Saturday, April 27, 2019

‘राज’ ठाकरेपर तो भरोसा करो

Image result for लावा रे तो व्हिडिओ

१९७०-८० च्या दशकात बब्बन खान नावाच्या हैद्राबादी कलाकाराने खुप धमाल उडवलेली होती. मुंबई, दिल्ली वा तत्सम महानगरात तो एक नाटक घेऊन यायचा आणि त्याच्या प्रयोगासाठी इतकी झुंबड उडायची, की आठवडाभराची तिकीटे काही तासात संपून जायची. षण्मुखानंद हे त्यावेळचे सर्वाधिक आसने असलेले थिएटर होते. अडीच तीन हजार सीटांच्या त्या नाट्यगृहामध्ये सलग सात दिवस बब्बन खानचे नाटक तुंबळ गर्दी खेचायचे. तसा त्यात नाव घेण्यासारखा कोणीही नावाजलेला कलाकार नव्हता आणि एकूण टीमही निनावी म्हणावी अशीच होती. पण त्यातल्या विनोदी संवाद आणि प्रसंगांनी लोकांना वेड लावलेले होते. त्या नाटकाचे नाव होते, ‘अद्रक के पंजे’. नाटकाची कथाही भारी नव्हती. पण त्यात जे प्रासंगिक व जीवनातील हलकेफ़ुलके अनुभव कथन होते, त्यामुळे त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठलेले होते. एक गांजलेला सामान्य मध्यमवर्गिय. त्याला बारा मुले असतात आणि त्यांच्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना हा गृहस्थ मेटाकुटीला आलेला असतो. त्या गरीबीवर बब्बन खान याने इतकी मजा निर्माण केलेली होती, की लोक त्याच्यावर फ़िदा होते, थोडक्यात दिवाळखोर कर्जबाजारी बब्बनखान, त्याची पत्नी आणि देणेकरी यांच्यातली वादावादी संवाद असे त्याचे एकूण स्वरूप होते. सध्या लोकसभा निवडणूका चालू असताना आपल्या पक्षाचा कोणी उमेदवार नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चालविलेली मोदीविरोधी आघाडी आणि त्यांच्या भरवंशावर लढणारी कॉग्रेस-राष्ट्रवादी, यांच्या भूमिका बघितल्यावर बब्बन खान आणि त्याच्या त्या विनोधी नाटकातील एक प्रसंग आठवला. दिवाळखोर कसे युक्तीवाद करू शकतात? आज कॉग्रेसी राजवर लोकांनी विश्वास ठेवून आपल्याला मते द्यावीत म्हणून आशाळभूत मागाणी करतात, त्यामुळे खरे तर बब्बनखान आठवला. बब्बन म्हणायचा रेड्डीसाब पर भरोसा करो. आणि आज कॉग्रेसवाले म्हणतात राज ठाकरेंवर विश्वास ठेवा.

शुक्रवारी रिपब्लिक या वाहिनीवर एका चर्चेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते आसिफ़ भामला यांचा युक्तीवाद मला बब्बनखानची आठवण देऊन गेला. वाराणशीतील नरेंद्र मोदी यांचा रोडशो आणि तिथून उमेदवारी करायच्या गमजा करून प्रियंका गांधींनी घेतलेली माघार, असा विषय चर्चेसाठी होता. तर त्यात वाराणशीबद्दल बोलण्यापेक्षा भामला हे अर्णबचे लक्ष राज ठाकरे यांच्या मुंबई महाराष्ट्रातील भव्य सभांकडे व त्यातील आरोपाकडे लक्ष वेधत होते. मला त्याची गंमत वाटली. राज्यात पंधरा वर्षे आणि देशात दहा वर्षे राज्य केलेल्या कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांना जनतेला सामोरे जाऊन आपला कारभार मोदी सरकारपेक्षा किती उत्तम होता, हे सांगायचे धैर्य आज उरलेले नाही. आपण काय दिवे लावले त्याविषयी त्यांना लोकांना सांगण्याची गरज वाटत नाही. यापेक्षा ते आपल्या प्रचाराची धुरा राज ठाकरे यांच्यावर सोपवून मोकळे झालेले आहेत. त्याविषयी इथे चर्चा आहेच. पण आपले मुद्दे मांडण्यापेक्षा राष्ट्रवादीचा प्रवक्ता किंवा मोदी विरोधातला कोणी बुद्धीमंत सुंदरम, राज ठाकरेंनी चालविलेल्या आरोपांचा हवाला देतो आहे. याला शहाणपणा नव्हेतर केविलवाणा प्रयास म्हणतात. आपण असे अन्य कुणाच्या भाषणाचे वा आरोपांचे हवाले देऊ लागतो, तेव्हा आपली विश्वासार्हता संपल्याचीच ग्वाही देत असतो. इतकेही अशा शहाण्यांच्या लक्षात येत नसेल, तर त्यांची कींव करावी तितकी थोडी असते. आसिफ़ भामला हे जणू असेच अर्णबला किंवा मतदाराला सांगत होते, की आमच्यावर, आमच्या पक्षावर विश्वास ठेवू नका. पण राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवाल की नाही? यालाच लाचारी म्हणतात आणि त्याचे अतिशय मस्त चित्रण बब्बन खानच्या नाटकात आलेले आहे. आपल्या दारात येऊन वसुलीसाठी शिवीगाळ करणार्‍या कुणा देणेकर्‍याला नाटकातला बब्बनखान नेमक्या याच शब्दात आश्वासन देतो, की माझ्यावर नाही, तर शेजारी रेड्डीसाहेब आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा ना? हे काय प्रकरण आहे?

बब्बन खान आपल्या घरात बसलेला आहे आणि एकामागून एक देणेकरी त्याच्या दारी वसुलीसाठी येत असतात. एक असतो किराणा दुकानदार. त्याची उधारी थकबाकी शिल्लक असताना बब्बनखानची पत्नी त्याला बासमती तांदळाचा भाव विचारते. तर बब्बनखान म्हणतो, बेगम उधारही लेना है तो भाव क्यु पुछना? कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाची दुर्दशा यापेक्षा वेगळी आहे काय? तशाच वसुलीसाठी आलेला दुधवाला भयंकर खवळलेला असतो. त्याची तीन महिन्यांची थकबाकी असते आणि तो वसुलीच्या भांडणात शिव्याशाप देण्यापर्यंत मजल मारतो. तर बब्बनखानचा शेजारी गलबला ऐकून तिथे येतो. दुधवाल्याला समजावतो, बब्बन एक गृहस्थ आहे आणि रस्त्यावरचा कोणी भुरटा नाही. घर सोडून कुठे पळून जात नाही. थकबाकी राहिलेली असेल तर पुढल्या खेपेस देऊन टाकेल, वगैरे. दुधवाला ते मान्य करीत नाही. मागल्या तीन महिन्यात अशाच आश्वासनाला फ़सून थकबाकी उधारी वाढलेली आहे. ती वसुल केल्याशिवाय हलणार नाही अशी धमकीच तो देतो. मग शेजारी रेड्डी व दुधवाला यांच्यातच हमरातुमरी सुरू होते. परिणामी बब्बनखान बाजूला पडतो आणि रेड्डीच दुधवाल्याला अंगावर घेतात. संतापाच्या भरात हा शेजारी विचारतो, अशी किती थकबाकी आहे की तू बब्बनला अपमानित करीत आहेस? अवघे ७५ रुपये? रागाच्या भरात रेड्डी खिशात हात घालतात आणि नोटांची थप्पी बाहेर काढतात. त्यातले मोजून ७५ रुपये दुधवाल्याच्या अंगावर फ़ेकतात. समाधान झाले काय, अस विजयी मुद्रेने बोलतात. त्यांचे मन:पुर्वक आभार मानून दुधवाला निघत असताना बब्वनखान म्हणतो. पहेलवान, कल दुध देने आ रहे होना? या निर्लज्जपणाने खवळलेला दुधवाला मागे वळून म्हणतो. तुझ्यावर कोण विश्वास ठेवील? वसुली करताना दमछाक झाली. बस झाले. यापुढे तुला दुध नाही. बब्बनखान राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रवक्त्याच्या भाषेत म्हणतो, यार हमपर नही लेकीन रेड्डीसाबपर तो भरोसा करो.

मागल्या काही दिवसात राज ठाकरे यांनी उघडलेली आघाडी कशासाठी होती? रेड्डी यांनी तर दुध घेतलेले नव्हते आणि सगळी लढाई त्यांनी अकारण अंगावर घेतली होती. त्यापेक्षा मनसेच्या सभा वेगळ्या आहेत काय? आपले उमेदवार नाहीत की आपण निवडणूकीच्या लढतीमध्ये नाही. मग राज ठाकरे आवेशात इतकी भाषणे का देत आहेत? कॉग्रेस राष्ट्रवादीचे नेते त्यांना त्याविषयी चकार शब्द कशाला विचारत नाहीत? निदान त्या नाटकात शेजारच्या रेड्डीला बब्बनखान आपली उधारी चुकती करण्यासाठी वा दुधवाल्याशी भांडायला बोलावत तरी नाही. इथे मातोंडकरपासून अशोक चव्हाणांपर्यंत प्रत्येकजण राज ठाकरेंना आपापल्या मतदारसंघात सभा घ्यायला आमंत्र्ण देतो आहे. आपली दिवाळखोरी प्रत्येकाला इतकी मनोमन पटलेली आहे, की आपल्या कामाच्या जोरावर मते मागण्याची हिंमत त्यांच्यात उरलेली नाही. मग कलावंत साहित्यिक वा अन्य कोणी पक्ष नेते यांना मतांचा जोगवा मागायला पुढे केले जात आहे. त्यासाठी मग लोकशाही वाचवणे किंवा संविधान धोक्यात असल्या आरोळ्याही ठोकल्या जात असतात. पण व्यवहारात त्यांचे दिवाळे वाजलेले आहे. त्या नाटकात बब्बनखान जसा दुध घेऊन पैसे चुकते करायलाही खिशात काही नसलेला दिवाळखोर झालेला असतो, तशी ही दुर्दशा आहे. आमचे नेते, आमचा कार्यक्रम, आमची धोरणे यावर आम्हाला मते द्या, असे कोणी मतदाराला सांगण्याच्या स्थितीत राहिलेला नाही. अगदी त्यांच्या साहित्यिक कलावंत पुरोगामी साथीदारांचीही अवस्था तितकीच केविलवाणी झालेली आहे. आजवर ज्या राज ठाकरेवर ‘खळ्ळ खट्याक’ अशी मल्लीनाथी चालायची तोच आता पुरोगामीत्व वाचवू शकेल इतकाच आशावाद शिल्लक उरला आहे. म्हणून मग बब्बनखानच्या सुरात ते लोक सांगू लागले आहेत, आमच्यावर राग असू देत, पण निदान राज ठाकरेंवर विश्वास ठेवाल की नाही?

17 comments:

  1. आदरणीय भाऊ सर २०१३ मध्ये देखिल इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केजरीवालना मोदींसमोर माध्यमातून आव्हान उभे केले होते त्याचे नंतर काय झाले हे सर्वश्रृत आहे. पण गंमत अशी की महाराष्ट्रात सुद्धा हेच चालू काही मोजक्या माध्यमांनी पेंटरची तळी उचलून धरली आहे आणि सोशल मिडीयातून त्यांच्या समर्थकांनी आणि काही पाठीराख्यांनी. खरं म्हणजे जनता आणि कार्यकर्त्यांना जोडणारा दुवा म्हणजे दुसर्या आणि तिसर्या फळीतील नेत्यांची वानवा आहे मनसेत. दूसरे असे राजूची धाव ही मुंबई, ठाणे आणि नाशिक, थोडं फार पुणे इथपर्यंत आहे.मुंबईत तोही ठराविक मराठी पट्ट्यात आहे. ठाणे हे एकनाथ शिंदे यांच्या सारख्या कुशल नेतृत्वाने बांधणी केली आहे तर पुण्यात भाजपने महापालिका जिंकून बस्तान बसवायला सुरूवात केली आहे
    नाशिकमध्येही तेच आहे. मग राज यांचा जनाधार आहे कुठे. जोपर्यंत खालच्या स्तरापासून ते वरच्यास्तरावर संघटनेची आणि नेत्यांची मोर्चे बांधणी होत नाही,केवळ पेंटरच्या सभा आणि भाषणांवर विसंबून न राहता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत पक्षसंघटन मजबूत होत नाही तोपर्यंत विधानसभाच नाही तर महापालिका जिंकणे सुद्धा कठीण आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. But main problem is Raj is damaging the faith in Government and Politicians which is damaging for Democracy

      Delete
  2. झुक झुक झुक झुक अगीन गाडी
    काँग्रेस राष्ट्रवादीची नेसुन साडी
    खोटे व्हिडिओ लाऊया
    काकांच्या गावाला जाऊया

    ReplyDelete
  3. पूर्वी लग्न मुंज असे विधी घरातल्या घरात केली जायची.घरातले सर्वजण नातेवाईक कामे करायची.मग कॉन्टॅक्ट जमाना आला व सर्व जबाबदरी कॉन्टॅक्टरवर सोडून आपण मोकळे.असेच सध्या चालले आहे.पण कॉन्टॅक्टरवर किती व कसा भरवसा ठेवायचे हे ज्याचे त्यानी ठरवायचे आसते व आता हा कॉन्टॅक्टर किती खरा व किती खोटा हे जनता ठरवतिलच

    ReplyDelete
  4. आता सध्याच्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर उपद्रव मूल्याच्या अनुषंगाने, एक नाव नक्कीच घोंघावतंय ते म्हणजे राज ठाकरे. पण ह्या राज ठाकरेंच्या उपद्रव मूल्याची परिमाणेच ही प्रचंड गोंधळलेली दिसतात. जी केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वालाच नव्हे तर त्यांच्या एकंदरीत पक्षाला हानिकारक ठरली आहेत, येत्या काळात अजून ठरतील..

    “माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे” म्हणून एक रुबाबदार आणि तेवढंच धीरगंभीर व्यक्तिमत्व शिवसेनेतून बाहेर पडलं, राज्याचा दौरा केला, तरुणाई ह्या व्यक्तिमत्वाच्या मागे वेडी झाली, जागोजागी त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स वाजू लागल्या, त्याचं पाठांतर सुरु झालं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. तमाम तरुणाईचे आकर्षण म्हणजे राज ठाकरे असे काहीसे समीकरण बनले. पहिल्याच निवडणुकीत तब्बल तेरा आमदार निवडून आले. आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली. एकोणतीस जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. ज्याठिकाणी मनसे निवडून येऊ शकत नव्हती तिथे भाजपा-शिवसेनेचे उमेदवार, मतविभाजनामुळे पडले. त्याच वर्षी, विधानसभेआधी झालेल्या लोकसभेत ह्या मनसेचा सगळ्यात जास्त फटका हा भाजपा शिवसेनेच्या उमेदवारांना पडला कारण युतीचा पारंपरिक मतदार ह्या नेत्याला भुलला. युतीचं प्रचंड नुकसान झालं जरी मनसेचा एकसुद्धा खासदार आला नसला तरी..

    त्याचसुमारास पुणे मनपामध्ये मनसे मुख्य विरोधी पक्ष म्हणून पुढे आला, तर नाशिक मनपा खिशात घातली.. आणि २०१४ ची लोकसभा आली..

    २०१४ पर्यंत मनसेने जे काही मिळवले होते. कदाचित त्याची हवा डोक्यात गेली असेल पण नंतर त्याला उतरती कळा लागली. राज ठाकरेंचे वक्तृत्व आणि त्यांचे ठाकरे हे आडनाव सोडले तर त्यांच्यामध्ये असं काय आहे कि पत्रकार त्यांना दूरदृष्टीचा नेता म्हणतात असा मला नेहमी प्रश्न पडतो.. कारण जे यश मनसेला मिळालं. ते राज ठाकरेंना टिकवता आलं नाही, निवडून आलेल्या उमेदवारांसोबतच..

    राज ठाकरेंच्या गोंधळाची सुरुवात त्यांच्या पार्टटाइम राजकारणापासून होते. राज ठाकरे हे पूर्णवेळ राजकारणी नाहीत. ते सहा सहा महिने दिसत नाहीत. दिसले तरी कधी गायब होतील सांगता येत नाही. पण २०१४ पर्यंत राज ठाकरेंची जी मोहिनी मराठी मनावर घातली गेली होती त्यामुळे हे कोणाच्या फारसे लक्षात आले नाही. २००९ मध्ये मनसेने ११ उमेदवार उभे केले होते आणि मतविभाजनामुळे त्याचा जबर फटका युतीला बसला होता, हे सर्वांना माहीत आहेच. कदाचित राज ठाकरे त्याच २००९ च्या प्रभावाखाली असावेत आणि भाजपा-शिवसेना ही जाहीर युती असूनही त्यांनी २०१४मध्ये सेनेविरोधात ९ उमेदवार उभे केले होते, सोबत मोदीनामाचा जप होताच. २०१४ साली ते अशा प्रकारे मोदींच्या आहारी गेले कि कदाचित त्यांना त्यांच्याच पक्षाचा विसर पडला असावा. कारण सभांमधून मोदींना मत द्यायचा आग्रह ते करीत. ही गोष्ट पत्रकारांच्या नजरेमधून कशी सुटेल?? २०१४ च्या लोकसभेच्या सुमारास त्यांचे जेवढे काही इंटरव्युज झाले, त्यामधून जेंव्हा त्यांना विचारलं जायचं, कि जर मोदींच पंतप्रधान हवेत तर मग मनसेला लोकांनी का मत द्यावं? युतीला का नको? सरळ घास समोर असताना अवघडातला का बुवा? ह्या अश्या प्रश्नांवर ते प्रचंड चिडायचे. त्यांची ती चिडचिड युट्युबवर अजूनही उपलब्ध आहे. मतदारांनी जो काय द्यायचा तो निर्णय दिलाच. ह्या अश्या गोंधळामुळे मनसेला डिपॉझिटसुद्धा वाचवता आलं नाही आणि मनसेची जी अपेक्षित धूळधाण उडाली त्यानंतर राज ठाकरेंच्या गोंधळात अजून वाढ झाली..

    नंतरच्या विधानसभेच्या वेळेस तर राज ठाकरेंच्या लहरी स्वभावाला कंटाळून मनसेला बऱ्याच जणांनी जय महाराष्ट्र केला होताच.. आधी मुंबई, पुणे नाशिक एवढ्याच तीन जिल्ह्यांमध्ये पसारा असणाऱ्या मनसेला खरंतर सावरणं एवढं अवघड नव्हतं. पण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही. विधानसभेचे पडघम वाजू लागले. पक्ष संघटन बऱ्यापैकी मोडकळीस आलं होतं. कदाचित ह्याचे भान ह्या दूरदृष्टीच्या नेत्याला आले नसेल. एका सभेत त्यांनी स्वतःच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून स्वतःला सादर केले. लगेच दोन चार दिवसात ती घोषणा मागे घेतली गेली.. अजून एक गोंधळ..

    ReplyDelete
  5. चार निवडणुकांत चार वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचारासाठी काम .
    २००४ शिवसेना
    २००९ मनसे
    २०१४ भाजप
    २०१९ काँग्रेस

    ReplyDelete
  6. Bhau you should tell Raj that for his political gain what big mistake he is doing and demolishing respect for politician's in general public and damaging democratic values

    ReplyDelete
  7. हा हा हा उदाहरण बाकी छानच दिलंत, जर राज साहेब यांनी प्रचार सभेत भाग घेतला नासता तर यावेळी प्रचार सभाना मजा आली नसती, शिवाय राज ठाकरे यांनी जी नवीन पद्धत अवलंबिली त्याला तर तोडच नाही। तसही भाजप नेते तोड देण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात पण त्यात काहीच दम दिसत नाही।
    शेळीने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून थोडावेळ वाघाचं पिल्लू असल्याचा भास होईल पण शेळी डरकाळी फोडू शकत नाही, ती शेवटी बॅ बॅ च करणार।

    ReplyDelete
  8. अद्रक के पंजे. इतके जुने संदर्भ आणि आणि त्याची आजच्या या परिस्थितीशी तुलना. भाऊ मानलं तुम्हाला. राज ठाकरे पे भरोसा. हा हा हा हा हा!!!!

    ReplyDelete
  9. Bhau tumhi Raj baddal bola na impartial.

    ReplyDelete
  10. आता पुढील दर्शन सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात. नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या मनोरंजनासाठी येतील. तोपर्यंत या निवडणुकीत जे व्हिडिओ पाहिले त्यावरच गुजराण करावी लागेल असे दिसते.

    ReplyDelete
  11. मध्यन्तरी अमीर खान, किरण जोहर आणि इतर काही लोकांनी एका आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञाना द्वारे मुले झाली तेंव्हा पासून "सरोगसी" हा शब्द आता बऱ्याच लोकांना माहित झाला आहे. नवऱ्याचे शुक्राणू आणि पत्नी चे बीज वापरून तयार केलेला गर्भ वेगळ्याच स्त्रीच्या उदरात वाढवतात. राज ठाकरे हे असे राजकीय सरोगेट माता बनलेले आहेत.

    ReplyDelete
  12. विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनुसार राज ठाकरे मतदानासाठी किती काळ रांगेत उभे होते याचे नमुने

    साम टीव्ही-एक तास
    एबीपी- दीड तास
    लोकमत-पावणे दोन तास
    लोकसत्ता-दोन तास

    धन्य तो मतदार, आणि धन्य ती पत्रकारिता .

    ReplyDelete
  13. भाऊ,
    आमच्या(??) पुण्यातील एक नामवंत आणि थोर समाजवादी नेते कुमार सप्तर्षि ह्यांनी राज ठाकरे ह्यांना नुकतेच एक प्रशस्तीपत्र दिले.ते म्हणाले ‘राज ठाकरे आता राष्ट्रीय नेते होतील’.कोंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आपण समजू शकतो पण कै. लोहियाना आज स्वर्गात धन्य वाटेल.ह्याच कुमारनी नुकतेच मधुसूदन मिस्त्रीना भाषण करायला बोलावून कोंग्रेसची भरपूर स्तुति केली.-----धन्य समाजवाद

    ReplyDelete
  14. Today... After the Great PAPPU himself, Raj Thackeray is the BEST ENTERTAINER. Both should form a Gathbandhan and perform together. GUARANTEED CROWDS.... TOTAL DHAMAAL!

    ReplyDelete
  15. महेश लोणेMay 1, 2019 at 11:50 AM

    आजची परिस्थिती आणि जुने संदर्भ... खूप अप्रतिम लेख

    ReplyDelete