष वा नेत्यांचे कर्तॄत्व अजिबात नाही. बहूसंख्य हिंदू समाजाच्या मानसिकतेचा तो परिणाम आहे. पण थरूर वा तत्सम दिवट्यांना अशा गोष्टी समजू शकत नाहीत, की कळतही नाहीत. पुस्तकी पोपटपंची करणार्‍यांचा वास्तविकतेशी कुठे संबंध असतो? त्यामुळे असे लोक नेहमी कॉग्रेसी पाकिस्तानात रममाण झालेले असतात.

हिंदू दहशतवाद नावाच्या पाखंडाने कॉग्रेसला मागल्या निवडणूकीत पुरते जमिनदोस्त करून टाकलेले आहे. आता जे काही बळ उरले आहे, ते संपवण्यासाठी थरूरसारखे लढवय्ये कामाला लागलेले आहेत. त्यातून मग बहूसंख्य हिंदू मतदारापैकी अजून जे कोणी सहानुभूतीदार शिल्लक असतील, त्यांना कॉग्रेसपासून पळवून लावण्याची नवी योजना आखलेली आहे. तिला ‘हिंदू पाकिस्तान’ असे त्यांनी नाव दिलेले आहे. त्यातून एक गोष्ट ते मान्य करतात, की पाकिस्तान धर्मांध देश आहे आणि भारताला असल्या मनस्थितीचा धोका आहे. पण ती मानसिकता स्वातंत्र्यपुर्व काळापासून होती आणि त्यामुळेच देशाची फ़ाळणी झाली. उरलेल्या भारतातील बहुसंख्य हिंदूंनी कधी मुस्लिमांना परके वागवले नाही, की भेदभाव केला नाही. बहूसंख्य हिंदू असतात तिथेच सेक्युलर विचार तग धरू शकतो आणि ते प्रमाण बिघडले, की काश्मिरचाही पाक होऊन जातो. ज्या कॉग्रेसी धोरणे व मनोवृत्तीचे थरूर गुणगान करीत असतात, त्यांनी काश्मिरला भारतात राहूनही पाकिस्तान करून टाकलेले आहे. त्याला विकृत सेक्युलर राजकारण जबाबदार आहे. जर फ़ाळणीनंतर उर्वरीत भारताचा ‘हिंदू’स्तान झाला असता, तर काश्मिरही कॉग्रेसी पाकिस्तान झाला नसता. किंवा तसल्या वृत्ती पुन्हा भारतातही डोके वर काढू शकल्या नसत्या. मुळातच कॉग्रेसी पाकिस्तानचा अनुभव घेऊन पिडलेल्या हिंदू-मुस्लिमांनी भारत सेक्युलर राखण्यासाठीच भाजपाला मोठ्या संख्येने निवडून दिलेले आहे आणि त्याचा खराखुरा पाकिस्तान होण्यापासून वाचवले आहे. पुन्हा इथे कॉग्रेस वा तिच्या नेतृत्वाखाली सेक्यु्लर विचारांची सत्ता आली, तर भारताचाच धर्मांध जिहादी पाकिस्तान होऊन जाईल, अशी लोकांना भिती वाटते. म्हणून भारतीयांना नेपाळी मुस्लिमांप्रमाणे भारत हे ‘हिंदूराष्ट्र’ व्हावे असेही वाटते. आज दिसते ती मोदी-भाजपाची लोकप्रियता नसून थरूर-राहुल देशाचा पाकिस्तान करून टाकतील, याचा भयगंड मोदीलाट निर्माण करीत असतो.

https://www.youtube.com/watch?v=Wei-n2EvUQA
http://insistpost.com/9525/why-is-christianity-thriving-in-nepal/
http://zeenews.india.com/news/south-asia/muslims-in-nepal-demand-a-hindu-state_1646037.html
https://www.youtube.com/watch?v=WYVlCvudVFw
https://www.thenewsminute.com/article/muslims-nepal-ask-hindu-nation-say-no-secularism-33079

10 comments:

  1. योग्य विश्लेषण .

    ReplyDelete
  2. गेल्या वर्षी म्हणजे ३० जुलै २०१७ रोजी हिना रब्बानी खर या पाकिस्तानी राजकारणीशी बोलताना याच शशी थरूर यांनी भारताचा हिंदू पाकिस्तान होणार नसल्याची ग्वाही दिली होती व त्याची जाहीर वाच्यता आपल्या twitter वरून हि केली होती आज १ वर्षाच्या आत शशी थरूर पाकिस्तानी agenda राबवत आहेत

    ReplyDelete
  3. मानलं भाऊ तुम्हाला... नेपाळ चा अचूक संदर्भ शोधून काढला तुम्ही. खरच ह्याला म्हणतात विचारवंत, ह्याला म्हणतात पत्रकार. तुमच्या सारखा बिरबल अजून अकबराच्या नजरेत कसा आला नाही...

    ReplyDelete
  4. Congress do opposite whatever bjp does,if bjp is for Hindu Pakistan then opposite Congress will Muslim Pakistan? I choose Hindu Pakistan rather Muslim Pakistan

    ReplyDelete
  5. Abbbb Bhau, Cant resist my self from reacting to this, Thanks for this. Day by day your thought or rather truth you write is spreading and making people aware that we were exploited intellectually by group of people in this country.
    Thanks again, only one request I want to make that, please pass on all your skills to the correct person.

    ReplyDelete
  6. शशी थरूरला अशी बडबड करायला भाजपनेच सुपारी दिली की काय असे खांग्रेसवालेच बोलू लागलेत.

    ReplyDelete
  7. भारतात परिस्थिती वेगळी आहे.येथील मुसलमान वरच्या वर्गातले स्वत:ला येथील राजे समजतात.शिवाय ख्रिश्चन भारतामध्ये मुस्लिमाना बाटवू शकत नाहीत.

    ReplyDelete
  8. पुरोगामी धर्माच्या भाटानी अखिल भारतीय काँग्रेसचे पाकिस्तानी काँग्रेस केले. नंतर काश्मीर चे वाटोळे केले
    आता भारताचे पाकिस्तान करण्याचा घाट घातला आहे मणिशकर, थरूर हीच मुहजिर काँग्रेसचे उच्चाटन करतील.

    ReplyDelete