Monday, June 10, 2019

मास्टरस्ट्रोकचे काय झाले?



एवढ्या मोठ्या सतराव्या लोकसभा निकालाचे विश्लेषण होत असताना कोणाही नामवंत अभ्यासकाला पुर्व उत्तरप्रदेशात राहुल गांधी यांनी ठोकलेल्या मास्टरस्ट्रोकचे स्मरणही राहू नये, याचे नवल वाटते. लोकसभा निवडणूकांचे वेध लागल्यावर महागठबंधनाची खुप चर्चा झाली. पण भाजपा विरोधातल्या त्या गठबंधनात कॉग्रेसला समाविष्ट करून घ्यायला अखिलेश आणि मायावतींनी नकार दिला. तेव्हा कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पोतडीतून हुकूमाचा पत्ता बाहेर काढला, असे बहुतांश विश्लेषकांचे तेव्हा मत होते. कारण दहा वर्षे चर्चा चाललेल्या त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना राहुलनी पक्षात आणून थेट उत्तरप्रदेशची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. पुर्व उत्तरप्रदेशच्या चाळीसहून अधिक लोकसभा जागी भाजपा व गठबंधनाला शह देऊन मोठी बाजी मारण्यासाठीच प्रियंकाला ऐनवेळी मैदानात आणले गेले. राहुलचा तोच मास्टरस्ट्रोक असल्याचे बहुतांश प्रत्येक राजकीय जाणकारांना वाटले होते आणि मग प्रियंकाचा जो डंका वाजू लागला होता, त्याला तोड नव्हती. प्रियंका वाराणशीत लढणार. त्या गंगादर्शन करणार; यापासून बारीकसारीक गोष्टींचे सातत्याने कौतुक झाले आणि पर्यायाने प्रियंका हा उत्तरप्रदेश व कॉग्रेससाठी गेमचेंजर असल्याचाही बोलबाला झाला होता. मात्र निकाल लागल्यानंतर कोणालाही प्रियंका आठवूही नये, या़चे म्हणूनच नवल वाटते. निकालानंतर पंधरा दिवस उलटून गेल्यावर आता त्या उत्तरप्रदेश रायबरेलीत जाऊन कार्यकर्त्यांसोबत आत्मचिंतन करण्याची बातमी आली तितकीच. पण गेम कुठला चेंज झाला किंवा मास्टरस्ट्रोकचा चेंडू कुठे भिरकावला गेला; त्याचा मागमूस माध्यमात किंवा विश्लेषणात नाही. अर्थात विश्लेषकांचे सोडून द्या, प्रियंका मात्र आपल्या ख्यातीला जागलेल्या आहेत. त्यांनी यापुर्वी अमेठी रायबरेलीत काम करताना पक्षाचे आमदार कमी करून दाखवले होते. यावेळी एक खासदार कमी करून दाखवला आहे.

जेव्हा प्रियंकांना मैदानात आणले गेले, तेव्हा कॉग्रेसच्या कार्यकर्ते नेत्यांपेक्षा अनेक राजकीय विश्लेषकांना उचंबळून आलेले होते. मागल्या दहा वर्षात राहुल गांधींच्या बेताल बोलण्या वागण्याने निराश झालेल्या पक्ष नेत्यांना व कार्यकर्त्यांना इंदिराजींची प्रतिकृती असलेल्या प्रियंका कॉग्रेसला गर्तेतून बाहेर काढतील, अशी अपेक्षा वाटलेली होती. त्यासाठी प्रियंका लावो कॉग्रेस बचावो; अशा घोषणा व फ़लकही झळकावून झालेले होते. पण त्याला काही फ़लस्वरूप येत नव्हते. सहाजिकच झाकली मूठ सव्वा लाखाची या उक्तीप्रमाणे प्रियंका हा झाकलेला पत्ता होता. त्याची हवी तितकी फ़ुगवून किंमत सांगण्याची चैन विश्लेषकांना करता येत होती. पण उत्तरप्रदेशात राहुलनी प्रियंकाना आणून जबाबदारी टाकल्यावर, खरी कामगिरी विश्लेषकांवर येऊन पडली. प्रियंका गेमचेंजर किंवा मस्टरस्ट्रोक असल्याची टिमकी वाजवण्याचे काम अशा विश्लेषकांकडे आले. त्यांनीही इमानदारीने पुर्व उत्तरप्रदेशच्या ४० जागी प्रियंकाचा प्रभाव भरपूर पाडून घेतला. फ़क्त प्रभाव मतदारावर पडावा लागतो आणि त्यानेच कुठल्या तरी पक्षाला दिलेली मते मोजली जातात, त्याचे भान कुणालाच राहिले नव्हते. सहाजिकच विश्लेषणाचे कौतुक एका बाजूला आणि प्रत्यक्ष निवडणूक व मतदार दुसर्‍या बाजूला; अशी स्थिती झाली. परिणाम निकालातून समोर आले. बाकीच्या उत्तरप्रदेशात प्रियंकाचा प्रभाव पडून कॉग्रेसला मोठे यश मिळणे दुर राहिले आणि अमेठी हा पिढीजात गांधी घराण्याचा असलेला मतदारसंघही प्रियंकाने गमावून दाखवला. अर्थात त्यालाही पर्याय नव्हता, की त्याविषयी मनात शंका बाळगण्याचे काहीही कारण नव्हते. मागल्या तीनचार निवडणूकात प्रियंकाने तिथले दौरे करून व प्रचार करून सुरक्षित क्षेत्रातही जागा गमावण्याचा चांगला सराव करून घेतला होता. पण त्यांचा प्रभाव यापुर्वी फ़क्त रायबरेली अमेठीतले पक्षाचे आमदार पराभूत करण्यापुरता मर्यादित होता. यावेळी त्यांनी खासदारही पाडून दाखवला.

कुठल्याही नेत्याचा प्रभाव अमूक एका क्षेत्रातील मतदारावर पडत असतो आणि त्याला मिळणार्‍या मते व यशावरून त्याचे मोजमाप होत असते. प्रियंका जेव्हा राजकीय क्षेत्रात वावरत नव्हत्या किंवा रायबरेली अमेठीत फ़िरकत नव्हत्या, तेव्हापासून हा विभाग गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. तिथून त्याच घराण्याचे खासदार निवडून आलेले आहेत आणि त्यांनी आशीर्वाद दिलेले आमदारही निवडून येत राहिले आहेत. मात्र प्रियंकांनी तिथे काम करायला आरंभले आणि तेव्हापासून कॉग्रेसचा तिथला प्रभाव हळुहळू कमी होत गेला. हा इतिहास आहे. भले तिथून सोनिया वा राहुल सलग निवडून आलेले असतील. पण विधानसभेच्या निवडणूकीत त्यांचा आशीर्वाद असलेले पक्षाचे उमेदवारही बहुसंख्येने निवडून येत नव्हते. दोन जागी असलेल्या दहा आमदारांपैकी चारपाच आमदार सहज याय़चे आणि त्यांना प्रियंकाच्या प्रचाराची गरज नव्हती. पण प्रियंका तिथे प्रभाव पाडू लागल्या आणि एकामागून एक आमदार घटत गेलेले आहेत. २०१२ असो किंवा २०१७ असो, प्रियंकांनी त्या भागात प्रचाराचे रान उठवले होते आणि प्रत्येक फ़ेरीत आमदार कमी होत गेले. याचा अर्थच प्रियंकामुळे कॉग्रेसच्या प्रभावक्षेत्रातही पक्षाची मते कमी होतात आणि उमेदवारांचा विजय अवघड होतो, हा इतिहास आहे. २०१७ मध्ये तर तिथे समाजवादी पक्षाचा पाठींबा असतानाही आणखी एक कॉग्रेस आमदार कमी झालेला होता. मग दोन वर्षात प्रियंका अशी कुठली सिद्धी प्राप्त करून उत्तरप्रदेशच्या लढाईत उतरल्या होत्या, की त्यांचे कौतुक गेमचेंजर म्हणून चाललेले होते? पण हीच तर विश्लेषकांच्या बाजारूपणाची खरी किमया असते, ते एक बागुलबुवा उभा करतात आणि त्याला लोक फ़सले नाहीत, मग त्याविषयी चकार शब्द बोलत नाहीत. आताही प्रियंकाच्या बाबतीत तेच तसेच झालेले आहे. कोणाला प्रियंकाचा मास्टरस्ट्रोक कुठे भरकटला, त्याची आठवणही नको आहे.

पुर्व उत्तरप्रदेशात चाळीसहून अधिक जागा आहेत आणि प्रियंकाच्या प्रभावाने भाजपाला तिथेच मोठा दणका बसून, मोदींना बहूमत गमवावे लागणार असल्याचे सिद्धांत कुठल्या कुठे गायब झालेत ना? वास्तविक राहुल गांधींना आपल्या भगिनीच्या कर्तृत्वाची पुर्ण खात्री होती. म्हणूनच त्यांनी प्रियंकाच्या नावाची घोषणा केल्यावर अवघ्या दोन दिवसात गेमचेंजर लोकसभेसाठी नसल्याची जाहिर कबुली देऊन टाकली होती. लोकसभेच्या अधिकाधिक जागा कॉग्रेसने जिंकाव्यात म्हणून प्रियंकाला आखाड्यात उतरवले आहे, अशी भाषा विश्लेषक वापरत होते आणि राहुलनी सांगितले तिच्यावर आपण २०२२ च्य विधानसभा निवडणूका जिंकण्याची जबाबदारी टाकली आहे. याचा अर्थ लोकसभेत प्रियंका कुठलीही अधिकची जागा जिंकणार नाही आणि कदाचित रायबरेली वा अमेठीपैकी एखादी जागा घालवून दाखवू शकेल; अशी खात्रीच राहुलना होती. म्हणून त्यांनी अमेठीच्या सोबतच केरळात वायनाडच्या सुरक्षित जागीही आणखी एक अर्ज भरून ठेवला होता. मुद्दा इतकाच, की प्रियंकाच्या करिष्म्याने डोळे दिपलेल्य विश्लेषकांपेक्षाही राहुल गांधी खुप सावध होते आणि आपला हा मास्टरस्ट्रोक आपल्यावरच उलटण्याची त्यांना खात्री होती. बिचार्‍या विश्लेषक अभ्यासकांना निकालानंतर त्याचा अंदाज आला. वास्तविक त्यात नवे काहीच नाही. यापुर्वीच्या दोनतीन निवडणूकांचे निकाल त्याची साक्ष आहेत आणि त्यातली आकडेवारी पुरावाही आहे. पण थापाच मारणार्‍यांना पुरावे साक्षीची कुठे गरज असते? त्यामुळे माध्यमे व अभ्यासकांनी मास्टरस्ट्रोकची आतषबाजी मनसोक्त करून घेतली आणि निकाल लागल्यानंतर प्रियंकासहीत सगळेच जाणकार बिळात दडी मारून बसले आहेत. असो, प्रियंका आता निकालांचा आढावा घेण्यासाठी लखनौ उत्तरप्रदेशाला जाणार आहेत असे कळले, म्हणून तो मास्टरस्ट्रोकचा चेंडू कुठे भिरकावला गेला, तो शोधायची इच्छा झाली इतकेच.

8 comments:

  1. अनेकवेळा राहुल गांधी यांच्या दोन ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अपूर्ण अर्थ लावला जातो. १९८० साली केंद्रात काँग्रेसची सत्ता नव्हती. इंदिरा गांधी यांनी रायबरेली आणि मेदक (आंध्रप्रदेश) या दोन ठिकाणहून निवडणूक लढवली व त्या दोन्ही ठिकाणी विजयी झाल्या आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता आली. २००४ साली केंद्रात काँग्रेसची सत्ता नव्हती. सोनिया गांधी यांनी बेलारी (कर्नाटक) आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवली व त्या दोन्ही ठिकाणी विजयी झाल्या आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता आली. आता अमेठी आणि वायनाड या दोन्ही ठिकाणी राहुल विजयी होतील व केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल अशी अंधश्रद्धा वाटत होती. पण ती खरी ठरली नाही.

    ReplyDelete
  2. सुपर भाउ.पुरोगामी लोक सध्या मतदारांना नावे ठेवण्यात मग्न आहेत.लोकच कसे चुकले यावर fb पोस्टी पडत आहेत.प्रियंकाची राजकीय समज तर आपले उमेदवार वोट कटाउ आहेत हे उघड कबुल करण्यातच दिसली होती.

    ReplyDelete
  3. प्रियांका येणे ही घराणेशाहीतील चापलूसगीरी होती. मतदार त्याला बळी पडला नाही।प्रियांका यांचे वागणे उर्मटपणा आहे

    ReplyDelete
  4. लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि एनडीए सरकार निर्विवाद बहुमताने सत्तेत आले आहे. आता राहुल गांधी किती कमकुवत, काँग्रेस किती भ्रष्ट, प्रियंका वद्रा, रॉबर्ट, इ. यांवर चर्चा पुरे. मेलेल्याला का झोडपता? एनडीए सरकारने काय काय चांगली कामं करायला हवी यावर मार्गदर्शन करा, सरकारने जर काही चांगले निर्णय घेतले असतील तर ते आम्हाला समजावून सांगा, कारण बऱ्याचदा चांगला निर्णय असूनही विरोधी पक्षांकडून अपप्रचार केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही चुकत असेल तर जाब विचारा कारण हेच सरकार 2024 मधेही पाहिजे.

    ReplyDelete
  5. मतदार शाहणे झाले आहेत, ते २०१९ मध्येच डोळसपणे वावरत आहेत. काॅंग्रेसवाले अजूनी १९४७ सालातच वावरत आहेत. त्यांचे पाय जमिनीवर आले तर तो खरा " मास्टर स्ट्रोक " ठरेल. तो पर्यंत हे असले फुसके स्ट्रोक पाहून आपण गंमत पहायची.

    ReplyDelete
  6. भाऊ, तुम्हाला सांगू का कि मला अनेकवेळा वाटते कि राहुल गांधीला या राजकारणाच्या गर्तेतून बाहेर पडायचे आहे आणि त्याच्या बहिणीला सुद्धा तेच वाटत असेल. परंतु काँग्रेस मध्ये दुसरे कोणी पक्षाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे यायलाच तयार नाही. काँग्रेसच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना आपापले पद मिळवण्यात आणि त्यातून पैसे कमावण्यातच रस आहे. बाकी पक्षाची वगरे जबाबदारी त्यांची नाही असेच त्यांना वाटते. मग स्वतःला पुन्हा पुन्हा अपयशी सिद्ध करून आणि पक्ष खड्ड्यात घालूनच त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो. आणि त्या बदल्यात त्यांना कोणत्या आर्थिक घोटाळ्यात अडकवू नये अशी डील सुद्धा ते मोदींशी करू शकतात. असे वाटण्याचे कारण -
    १. ज्याला गंभीरपणे राजकारण करायचे आहे आणि समजून घ्यायचे आहे त्या सामान्य बुद्धीच्या माणसाला सुद्धा १५ वर्षात राजकारण समजू शकते. स्वतःला कळत नसले तरी चांगल्या सल्लागार आणि रणनीतीकारांसोबत ते आपले स्थान बळकट करू शकतात.
    २. पक्षाच्या इतर लोकांना आपल्या पक्षाची सत्ता, नाव आणि विचारसरणी टिकावी असे वाटत असेल तर ते त्यासाठी ते धडपडतात, निष्प्रभ नेत्याला मागे सारून पुढे येतात.
    ३. सत्तेतून केलेल्या गैरव्यवहारात आपण बदनाम होऊ नये म्हणून ते संपूर्ण सत्ता दुसऱ्याकडे देऊ शकतात.
    ४. मोदींना जर खरेच गांधी फॅमिलीला त्यांच्या पापांची शिक्षाच द्यायची होती तर ५ वर्षे पुरेशी होती. परंतु ५ वर्षात वद्रा जमीन प्रकरण, नॅशनल हेराल्ड प्रकरण, चुकीचा इनकम टॅक्स रिटर्न भरणें, चुकीची माहिती देणे, चुकीचे ऍफिडेव्हिट संसदेस देणे या जिथे प्रत्यक्ष सह्या असलेले पुरावे आहेत त्या प्रकरणात त्यांना शिक्षा होण्यासाठी ५ वर्षाचा कार्यकाळ खूप मोठा असतो. परंतु पाचव्या वर्षाच्या शेवटी शेवटी ते विषय पुन्हा चर्चेत येण्याशिवाय बाकी काहीही घडलेले नाही. एकवार एक पराभवानंतरही गांधीवरची एकही केस तसूभरही पुढे सरकलेली नाही. मोदी है तो मुमकिन है म्हणताना हे मुमकिन का नाही झाले?

    ReplyDelete
  7. Bhau
    Do write on the Aligadh Issue of Little Twinkel Sharma.
    Political articles are good however dont limit yourself to politics only. This mentality is the huge challenge infornt of our society & if you write on such topics then it will help to educate the society on that too which is very Vital.

    Thanks Allot

    ReplyDelete