लालू तुरूंगात पडले असले तरी त्यांनी बिहारी राजकारणातील आपली हुकूमत सोडलेली नाही, की तिथल्या भाजपाविरोधी राजकारणावरून आपली पकड सैल होऊ दिलेली नाही. त्यांच्या धाकट्या सुपुत्राला वारस नेमून लालू राजकारण करीत असतात. या मुलानेही शिताफ़ीने पित्यासाठी तुरूंगाबाहेरची आघाडी संभाळलेली आहे. त्यात गठबंधनाचे ताणतणाव आणि अन्य राज्यातील प्रादेशिक नेत्यांशी समतोल राखण्याचेही कौशल्य त्याने राखलेले आहे. म्हणूनच दिर्घकाळ दोस्ती असलेले राष्ट्रीय जनता दलाचे मित्र पक्ष बिहारमध्ये लालूंना डोईजड होऊ शकलेले नाहीत. कॉग्रेससारख्या पक्षालाही तिथे शिरजोरी करता आलेली नाही. पण प्रत्येक मित्रपक्षाने आपापल्या मतलबासाठी दबाव आणल्याने त्या राज्यातील गठबंधनाचे जागावाटप रेंगाळलेले होते. अखेरीस त्याचा निकाल लागला असून, डाव्या पक्षांच्या हातावर तुरी देऊन लालूंनी जागावाटप संपवले आहे. त्यात दिल्लीच्या नेहरू विद्यापीठाचा लाडका लढवय्या कन्हैयाकुमार पुरता तोंडघशी पडला आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा हा तरूण नेता विद्यापीठात संघटनेचा अध्यक्ष म्हणून पुढे आला आणि नंतर काश्मिरी घातपाती जिहादींच्या आझादी घोषणांमुळे देशद्रोहाच्या आरोपांनी कुख्यातही झाला. त्यामुळे त्याच्या कडेवर बसून त्या पक्षाला बिहारमध्ये पुन्हा राजकीय वाटचाल करण्याची उबळ आली होती. पण चाणाक्ष लालूंनी त्यांचे मनसुबे जमिनदोस्त करून टाकले आहेत. त्यात बिचार्या कन्हैयाकुमारचा पोपट झाला आहे. कारण जागावाटप झाल्यानंतर त्याच्यासाठी कौतुकाची बेगुसराई जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला स्वबळावर उभे करण्याची नामुष्की कम्युनिस्ट पक्षावर आलेली आहे. थोडक्यात बळीचा बकरा म्हणूनच कन्हैयाला निवडणूकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे. मेवानी वा हार्दिक पटेल व्हायला निघालेला कन्हैया मतदानापुर्वीच संपला आहे.
देशभरच्या निवडणूक रणधुमाळीत कोणी कन्हैयाच्या या नामुष्कीची बातमीही देण्य़ाचे सौजन्य दाखवलेले नाही. खरेतर त्यातून या तरूण नेत्याने काही धडा शिकण्याची गरज आहे. त्याच्यासारखे उपटसुंभ क्रांतीकारी नेते म्हणजे बड्या राजकारणात बळी पडणारे निव्वळ प्यादे मोहरे असतात. त्यांनी कधी वजीर होण्याची स्वप्ने बघायची नसतात. छु केल्यावर दिसेल त्याच्यावर भुंकण्याने मालकाची शाबासकी मिळत असते, पण मालक होण्याची स्वप्ने बघायची मोकळीक नसते. नेहरू विद्यापीठाच्या पटांगणात जिहादी अफ़जल गुरू वा बुरहान वाणी यांच्यासाठी गळा काढताना देशद्रोही घोषणा देण्याने प्रसिद्धी खुप मिळू शकली. त्या कालखंडात नामोहरम झालेल्या कॉग्रेसला कुठूनतरी प्रसिद्धीचा झोत हवा होता. म्हणूनच कन्हैयाला अटक होताच त्याच्या पाठीवर राहुल गांधीही स्वार झाले आणि त्यांनी सिब्बलसारखे वकीलही कन्हैयाची बाजू मांडायला कोर्टात पाठवले होते. पण आता तो उपयोग संपला आहे आणि कन्हैयापेक्षा बिहारमध्ये राहुलना लालूंची गरज आहे. लालूंचे समर्थन व पाठींबा नसेल तर तिथून कॉग्रेसला दोनही जागा जिंकता येणार नाहीत. कन्हैया आपल्या बळावर निवडून येऊ शकत नाही, की कॉग्रेसला चार अधिकची मतेही मिळवून देऊ शकत नसतो. हे ठाऊक असल्याने त्याला सोबत घेण्याचा हट्ट कॉग्रेस धरू शकत नव्हती. लालूंनाही नुसत्या देखाव्यापेक्षाही निवडून येणार्या उमेदवारांची महत्ता कळते. त्यामुळे मते मिळवण्यापेक्षा घालवण्याची हमी असलेला कन्हैया कोणालाच नको आहे. पुलवामा आणि बालाकोटच्या घटनाक्रमाने कन्हैया हा एक राजकीय बोजा बनलेला आहे. तो घेऊन कोण निवडणूक लढवू शकेल? म्हणूनच बिहारच्या जागावाटपात बेगुसराईची एकमेव जागा कम्युनिस्टांना देण्याचे लालूंनी साफ़ नाकारले. कारण कम्युनिस्ट तिथे कन्हैयाला उभा करणार आणि आसपासच्या दहाबारा मतदारसंघात तरी लालूंचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.
कन्हैयाने देशद्रोही घोषणा देण्याबद्दल भले त्याला कोर्टात शिक्षा होऊ शकत नाही. तिथे युक्तीवादाने देशद्रोहसुद्धा पचवला जाऊ शकतो. पण निवडणूक हे जनतेचे कोर्ट आहे आणि तिथे कायदे व नियमांपेक्षाही भावनांचे निकष निर्णायक असतात. सामान्य जनतेला देशाच्या विरोधातल्या घोषणा किंवा भारतीय सेनादलाच्या विरुद्ध केलेले आरोप आवडत नाहीत. सहाजिकच ती जनता म्हणजे मतदार अशा बोलघेवड्यांना मतपेटीतून धडा शिकवत असतो. कन्हैयाने विद्यापीठात अशा घोषणा दिल्या वा सेनादलावर बलात्काराचे आरोप केले. त्यावर भाजपाने आक्षेप घेतला होता, तर कॉग्रेससह पुरोगाम्यांनी त्याचे समर्थन केले होते. पण तेव्हा निवडणुका नव्हत्या. आज निवडणूका आहेत आणि त्या लढवणार्यांना जनतेचा रोष परवडणारा नसतो. ह्याची जाणिव सॅम पित्रोडा वा कपील सिब्बलना नसेल. पण तुलनेने असंस्कृत गांवढळ असलेल्या लालूंना त्याचे पुर्ण भान आहे. म्हणूनच त्यांनी बेगुसराईची जागा कम्युनिस्ट पक्षाला नाकारून प्रत्यक्षात कन्हैयाचाच पत्ता कापला. वास्तविक कम्युनिस्ट पक्षाला लालूंनी एखादी जागा नक्की दिली असती. पण बेगुसराई म्हणजे कन्हैया हे ओळखूनच त्यांनी नकार दिला आणि सुंठीवाचून खोकला गेला. आता कम्युनिस्ट पक्षासाठी कन्हैया प्रतिष्ठेचा विषय झाला असून, त्यांनी स्वबळावर कन्हैयाला बेगुसराईतून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अर्थच सपाटून पराभूत होण्यासाठीच उभा केला आहे. त्यामुळे लालूंचे काडीमात्र नुकसान होणार नाही. कारण कन्हैयाच्या एकाकी लढतीमुळे लालूंनी त्याला तिकीट वा पाठींबा नाकारल्याचे सिद्ध होणार आहे. याला म्हणतात गावरान मुरब्बी राजकारण. जे आव आणुनही शरद पवारांना कधी जमले नाही आणि लालू त्यात पक्के मुरलेले आहेत. अगदी गावोगाव फ़िरून पवारांना जे शक्य झालेले नाही, ते लालू गजाआड राहूनही शक्य करतात ना?
माध्यमात चमकायचे असेल तर दिग्विजय वा थरूर, पित्रोडा असले पढतमुर्ख कामाचे असतात. पण निवडणूकांच्या कालखंडात त्यांचा काडीमात्र उपयोग नसतो. कारण माध्यमातले पढतमुर्ख ज्या शब्दांनी भुलतात, त्याला सामान्य मतदार किंमत देत नाही. राजकारणात टिकून रहायचे तर निवडणूका जिंकण्यला प्राधान्य असते. लालूंना त्याची जाणिव आहे. म्हणून त्यांनी कॉग्रेससह इतर लहानसहान पक्षाच्या दबावाला भिक घातली नाही आणि नेमके जागावाटप केले. त्यात कन्हैयाला खड्यासारखे बाजूला केले. जे पाप कन्हैयाचे आहे त्याची पुनरुक्ती करून पित्रोडा सारखे दिवाळखोर कॉग्रेसला गोत्यात आणत असताना लालूंची ही खेळी नजरेत भरणारी नाही का?मध्यंतरीच्या काळात एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याने चर्चेचे फ़ड रंगवता येतात. जनताही मनोरंजन म्हणून त्याकडे बघत असते. त्यात जनतेचा तसा सहभाग नसतो. पण मतदान हा जनतेच्या सहभागाचा खेळ आहे. त्यामुळेच तिथे मत देणार्याच्या अकलेला प्राधान्य असते आणि चर्चेचे फ़ड जिंकणार्याच्या बुद्धीपेक्षाही सामान्य जनतेच्या भावनांना अधिक मोल असते. त्याच्याशी कधी संबंध न आलेल्या पित्रोडांना लालू कधी समजू शकत नाहीत आणि राहुलनाही पित्रोडाला रोखता येत नसते. तिथेच मोठा फ़रक पडत असतो. सर्वात मजेची गोष्ट म्हणजे कालपरवापर्यंत कन्हैयाला डोक्यावर घेऊन नाचणार्या माध्यमातील शहाण्यांनाही आता त्याच कन्हैया किंवा त्याच्या साथीदारांचे स्मरणही उरलेले नाही. सगळेच कुठल्या कुठे बेपत्ता झालेले आहेत. इतरांचे सोडून द्या. कन्हैयासाठी शेहला रशीद किंवा तो खाली्द उमर वगैरही कोणी पुढे आलेले नाहीत. हा व्यवहार असतो. बळी व्हायला धावत सुट्लेल्या कन्हैयाचे असेच बळी जात असतात आणि त्यांच्याही नंतर नवनव्या पिढीतले मुर्ख बळी व प्यादे होऊन मरायला उतावळे होतच असतात. तीच तर जगरहाटी असते ना?
excellent read...
ReplyDeleteभाऊ साडेचार वर्षाच्या चिखलफेकीनंतर सेना भाजप युती झाली आहे त्यामुळे आता संजय राऊत यांची अवस्था अशीच झाली आहे
ReplyDeleteखरय भाउ. परत नवादाची जागा बदलुन गिरीराजना बेगूसराय देण्यामागे पण भाजपचा डाव असु शकतो.
ReplyDeleteकाय भाउ मस्त थेअरी मांडता राव तुम्ही.. कम्युनिस्टांचे आपल्याच कामगिरीने बिहारमधून उच्चाटन झालेलं आहे
ReplyDeleteभणंग लोकांना एकत्र आणून त्यांच्या दारिद्रयाचे उरबडवं प्रदर्शन मांडण्या व्यतिरिक्त पोथीनिष्ठ कम्युनिस्टांनी काहीही
केलं नाही त्यामुळे कम्युनिस्ट संपलेत. लालू घ्या काँग्रेस
घ्या किंवा वंचित आघाडी घ्या त्यांना कम्युनिस्ट संपलेत हे
नक्कीच माहिती आहे.. कन्हय्या साठी जर कुणी बिनडोक
कम्युनिस्टांशी आघाडी करेल तर तो राजकारणीच नव्हे.. कन्हय्याला मोठं मेडियान बनवलं. राहुल सिब्बल केजरीवाल
ह्यांनी त्यात लोण्याचा गोळा खाल्ला. पुरोगामींना मनस्वी आनंद झाला कि चला कुणी तरी भारताविरुद्ध परस्पर दवंडी
पिटतो आहे.. वंचितांच्या टाळू वरच लोणी खाणाऱ्यांना काश्मिरी मानवतावाद्यांना, ह्युमन राईट वाल्या
बांडगुळांना कन्हय्या देवदूत वाटला.. एकेकाळी इशरत जहाँ
सुद्धा ह्यांना मुलगी वाटली होतीच..आता इशरत जहाँ ऐवजी
कन्हय्या आला.. लालू च्या राजकारणावरून जाणता ( खरं तर कण्हता) राजा च धोतर भाउ तुम्ही मस्त सोडलं.. एकदम
पटलं... मस्त भाउ मस्त..
🦶🏻अशीच बसायला हवी होती,बरं झालं बसली ते !!
ReplyDeleteफारच अफलातून assessment केलीत तुम्ही लालूची, कन्हैयाची व निडणुकीतील डावपेचांची!
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteपिट्रोदासारखी माणसं काँग्रेसची पीत्रं घालत असताना कन्हैया ही लायबिलिटी आहे हे चाणाक्ष लालूंनी लगेच हेरले.
ReplyDeleteभाऊ तुमचा तर्क शंभर टक्के वास्तव!
काका लेखाचं शीर्षक वाचून फार हसलो. मस्त सुचतं तुम्हाला
ReplyDeleteचपराक!👍👍👍
ReplyDelete