बॉडी लॅन्गवेज म्हणजे देहबोली नावाचा एक शास्त्रीय प्रकार आहे. त्यावर बरेच संशोधन चालू असते. नॅशनल जिओग्राफ़ीक किंवा डिस्कव्हरी अशा वाहिन्यांवर त्याचे माहितीपट अनेकदा प्रदर्शित होत असतात. त्यामध्ये या शास्त्राचे विविध पैलू उलगडून दाखवले जात असतात. त्याचा संदर्भ समजून घेतला, तर ममता बानर्जी, राहुल गांधी किंवा केजरीवाल, शरद पवार अशा विरोधी नेत्यांची देहबोली खुप काही सांगून जाणारी असते. त्यांच्या बोलण्यातला आवेश किंवा भरकटलेले शब्द, त्यांना भयभीत करणारे असल्याचे आपल्या सहज लक्षात येऊ शकतात. त्यातल्या त्यात ममता बानर्जी यांचा तर पुरता तोल सुटला आहे आणि ती आजकालची गोष्ट नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून किंवा त्याच्याही आधीपासून त्यांना बंगाली जनतेचा प्रतिसाद मिळू लागल्यापासून त्या बंगालची महासम्राज्ञी असल्याप्रमाणे मनमानी करीत असतात. आपल्या विरोधात कोणी बोलला किंवा मतभिन्नता जरी व्यक्त केली, तरी त्याच्यावर शत्रू म्हणून तुटून पडत असतात. अशा वर्तनामागची प्रेरणा देहबोलीतून स्वच्छ दिसू शकते. ‘सिक्रेटस ऑफ़ बॉडी लॅन्गवेज’ नामक माहितीपटामध्ये त्याचे बारकावे स्पष्टपणे मांडलेले आहेत आणि त्याचे प्रतिबिंब या सर्वच विरोधी नेत्यांच्या वागण्यात पडलेले दिसते. म्हणूनच सतरावी लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना, या नेत्यांचा धीर कशाला सुटला आहे, त्याचे उत्तर त्यांच्या देहबोलीतच शोधणे भाग आहे. यातले जाणकार म्हणतात, माणूस शब्दांचा उच्चार करून बोलत असला तरी त्या शब्दांपेक्षाही त्याच्या देहाच्या हालचालीतून तो अधिक व्य्क्त होत असतो. शब्दांचा परिणाम फ़क्त ७ टक्के आणि शारिरीक हालचालींतून तो माणूस ९३ टक्के व्यक्त होतो. ही बाब समजून घेतल्यास राहुल, ममता किंवा केजरीवाल यांचे राजकीय आवेश उलगडू शकतात. ममता इतक्या कशाला खवळल्या आहेत?
अनेकदा आपल्याला असे जाणवते, की समोरची व्यक्ती बोलत एक असते आणि त्याचा देह किंवा चेहर्यावरचे भाव भलतेच काही सांगत असतात. ज्या माहितीपटाचा संदर्भ इथे दिला आहे, त्यामध्ये याचा छानपैकी खुलासा आलेला आहे. राजकीय नेते सोडा, सामान्य गुन्हेगार, पत्रकार किंवा कोणाही व्यक्तीच्या हालचाली खुप बोलक्या असतात. त्यातूनही त्याचा खरेखोटेपणा आपल्याला ताडून बघता येत असतो. राहुल गांधी म्हणतात, आपण मोदींचा काडीमात्र द्वेष करत नाही. उलट आपण मोदींवर प्रेमच करतो आणि आपल्या प्रेमातूनच आपण मोदींना पराभूत करणार आहोत. त्यांची भाषा, शब्द आणि त्यांचा आवेश परस्परांशी जुळणारे असतात काय? प्रेमाची भाषा बोलणारा बाह्या वर करून आवेशात बोलतो, की मृदू आवाजात आपले मन व्यक्त करीत असतो? कोणी प्रियकर वा प्रेयसी आपल्या प्रेमाचा संदेश घोषणांनी देते काय? शिव्याशाप किंवा अपशब्दातून प्रेम व्यक्त होते काय? पण राहुल गांधींचे तसे म्हणणे आहे. आपल्या राज्यात ममता अन्य पक्षांना चिरडून काढण्याची भाषा सतत बोलतात आणि त्याला कोणी आक्षेप घेतला वा प्रश्न विचारला, तरी त्याच्या अंगावर धावून जायचे बाकी ठेवतात. आज नाही, आठ वर्षापुर्वी सागरिका घोष या पत्रकार महिलेने जाधवपुर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी ममतांचा संवाद घडवून आणणारा कार्यक्रम योजला होता. तेव्हा लागोपाठ बंगालच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विचारले गेले. तर उपस्थित सगळे विद्यार्थी माओवादी किंवा मार्क्सवादी असल्याचा गदारोळ करून ममता त्या कार्यक्रमातून हातपाय आपटून निघून गेलेल्या होत्या. आज तेच व तसेच आरोप ममता भाजपाविषयी करत असतात. दहा वर्षापुर्वी ममतांना प्रश्न विचारणारा माओवादी असायचा, आजकाल तसे करणारा भाजपावाला किंवा संघाचा हस्तक असतो. अगदी राजदीप सरदेसाई या कट्टर मोदी विरोधकाला ममतांनी भाजपाचा दलाल संबोधण्याची घटना कालपरवाचीच आहे.
ह्या प्रकारचे वागणे हे भयगंडाचे लक्षण असते. २००९ सालात ममता बानर्जींनी प्रथम बंगालमध्ये डाव्या आघाडीला राजकीय शह देऊन कॉग्रेसच्या मदतीने मोठे यश मिळवले. तेव्हापासून त्यांना अशा भयगंडाने पछाडलेले आहे. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद व्यक्त करणारा किंवा त्यांच्या कुठल्याही कृतीवर प्रश्न विचारणारा त्यांना शत्रू वाटत असतो. कुठल्याही घटनेत त्यांना शत्रू वा कारस्थान दिसू शकत असते. अडीच वर्षापुर्वी देशात नोटबंदी झालेली असतानाच्या कालखंडात बंगालमध्ये एका ठिकाणी लष्कराच्या तुकड्या आपला नेहमीचा सराव करीत होत्या आणि त्याविषयी स्थानिक नागरी प्रशासनाला पुर्वसुचना देण्यात आलेल्या होत्या. पण नोटबंदीच्या विरोधामध्ये कंबर कसून उतरलेल्या ममतांना त्यामागे बंगालचे सरकार बरखास्त करण्याची मोदींची चाल दिसलेली होती. कधीकाळी त्यांच्या विरोधात बोललेले मार्क्सवादी असायचे, आता तेच शब्द त्यांना संघाचे वाटतात. कालपरवा कुठल्या तरी सभेला कार्यक्रमाला त्या निघाल्या असताना एका गावातल्या जमावाने ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. तर गाड्यांचा ताफ़ा थांबवून मुख्यमंत्री रस्त्यावर उतरल्या आणि गावकर्यांशी हुज्जत घालून भांडू लागल्या. भारताच्या इतिहासात अशा रितीने गावकर्यांशी किंवा गर्दीशी वाद घालणारा हा पहिलावहिला मुख्यमंत्री आहे. पण त्यातून त्यांना बाहेर काढायचे कोणी, असा प्रश्न आहे. कारण मानसिक संतुलन बिघडले असेल, तर त्यावर उपचार करणार्यालाही आरोग्याविषयी प्रश्न विचारावे लागणारच. पण तसा प्रश्न विचारणार्या डॉक्टरलाही ममता संघवाला किंवा माओवादी ठरवून मोकळ्या होण्याचा धोका असतोच ना? सबब त्यांच्या सहकार्यांना किंवा निकटवर्तियांनाही ममतांचे दोष वा दुर्दशा दिसत असली, तरी सल्ला देण्याची हिंमत होत नाही. परिणामी त्यांचे मानसिक संतुलन पुर्णपणे हरवलेले आहे आणि आता त्यांना निवडणूक आयोग किंवा सुप्रिम कोर्टही संघाच्या आदेशानुसार चालते, असा संभ्रम व्हायला लागला आहे.
गेल्या मंगळवारी ममतांच्या बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा कोलकात्यामध्ये रोडशो ठरलेला होता अशा कुठल्याही कार्यक्रमाला ममता मुद्दाम अडवणूक करतात. हा तमाशा मागली दोन वर्षे अखंड चालू आहे. कुठल्याही सभागृहात किंवा खुल्या मैदानात भाजपाने सभा समारंभाचे आयोजन केल्यावर त्याला वेळीच परवानगी द्यायची नाही. उशीर केल्यावर त्यात पुन्हा नवे आक्षेप घेऊन आयोजनामध्ये गोंधळ घालायचा, असाच बंगालच्या प्रशासनाचा खाक्या राहिलेला आहे. तो अर्थातच ममतांच्या पक्षीय भूमिकेतून आलेला असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यापैकी अनेक कार्यक्रम भाजपा किंवा त्यांच्या विविध संघटनांना कोर्टामध्ये दाद मागून साजरे करावे लागलेले आहेत. कधी भाजपा नेत्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास परवानगी नाकारली जाते, तर कधी त्यांचे प्रमुख कार्यकर्ते ऐन सभेच्या आधी अटक करून रोखले जातात. मंगळवारीही ज्या रस्त्याने अमित शहांचा रोडशो व्हायचा होता, तिथल्या ठिकठिकाणी लावलेले फ़लक झंडे पोलिसांच्या मदतीने उध्वस्त करण्यात आले. नियमात बसत नसेल म्हणून मालमत्तेची वा प्रचार साहित्याची नासधूस करण्याचा अधिकार पोलिसांना कुठला कायदा देत असतो? पण हा प्रकार राजरोस चालू होता आणि संध्याकाळी त्याच रोडशोच्या दरम्यान विद्यासागर कॉलेजनजिक हिंसाचार झाला. तिथे ममतांच्या पक्षाचे टोळीने जमलेले काही कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन थांबलेले होते, तर त्यांचा बंदोबस्त करून रोडशो शांततेत पार पाडणे, ही कोलकाता पोलिसांची जबाबदारी होती. पण तिथेच ममतांच्या पोलिस खात्याने बघ्याची भूमिका घेतली आणि हिंसेचे थैमान झाले. मिरवणूकीवर मुठभर लोक हल्ला करणार असतात, तेव्हा त्यांच्या मुसक्या बांधणे ही पोलिस कारवाई असते. तसे न करणे म्हणजे हिंसेला पोलिसांनीच प्रोत्साहन देणे असते. ममतांनी नेमके तेच घडवून आणलेले आहे.
ममता एक गोष्ट साफ़ विसरून गेल्यात, की त्यांना बंगाली मतदाराने ज्या कारणास्तव सत्तेत आणून बसवले, ते तिथली प्रशासन व गुंडांची मिलीभगत मोडून काढली जावी म्हणून. आज जितका धिंगाणा तृणमूलचे गुंड घालीत असतात, तितकीच दहशत अशा गुंडांनी डाव्या आघाडीची सत्ता असताना जनतेच्या मनात बसवली होती. त्या दहशतीचा सामना करायची हिंमत कॉग्रेसने दाखवली नाही म्हणून वैतागून ममतांनी त्या पक्षाला रामराम ठोकून आपल्यासारख्या निराश कॉग्रेसजनांच्या सोबतीने तृणमूल कॉग्रेस हा वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. त्यांनी थेट मार्क्सवादी व डाव्या गुंडगिरीच्या विरोधात विरोधाचे निशाण खांद्यावर घेतले आणि हळुहळू विविध समाज घटकातले असे भयभित लोक ममतांच्या पाठीशी उभे रहात गेले. आरंभी डाव्यांच्या गुंडगिरीला पाठीशी घालणारे बुद्धीमंतही ममताच्या मागे येऊन उभे राहिले आणि डाव्यांची दहशत संपुष्टात आली. जेव्हा सामान्य जनता एकजुटीने गुंडगिरीचा सामना करायला समोर येते, तेव्हा गुन्हेगारांचे अवसान गळून पडत असते. दुर्दैव इतकेच, की सत्ता हाती आल्यावर खुद्द ममतांनाच ह्या सत्याचा विसर पडला. हाती आलेली सत्ता टिकवण्यासाठी डाव्यांनी ज्या दहशतीचा आधार घेतला होता, त्याच मार्गाने ममताही जाऊ लागल्या. प्रशासन आधीच डाव्यांनी पक्षपाती करून ठेवलेले होते आणि ममतांच्या हाती सत्ता आल्यावर त्याच प्रशासनाने गुंडांनाही तृणमूलच्या गोटात आणून बांधले. ममता कार्यकर्ता विसरून गुंडांच्या आहारी गेल्या आणि त्यातून पुन्हा निराश भयभीत जनतेला नवा पर्याय शोधण्याची वेळ आली. तोपर्यंत तिथला कॉग्रेस पक्ष दुबळा होऊन गेला होता आणि गुंड सोडून गेल्याने डावी आघाडीही निष्प्रभ झालेली होती. अशावेळी भाजपाने बंगालमध्ये प्रवेश केला आणि गुंडगिरीशी दोन हात करण्याची इच्छाशक्ती दाखवली. त्यातून पुन्हा एकदा बंगाल परिवर्तनाचा उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेरच्या दोनतीन सभांमध्ये काय बोलले, ते आपले पुर्वग्रह बाजूला ठेवून समजून घ्यावे लागेल. बंगालची लढाई भाजपा विरुद्ध ममता किंवा तॄणमूल अशी पक्षीय राजकारणाची नाही. ही लढाई ममता विरुद्ध जनता अशी झालेली आहे. भाजपा वा कॉग्रेस, मार्क्सवादी यांना ममता घाबरत नाहीत, त्यांना आता जनतेची भिती सतावते आहे. ऐकायला हे गमतीशीर विधान वाटेल. पण दहाबारा वर्षापुर्वी तेच झालेले होते. डाव्यांनी ममताची कोंडी अशीच केलेली होती आणि त्यातून सत्तापरिवर्तन झालेले होते. डावे ममताच्या विरोधात गुंडगिरी करताना सामान्य निराश हताश जनतेचीच कोंडी करू लागले होते आणि त्यांच्या विरोधात उत्स्फ़ुर्त प्रतिक्रीया उमटली. त्याला अभ्यासकांनी ममताचा करिष्मा ठरवले होते. तो प्रत्यक्षात सामान्य पिडलेल्या गांजलेल्या जनतेचा हुंकार होता. मागल्या दोनचार वर्षामध्ये खुद्द ममतांनीच तशी वेळ जनतेवर आणली. तिला नवे नेतृत्व शोधायला भाग पाडले, तेव्हाच डाव्यांनी किंवा कॉग्रेसने तिथल्या जनतेच्या भावनांना प्रतिसाद दिला असता, तर भाजपचा इतका विस्तार होऊ शकला नसता. आज वरकरणी तिथे ममता विरुद्ध भाजपा असे राजकीय चित्र दिसत असले, तरी व्यवहारात बंगालची लढाई ममताचे पोलिस-गुंड यांच्या आघाडी विरोधात जनतेशी लढाई जुंपलेली आहे. म्हणूनच वारंवार ममतांचा तोल जातो आहे. ज्या कायदेशीर वा प्रशासकीय कारवाया करून ममता भाजपाला रोखू बघत आहेत, त्या अधिकाधिक जनतेला मतदाराला भाजपाच्या गोटात ढकलून द्यायला कारणीभूत ठरलेल्या आहेत. अशा अतिरेकातून जर जनतेला वा भाजपाला रोखणे शक्य असते, तर मुळात ममता तरी मुख्यमंत्री कशाला होऊ शकल्या असत्या? मार्क्सवादी गुंडगिरी व प्रशासनाची शक्तीच ममतांना रोखायला पुरेशी ठरली असती. लोकमतासमोर अशा शक्ती दुबळ्या असतात, हे समजून घेतले तर बंगालची लढाई समजू शकेल.
सत्तेत येताना ममता बांगलादेशी घुसखोरीच्या विरोधात लोकसभेत धुमाकुळ घालत होत्या. आज त्यांना अशा घुसखोरांच्या मतांवर निवडणूका जिंकण्याच्या आशावादाने पछाडले आहे. तेव्हा ममता मार्क्सवादी प्रशासन व गुंडगिरीच्या संगनमताच्या विरोधात लढत होत्या. आज त्यांना त्याच आधारावर सत्ता टिकवायची आहे. मार्क्सवादीही केंद्राच्या विरोधात व राज्यपालांना दोष देत होते. ममता काय वेगळे करीत असतात? फ़रक नक्की आहे. मार्क्सवादी नेते ममता इतके बेताल झालेले नव्हते. त्यांना निदान जग काय म्हणेल, अशी लाज वाटायची. ममता सुप्रिम कोर्टापासून सेनादल वा निवडणूक आयोगालाही संघाचे मोदींचे हस्तक म्हणण्यापर्यंत बेताल झालेल्या आहेत. उद्या कदाचित त्यांना बंगालचा मतदार व जनताही मोदींची सेना वाटू शकेल. अशा गर्जना डरकाळ्या युक्तीवाद माध्यमात झळकण्यासाठी उपयुक्त नक्की आहेत, पण लोकमत जिंकण्यासाठी त्यांचा काडीमात्र उपयोग नसतो. हा ममताना अनुभवातून मिळालेला धडा आहे. ज्या मार्गाने त्यांनी मार्क्सवादी गुंडगिरीचा बिमोड केला होता, त्याच पद्धतीने भाजपा किंवा अमित शहांनी बंगालची रणनिती राबवलेली आहे. तिच्याशी दोन हात करताना मार्क्सवादी आघाडीने केलेल्या चुका करू नयेत, इतकेही ममता शिकलेल्या नसतील, तर त्यांना कुठली व्होटबॅन्क किंवा कांगावखोरी वाचवू शकत नाही. त्यांच्या वागण्याबोलण्यातून व्यक्त होणारा भयगंड भाजपाविषयी नसून खरेच मतदारावरचा विश्वास उडाल्याचे लक्षण आहे. आपल्या पाठीशी मतदार ठाम राहिला नसल्याची खातरजमाच त्यांना इतकी बेताल बनवून गेलेली आहे. २३ मे रोजी दिवशी बंगालमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली तर विधानसभेच्या निवडणूकांपर्यंत ममतांचे आमदारही त्यांच्या पक्षात कितपत शिल्लक रहातील, याचीच शंका आहे. कारण ममतांच्या असल्या अरेरावी व मनमानीला नुसते मतदार कंटाळलेले नाहीत, त्यांचेच आमदार व सहकारीही मुक्तीची प्रतिक्षा करीत आहेत.
👍👍👌👌👍👍👌👌👍👍👌👌👍👍👌👌👍👍👌👌👍👍👌👌
ReplyDeleteachuk vishleshan
ReplyDeleteबुडा खालची खुर्ची जाणार म्हटल्यावर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशा प्रमाणे तळमळ होत आहे. असल्या दीदींसाठी तुम्ही एक संपूर्ण " ब्लाॅग " कशासाठी खर्ची घातलात ? अर्थात एकाच ब्लाॅग मध्ये तुम्ही अनेक राजकारण्यांची तळमळ व्यक्त केली आहे . प्रवाहा विरूध्द जाणार्यांची हीच अवस्था होते , हे ज्यांना प्रवाहाची दिशाच कळली नाही त्यांना कोण सांगणार ?
ReplyDeleteभाऊ देहबोलीवर अत्यंत मनोरंजक माहिती आपण दिली.ममता बॕनर्जी या मुख्यमंत्री आहेत त्या पदाचा मान राखुन म्हणावेसे वाटते की त्या कुठल्याही दृष्टीने मुख्यमंत्री आहेत असे वाटत नाही ,आपण गोर गरीबांचे कैवारी आहोत हे दिसण्यासाठी जाणीव पूर्वक जाड्या भरड्या सुती साड्या व चपला घालुन वावरणे.पण भांडकुदळ पणा ईतरांशी बोलताना दिसुन येतो.ज्या ऊद्देशाने त्या सत्तेवर आल्या त्याचा विसर पडून आपली पकड प.बंगालवर मजबूत करण्या करता मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण व हिंदू समाजावर हेतुपूर्वक आन्याय हे सुरु केले.मी स्वतःअनेक वेळा कलकत्ता येथे गेलो आहे व टाटाच्या सिंगुर प्रकल्पाला विरोध करण्या साठी रस्त्यावर ऊतरुन जो धिःगाणा घातला ते पाहिले आहे.आता ममता यांना काव्यात्मक न्याय मिळत आहे.आताच सगळे विरोधक EVMच्या विरोधात एकत्र आले आहेत व निकालांना विरोध करण्याचे ठरत आहे .बिहारचे नेता उपेन्द्र कुशवाहा यांनी सरळ सरळ रक्तपाताची धमकी दिली आहे. आपले जाणता राजा असेच सुचक बोलत आहेत, भाऊ हे विरोधक कुठाल्याच संस्थेला जुमानत नाहीत . विनाश स्वतःहून ओढवून घेतला आहे व लोकांच्या मनातुन उतरण्याची व्यवस्थाकेली आहे.
ReplyDeleteभाऊ अचूक विश्लेषण ... 🙏🙏🙏
ReplyDeleteदेहबोली या विषयावर डेस्मंड माॅरीस यांनी खुप संशोधन व लिखाण केले आहे...
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि मोचके विश्लेषण I am proud to me मला हे लेख वाचण्याची संधी मिळतेय
ReplyDeleteछान लेख भाऊ.....ममता बॅनर्जी स्वतः हिटलर प्रमाणे वागतात आणि मोदींना हिटलर संबोधतात..
ReplyDeleteOpposition parties have lost faith in public minds, they should accept the results and should allow the elected government to govern the country for full term up to 2024.
ReplyDeleteBhau, very realistically true.
ReplyDelete����
ReplyDeleteAll opposition parties are lost the confidence in public minds they are not secular and not for people, they are interested in power for the betterment of their families only.
ReplyDeleteभाऊ शब्दांची समृद्धी असत्या शीवाय चपलख शब्दांचा वापर करता येत नाही आतिषय मार्मीक
ReplyDeleteव यथोचीत शब्दप्रयोग आपल्या लिखानात असतात सेलूट आपणास
भाऊ लिहा काहीतरी
ReplyDeleteTumache lekh jari congress chya lokanni nit vachale aste tari tyanche changlya jaga aalya astya
ReplyDeleteभाऊ , अभिनंदन . मी तुमच्या ब्लॉगचा नियमित वाचक आहे. तुमचे विश्लेषण हे अतिशय समर्पक , अनुभवी , जनतेची , राजकारणाची अचूक नाडी ओळखणारे , व नि:पक्षपाती असते. घटना , नेत्यांचे उद्गार, त्यांची वर्तणूक, त्यांची देहबोली ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धागेदोरे, इतिहासाची वर्तमानाशी सांगड हे सगळंच तुम्ही आपल्या विश्लेषणासाठी पुरेपूर कौशल्याने वापरता. म्हणूनच ते खरे ठरते हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमची सारी मांडणी ही तर्कशुद्ध असते व बुद्धिमान विचार करणा-या नागरिकाला ती पटते त्याचे ते महत्त्वाचे कारण आहे.
ReplyDeletePerfect analysis !!!
ReplyDelete