Friday, December 21, 2018

वातकुक्कूटाची गोष्ट

paswan amit shah के लिए इमेज परिणाम

एनडीएतून राष्ट्रीय लोकसमता पक्ष बाहेर पडला आणि त्याचे नेते उपेंद्र कुशावाहा यांनी केंद्रीय मंत्रीपदाचाही राजिनामा दिला. आता तर ते लालूच्या महागठबंधनातही सहभागी झाले आहेत. त्यामुळे तेलगू देसमच्या पाठोपाठ आणखी एक पक्ष मोदी गोटातून बाहेर पडल्यावर अनेकांचे चेहरे खुलले असतील, तर नवल नाही. जेव्हा आपल्याला सोयीचे मुद्दे मांडायचे असतात, तेव्हा अडचणीच्या गोष्टी जाणिवपुर्वक दुर्लक्षित केल्या वा लपवल्या जात असतात. त्यालाच युक्तीवाद म्हटले जाते. पण तो युक्तीवाद जिंकून लढाई जिंकता येत नसते. युक्तीवाद लढाई टाळण्यासाठी वा तहासाठी होत असतात. त्यामुळेच कुशवाहा यांची कुवत किती, हे आता बोलले जाणार नाही. तर एक पक्ष एनडीएतून बाहेर पडला, याचाच डंका पिटला जाणे स्वाभाविक आहे. त्यांच्या पाठोपाठ पासवान यांनी उचल खाल्ली आहे. आधीच जागा वाटपाचा विषय संपवावा, म्हणून भाजपाकडे तगादा लावल्याने पासवानही मोदी गोटातून बाहेर पडत असल्याचे शुभसंकेत अनेकांना मिळालेले आहेत. त्यांना खुश करण्यासाठी अर्थातच पासवान बाहेर पडतील असे नाही. कारण असल्या कोलांट्या उड्या मारताना त्यांना बसलेले चटके पासवानांनाच सोसावे लागलेले आहेत. चर्चा रंगवणार्‍या शहाण्यांना त्याची कुठलीही झळ बसलेली नव्हती, की बसणार नाही. म्हणूनच राजकीय वारे कुठल्या दिशेने वहात आहेत, ते पासवानांनाच कळते; असे हरभर्‍याच्या झाडावर कोणी चढवले, म्हणून पासवान भरभरा चढतील, अशा भ्रमात कोणी राहू नये. कारण वातकुक्कूट ही कल्पना हास्यास्पद आहे. तसे असते तर पासवान मुळातच मोदींच्या वळचणीला पाच वर्षापुर्वी गेले नसते. त्याच्याआधी पाच वर्षे वनवासात जाण्याची नामुष्की त्यांच्या वाट्याला आली नसती. पण तो इतिहास कोणी कशाला सांगणार ना? २००९ च्या लोकसभा निवडणूकीत पासवानांचा वातकुक्कूट कुठे मुंडी पिरगाळून पडला होता?

२००३ सालात गुजरात दंगलीचे कारण देऊन पासवान वाजपेयी सरकारमधून बाहेर पडले. नंतर २००४ सालात त्यांनी सोनियांच्या युपीएमध्ये सहभागी होण्याची चतुराई दाखवली. त्यामुळे त्यांना राजकीय वारे कुठे वहातात, ते समजत असल्याची पदवी बहाल करण्यात आलेली आहे, नेमका तसाच प्रकार २०१४ सालात घडला. पासवान तेव्हा अडगळीत पडलेले होते आणि त्यांच्यासह त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीला बिहारी राजकारणात कोणी धुप घालत नव्हते. अगदी लालू व कॉग्रेस यांनी आपापसात लोकसभेच्या सर्व जागा वाटून घेतल्या होत्या आणि पासवान रस्त्यावर पडलेले होते. त्यातून वाट काढण्यासाठी त्यांनी मोदींच्या आश्रयाला जाण्याची नामुष्की पत्करली. भाजपालाही त्यांची गरज होती. कारण गुजरातचे निमीत्त वा मोदीद्वेष पुढे करून नितीशकुमारांनी साथ सोडलेल्या भाजपाला बिहारमध्ये किरकोळ मदत करणारे पक्ष हवेच होते. दोघांची सोय असल्याने पासवान एनडीएत आले. ती चतुराई असण्यापेक्षाही अगतिकता होती. आता त्यांना वातकुक्कूट ठरवण्यासाठी त्याही प्रसंगाचा वापर होतो आहे. पण मग तेच पासवान २००९ सालात आपली चतुराई का दाखवू शकलेले नव्हते? तेव्हा त्यांच्या वातकुक्कूटाला राजकीय वारे कशाला ओळखता आले नव्हते? कारण त्या लोकसभा निवडणूकीत फ़क्त त्यांचा पक्षच संपला नाही तर खुद्द पासवानही धाराशायी झालेले होते. तेव्हा कॉग्रेसला वार्‍यावर सोडून पासवान लालूंनी बिहारच्या सगळ्या जागा आपसात वाटून घेतल्या आणि कॉग्रेसला वार्‍यावर सोडून दिले होते. दोघांनाही त्याचा जबर फ़टका बसला आणि देशात पुन्हा कॉग्रेसची सत्ता आली. पण त्यात पासवान नव्हते की जिंकूनही लालूंना स्थान मिळाले नाही. पासवान खरेच राजकीय वारे ओळखू शकत होते, तर युपीएचे मंत्री असूनही त्याना २००९ सालात पुन्हा तीच आघाडी जिंकण्याचा सुगावा कशाला लागलेला नव्हता? पण हा तपशील आता कोणी ‘कोंबडीविके’ सांगणार नाहीत.

१९९९ सालात नितीश व अन्य जनता दल गट एकत्र येऊन त्यांनी युनायटेड जनता दलाची स्थापना केली. निवडणूका संपल्यावर पासवान त्यातून बाजुला झाले व त्यांनी लोकजनशक्ती पार्टी नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला. पुढल्या विधानसभेत त्यांना चांगल्या ४० जागा जिंकता आल्या होत्या. पण सतत वातकुक्कूट असल्याच्या भ्रमात नांदणार्‍या पासवानांना राजकीय वारे ओळखता आले नाहीत आणि त्यांनी राजकीय प्रक्रीया अडवून धरलेली होती. २००५ च्या निवडणूकीत नितीश-भाजपा किंवा कॉग्रेस-लालू यापैकी कुठल्याही आघाडीला बहूमताचा पल्ला गाठता आला नाही. त्रिशंकू विधानसभेत पासवान ज्या बाजूला आपले आमदार पाठवतील, त्यालाच सरकार बनवणे शक्य होते. पण तटस्थ राहून पासवान खेळत बसले आणि अखेरीस विधानसभाच बरखास्त होऊन गेली. तिथून त्यांच्या पक्षाचा अस्तकाळ सुरू झाला. नंतर नितीश-भाजपा आघाडीने काठावरचे बहूमत मिळवून सत्ता काबीज केली आणि पुढे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पासवान यांना त्याच ‘भ्रष्ट’ लालूंशी हातमिळवणी करीत २००९ सालच्या लोकसभेला सामोरे जावे लागलेले होते. तेव्हा रेल्वेमंत्री होऊन एकामागून एक विक्रम करणारे लालू व पासवान मित्र झाले आणि दोघांनी मिळून बिहारच्या सर्व जागा आपसात वाटून घेतल्या. त्या दोघांच्या पक्षाचे नुकसान झाले आणि बिहारमध्ये बहुतांश म्हण्जे ४०पैकी ३२ जागा नितीश-भाजपा आघाडीने जिंकल्या. मग पासवान यांना राजकीय वनवासात जावे लागले. कारण लोकसभेचीच पुनरावृत्ती २०१० च्या विधानसभेतही झाली आणि लालूंसह पासवान नामशेष होण्यापर्यंत खाली घसरले होते. तेव्हाही या वातकुक्कूटला राजकीय वारे कशाला कळलेले नव्हते? २०१४ सालात कॉग्रेसने लालूंना हाताशी धरून पासवानांना वार्‍यावर सोडण्यापर्यंत हा वातकुक्कूट मरगळून का पडलेला होता? नुसते शब्द वापरले म्हणून वास्तव बदलता येत नसते.

नितीशकुमार यांनी मागल्या लोकसभेत नाटके केली नसती, तर बिहारमध्ये लालूंची सद्दी तेव्हाच संपली असती आणि पासवान यांना सोबत घेण्याची भाजपावर वेळ आली नसती. पण पुर्वाश्रमीचे समाजवादी कायम कुठल्याही गोष्टीचा विचका करण्यासाठीच ख्यातनाम असतात. नितीशच्या त्या खेळीने मोदींचे कुठलेही नुकसान झाले नाही. पण त्यांचेच दोन समाजवादी प्रतिस्पर्धी लालू व पासवान यांना नवे जीवदान मिळून गेले. पासवान वनवासातून पुन्हा राजकारणात येऊन उभे राहिले; तर नितीशच्याच मदतीने लालूंच्या पक्षाचा नवा जिर्णोद्धार झाला. मात्र खुद्द नितीश जे बिहारमध्ये शिरजोर होते वा भाजपाचा थोरला भाऊ म्हणून राजकारण करत होते, त्यांची शक्ती आणखी क्षीण होऊन गेली. मागल्या पाचसहा दशकातला पुर्वाश्रमीच्या समाजवादी नेत्यांचा इतिहास असाच राहिला आहे. त्यांनी प्रत्येकवेळी राजकारणाचा पुरता विचका केला आहे आणि त्यातून मरगळल्या कॉग्रेसला जीवदान दिलेले आहे. त्यात अनेक राज्यातली समाजवादी चळवळ कायमची खच्ची वा नामशेष होऊन गेली आहे. ते ज्याला संपवायला जातात तो संपत नाही आणि दरम्यान आपल्याच पायावर धोंडा मात्र पाडून घेतात. नितीशनी मोदींना संपवण्यापेक्षा अखेरीस त्यांच्याच आश्रयाला आले आणि दरम्यान लालूंना शिरजोर करताना स्वत:लाच दुबळे करून गेले. पासवानही त्याच कुळातले असून त्यांनी आता एनडीए सोडण्याचा पवित्रा घेतला तर त्यांना सामावून घेण्याइतकी लालूंच्या महागठबंधनात जागा शिल्लक नाही. शिवाय त्यात २००९ ची पुनरावृत्ती झाली तर पुन्हा वनवासात जाण्याखेरीज पर्याय शिल्लक उरणार नाही. कारण नितीश लालूंसह त्यांचे अस्तित्व फ़क्त बिहारपुरते असून, भाजपा जवळपास बहुतांश राज्यात बस्तान बसवलेला सुदृढ पक्ष आहे. आश्रिताने आश्रयदात्याला किती दमदाटी करावी, याला मर्यादा असतात. २००९ सालात दुबळ्या कॉग्रेससमोर पासवान टिकले नसतील, तर आज भाजपासमोर काय होईल?

7 comments:

  1. आश्रिताने आश्रयदात्याला किती दमदाटी करावी, याला मर्यादा असतात.

    ReplyDelete
  2. अचुक विश्लेषण

    ReplyDelete
  3. महागटबंधन मेळाव्यातील स्वार्थी व संधीसाधू लुच्च्या लोकांमध्ये या नव्या आणि तोटक्या ताकदीच्या लोकांचे मनोरथ पूर्ण होतील काय याचा त्यांनी कितपत विचार केला असेल? कारण जुन्या लबाडांच्या पदरात श्रेय पडल्यावर या नव्या आगंतुकाना पंगत सम्पल्यावरच्या खरकट्याची वाट बघण्याखेरीज गत्यंतर नाही.

    ReplyDelete
  4. भाऊ 2019 मध्ये जनतेने या प्रादेशिक पक्षांचा माज उतरवायला हवा आता महाराष्ट्रात सेनेची भूमिका पहा एकीकडे राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहेत दुसरीकडे राम मंदिराचा अध्यादेश आणा म्हणून आक्रस्ताळेपणा करतायेत आणि आणि तिसरीकडे सामना मधून राहुल गांधी बाजीगर आहेत म्हणून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत बहुतेक मतदार मूर्ख आहे असा यांचा समज असावा 2009 मध्ये जी स्थिती पासवनांची झाली तीच 2019 मध्ये शिवसेनेची होणार आहे हे नक्की

    ReplyDelete
    Replies
    1. एकदम बरोबर बोललात

      Delete
    2. एकदम बरोबर बोललात

      Delete
  5. भाऊ आपल्या या लेखाच्या निमित्ताने अजून एक गोष्ट आहे ती आपण वर उल्लेख केलेल्या नितीश आणि पासवान यांची,नितीश यांनी 2005 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन केल्यावर त्यांना मोदींची सावली सुद्धा नको झाली होती 2010 मधे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पाटणा येथे बैठक होती तेव्हा नितीशकुमार यानी भाजपच्या नेत्यांना भोजनाला निमंत्रित केले होते पण कोणीतरी उत्साही कार्यकर्त्यांनी पाटण्यात मोदींचे काटोउत लावले आणि रागारागाने नितीश यांनी हा भोजन समारंभ रद्द करून टाकला होता इतका पराकोटीचा मोदी द्वेष यांच्या मधे होता रामविलास पासवान यांनी 2004 मध्ये गुजरात दंगलीचे कारण काढून वाजपेयींच्या सरकारमधून राजीनामा दिला होता आणि upa मध्ये गेले होते पण आपण म्हणता तसे 2009 नंतर राजकारणातून कालबाह्य झाल्यावर मोदींच्या आश्रयाला हे पासवान आले म्हणजेच मुस्लिम मतांपायी एकेकाळी मोदींचा द्वेष करणारे हे नेते आज मोदींचे आश्रित आहेत काळाचा सूड हा असा असतो

    ReplyDelete