Thursday, September 13, 2018

शोध आणि बोध

ganesh के लिए इमेज परिणाम

गेल्या काही दिवसात म्हणजे गणपती येण्य़ाची चाहुल लागल्यापासून गणेशाच्या जन्मकथेची वेगवेगळ्या प्रकारची टवाळी व हेटाळणी करणार्‍या काही पोस्ट वाचनात आल्या. तसे काही केले मग आपण पुढारलेले, विज्ञानवादी वा चिकित्सक असल्याचे समाधान मिळत असते. यात आता काही नविन राहिलेले नाही. कुठल्याही बुद्धीमान माणसाला डोळे झाकून कशावरही विश्वास ठेवायला आवडत नाही. सहाजिकच अनाकलनीय गोष्टींची खिल्ली उडवली, मग त्याला बौद्धीक समाधान मिळत असते. परिणामी अशा पुराणकथा वा भाकडकथा टिंगल उडवायला उपयुक्त ठरत असतात. पण अगदी बुद्धीवाद म्हणून पेश केल्या जाणार्‍या अनेक उदाहरणे व रुपकांचीही तशीच टवाळी करता येऊ शकत असते. सुनील तांबे या समाजवादी मित्राने अलिकडेच फ़ेसबुकवर आचार्य दादा धर्माधिकारी यांची एक बोधकथा टाकली होती. त्यांनी एका रुपकातून भांडवलशाही अगदी सोपी करून सांगितली आहे. पण त्यावर विसंबून आपण समाजवादी वा भांडवली अर्थशास्त्राची मिमांसा करायला गेल्यस अनर्थ होईल. ती बोधकथा शोध घेण्य़ासाठी नसून मिळालेला बोध सामान्य बुद्धीच्या लोकांना झटकन समजण्य़ासाठी असते. त्या कथेप्रमाणे औषधे गरजवंताला पैशाशिवाय देण्याची व्यवस्था करणे शक्य असते, तर कम्युनिस्ट रशिया बुडाला नसता आणि चीनला पाश्चात्य भांडवलशाहीच्या कुबड्या घेऊन आपली वाटचाल करावी लागली नसती. पण त्या बोधकथेची कोणी मिमांसा करणार नाही. कारण तिचा जनक पुरोगामी मानला गेलेला आहे आणि पार्वतीने अंगावरचा मळ काढून त्याचा गण लिंपला असेल, तर त्याची वैज्ञानिक मिमांसा मात्र जरूर होत असते. ही मानवी बुद्धीची झेप आहे आणि त्या गणरायालाच बुद्धीची देवता मानले जाते. अशी दुर्बुद्धी सार्वत्रिक होताना दिसल्यावर त्याने बुद्धीदाता म्हणून हात आखडता घेतला तर नवल कुठले? कथा अशी,

आई आणि तिचा मुलगा असं कुटुंब होतं. आई मजूरी करायची, मुलगा नुक्ताच शाळेत जाऊ लागला होता. एक दिवस आई आजारी पडते. घरातली चूल बंद होते. शेजारचे डॉक्टरला घेऊन येतात. डॉक्टर औषध लिहून देतो. ती चिठी घेऊन मुलगा औषधाच्या दुकानात जातो. दुकानदार म्हणतो या औषधाची किंमत दहा रुपये. मुलगा म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत. दुकानदार म्हणतो मग तुला औषध मिळणार नाही. मुलगा विचारतो, तुम्ही आजारी आहात का, तुमची आई आजारी आहे का.
दुकानदार म्हणतो, नाही. मग तुम्हाला औषधांची गरज काय? माझी आई आजारी आहे, तिला औषधांची गरज आहे, मुलगा उत्तरतो. बाबारे, याला भांडवलशाही म्हणतात, ज्यांना गरज आहे त्यांना आवश्यक वस्तू मिळत नाहीत आणि ज्यांना गरज नाही त्यांच्याकडे अशा वस्तुंचा भरपूर साठा असतो, दुकानदार त्याला समजावतो.

आमच्या लहानपणी म्हणजे अगदी १९६०-७० च्या जमान्यापर्यंत दक्षिण व मध्य मुंबईच्या कामगार भागात चाळी होत्या आणि तिथे घरकाम करणारे बानकोटी बालेही असायचे. चार घरी भांडीकुंडी करून ते आपली गुजराण करीत आणि चाळीच्या बोळात गॅलरीत वास्तव्य करीत. अशा लोकांची कलापथके असायची. मोजकी वाद्ये व ठरलेल्या भडक वेशात त्यांचे फ़ेर धरून केलेले नृत्य बाल्यानाच म्हणून त्या काळात प्रसिद्ध होते. मधे ढोलकी वगैरे वाजवणारे बसायचे आणि त्यांच्या भोवती हे बाले फ़ेर धरून नाचायचे. एक ठेक्यावर पाय आपटून त्यांचा नाच होत असे. अख्खी चाळ हादरून जाईल, असा तो नाच असायचा. त्यापैकी एका गाण्याचे बोल अजून आठवतात.

पारबतीबाई बसली न्हायाला, बसली न्हायाला.
तिनं आंगीचा मल काढीला, मल काढीला.
आनि मग तेचा गन लिपीला, गन लिपीला.

थोडक्यात पार्वतीने अंगीचा मळ काढून त्याचा गण लिंपला, तोच पुढे बुद्धीदाता गणपती मानला गेला. ह्याच भाकडकथेची टिंगल गेल्या काही दिवसात ऐकली. त्यातून अशी टिंगल करणार्‍यांच्या मनावर आणि बुद्धीवर किती मळ साचलेला आहे, त्याची प्रचिती येऊ शकते. सवाल मनातला मळ काढून टाकायचा आहे. तरच त्यातला बोध लक्षात येऊ शकतो. कुठलाही शोध हा मुळातच काही बोध घेण्यासाठी असतो हा विवेकाचा निकष ढळला, मग शोधही निकामी व निरूपयोगी होऊन जातो. नाक मुठीत धरून चाललेली पार्वतीच्या अंगावरच्या मळाची टवाळी वाचली आणि मला विंदा करंदीकर आठवले. ते एका कवितेत म्हणतात,

अटळ आहे घाण सारी, अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल, घाणीचेच खत होईल

घाणीच्या दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून रडणारे काही करू शकत नाहीत. त्यांना मुळातच घाण अटळ असल्याचे समजत नाही आणि ते शिसारीलाच बोध समजून बसतात. त्यांना बुद्धी असून नसून काही उपयोग नसतो. घाणीचेच खत होईल याचा अर्थ सामान्य खेडूतालाही समजू शकतो. पण चार बुके शिकून शहाणे झालेल्यांना त्याचा बोध कधीच होऊ शकत नाही. आयुष्यभर दु:ख शोधत फ़िरणार्‍यांना आनंद कुठून मिळायचा? आणि घाण म्हणजे तरी काय असते? कुठलेही व कितीही पक्वान्न खाल्ले तरी त्याची शेवटी घाणच होत असते ना? अर्थात निदान ते खाऊन पचल्यावर झालेली घाण सुसह्य तरी असते. पण अति खाण्याने अजीर्ण झाले तर येणार्‍या उलट्या ओकार्‍या अधिक दुर्गंधीयुक्त असतात. जे अन्नाविषयी असते, तेच अजीर्ण झालेल्या बुद्धीचेही असते. ज्यांना बुद्धीचे अजीर्ण झालेले असते, त्यांच्या ओकार्‍या उलट्या अधिक दुर्गंधीयुक्त असतात. मग त्यांना लोकांचा उत्सवी आनंदात उत्साहातही घाण दिसू लागते. इतर कोणी कशाला आनंदी झाला, म्हणून हे दुखवटे साजरे करू लागतात. कुठल्याही उत्सव आनंदसोहळ्यात त्यांना विकृती व रोगराई दिसू लागते. आपण दिर्घकाळ बुद्धीचे जे बेशिस्त वाटप केले, त्याच्या असल्या अजीर्णानेच बहुधा गणेशाने बुद्धीचे वाटप थांबवलेले असावे. अन्यथा असले दिवाळखोर निर्बुद्ध बुद्धीवादी व त्यांचा मोठा वर्ग कशाला उदयास आला असत? अर्थात त्यामुळे आपण विचलीत होण्याचे अजिबात कारण नाही. सामान्य बुद्धीचे लोक म्हणून शांत असतात आणि अशा कुबुद्धीला सडवून त्याचे खत बनवण्याची प्रक्रीया हाती घेत असतात. आज देशातील एकूणच बुद्धीजिवी वर्ग कमालीचा वैफ़ल्यग्रस्त आहे आणि आपल्याला का ‘सडवले’ जात आहे, त्याची तक्रार करत असतो. त्याचेच उत्तर उपरोक्त दोन रुपकात आलेले आहे. असली दुर्बुद्धी म्हणजेच पार्वतीच्या अंगावर साचलेला मळ असतो आणि त्याला सडवूनच खत निर्माण करण्याखेरीज समाजाला त्याचा अन्य काही उपयोग नसतो ना? वाजतगाजत आणि धुमधडाक्यात नाचत आलेला गणपती विंदाच्या भाषेत आपल्याला तेच सांगतोय, अशा नाकर्त्यांच्या टाहोकडे दुर्लक्ष कर आणि ‘माझ्या मना बन दगड!.


10 comments:

  1. भाऊ खरंच तुम्हीच खरे बुद्धिवादी आहात ,सर्वांना खरं काय ते नीट उदबोधक भाषेत सांगता कोणताही आव न आणता .लोकांना तुमच्यासारख्या विश्लेषकांची गरज आहे खूप .या सडेल पुरोगामी लोकांनी उगीच दहशतवाद माजवलंय,आता वट पौर्णिमेची पूजा करून नवरा मिळत नाही हे अडाणी बाईलाही कळत तरी ती काही श्रद्धेपोटी प्रेमापोटी करत असते मानसिक समाधान पण मिळत असत कारण तिच्यावर कोणी जबरदस्ती केलेली नसते ,हि निरुपद्रवी प्रथा पण चौधरी सारख्याना बघवत नाही शिकलेल्या महिलांना पूजा का करता म्हणून ते दरडावतात खिल्ली उडवतात स्वताची कुजकी मानसिकता दाखवणारी हि एक अंधश्रद्धाच आहे कि.

    ReplyDelete
  2. लोकांच्या आनंदावर विरजण कसे पडेल हे पहाणे हे बुद्धिवाद्यांचे ध्येय असावे असे वाटते.ज्या लोकांना बुद्धि या शब्दाची फोडही करता येत नाही असे लोकं स्वत:ला बुद्धिवादी समजतात.

    ReplyDelete
  3. ज्या गोष्टी वर्षानुवर्षे परंपरा म्हणून मान्य आहेत त्यांं चूक आहेत असे सांगणारे हे तथाकथित बुध्दिवादी टिक्कोजिराव कोण लागून गेलेत.त्यांची लायकी काय,त्यांची पात्रता काय.आमचे पूर्वज मूर्ख होते काय?

    ReplyDelete
  4. भाऊ छान माहिती दिली आहे

    ReplyDelete
  5. Jammu and kashmir 3 parts madhe divide hoil 1 2 mnths madhe as aikayla miltay yawr lihaw

    ReplyDelete
  6. भाऊ आवडला आहे लेख अतिशय.. बुद्धीचे अजीर्ण.. संकल्पना पटलीच म्हणजे एकदम..! 'विद्या विवादाय...' ही निरूपयोगीच! मग त्यात 'विज्ञान' पण..

    ReplyDelete
  7. खूपच छान आणि सडेतोड आणि उपयुक्त. .

    ReplyDelete
  8. Bhau.. Pheksattetil (Loksatta) Atul Pethechya lekhachahi samachar ghyava hi vinanti.

    ReplyDelete