ह्या सगळ्या भामटेगिरीची सुरूवात नवी नाही. तब्बल वीस वर्षापुर्वी त्याचा मुहूर्त झालेला होता. तेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचे सरकार होते आणि प्रथमच कुठलाही वाडगा घेतल्याशिवाय मराठी साहित्य संमेलनाला सरकारने मोठी रक्कम दिलेली होती. राज्य मराठी आहे, तर त्याच्या खर्चासाठी साहित्यिकांना वाडगा घेऊन फ़िरायला लागू नये, म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भरघोस सरकारी अनुदान देण्याचा आग्रह धरला होता. तोपर्यत अशा सोहळ्याला जितके सरकारी अनुदान मिळत होते, त्याच्या दुपटीने पैसे वाढवून बहुधा २५ लाख रुपयांची एकरकमी देणगी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी दिलेली होती. त्यांनीच पुढकार घेऊन दादर वाचनालयाला त्यात यजमान होण्यासाठी पुढे केलेले होते. मग मनोहर जोशींनाच दादरकर म्हणून त्याचे स्वागताध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पुढे आलेला होता. तर त्यावरून पुरोगामी कुजबुज सुरू झाली. तिचा इतका गवगवा झाला, की संमेलनात राजकारण नको म्हणत गदारोळ सुरू झाला. त्यापुर्वी अनेकदा राजकारणी नेते व मंत्रीही संमेलनात सहभागी झालेले होते व स्वागताध्यक्षही झालेले होते. पण असला वाद कधी उकरून काढण्यात आलेला नव्हता. कारण तोपर्यंत महाराष्ट्रात कॉग्रेसचेच राज्य होते आणि मंत्री वगैरे कॉग्रेसचेच असायचे. म्हणजेच युती सरकारच्या काळात साहित्यिक अस्मिता पुढे करून शिवसेनेला अपशकून करण्याचा अट्टाहास चालला होता. त्यासाठी मग आयुष्यभर समाजवादी कविता लिहीलेले संमेलनाध्यक्ष वसंत बापट यांच्यावरही ब्राह्मण असल्याचे आरोप झाले. अशावेळी आपल्या शैलीने प्रत्याघात करायलाच प्रसिद्ध असलेल्या शिवसेनाप्रमुखांनी जोरदार उत्तर दिले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री स्वागताला नको असेल तर सरकारने देऊ केलेले अनुदानाची रक्कम परत घ्यावी, असे खडे बोल ऐकवले होते. त्यामुळे ताजे नयनतारा प्रकरण त्याच वंशावळीतले आहे, हे विसरून चालणार नाही.
खरेतर हे असले फ़डतूस लोक अशा संमेलनात बोलावले कशाला जातात, हाच प्रश्न विचारला पाहिजे. कारण त्याचा निचरा वीस वर्षापुर्वीच झालेला आहे. तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी व ते मोठ्या रकमेचे अनुदान इतका कळीचा मुद्दा झाला, की तथाकथित पुरोगामी साहित्यिकांनी शिवाजी पार्कच्या साहित्य संमेलनावर बहिष्कार घालून दोन पर्यायी संमेलने भरवली होती. त्यापैकी एक उच्चभ्रू सवर्ण पुरोगामी लोकांचे होते आणि दुसरे पिछड्या दलित वगैरे साहित्यिक सहभागी असलेल्यांचे विद्रोही साहित्य संमेलन झालेले होते. त्या धारावीतील विद्रोही संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. य. दि. फ़डके होते आणि नंतरच्या काळात तेही मुलप्रवाहातील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेव्हा अशा पुरोगाम्यांची टांगलेली तलवार त्यांच्यावरही कोसळली होती. त्यामुळे अशा चालबाजीच्या मागचा कुटील हेतू पहिल्यापासून स्पष्ट आहे. असे लोक राजकीय तिरस्कार व मत्सराने भारावलेले काही वैफ़ल्यग्रस्त राजकारणी असून साहित्यिक प्रांत हा त्यांनी बळकावलेला प्रदेश आहे. मग असे लोक नयनतारा वगैरे लोकांना अकारण मोठे महत्व देऊन सामान्यांच्या गळ्यात मारण्याचा उद्योग करत असतात. नेहरूवादच साहित्य संस्कृती असा आभास निर्माण करत असतात. कारण नेहरूंनी सत्ता हाती आल्यावर त्यांच्या टाकावू साहित्यासाठी अनुदाने व पैशाची बेगमी करणार्या संस्था उभ्या केलेल्या आहेत. अन्यथा ज्यांनी लिहीलेले कोणी विकत घेऊन वाचणार नाही, त्यांचे रद्दी लिखाण सरकारी खर्चाने छपाई करून फ़ुकटात ग्रंथालयांना अनुदानित खर्चाने पुरवठा करण्याची गरज भासली नसती. आजवर साहित्य अकादमी नावाच्या संस्थेने कोणाला पुरस्कार दिले, त्याची यादी सांगितली गेली आहे. पण त्यांची साहित्यसेवा किंवा वाचकांमधील अशा साहित्यिकांची लोकप्रियता कधी सांगितली जात नाही. हा सगळा पुरोगामी भामटेगिरीचा उजळमाथ्याने चाललेला भुरटा व्यवहार आहे. त्यात मुठभर नावाजलेले लेखक घ्यायचे आणि बाकी आपल्या भामट्यांची रद्दी छापायची असा खेळ आजवर चालला आहे.
गेल्या काही दशकात साहित्य अकादमीने पुरस्कार दिलेले वा त्यांची अनुदानित खर्चाने छापलेली पुस्तके किती वाचली गेली आहेत? खुल्या बाजारात त्यांच्याच पुस्तक ग्रंथांना किती किंमत मिळाली आहे? पण त्याचा पाढा वाचला गेला. अशा पुरस्कारप्राप्त लेखक साहित्यिकांचे मग त्यांचेच साथीदार वर्तमानपत्रे व माध्यमात बसून गुणगान करणार आणि सामान्य जनतेला वाचकाला त्यांचे एकही पुस्तक ठाऊकही नसते. पण बातम्यातून हे लोक साहित्यिक असतात. पण व्यवहारात ते एका विचारसरणीचे बांधील वा पुरस्कर्ते असतात. तसे नसते तर मनोहर जोशी वा आज फ़डणवीस यांच्यावरून इतका गदारोळ झाला नसता. साहित्यसेवा शून्य आणि राजकीय शेरेबाजी अधिक, असेच एकूण या लोकांचे साहित्यिक कार्य राहिलेले आहे. मग त्यात ‘राजा चुकला’ म्हणायची भाषा वापरणारे बडोदा संमेलनाचे अध्यक्ष देशमुख येतात, तसेच माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीसही येतात. मराठी वाचकातल्या एक टक्का लोकांना ज्यांची नावे ऐकूनही माहिती नाहीत, ते संमेलनाचे अध्यक्ष झाले, म्हणून त्यांचे नाव बातमीतून लोकांना समजलेले असते. अन्यथा त्यांनी काय व कोणते पुस्तक लिहीले, त्याची गंधवार्ता मराठी समाजालाही नसते. असे लोक सरकारी अनुदान घेऊन मेजवान्या झाडणार आणि तो खर्च देणार्या शासनकर्त्यांचे कान उपटण्यात धन्यता मानणार. हा खेळ खुप झाला आहे. अशा शिकारीसाठी मग हाकारे उठवावे लागत असतात. तेही पाळलेले लोकच असतात. त्यांच्याकरवी रान उठवले जाते आणि साहित्य व्यवहारात गुंडगिरी व अरेरावी प्रस्थापित केली जाते. व्यवहार साहित्याचा असताना त्यात मुकेश अंबानीच्या मुलीच्या लग्नाचा राजेशाही थाट हवाच कशाला? आजीमाजी अध्यक्ष वा मुठभर कोणी असेच कवि-साहित्यिक संमेलनाच्या खर्चाने येतात तरी कशाला? त्यातून कुठला साहित्य व्यवहार विकसित होत असतो?
जनतेचा पैसा मौजमजा करण्यासाठी निर्धास्तपणे वापरणार्यांनी कधी त्याचा हिशोब त्या जनतेला दिलेला आहे? ‘पुरोगामी महाराष्ट्र’ असली भाषा प्रतिदिन वापरणार्या या भंपक लोकांनी कधीतरी सामान्य मराठी जनतेच्या मनाची चाचपणी केली आहे काय? आपापल्या मुठभर लब्धप्रतिष्ठीतांच्या टोळ्या बनवून सरकारी वा शेठजींच्या अनुदानावर पुख्खा झोडणार्याना आपल्या अशा बदमाशीची कधी लाज तरी वाटली आहे काय? त्यांना कुठल्या वाचकाने वा जनतेने कुठला पुरस्कार दिला आहे काय? त्यांच्या अनुदानित नसलेल्या पुस्तक वा ग्रंथाचे कोणी आवडीने वाचन केलेले आहे काय? सरकारी पैसा व त्याच्या आधारवर आपले थोतांड चालवणार्या टोळ्याचा मस्तवाल खेळ; असाच हा प्रकार होऊन बसला आहे, ज्या राजकारण्यांच्या नावाने हे लोक कायम गळा काढतात, त्यांच्यापेक्षा अशा अनुदानित साहित्यिकांचा भ्रष्टाचार किंचीत वेगळा आहे काय? असेल तर त्यांनी पुरस्कार वापसी करण्यापेक्षा सरकारी खर्चाने प्रकाशित झालेल्या त्यांच्या ग्रंथसंपदेचे सर्व व्यवहार एकदा साहित्य संमेलनातच जाहिरपणे मांडावेत. तसे असते तर त्यांना सरकारी वा अन्य कुणाकडे वाडगा घेऊन संमेलनाचा खर्च भागवण्यासाठी फ़िरावे लागले नसते. गाव गोळा करून मिरवावेही लागले नसते. मोजक्या साहित्यप्रेमी जनतेसमोर अशा संमेलनाचे सोहळे अधिक छानपैकी झाले असते. काही वर्षापुर्वी धारीवाल या व्यापार्याने संमेलनाला भरघोस पैसे दिले, तर अभय बंग यांनी त्याला गुटख्याचे पैसे घेतलेले संमेलन म्हणून हिणवले होते. पळापळ झाल्यावर ती देणगी नाकारली गेली. पण सरकारी अनुदान मात्र चालू राहिले. पण सरकारी तिजोरीतला अधिक पैसा दारूवरील अबकारी करातून येत असतो आणि त्यातला हिस्सा अनुदानातून संमेलनासाठी आलेला चालतो. अभय बंग यांनी त्याबद्दल आक्षेप कशाला घेतला नाही? गुटख्याचा पैसा पाप असते आणि दारूचा पैसा पुण्यकर्म असते काय? हा दुटप्पीपणा नाही काय?
दुटप्पीपणा खुप सोज्वळ शब्द आहे, याला बेशरमपणा म्हणतात. हा निर्लज्जपणा नित्यनेमाने कुठल्याही प्रतिष्ठीत साहित्यिक सांस्कृतिक सोहळे व्यवहारात चाललेला असतो. देशातल्या कुठल्याही अशा सांस्कृतिक सोहळ्यासाठी लागणारा वारेमाप पैसा सोज्वळ मार्गाने आलेला नसतो आणि तरीही असे बेशरम लोक त्याला अगत्याने हजेरी लावतात व पवित्र्याच्या गमजा करीत असतात. सगळा साहित्यप्रांत वा सांस्कृतिक कलाप्रांत अशा पुरोगामी भंपकपणाने पुरता नासवून टाकलेला आहे. अशा लोकांमध्ये सराईतपणे परदेशी पैशावर सामाजिक कार्याची चैनबाजी करणारेही सहभागी झालेले असतात. देशाचे कायदे मोडून बेहिशोबी पैसे मायदेशी आणणार्या त्या बदमाश स्वयंसेवी संस्था वा त्यांच्या पुरस्कर्त्यांना यापैकी एकाने तरी कधी जाब विचारला आहे का? मल्ल्या किंवा आणखी कोणी उद्योगपती करचुकवेगिरी बुडवेगिरी करतो, त्यापेक्षा असे स्वयंसेवी बदमाश वेगळे असतात काय? दोन वर्षापुर्वी केंद्र सरकारने बारा हजार स्वयंसेवी संस्थांचे परदेशी आर्थिक मदत घेण्याचे परवाने रद्द केलेले आहेत. नयनतारा यांच्यासह प्रतिष्ठीतांच्या घोळक्यात वावरणारे कित्येक नामवंत व साहित्यिक त्यापैकीच आहेत. कधी त्यांना आपल्यातच मिरवणार्या अशा बदमाशांना जाब विचारण्याची बुद्धी झाली आहे काय? नीरक्षीरविवेक नसलेल्यांना कधी पावित्र्याचा टेंभा मिरवून चालत नाही. त्यात अशा प्रतिष्ठीतांचा भरणा असतो. तेच अघोषित आणिबाणीच्या आवया उठवित असतात आणि एका राजकीय विचारसरणीच्या नावाने शंख करण्यात शक्ती खर्च करत असतात. ज्यांनी आजवर कधी सरकारी अनुदानातून आपले साहित्य प्रसवले वा प्रकाशित केले नाही, त्यांचे राज्य आज देशात आले आहे, याची सगळी पुरोगामी पोटदुखी आहे. आपले अनुदानित साहित्य समाजाने नाकारले त्याचे हे दुखणे आहे. त्यासाठी सगळा कांगावा चाललेला असतो.
आजवर अशा किती कार्यक्रमात शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते वा पुरस्कर्ते होते. त्याची गणती सांगता येईल काय? आनंद यादव यांना बाजूला व्हावे लागले किंवा ह. मो. मराठे या साहित्यिकाला अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून का माघार घ्यावी लागलेली होती? तेव्हा यापैकी किती लोकांनी गळा काढला होता? कशाला काढला नव्हता? संमेलन उधळून लावण्याच्या धमक्या तर चिपळूणच्या संमेलनातही मिळालेल्या होत्या. आयोजनाचे प्रसार साहित्य कसे हवे आणि त्यात कोणाचे प्रतिक नको, असले आक्षेप घेऊन उच्छाद कोणी मांडला होता? बाळासाहेब ठाकरे कमान नको कोण म्हणाले होते? तेव्हा कोणाची मान शरमेने खाली गेलेली होती? आमचे तेच खरे आणि दुसर्याची गळपेची, म्हणजे लेखन स्वातंत्र्य असली गुंडगिरी सरावलेली आहे. त्याला अघोषित नव्हेतर स्वयंघोषित आणिबाणी म्हणतात. मुळातच जे स्वयंघोषित साहित्यिक वा प्रतिभावंत आहेत, त्याची आणिबाणी स्वयंघोषित असली तर नवल कुठले? कारण ही मंडळी कायम आभासी जगात रममाण झालेली असतात. त्यांना आपल्या टोळीबाहेरचे जग माहिती नसते आणि मराठी जनताही ठाऊक नसते. मग तिथे आपले बस्तान बसवू बघणार्यांना त्याच्या कांगाव्याला शरण जावे लागते आणि पुरोगामीत्वाचा विजय होत असतो. ही नुसती झाकली मूठ असते. असे लोक मुळात साहित्य महामंडळ वा तत्सम संस्थांच्या जवळपास तरी कशाला फ़िरकतात? त्यांनी वीस वर्षापुर्वी विद्रोही संमेलन आरभले आहे. ते त्यांच्यासाठी पुरेसे आहे. अशा लोकांच्या बहिष्काराने १९९८ सालातले शिवाजीपार्क संमेलन विटाळले नाही आणि नंतरही काही बिघडले नाही. मग आताही त्यांच्या बहिष्काराने काय फ़रक पडणार आहे? त्यांना अशा बहिष्काराला प्रोत्साहन देणेच योग्य आहे. त्यांच्या अनुपस्थितीत मराठी साहित्य संमेलन उत्तम पार पाडले जाते, याची अनुभूती त्यांनाच येण्याची गरज आहे. कारण हे थोतांड दिवसेदिवस फ़ारच बोकाळत चालले आहे.
आजच्या साहित्यिक म्हणून मिरवणार्यात खरे प्रतिभावंत किती आणि पुरस्कृत चळवळ्ये, किती ह्याचा एकदा गंभीरपणे शोध घेणे अगत्याचे ठरेल. मुठभर चळवळ्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांना व संस्थांना पोखरून त्यांना राजकीय आखाडा बनवले आहे. त्यातून अशी क्षेत्रे व संस्थांना मुक्ती देण्याची गरज आहे. कारण हे नुसतेच त्यांच्या राजकारणाचे आखाडे झालेले नसून, चैनमौजेची कुरणे होऊन बसलेली आहेत. अशा साहित्य व्यवहारासाठी असलेली विविध सरकारी अनुदाने विनाविलंब थांबवावी. मग त्यांची मस्ती ठिकाणावर येऊ शकेल. कारण त्यातून समाजाला प्रगल्भ वा प्रगत करण्याला कुठलाही हातभार लागत नाही, तर फ़ुकट्यांचे अनुदानित राजकारण मात्र खेळले जात असते. अशा लेखकांची पुस्तके ग्रंथ वा त्यांना वाचनालयात अनुदानामुळे मिळणारी किंमत थांबली, मग हा भंपकपणा आटोक्यात येऊ शकेल. कारण काल किंवा आज त्यांच्या पुस्तक व लेखनाला कधीच वाचकमान्यता फ़ारशी मिळालेली नाही. उलट अशा फ़ुकट्यांमुळे खर्याखुर्या प्रतिभावंताना मात्र अडगळीत पडावे लागलेले आहे. ते वाचकांत लोकप्रिय होऊ शकणारे लेखक साहित्यिक मग नजरेत भरू लागतील आणि अशा पुरस्कृत आणि तिरस्कृत तोतयांना बहिष्कृत करण्यातून ते बदमाश चव्हाट्यावर येतील. तिथून साहित्य व्यवहाराला नवी चालना मिळू शकेल, नवी पालवी फ़ुटू शकेल. या वांझोट्यांची चैन बंद करण्यासारखी साहित्यसेवा सरकारला दुसरी कुठली करता येणार नाही. कारण यातले बहुतांश लोक अनुदानातून सरकारच पोसत असते आणि त्यांचा मलिदा बंद झाला, मगच ते भानावर येऊ लागतील. अन्यथा हा दरवर्षीचा तमाशा चालूच राहिल. संमेलनाच्या आयोजकांनी कुठल्याही कारणास्तव नयनतारा यांना आमंत्रण नाकारले असताना त्यावर बहिष्कार घालण्याच्या धमक्या देणार्यांचे म्हणून मराठी वाचकाने स्वागत करावे आणि त्यांच्याशिवायही मराठी साहित्य संमेलन यशस्वी होत असल्याची प्रचिती घडवावी.
परखड लेख. ..मजा आली.
ReplyDeleteत्या नयनतारा यांना बोलावणारे कोण हे ही कळु द्या आम्हाला.
श्री भाऊ एकदम मस्त, तुम्ही तर बिनपाण्यानी केलीत
ReplyDeleteकधी काळी बाळासाहेबांनी उगाच या तथाकथित साहित्यिक मंडळींचा बैल असा उल्लेख केला नव्हता . 😂😂😂
ReplyDeleteAbsolutely correct analysis. Nobody knows names of these people.Let alone reading their work ,which has no value. They should not be given public funds and told to manage own resources. And who knows Sehagal ? Anti Hindu woman.
ReplyDeleteनिःशब्द
ReplyDeleteमस्त लेख ..!! मागे एका कार्यक्रमात रामदास फुटाणे म्हणाले होते की आजकाल साहित्य महामंडळाच्या कार्यालयात पुस्तकांच्या आणि नोटिशींच्या ' फोटो प्रति ' काढणाराही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकतो....अट फक्त एकच ' या पुरोगामी भामट्यांची तुम्हाला मान्यता हवी. ' मग कोण कुठला सुमार ' श्रीपाल सबनीस ' साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनून जातो. या संमेलनाला येणारे श्रोते हे सगळे निवृत्त लोकांचा भरणा असतो. घरी वेळ जात नाही तर कोठेतरी जाऊन बसायचे ते संमेलनाला ....!! उपस्थित साहित्यिकांच्या गप्पा ऐकल्या तर सर्वजण कोठल्या स्टोलवर कोठले पदार्थ छान मिळतात यावरच चर्चा खिळलेली असते. बाकी संमेलन अध्यक्षांचे भाषण म्हणजे ' बकवास ' असतो.....ह्या पुरोगामी टोळक्यातील साहित्यिकांचे वागणे म्हणजे मागे एकदा पूर्वीचे समाजवादी पार्टीचे खासदार ' अमर सिंह ' एका कार्यक्रमात म्हणाले होते ते आठवले. ते म्हणाले होते की या भामट्यांचे असे असते की त्यांनी काही केले तर तर ती ' रासलीला ' असते आणि त्यांच्या विरोधातील कोणी तीच गोष्ट केली तर ते त्याला ' केरेक्टर ढिला ' म्हणतात.
ReplyDeleteमस्तच
Deleteफ मुं नी त्यावर विडंबन केल्याचे आठवते ..
ReplyDeleteजग हे नंदीशाळा .
कुणी न येथे बैल चांगला .
जो तो पथ विकलेला . 😂😂😂
एकदम छान भाऊ, आम्हां सर्वांच्या भावनांना तुम्ही शब्द देता, युनिव्हर्सिटी मध्ये लाखाने पगार घेणाऱ्या प्राध्यापकांबद्दल एकदा होऊन जाऊदे,,,,
ReplyDeleteसाहित्य संमेलन भरवून त्याचा आजपर्यंत खरंच जनतेला किती उपयोग झाला. दरवर्षी साहित्य संमेलन आले की अध्यक्ष पदापासून ते समारोपा पर्यंत यांची भांडणे सुरू होतात. हे लोकं खरंच सुशिक्षित अडाणी आहेत.
ReplyDeleteहे साहित्यिक नव्हेत 'सांस्कृतिक दाहशतवादी' होत.हे चेहरा झाकून नव्हे 'विवेक' झाकून गुंडगिरी करतात.सरकारी अनुदानावर चालणारे हे भंपक साहित्याचे कारखाने बंद केले पाहिजेत.
ReplyDeleteवाह! भाऊ मस्त परखड लेख. नयनताराबाईनवर अन्याय झाला असे सकाळ संध्याकाळ ओरडणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. अभिनानंदन!
ReplyDeleteStop this event forever
ReplyDelete