Saturday, July 14, 2018

राजसत्ता आणि धर्मसत्तेचा संघर्ष

Image result for secular islam cartoon kureel

Religion is what keeps the poor from murdering the rich.   - Napoleon Bonaparte

जगातल्या कुठल्याही देशात वा समाजात गेलात तर तिथे धर्माचे पाखंड माजवलेले दिसेल. हे पाखंड जे माजवू शकतात, त्यांना तिथले सत्ताधीश हाताशी धरतात आणि खुश ठेवतात. अर्थात धर्म म्हणजे मशिद-मंदिर वा चर्च इतकाच मर्यादित नसतो. धर्म असे काहीच नसते. मोठ्या लोकसंख्येच्या मनावर जे हुकूमत गाजवू शकतात, हे लोक स्वर्गनरक वा पापपुण्याचा असा आभास निर्माण करतात, की त्यातून जनमानसात एक भयगंड निर्माण केला जातो. मग त्या भयगंडावर कुठल्याही शस्त्राविना हुकूमत गाजवता येत असते. वास्तवात ती दहशत कुठल्याही हिंसेपेक्षाही अधिक परिणामकारक असते. मग असे जे लोक असतात, तेच पुण्य वा पापाची आणि स्वर्ग नरकाची वर्णने करीत असतात आणि बाकीची सामान्य माणसे त्यांची वर्णने ऐकूनच गारद होत असतात. तसे नसते तर अजमल कसाब कराचीहून इथे मुंबईत मरणाच्या जबड्यात उडी घ्यायला कशाला आला असता? शत्रूदेशात हिंसा माजवून वा मुडदे पाडून आपल्याला सुखरूप मायदेशी परत जाता येणार नाही, हे समजण्याइतकी बुद्धी त्याच्यापाशी नक्कीच होती. न्युयॉर्कच्या जुळ्या मनोर्‍यावर विमाने आदळ्ल्यावर आपणही त्यात मृत्यूमुखी पडणार, हे त्या बिन लादेनच्या सवंगड्यांना पक्के ठाऊक होते. मग ते त्यात मनपुर्वक कशाला सहभागी झालेले होते? तर त्यात त्यांना धर्माचे योद्धे म्हणजे पवित्र कामाचे पाईक बनवले गेलेले होते. त्यातून मिळणारे पुण्य त्यांना थेट स्वर्गाची दारे खुली करणार होते. अशी त्यांच्या मनावर हुकूमत गाजवू शकणारा जो कोणी असेल, तो खरा धर्ममार्तंड असतो. त्याचा धर्म कुठला किंवा विचारधारा कुठली, असले प्रश्न विचारून उपयोग नसतो. जनमानसाला खेळवण्याची त्याची क्षमता वा कौशल्य त्याला धर्ममार्तंड बनवित असते. एकदा त्यांचा शब्द प्रमाण मानला, की अशा लोकसंख्येवर निर्वेध राज्य करता येत असते. कधी त्या़चे नाव इस्लाम वा हिंदू असते, तर कधी त्याचे नाव माओवादही असू शकते. व्यवहारात तो धर्माचेच काम करीत असतो.

सामान्य माणसाला पापपुण्य वा स्वर्गनरक असल्या कल्पनांनी भारावून टाकणे खुप सोपे असते. त्याच्या मनात एकदा असल्या कल्पना भरवल्या, मग त्यांना स्वतंत्रपणे विचार करता येत नाही की स्वयंभूपणे विवेकाने काही करता येत नाही. प्रतिके वा शब्द पुढे करून अशा जनसमुहाच्या मनावर राज्य करत असतात. त्यां कुशल लोकांत भले शस्त्र उगारून लढाया लढण्याची मर्दुमकी नसते. पण सामान्य जनतेला काबूत ठेवण्याची कुवत नक्की असते. ते पिडीत वंचित लोकांना खेळवू शकत असतात आणि त्यांच्याच मदतीने कुठलीही जुलमी सत्ता दिर्घकाळ निश्चींतपणे राज्य करू शकत असते. म्हणून अशा बुद्धीमान कुशल विचारवंतांना सत्ताधीश नेहमी आपल्या आश्रयाला ठेवत असतो. पंडित नेहरूंनी सत्ता हाती आल्यावर अतिशय धुर्तपणे अशा एका वर्गाला हाताशी धरले. त्याच्या पोटपाण्याचीच नव्हेतर ऐषारामाची सोय लावली. पण तसे करताना त्यांनी त्यांच्याकडून पुढल्या अनेक पिढ्या तसे कुशल प्रचारक व विचारवंत निर्माण केले जातील, असे कारखानेही उभे करून घेतले. आज देशाच्या एकाहून एक नामांकित विद्यापीठातील प्राध्यापक वा विद्यार्थी पुरोगामी भाषा कशाला बोलतात, त्याचे उत्तर उपरोक्त विवेचनातून लक्षात येऊ शकेल. स्वातंत्र्य मिळून सात दशकाचा कालावधी उलटून गेला, तरी ६०-७० टक्के जनतेला किमान गरजेच्या गोष्टी मिळू शकल्या नाहीत. तर त्याचा दोष विद्यमान मोदी सरकारचा नसून इतका काळ सत्ता उपभोगणार्‍या कॉग्रेसचा तो गुन्हा आहे. तितका़च ते तथाकथित पुरोगामी धोरणाचे पाप आहे. १९९१ सालात नरसिंहराव यांचे कॉग्रेस सरकार सत्तेत आले आणि त्यानंतर आर्थिक सुधारणा सुरू झाल्याचा खुप डंका पिटला जातो. पण त्याआधी ४४ वर्षे आर्थिक बंदिस्तीकरण कोणी करून ठेवले होते? तेही नेहरू व त्यांच्या समाजवादी विचार भूमिकांचेच पाप होते ना? त्याविषयी किती बोलले जाते?

मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून १९९१ सालात मुक्त अर्थव्यवस्था आणली असेल, तर तिला आधीपासून बंदिस्त गुलाम कोणी करून ठेवलेले होते? प्रत्येक बाबीत निर्बंध व नियंत्रणे लावून अर्थकारण व उद्योग व्यापाराची नाकेबंदी नेहरू वा त्यांच्या धोरणांनीच केलेले असेल तर गुन्हेगार नेहरूच ठरतात ना? किंबहूना त्यांच्या अशा आर्थिक कोंडी करणार्‍या धोरणांना विरोध करणार्‍यांना उजवे किंवा प्रतिगामी कोणी ठरवले होते? इथल्या स्वातंत्र्योत्तर बुद्धीवादी लोकांनीच ते पाप केलेले होते ना? पण नेहरूंच्या काळात देशाला अधिकाधिक गरीबी व बेकारीत लोटले जाण्याला भारताचे भाग्य घडवणारा स्वर्ग ठरवणारे कोण होते? भारतातले संपादक, अभ्यासक, शहाणे सर्व़च समाजवादी होते ना? त्याच समाजवादाने देशाला अधिकाधिक गरीबी व दिवाळखोरीच्या खाईत लोटत नेले. पण त्याला़च विकास वा प्रगती असल्याची प्रमाणपत्रे व प्रशस्तीपत्रे देणारे कोण होते? आजही आहेतच ना? नेहरूंना देशाचा भाग्यविधाता ठरवणार्‍यांनीच, विचारवंत म्हणून गरीबी जनतेच्या माथी मारली आणि त्याला गुंगीत ठेवले. त्या गरीबीत पिचणार्‍यांनी कधी श्रीमंतांचे मुडदे पाडले नाहीत की त्यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उचलला नाही. कारण त्यांना समाजावादी साम्यवादी स्वर्गाची स्वप्ने दाखवून आभासात रममाण करणारे पुरोगामी धर्ममार्तंड इथे मोकाट होते. त्यांच्यासाठी नेहरूंनी विविध विद्यापीठे, अभ्यास संस्था व अकादम्या उघडून दिलेल्या होत्या. त्याच्या अनुष्ठानी ऐषारामात पैसा कमी पडू नये, अशी वतने अनुदाने दिलेली होती. त्यांनी सतत नेहरू वा त्यांच्या कुटुंबियांच्या कर्तॄत्वाचे गुणगान करावे आणि त्यांना कल्याणकारी राज्यकर्ते ठरवून भाटगिरी करावी, इतकीच अपेक्षा होती. बदल्यात नेहरूंनी त्यांची सर्व चैनीची सोय लावायची होती. हा एकप्रकारचा धर्म होऊन गेला आणि गरीब वंचित अन्याय सोसूनही आनंदित रहायला शिकत गेले होते.

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे नेहमीच असे साटेलोटे असते. जेव्हा ही धर्मसत्ता राजसत्तेला जुमानत नाही, तेव्हा त्यांचा बंदोबस्त राजसत्तेला करावा लागतो. अलिकडेच काही महिन्यांपुर्वी सौदी अरेबियात एका राजपुत्राने सत्ता बळकावली व इतर राजपुत्रांना मारले किंवा शरण यायला भाग पाडले. त्याच्या वाटेत आडवे येणार्‍या तिथल्या काही काजी मौलवींनाही उचलून तुरूंगात डांबले गेले. जे मौलवी नव्या सुलतानाची पाठ थोपटत होते, त्यांना धर्माधिकारी म्हणून मान्यता दिली गेली आणि बदल्यात त्यांनी नव्या राजपुत्राची तळी उचलून धरलेली होती. हेच सोवियत युनियनच्या काळात रशियामध्येही चाललेले होते. तिथे धर्माला अफ़ूची गोळी मानले जात होते. पण धर्माचार्यांच्या ऐवजी विचारवंत अभ्यासक व संपादक लेखक यांना धर्ममार्तंडाचा दर्जा देण्यात आलेला होता. अमर्त्य सेन काय म्हणतात? अमूकतमूक साहित्यिकाने काय तारे तोडले, त्याचे कौतुक आपल्याकडे तसेच चालते. कारण भारतीय लोकशाहीत नेहरू खानदानाची राजेशाही पुरोगामी राज्यव्यवस्था म्हणून पद्धतशीरपणे लोकांच्या माथी मारलेली होती. त्यात मग अशा पुरोगामी धर्माचार्यांचे हवाले दिले जातात. कुराण, बायबल वा कुठल्या धर्मग्रंथाचा हवाला द्यावा, तसा आपल्याकडे अशा मान्यवरांचे मत दाखला म्हणून दिला जात असतो. त्यातून पापपुण्याच्या कल्पना रुजवल्या जातात व बळकट केल्या जातात. असे दोन वर्ग एकमेकांना पुरक म्हणून काम करीत असतात. त्यांच्या हितसंबंधांना बाधा आली, मग तात्काळ लोकशाही धोक्यात आली, अशी आरोळी ठोकली जात असते. अघोषित आणिबाणी आली म्हणून अफ़वा पिकवली जात असते. वास्तवात त्यातले काहीही घडालेले नसते किंवा अतशी शक्यताही नसते. पण हे शेकडो वर्षे चालत आलेले आहे आणि कुठल्याही राज्यव्यवस्थेमध्ये ते सहजगत्या रुजवले जोपासले जात असते.

अशा समजुती वा भमातून लोकसंख्या बाहेर पडू लागली, मग या अभिजन व सत्ताधीश वर्गाची मोठी तारांबळ उडत असते. गुंगी दिलेल्या व्यक्तीला अकस्मात अपेक्षेपेक्षा लौकर जाग येऊ लागली; मग पुन्हा घाईगर्दीने त्याला गुंगीचे औषध देण्याचा आटापीटा सुरू होतो, त्यातलाच हा प्रकार आहे. २०१४ साली यापैकी कोणा सत्ताधीश वा त्यांनी पोसलेल्या धर्माचार्यांना समाज इतका खडबडून जागा होईल, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. मतदानाच्या सुरूवातीला तशी शक्यता दिसायला लागल्यावर त्यांची तारांबळ उडाली होती. मग त्यांनी सामान्य जनतेला पापपुण्याच्या स्वर्गनरकाच्या गोष्टी सांगायला आरंभ केलेला होता. कोणी देश सोडून पळून जाव्रे लागेल म्हणत होता, तर कोणी देशाचा सत्तानाश होण्याची हमी देऊन घाबरवित होता. आज चार वर्षे उलटून गेल्यावरही देश शाबुत आहे आणि जगात देशाची प्रतिष्ठा वाढलेली आहे. त्याकडे बघता, हे तमाम पुरोगामी धर्माचार्य किती भोंदू होते व आहेत, त्याची साक्ष मिळते. चार वर्षापुर्वीच्या मतमोजणीने त्यांन धक्का दिला आणि त्या ग्लानीतून जाग येईपर्यंत दोनतीन वर्षे उलटून गेली होती. आता आणखी काही महिन्यात देशाच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्यात पुन्हा एकदा असे कालबाह्य धर्माचार्य आपले नशीब आजमावून बघायला मैदानात उतरलेले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा जुन्याच आरोपांच्या फ़ैरी सुरू केल्या आहेत. मग लोकांना असा प्रश्न पडतो, की हे तथाकथित विचारवंत मोदींचा इतका द्वेष कशाला करतात? मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यात वा कशातही कुठली बाधा आणलेली नाही. मग अशा द्वेषाची गरज काय? कारण काय? त्याचे उत्तर राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या मैत्रीत सामावलेले आहे. मोदींनी अशा पुरोगामी धर्माचार्यांना प्यार असलेली राजसत्ता उलथून पाडली याचे दु:ख अजिबात नाही. संताप रोष आहे, तो नव्या सताधीशाने आश्रय नाकारण्यासाठीचा .

कुठल्याही अशा धर्ममार्तंड वा धर्माचार्यांना कुठला धर्म वा विचारधारेशी अजिबात कर्तव्य नसते की ममत्व नसते. त्यांना आपल्या व्यक्तीगत स्वार्थ व ऐषारामाशी कर्तव्य असते. राजा बदलला तरी पौरोहित्य व धर्मचिकित्सा करण्याचा अधिकार आपल्यापाशी कायम असावा, इतकाच त्यांचा आग्रह असतो. राजाने शस्त्रबळावर हुकूमत गाजवावी आणि जनमानसावर धर्माचार्यांची हुकूमत सन्मानित करावी, असा अट्टाहास असतो. मोदी सत्तेत येण्यापुर्वी सहा दशकात सत्ताधीश कितीतरी बदलत गेले. पण ज्याला धर्मसत्ता म्हणतात, अशी विचारवंत, अभ्यासक वा बुद्धीजिवी वर्गाची जी टोळी दिर्घकाळ जनमानसावर हुकूमत गाजवत होती, तिचा अधिकार संकटात आलेला नव्हता. तिला नवा सत्ताधीश धुप घालत नाही की त्यांच्या शिव्याशापांना किंमत देत नाही. तथाकथित समाजवादी, साम्यवादी वगैरे जी विचारधारा नेहरूंनी रुजवली, तिला नेहरूवाद म्हणतात. ती धर्मसत्ता होती. सत्ताधीश बदलला तरी विचारधारा कायम होती आणि त्या व्यवस्थेत विविध गटातटांची सोय छानपैकी लावून देण्यात आलेली होती. ती मोदी नावाच्या नव्या सत्ताधीशाने विस्कटून टाकलेली आहे. तथाकथित अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, मान्यवर, साहित्याचार्य, कलाक्षेत्रातले मक्तेदार अशा कुणालाही मोदी जुमानत नाहीत वा आश्रयही देत नाहीत. त्यांचे विविध मठ निकालात काढले गेले आहेत. नियोजन आयोग, साहित्य अकाद्मी अभ्याससंस्था, विद्यापीठे यांची ज्ञानक्षेत्रातली मक्तेदारी नव्या सत्ताधीशाने लिलावात काढलेली आहे. म्हणून त्यांना धर्म धोक्यात आलेला दिसतो आहे. धर्म वा लोकशाही वगैरे काहीही धोक्यात आलेली नसून पुरोगामी धर्माचार्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आलेला आहे. त्यांना बाजूला करून आजचा सत्ताधीश थेट लोकांशी संवाद साधतो, माध्यमे वा संपादकांना विचारत नाही, हे खरे दुखणे आहे. म्हणून मग महापाप म्हणून आरोळ्या ठोकल्या जात आहेत. पण ऐकणारा कुणीच राहिलेला नाही.

सरकारच्या विविध योजनांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचू लागलेले आहेत आणि समाजमनाची मक्तेदारी म्हणून चाललेला अशा आधुनिक धर्माचार्यांचा ऐषाराम संपुष्टात आल्याने ते विचलीत झालेले आहेत. गरीबांना झुलवण्याची गरज उरलेली नाही, कारण पापपुण्याच्या स्वर्गनरकाच्या भ्रमातून लोक हळुहळू बाहेर पडत चालले आहेत. ते असे समजूतीतून बाहेर पडले, तर या पापपुण्याच्या मक्तेदार दुकानदारांची गरज उरत नाही. निरोगी असल्याचे रोग्याला उमजू लागले तर दवाखाने चालवायचे कसे? ही समस्या झाली आहे. पुरोगामी, समाजवादी म्हणून सहा दशके चाललेले बाजार उठत चालले आहेत. आपण गरीबांचे वाली म्हणून मिरवण्याच्या जागा संपत गेल्या आहेत. पुरोगामीत्वाचा मुखवटा फ़ाटत गेला आहे. मग त्यावरच गुजराण करणार्‍यांनी मेटाकुटीला आल्यास नवल कुठले? बहूजन समाज जेव्हा पापपुण्याच्या फ़ेर्‍यातून मुक्त होतो, तेव्हा त्याला मोक्ष देण्यासाठी कुणी मध्यस्थ धर्माचार्याची गरज उरत नाही. आज देशातील अधिकाधिक जनता सुबुद्ध व स्वयंभू होऊ लागली आहे. तिला अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा होऊ लागल्याने अनुदानासाठी झुंजणार्‍या दलालांची गरज वाटेनाशी झाली आहे. आर्थिक घोटाळ्यात गुंतलेल्यांना कोर्टात खेचले जात आहे. हे असेच चालू राहिले तर पुन्हा मोदी विजयी होतील आणि पुढल्या पाच वर्षात नेहरूवादी धर्माचे नामोनिशाण पुसले जाईल, अशा भयगंडाने अनेकांना पछाडलेले आहे. त्याचा अर्थ त्यांना पुन्हा नेहरू घराण्याची सत्ता आणायची आहे किंवा राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, असेही नाही. त्यांची अपेक्षा खुप कमी आहे. त्यांना मोदी वा कोणाही सत्ताधीशाने आजही त्यांच्या धर्माचार्य असण्याला मान्यता द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. ते मोदींच्या चुकांवर पांघरूण घालतील व बदल्यात मोदींनी त्यांना जनमानसावर हुकूमत गाजवण्याची मोकळीक द्यावी. पण त्यात अडचण इतकीच आहे, की मोदींना अशा कुणा मध्यस्थाची गरजच राहिलेली नाही. आपण करतो तो कारभार अन्याय्य असेल तर जनता आपल्याला पराभूत करील, इतका मोदींचा आपल्या कामावर विश्वास आहे. मग या पुरोगामी धर्माचार्यांने भवितव्य काय?

17 comments:

  1. एक नंबर भाउ काही शब्दच नाही बोलायला.तुम्ही म्हनताय तस घडतय खर सामान्य मानसाच्या लक्षात येत नाही पन ज्यांना त्रास होतो ते विव्हलतायत.ते मोदींनी लोकशाही संस्था मोडीत काढल्याचा जप करतात ते त्यांना प्रवेश नाकारल्याचा ओरड आहे. विदेशी दौर्यावर पन नेत नाहीत पत्रकांराना फुकट मग ते गुणगाण थोडीच करनार

    ReplyDelete
  2. आता कळल की नीती आयोग वगेरे मोडीत काढल्यावर पुरोगीम्यांना वेदना का झाली? ती नेहरुची देन होती त्याचा जनतेला काहीच फायदा झाला नसेल तर मोडीत काढण्याने दुख होत नाही,ज्यांचा तोटा झाला ते रडतात.

    ReplyDelete
  3. मला तर वाटतय मोदी किडनाशक फवारणीच करतायत सगळे बाहेर पडतायत,पोखरनारे जज्ज,नियोजन आयोग,upsc,jnu,amu,पत्रकार Bollywood,सगळी कीड बाहेर येतेय.2019 नंतर मोदी काय करतील ते बरेच ऐतहासिक असेल अर्थात ते pm बननारच आहेत

    ReplyDelete
  4. 'excellent is under-rated....this time you have come up with crystal clear reality...an absolute treat to read..

    ReplyDelete
  5. Bhau,spell bound!!!! खरंच झणझणीत अंजन!!

    ReplyDelete
  6. Congress cha curuption charm and bjp cha kalpanik Puran dharm . Wanchit,soshit jantesathi Saman ahet.

    ReplyDelete
  7. त्यांच्या पोटापाण्याची सोय लावली, ऐषारामाची सोयच नव्हे तर सवय हि लावली

    ReplyDelete
  8. जबरदस्त. हिंदीत घेतोय, अर्थात नामोल्लेखासकट.

    ReplyDelete
  9. भाऊ , तुफान फटकेबाजी ! पुरोगामी धर्ममार्तंडांची इतकी खतरनाक हजामत तुमच्याशिवाय कुणीच करू शकत नाही ! सत्य मांडण्यासाठी शब्द किती अचूक प्रभावी असावेत याचे सर्वोत्तम उदाहरण आपण आहात भाऊ ! हॅट्स ऑफ !!������

    ReplyDelete
  10. सर मी ही पोस्ट शेअर केले तर चालले का?

    ReplyDelete
  11. चपखल भाषा, मार्मिक विश्लेषण

    ReplyDelete
  12. जबरदस्तच आहे

    ReplyDelete
  13. एकदम सडेतोड..आणि स्पष्ट..! आवडलं..

    ReplyDelete
  14. २०१४ च्या झालेल्या पराभवाचं अन् पुढे निश्चितपणे होणार्या पराभवाचं अगदी मुद्देसुद विश्लेषण आहे भाऊ.....

    ReplyDelete