Friday, September 21, 2018

छत्तीसगडचे छत्तीस गुण

sonia mayawati के लिए इमेज परिणाम

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती फ़ारशा बोलत नाहीत. पत्रकार परिषदाही घेत नाहीत. पण गल्लीबोळात व जिल्ह्यात, राज्यात फ़िरून आपल्या कार्यकर्ते व पाठीराख्यांशी सतत संवाद साधत असतात. त्यामुळेच त्यांच्या पक्षात कोणी फ़ारसे नावाजलेले नेते प्रवक्ते आढळणार नाहीत. पण मतदानाची वेळ येते, तेव्हा बसपाला दखल घेण्यासारखी मते नक्कीच मिळत असतात. कमी बोलून अधिक गंभीर राजकारण करणार्‍या मायावती, म्हणूनच भाजपा विरोधी राजकारणातील एक महत्वाचे पात्र आहे. त्यांना वगळून भारतीय राजकारणाचा विचार होऊ शकत नाही. मागल्या लोकसभेत व विधानसभेत त्यांना दणकून फ़टका बसल्यापासून, त्यांनी गंभीरपणे पुन्हा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला व आघाडीच्या राजकारणाचा विचार सुरू केला. पण अन्य भाजपा विरोधकांप्रमाणे त्या आत्महत्येला अजिबात राजी नाहीत. पुरोगामी असण्यासाठी सति जाण्याची त्यांची तयारी नाही, की आपल्या बलिदानातून अन्य कुठल्या राजकीय पक्षाला संजिवनी द्यायलाही त्या राजी नसतात. म्हणूनच आगामी लोकसभेवर डोळा ठेवूनच त्यांनी दोन महिन्यांनी व्हायच्या विधानसभा निवडणूकीची रणनिती आखलेली आहे. एका बाजूला उत्तरप्रदेशातील अखिलेशला खेळवत ठेवले आहे आणि दुसरीकडे शेजारी राज्यात कॉग्रेसला गाफ़ील ठेवून, मायावतींनी हालचाली सुरूही केल्या आहेत. बंगलोरला मायावतींनी सोनियांच्या डोक्याला डोके लावून अगदी शाळकरी मैत्रिणी असल्याचा आव आणला. पण व्यवहाराचा विषय आल्यावर छत्तीसगडमध्ये कॉग्रेसला टांग मारली आहे आणि राजस्थान मध्यप्रदेशात कॉग्रेसलाच पेचात पकडले आहे. २०१९ ची लोकसभा सुरू होण्य़ापुर्वी मायावतीच एकहाती कॉग्रेसला गोंधळून टाकतील, याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण त्यांच्या खेळी राहुल गांधींच्या एकूणच डावपेचांना मस्तपैकी सुरूंग लावत चालल्या आहेत. जणू भाजपाचा मार्ग मोकळा करण्याचे काम त्यांनीच हाती घेतलेले असावे.

महागठबंधन म्हणून ज्यांची मोट बांधायची आहे त्या पक्षांची एक मोठी पचाईत अशी आहे, की त्यांना प्रत्येकाला मिळणारी मते हीच त्यांना एकमेकांकाडून हिसकावून घ्यायची मते आहेत. अशा युती आघाडीमुळे भाजपाची मुठभर मतेही त्यांच्याकडे येऊ शकत नाहीत. मात्र या एकजुटीमुळे एखाद्या मतदारांघातील मायावती वा कॉग्रेस यांची मते एकमेकांच्या पारड्यात गेली, तर माघारी आणताना नाकी दम येणार असतो. मुळातच उत्तरप्रदेशात मायावतींना १९९५ सालानंतर उभारी आली, ती बहुतांश मते त्यांना कॉग्रेसकडून आंदण म्हणून मिळालेली आहेत. त्याच उत्तरप्रदेशात कॉग्रेसशी हातमिळवणी, म्हणजे ते आंदण परत केल्यासारखे होण्याचा धोका असतो. त्याची किंमत माध्यमात बसलेल्या ‘अजाणत्यांना’ मोजावी लागणार नसते. तीच कथा समाजवादी पक्षाची आहे. त्यांनीही मतदारांचा मोठा हिस्सा कॉग्रेसकडूनच बळकावलेला आहे. त्यात भाजपाकडून मिळालेली मते किरकोळही नसतात. सहाजिकच ज्या मतदारसंघात बसपा वा सपा कॉग्रेसला पाठींबा देतात, तिथे त्यांची मते कॉग्रेसकडे जाऊन माघारी येण्याची शक्यता संपून जात असते. कॉग्रेस, बसपा वा सपा; यांच्या जिल्हा तालुका नेत्यांची छाननी केल्यास त्यात बहुतांश इकडून तिकडे तळ्यातमळ्यात केलेले चेहरे़च सापडतील. हीच एकत्र येण्यातली अडचण आहे. म्हणूनच भाजपाला संपवण्यासाठी एकत्र येतानाचा, हा धोका अशा बिगर कॉग्रेसी पक्षांना परवडणारा नाही. बंगालमध्ये अलिकडेच मार्क्सवादी पक्षाने त्याचा अनुभव घेतला होता आणि कालपरवा उत्तरप्रदेशात कॉग्रेसला शंभर जागा देऊन अखिलेशने त्याची किंमत मोजली आहे. हे तपशील विसरून नुसत्या बेरजा गणित सोडवू शकल्या, तरी प्रमेय सोडवू शकत नसतात. म्हणून तर मायावतींनी लौकरच होऊ घातलेल्या विधानसभांच्या मतदानात भाजपा जिंकला तरी बेहत्तर, अशी भूमिका घेतलेली आहे.

छत्तीसगडमध्ये मायावतींनी कॉग्रेस सोडलेल्या अजित जोगी यांच्या पक्षाशी युती जाहिर करून टाकलेली आहे. तिथल्या ९० जागांपैकी ३५ जागा बसपा लढवणार आहे आणि जोगी ५५ जागा. म्हणजे तिथे कॉग्रेससोबत जाण्याचा विषय मायावतींनी एकतर्फ़ी संपवला आहे. तिथेच खरी राहुल मायावती युती प्रभावी ठरू शकली असती. कारण मागल्या विधानसभेत मायावतींनी मिळवलेली मते कॉगेस सोबत असती, तर बेरीज भाजपाला लोळवू शकणारी होती. पण तितकी तीच बेरीज मध्यप्रदेश राजस्थानात प्रभावी किंवा वजनदार नाही. म्हणजेच कॉग्रेसने मायावतींना अजित जोगीकडे जायला देऊन, आधीच नुकसान करून घेतलेले आहे. राहिला मध्यप्रदेश व राजस्थानचा विषय. तिथे मायावती व कॉग्रेस यांची बेरीजही भाजपापेक्षा कमीच आहे. पण सलग सत्तेत असलेल्या पक्षाविषयीच्या नाराजीचा प्रभाव विरोधकांच्या बेरजेला वजन देत असतो. तिथे झटपट निर्णय घेण्यात कॉग्रेस रेंगाळली आणि मायावतींनी २२ उमेदवारही जाहिर करून टाकले आहेत. विद्यमान विधानसभेत त्यांचे चारजण आमदार होते आणि २०-३० जागी त्यांनी तुल्यबळ लढत दिलेली होती. म्हणूनच त्या ५० जागांची मागणी करीत होत्या आणि तो सौदा कॉग्रेससाठी फ़ायद्याचा असणार होता. पण त्यात विलंब झालेला आहे आणि तशी शक्यता मायावतींनी संपवायला आरंभ केला आहे. सौदा झाला नाही तर मायावती सर्व जागा लढवणार आणि त्यांचे उमेदवार अनामत रकमा गमावताना काठावर जिंकू शकणार्‍या कॉग्रेस उमेदवाराला पराभूत करून भाजपाला सत्ता टिकवायला हातभार लावणार. पंधरावीस जागा जास्त देऊन त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याची संधी, त्यातून कॉग्रेस गमावणार आहे. राजस्थानमध्ये मायावतींच्या मतांची संख्या कमी असली तरी तिथे त्यांनी इतर पक्षांशी जुळवाजुळव चालविली आहे. एकूण हालचाली बघता मायावती ममतांच्या वाटेने निघालेल्या आहेत.

अशा लहानसहान पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभेत मोदी भाजपाला पाणी पाजणार, ही कॉग्रेसची जाहिर रणनिती आहे. पण त्यातले हे असे सहकारी विधानसभा निवडणूकीतून गोळा करावे लागत असतात. मायावती, ममता किंवा अखिलेश तसे सहकारी असू शकतात. पण त्या सहकार्‍यांना मग राज्यात त्यांची मनमानी करायची मुभा दिली पाहिजे. त्यांचे राज्य व सुभेदारी निरंकुश मान्य करायला हवी. पण तिथेच तर अडचण आहे. कॉग्रेसला पुन्हा प्रत्येक राज्यात आपली संघटना व राजकीय शक्ती वाढवायची आहे. ती शक्ती अशा पक्षांना गिळंकृत करूनच मिळवणे शक्य आहे. म्हणजे मायावती, ममता वा चंद्राबाबू, अशांचा मतदार ओढूनच कॉग्रेसला आपले पुनर्निर्माण शक्य आहे. त्याचीच तर अशा पक्षांना भिती आहे. म्हणून सगळे पक्ष सेक्युलर पुरोगामी एकजुटीची पोपटपंची करतात. हात मिळवतात आणि मतांची बेरीज सांगतात. पण जेव्हा प्रत्यक्ष निवडणूकपुर्व युती वा जागावाटपाचा प्रसंग येतो, तिथे गडबड होऊन जाते. बेरजेची वजाबाकी होऊन जाते. यापैकी कोणीही भाजपाचा मतदार ओढून घेण्याची भाषा एकदाही बोलताना दिसणार नाही. उलट भाजपाच्या हक्काच्या मतांविषयी विरोधकांनाच आत्मविश्वास अधिक आहे. सहाजिकच त्यापेक्षा अधिक आकडा वा टक्केवारी दाखवण्यासाठी बेरजेचा पदर पकडला जातो. पण मुद्दा भाजपाचा मतदार घटवणे व त्यातून भाजपाचा पराभव करण्याचा आहे. मोदींनी २०१४ साली कॉग्रेसची टक्केवारी २५ वरून १७ टक्के इतकी खाली आणली व भाजपाची १७ वरून ३१ टक्केपर्यंत नेलेली होती. तोंडाची वाफ़ दवडून ते शक्य होत नाही. तर सर्व राज्यातील किरकोळ वाटणार्‍या नगण्य पक्षांना सोबत आणुन त्याना मिळणार्‍या अर्धापाऊण टक्का मतांनाही जोडून घेतल्याने फ़रक पडत असतो. कॉग्रेस पक्षाला अनेक राज्यात दोन ते सात टक्के मते मिळवणार्‍या मायावतींना सोबत घेता येत नसेल, तर किती मजल मारता येईल? मायावतींनी अजित जोगींशी छत्तीस गुण जमवून कॉग्रेससाठी महागठबंधनाचे समिकरण पुरते बुडवून टाकलेले आहे.


4 comments:

  1. भाउ तुम्ही म्हनता तस पुरोगामी पक्ष हे कांगरेसचीच विचारधारा प्रतीत करतातप भाजपची विचारधारा पुर्न वेगळी आहे त्यामुळ त्यांची मते कोनी पळवु शकत नाही उलट मोदी मुस्लीममहीला शिया समुदाय असे कांगरेसी मते वळवु पाहतात

    ReplyDelete
  2. Bhau saw the man sunul tambe fb profile. Its full of heavy and conflict language his followers also gave difficult to understand comments.their theories are horrible .they want to throw modi gov but doubt even they vote?just ranting on ready fb platform.if he start blog like u no one even see it.

    ReplyDelete
  3. भाऊ.. त्या कर्नाटक विजयोन्माद सादर माध्यमकर्मींची जी पुरोगामी महाआघाडीच्या भविष्याबददल नि:शंक असलेल्या लोकांची कीव येते... त्याच वेळी आपण परखडपणे त्याची यथोचित संभावना केली होती.. तेव्हा आघाडीचे अॅंकर तुम्हाला भ्रूणहत्या करणारे.. नरडीला नख लावणारे... असा नतदृष्टपणा आपण करू नये वगैरे शब्दांनी त्यांच्या पुरोगामी वाहिनीवर सांगितले... त्याला आपण लगोलग उत्तर दिलेच होते... आता संबंधितांना परत सांगायची वेळ आली आहे... उघडा डोळे... बघा नीट...

    ReplyDelete