Saturday, July 7, 2018

माणूसकी मरते तेव्हा

delhi mass suicide के लिए इमेज परिणाम

दिल्लीत एकाच कुटुंबातल्या ११ लोकांनी आत्महत्या केली, किंवा संशयास्पद रितीने त्यांचा मृत्यू समोर आला आहे. बंद घराच्या दाराआड काय चालले आहे, त्याचा थांगपत्ता शेजार्‍यांना नव्हता किंवा आप्तस्वकीयांनाही नव्हता. त्यामुळेच जेव्हा या गोष्टीचा सुगावा पोलिसांना लागला आणि अकरा मृतदेह समोर आले, तेव्हा आसपासचेच लोक नव्हे, तर देशातले बहुतांश लोक हैराण होऊन गेले. जेव्हा ही सामुहिक आत्महत्येसारखी बातमी आलेली होती, त्याच दरम्यान महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या एका गावात पाचजणांची गावकर्‍यांनी सामुहिक हत्या केल्याचेही प्रकरण समोर आले. हे लोक कोण होते? त्याचा गावकर्‍यांना पत्ता नव्हता आणि ती मुले पळवणारी टोळी असल्याच्या समजूतीने जमावाकडून त्यांची हत्या झाली. जेव्हा असे काही परस्परविरोधी टोकाचे ऐकायला मिळते, तेव्हा कुठल्याही संवेदनाशील माणसाचे मन हेलावून जाऊ शकते. कारण जीवनाची सगळी धडपड जगण्य़ासाठीच असेल, तर माणसे अशी मरणाला कवटाळतात कशाला? किंवा एकमेकांच्या जिवावर उठतात कशाला, या प्रश्नाचे उत्तर कितीही तर्क लढवून मिळत नाही. कारण माणसाला आपला जीव जितक्या प्यारा असतो, तितकीच त्याला आपल्यासारख्या इतर माणसांविषयी अत्मियता व आस्थाही असते. म्हणूनच शेजारीपाजारी वा रस्त्यात कुठेही अन्य कोणाला अपघात झाला वा कोणी रक्तबंबाळ दिसला, तरी माणूस धाव घेऊन मदतीला जात असतो. मग ही माणसे अशी का वागली, त्याचे उत्तर सोपे कसे असेल? एका जागी लोक आपलाच जीव घेतात आणि दुसरीकडे माणसे दुसर्‍या कुणाचा अमानुषपणे जीव घेतात. असे काय होत असते, की माणसात असा पशू वा यमदूत संचारतो? पोलिस वा कायदा त्याची उत्तरे देत नाहीत किंवा त्याच्यावरचा कुठला उपाय सांगत नाहीत. कारण अशा उपायांनी ह्या घटनांना रोखता येत नाही.

जी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे, त्यानुसार दिल्लीत आत्महत्येचा मार्ग चोखाळणारे कुटुंब कुठल्या तरी दैवी शक्ती वा उपासनेच्या आहारी गेलेले होते. त्यांनी ठरवून सामुहिक आत्महत्येचा मार्ग चोखाळला. वरकरणी बघता हे कुटुंब सुखीसमाधानी व सुखवस्तुही असावे. अलिकडेच त्यांच्या कुटुंबात झालेल्या समारंभ व सोहळ्यांची छायाचित्रेही मिळालेली आहेत. मग त्यांना मृत्यूच्या दारी जाण्याची गरज कशाला वाटली? कोणी त्यामागे मोक्ष वा दैवी शक्तीचा संबंध असल्याचे म्हणतात. दुसरीकडे धुळ्यातील त्या गावात जमावाकडून मारले गेलेले पाचजण भिक्षुक होते. म्हणजे कुठल्याही गाववस्तीत जाऊन भिक्षा मागून आपली गुजराण करणारे लोक होते. याचा अर्थच आयुष्याशी कुठलीही शाश्वती नसलेले असे लोक होते. आजचा दिवस व रात्र काहीतरी क्षुधाशांतीसाठी मिळावे म्हणून दारोदार फ़िरत होते. सर्व आयुष्यात कुठल्याही सुखाची अपेक्षा केल्याशिवाय केवळ दोन वेळची भुक भागावी, इतकाच आनंद त्यांच्या आयुष्यात होता. त्यांच्या घराला दारे नव्हती की दरवाजामागे काही करणारेही हे लोक नव्हते. पण अलिकडे अनेक गावात शहरात मुले पळवणार्‍या टोळ्या फ़िरत असल्याच्या अफ़वांनी त्या गावातील लोकांना भयभीत करून सोडले होते. सहाजिकच त्यांच्याइतकेच गरीब व वंचित लोक या भिक्षुकांच्या अनोळखीपणामुळे त्यांच्याकडे संशयाने बघत होते. त्याचा परिपाक जमावाने हल्ला करण्यात झाला. संशय व शंकाही एकप्रकारची अंधश्रद्धाच असते. कुठल्याही गैरसमजाने मनाचा कब्जा घेतला, मग विवेकबुद्धी मरगळते आणि मनातले दिसू लागते. कारण आपल्याला सत्य बघायचेच नसते. मनातले बघायचे असते आणि तेच दिसू लागते. म्हणूनच त्या अनोळखी भिक्षेकर्‍यांना मुले पळवणारे समजून, त्यांचा समाचार घ्यायला जमाव एकत्र आला. जमाव नेहमी बुद्धीहीन असतो आणि त्याच्या तावडीत सापडलेल्यांना कोणी वाचवू शकत नाही.

शंका व संशय भितीला जन्म देतो आणि हा भयगंड क्षणाक्षणाला अक्राळविक्राळ स्वरूप धारण करत जातो. अफ़वा किंवा बातमी अशी रंगवून सांगितली जात असते, की ती खरी असण्याचे कारण नसते. पण अशा अफ़वा किंवा माहितीचा पगडा मनावर बसला, मग खरेखोटे तपासण्याची गरज उरत नाही. दिल्लीत त्या कुटुंबाला दैवीशक्ती प्राप्त झाली होती. किंवा तसा समज झाला होता आणि त्यांनाही कुठे विचार करावासा वाटला होता? त्यांनी आपलाच बळी देण्यासाठी फ़ासामध्ये माना अडकवल्या. तर इथे आपल्या मुलांना टोळीपासून वाचवण्याच्या इच्छेने मनाचा ताबा घेतला होता. मग समोर दिसणारे पाचजण खरीच टोळी आहे, की साधे भिक्षेकरी आहेत, ते कोण तपासून बघणार? अशावेळी जमावाचे मन सामुहिक होत असते. शिक्षण कायदा ज्ञान तिथे निष्प्रभ होऊन जाते. कोणीतरी एकजण बोलतो आणि जमावातल्या बाकीच्या लोकांना तो आपल्याच अंतर्मनाचा आवाज भासतो. समोर किंकाळ्या फ़ोडणार्‍याच्या यातना बघून सहानुभूती जागत नाही, की दयामाया स्मरत नाही. कुठल्याही जंगली पशू श्वापदासारखा खुन अंगी संचारतो. इतरवेळी लहानसहान गोष्टीत कळवळून बोलणार्‍यांचा रौद्ररुप चेहरा तेव्हा शिकारी श्वापदापेक्षा भेसूर झालेला असतो. मरणार्‍या माणसाच्या किंकाळ्यांपेक्षा मारणार्‍यांच्या आरोळ्या गगनभेदी होऊन जातात आणि काय केले हे समजण्यापुर्वीच ते होऊन गेलेले असते. आता दिसायला धुळ्याच्या त्या गावातील जमाव अमानुष वाटेल. वस्तुस्थिती समजल्यावर त्यापैकी अनेकांना पश्चात्तापही होऊ शकेल. किंबहूना आपण जमावात शिरून असे राक्षसी कृत्य केल्याचीही लाज वाटेल. पण मग त्याक्षणी त्यांची बुद्धी कुठे गेलेली असते? का निकामी झालेली असते? त्यांनाही त्याचे उत्तर देता येणार नाही. कारण आपल्यात दडलेला पशू वा श्वापद प्रत्येकाला ठाऊक असतेच असे नाही. म्हणून त्या श्वापदाला आवाक्यात राखण्याला संस्कृती म्हणतात.

माणूस कितीही प्रगत झाला वा त्याने कितीही मोठे शोध लावले, विचारधारा निर्माण केल्या, तरी मुलत: माणूसही या निसर्ग रचनेतला एक पशूप्राणीच आहे. सजीवांच्या नैसर्गिक रचनेत माणसाला विचार करण्याची क्षमता अधिक असल्याने माणसाने इतर प्राण्यांपेक्षा मोठी मजल मारून निसर्गावरही मात केली आहे. निसर्गाची विविध रहस्ये हुडकून काढून नवनव्या सुविधा उभ्या केल्या आहेत. त्यातून अन्य सर्व सजीवांवर वर्चस्व प्राप्त केले आहे. मग हे सर्व करताना जंगली मानसिकतेतून बाहेर पाडण्यासाठी विवेक व विचारांची कास धरलेली आहे. पण हजारो पिढ्यांची वाटचाल केल्यावरही माणसाला आपल्यातला पशू पुर्णपणे मारून टाकता आलेला नाही. इतर पशू प्राण्यांवर विजय मिळवताना आपल्याच अंतरंगात दडी मारून बसलेल्या श्वापदालाच्या मुसक्या कायमस्वरूपी बांधून टाकण्यात माणसाला यश मिळालेले नाही. तसे झाले असते, तर कायदे व शिक्षा वगैरेची गरज भासली नसती. मानव समाजाचे नियंत्रण करण्यासाठी प्रशासन शासन व विविध यंत्रणा उभ्या कराव्या लागल्या नसत्या. त्या कराव्या लागलेल्या आहेत, कारण माणसाने निसर्गावर कितीही मात केलेली असली, तरी त्याला आपल्या मनाचा ठाव घेता आलेला नाही. कुठल्या क्षणी मनातले दबा धरून बसलेले श्वापद उसळी मारून बाहेर येईल, त्याचा अंदाजही माणसाला अजून बांधता आलेला नाही. म्हणून विविध कायदे शस्त्रास्त्रे व चाकोर्‍या निर्माण करून माणसातील या श्वापदाला नियंत्रणाखाली ठेवावे लागते. त्याला जरा सैल स्थिती मिळाली वा किंचीत चिथावणी मिळाली, तरी जंगली श्वापदाला लाजवणारी कृत्ये माणुस करीत असतो. धुळ्यातील घटना जशी अमानुष आहे, तितकीच दिल्लीतील सामुहिक आत्महत्याही लज्जास्पद कृती आहे. त्यांची वरकरणी तुलना होऊ शकत नसली तरी त्यातही पशूता सारखीच आहे. आपला जीव घेणे वा दुसर्‍याचा जीव घेणे सारखेच अमानुष आहे.

कुठे अशा धनप्राप्ती वा दैवी शक्ती सिद्ध करण्यासाठी नरबळी दिले जातात. इथे मोक्षासाठी आपल्याच जीवाशी झालेला खेळ त्यापेक्षा वेगळ्या मानसिकतेतून आलेला नाही. दुसरीकडे आपली मुले वाचवण्यासाठी इतर कुणाचा सामुहिक बळी घेण्याची घटना आहे. त्यात कोणीतरी मोबाईल फ़ोनच्या कॅमेरातून घटनाक्रमाचे चित्रणही करतो. पण त्याच मोबाईलचा वापर करून पोलिसांना खबर देण्याचे अगत्य त्याला वाटत नाही. मग अशा यंत्राची वा उपकरणाची महत्ता काय उरली? समजा त्याने चित्रणापेक्षा पोलिसांना कळवण्याची तसदी घेतली असती, तर त्या भिक्षेकर्‍यांपैकी दोघेतिघे नक्कीच वाचले असते. पण त्यांच्या किंकाळ्या ऐकून त्याला चित्रण थांबवावे वाटले नाही की पाझर फ़ुटला नाही. त्याचेही मन कसे दगडासारखे झाले होते. त्याच्याकडे वा जमावाकडे आरोपी म्हणून बोट दाखवणे सोपे आहे. त्यामुळे आपण तसे नसल्याचा विश्वास आपल्यालाच देऊ शकत असतो. पण तसे प्रसंग आपल्याच आयुष्यात उदभवले, तर किती पुढाकार घेऊ शकतो? रस्त्यावर एखाद्या मुलीची छेड काढली जाते वा दुबळ्या व्यक्तीला गैरलागू वागणूक मिळताना आपण बघतो. कधी तिथे हस्तक्षेप करून आपल्यातल्या माणूसकीची साक्ष देण्याची इच्छा आपल्या मनात जागते का? नसेल, तर माणूसकी कशाला म्हणायचे? कुठल्याही माणसाच्या वा जमावाच्या वागण्यातून वेगवेगळे संदेश संकेत मिळत असतात. त्यातून येऊ घातलेल्या संकटाचा इशाराही मिळत असतो. पण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून कितीसा पुढाकार घ्यायला सज्ज असतो? ज्याचे त्याचे खाजगी आयुष्य आहे, असे बोलून आपणच अंग झटकत असतो. ती स्थिती वा प्रसंग आपल्या आयुष्यात अवतरण्यापर्यंत आपण अंग झटकून टाकत असतो. अशा घटना कानी येतात तेव्हा सहानुभूती दाखवून नामानिराळे रहाण्यात दंग असतो. रिंकू पाटिलपासून निर्भयापर्यंत मागल्या पंचवीस वर्षात त्याच अनुभवातून आपण गेलेलो नाही काय? त्या दिल्लीच्या आत्महत्या वा धुळ्यातल्या सामुहिक हत्याकांडाशी आपल्याला काही कर्तव्य आहे काय? आपण किती माणूस होऊन शकलोय?

2 comments:

  1. स्वत:चे हात बांधून आत्महत्या करणे शक्य आहे का ? दार उघडे कशासाठी ? असा प्रश्न टिव्ही वर एका फोरेन्सिक तज्ज्ञाने उपस्थित केला होता. मलाही त्यांच्या मुद्द्यात दम आहे असे वाटते.

    ReplyDelete
  2. मोबाइल क्लीप काढणाार्यांचे आश्चर्य वाटते ही प्रवत्ती सगळीकडे आहेभारतात चॅनेलतर दाखवतातच पन राहुलसारख्या काॅंगरेस अध्यक्षानेपन कराव महाराष्ट्रातील विहीरीच्या प्रकरणात लहान मुलाचा लाजीरवाना विडिओ ट्विटरवर टाकल्याबद्ल बालहक्क आयेगाने नोटीस बजावलीय

    ReplyDelete