Wednesday, June 26, 2019

कॉग्रेसचे मल्ल्या-नीरव

संबंधित इमेज

गेल्या रविवारी म्हणजे लोकसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर तीन आठवड्यांनी ‘द सन्डे गार्डीयन’ नामक इंग्रजी साप्ताहिकात आलेली एक संशोधनपर बातमी किंवा अहवाल, मुळातल्या निकालापेक्षाही धक्कादायक आहे. कारण ती बातमी आधुनिक भामटेगिरीचा थरारक नमूना आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांनी भाजपाला बहूमत मिळवून दिले आणि ते तब्बल आठ लोकसभा निवडणुकांनंतर कोणा एका पक्षाला मिळालेले पहिलेच स्पष्ट बहूमत होते. त्या निकालांनी बहुतांश राजकीय विश्लेषकांना धक्का बसला होता आणि पाच वर्षे उलटून गेल्यावरही त्याचा अन्वयार्थ लावणे अनेक अभ्यासकांना शक्य झालेले नव्हते. कारण आजवरचे तमाम ठोकताळे धाब्यावर बसवून मोदींनी अपुर्व यश मिळवले होते. त्याचा अभ्यास करणेही बहुतेक विश्लेषकांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. अशावेळी मग साध्यासोप्या उत्तरांचा शोध सुरू होतो आणि त्यातूनच नवे तंत्रज्ञान किंवा जाहिरातीच्या माध्यमातून लोकमत फ़िरवण्याची भ्रामक संकल्पना विकसित करण्यात आली. २०१४ चे श्रेय प्रशांत किशोर नावाच्या एका तंत्रज्ञान जाणकाराला देण्यात आले. त्यामुळे मग राजकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाची मागणी फ़ोफ़ावत गेली. एकामागून एक तशा कंपन्या आणि भुरटे व्यापारीही बाजारात मागणीचा पुरवठा करण्यासाठी दुकाने थाटून बसू लागले. अशाच काही भुरट्यांनी ताज्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसची नैय्या बुडवली असल्याची ही बातमी आहे. पण मुद्दा एका शतायुषी पक्षाच्या दिर्घकाळ सत्ता राबवणार्‍या तमाम ज्येष्ठ नेत्यांच्या बौद्धीक दिवाळखोरीचा आहे. कोणी भामटा त्यांच्या नवख्या अध्यक्षाला दिवसाढवळ्या राजरोस उल्लू बनवित असताना, हे शहाणे त्याची कॉलर कशाला पकडू शकले नव्हते? त्यांची कुशाग्र बुद्धी कुठे चरायला गेली होती, हा प्रश्न आहे. कारण बातमीचा तपशील बघितला तरी त्यातली भुरटेगिरी सहज लक्षात येऊ शकते.

प्रविण चक्रवर्ती नावाचा कोणी हा इसम आहे आणि त्याच्याकडे राहुल गांधींनी कॉग्रेसच्या डिजिटल व माहिती तंत्रज्ञानाची जबाबदारी सोपवलेली होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी जनमानस ताडायचे आणि मग यातून मिळणार्‍या मुद्दे विषयावर निवडणूकीची रणनिती राबवली जात होती. त्यातूनच ५ कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी प्रत्येकी ७२ हजार रुपये थेट खात्यात भरण्याची योजना आलेली होती. त्यातूनच राफ़ायल खरेदीतला भ्रष्टाचार मोदी विरोधातील भेदक अस्त्र होणार असल्याची राहुल गांधींसह कॉग्रेसला खात्री पटलेली होती. अशा मार्गाने जाऊन किमान १६४ ते १८४ जागा कॉग्रेसला मिळणार आणि सरकार राहुलच्याच नेतृत्वाखाली बनवले जाणार, याची खात्री या भुरट्यांनी दिलेली होती. अगदी २३ मेच्या सकाळी म्हणजे मतमोजणी सुरू झाल्यावर दोन तास प्राथमिक आकडे येण्यापर्यंत; कॉग्रेसच्या गोटात आनंदी व विजयी वातावरण होते. राहुल व प्रियंकांना इतकी खात्री होती, की राष्ट्रपतींना सादर करण्याच्या पत्राचे दोन मसूदेही वकीलामार्फ़त कायदेशीर भाषेत सज्ज ठेवण्यात आलेले होते. त्याच्याही पलिकडे जाऊन द्रमुकचे स्टालीन, तेलगू देसमचे चंद्राबाबू, राजदचे तेजस्वी यादव आणि समाजवादी अखिलेश यादव यांना आघाडीच्या सरकारात मंत्री म्हणून सहभागी करून घेण्याची बोलणीही झालेली होती. त्यांच्याशी खातेवाटपाची चर्चाही राहुलमार्फ़त झालेली होती. विजयाचा सोहळा साजरा करण्यासाठी दिल्लीत नेत्यांना, पक्षाच्या मुख्यालयात किमान दहा हजार लोकांची गर्दी मिरवणूकीसाठी आणण्याचेही आदेश दिलेले होते. मात्र प्रत्यक्षात मतमोजणी पुढे सरकत गेली आणि कॉग्रेसचा आणखी एक दारूण पराभव समोर येऊ लागला. ते दिसल्यावर हे डिजिटल तंत्रज्ञानातले तमाम भुरटे कुठल्या कुठे पसार झाले आणि कुणालाही त्याच्याशी फ़ोनवर संपर्क करणेही अशक्य होऊन गेले. या भामटेगिरीला एक वर्षापुर्वी सुरूवात झालेली होती.

मागल्या वर्षी जुन महिन्यातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. त्यापुर्वी तेलगू देसम पक्ष एनडीए आघाडीतून बाहेर पडला आणि त्यानेच मोदी सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणलेला होता. तिथून राहुल गांधींचा नवा अवतार सुरू झाला होता. प्रस्ताव आंध्राला खास दर्जा नाकारला जाण्याच्या संदर्भाने आणला गेलेला होता. पण राहुल गांधी कॉग्रेसच्या वतीने बोलयला उभे राहिले व तासभरापेक्षाही अधिक केलेल्या भाषणात त्यांनी राफ़ायल या लढवू विमानाच्या खरेदीतला भ्रष्टाचार उघड करण्याचा आव आणला. तिथून राफ़ायल विषय सुरू झाला आणि संसदेपासून सुप्रिम कोर्ट व निवडणूक प्रचारापर्यंत धुमसत राहिला. सरकारने कितीही खुलासे दिले वा सुप्रिम कोर्टाने त्याची वेगळी चौकशी करायलाही नकार दिला. पण राहुल आरोपाला चिकटून होते आणि त्याचाच विस्तार करताना त्यांनी ‘चौकीदार चोर’ अशी घोषणाच बनवून टाकली होती. त्यांची घोषणा लोकप्रिय होत असल्याचे आणि त्यांच्यावरील लोकांचा विश्वास दिवसेदिवस वाढत असल्याची ग्वाही देणारे डेटा विश्लेषक अभ्यासक त्यांनी स्वत:भोवती जमा केलेले होते. त्यामुळे राहुलना हवे असलेलेच आकडे व मते चाचणीतून त्यांना सादर केली जात होती. बाहेर वस्तुस्थिती भिन्न असली तरी राहुलना त्याची पर्वा नव्हती. कारण त्यांच्या खुळेपणालाच जनता प्रतिसाद देत असल्याची फ़सवी माहिती हे भामटे तंत्रज्ञान अभ्यासक त्यांना देत होते. मोदी भाजपाला डिवचणारे ताशेरे सोशल माध्यमातून फ़ैलावण्याचे काम करणारी दुसरी भामट्यांची टोळीही आपल्यापरीने कामाला सज्ज झालेली होती. तिथे जे ताशेरे झाडले जायचे तेच मग व्हायरल झाल्याचा आभास भाडोत्री माध्यमातून उभा केला जायचा आणि राहुल त्यावर समाधानी होते. त्याला पुरक ठरतील अशा गठबंधनाच्या बातम्याही पेरल्या जात होत्या. त्यामुळे निकालाचे आकडे येईपर्यंत भामट्यांची चंगळ चालली होती.

हा प्रवीण चक्रवर्ती व दिव्यस्पंदना नावाची कोणि अभिनेत्री यांनी मिळून कॉग्रेस पक्षाला त्याचे ३२ कोटी रुपये बिल लावले असल्याचा तपशील गार्डीयनच्या बातमीतून समोर आला आहे. त्याचा इन्कार अजून तरी कोणी केलेला नाही आणि निकालाच्या दिवशी म्हणजे २३ मेच्या दुपारपासून हे दोन महानुभाव बेपत्ता झालेले आहेत. दिव्य स्पंदना ही विदुषी त्या दिवशी आपला ट्वीटर अकाऊंट बद करून कुठल्या कुठे अंतर्धान पावली आहे. प्रविण नावाचा इसम गायबच झाला आहे. फ़क्त वर्षभरापुरी कॉग्रेस पक्षात दाखल झालेल्या या इसमाचा राजकीय वा निवडणूकीचा अनुभव काय, याची राहुलनी चौकशी तरी केली होती काय? हे लोक कुठल्या चाचण्या करतात किंवा आकडे कुठून गोळा करतात, त्याचाही कुणाला अजून थांगपत्ता नाही. पण एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रविणने म्हटले होते, त्याने ७२ हजार रुपये गरीब कुटुबाच्या खात्यात थेट भरायची मूळ योजना मोदी सरकारला सादर केलेली होती. पण तिथे प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून ती राहुल गांधींच्या गळ्यात घातली. असा माणूस उचलून राहुलनी त्याच्याकडे पक्षाची संपुर्ण प्रचारमोहिम सोपवली. यातून बालीशपणा व अननुभवाचे मोल लक्षात येऊ शकते. प्रविणचा दावा खरा असेल, तर त्याला नाकारणारे मोदी सरकार बुद्धीमान म्हणायला हवे आणि त्याच्यावर आपल्या पक्षाची अब्रु पणाला लावणारे राहुल गांधी नुसते पप्पू नाही, तर उल्लूही असल्याचे लक्षात येऊ शकते. कारण अशा योजनेतला पोकळपणा अर्थशास्त्रज्ञ म्हणून मिरवणार्‍या मनमोहन सिंग वा चिदंबरमनाही समजू शकलेला नव्हता. कारण त्यांनीही राहुलच्या त्या ‘न्याय’ कल्पनेची तळी उचलून धरली होती. मग त्यांचे मेंदू बधीर झाले होते, की राजपुत्रासमोर सत्य बोलण्याची हिंमत त्यांनी गमावली आहे? कारण कुठलेही असले तरी मुठभर भामट्यांनी बालीश अध्यक्षाला हाताशी धरून एका शतायुषी पक्षाला मातीमोल करून टाकलेले आहे.

मात्र हा विषय एका पक्षापुरता नसून राजकीय जुगाराचा आहे. याच्याआधी राहुल गांधींनी तीन वर्षापुर्वी प्रशांत किशोर यांना हाताशी धरून उत्तरप्रदेशात स्वबळावर कॉग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा जुगार खेळला होता. तो इतका फ़सला, की समाजवादी पक्षाला सोबत घेऊनही असलेल्या दोन डझन आमदारांच्या जागा राहूलना टिकवता आल्या नव्हत्या. पण त्यात निदान प्रशांत किशोरने नव्या कल्पना घेऊन प्रचाराची मोहिम आखली होती. त्याने २०१४ साली मोदी व नंतर नितीश व अमरिंदर सिंग यांना जिंकून दाखवले होते. अगदी आताही २०१९ मध्ये आंध्राप्रदेशात जगनमोहन रेड्डीला जिंकून दाखवले आहे. पण असे किमयागार मातीचे सोने बनवू शकत नाहीत. कोरड्या विहिरीतून पाणी काढू शकत नाहीत. ज्या पक्षापाशी जिंकण्याची क्षमता असते त्यांनाच असे चतुर लोक विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवू शकतात. ज्यांच्यात लढायचीही क्षमता नसते, त्यांना शून्यातून सत्तेवर आणून बसवणे ब्रह्मदेवालाही शक्य नसेल, तर प्रशांत किशोर वा प्रविण चक्रवर्ती काय चमत्कार घडवू शकतात? पण निदान प्रशांत किशोरचे काम उघड व संगतवार होते. हा चक्रवर्ती भामटाच निघाला. त्याने एका जुन्या पक्षाला मातीत मिळवले आहे आणि इतर सर्व राजकीय पक्षांना तो धडा आहे. तंत्रज्ञान वा आधुनिकता आवश्यकच आहे. पण असे कुठलेही तंत्रज्ञान वा जादू जगात उपलब्ध नाही, ज्याचा उपयोग करून लोकांची मते पदरात पाडून घेता येतात. इव्हीएमचा घोटाळा करून मते फ़िरवता येत नसतात आणि तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करून आभास निर्माण करता येतो. पण मते मिळत नाहीत, किवा निवडणूकाही जिंकता येत नाहीत. पण जुगाराच्या आहारी गेलेल्या युधिष्ठीराची बुद्धीही रसातळाला गेलेली असेल, तर राहुल, मनमोहन वा चिदंबरम यांची काय कथा? कष्टाशिवाय श्रीमंत होण्याच्या नादात करोडो लोक देशोधडीला आजवर लागलेले आहेत. एका राजकीय पक्षाला जुगारात दिवाळखोर होताना प्रथमच बघितले.

17 comments:

  1. भाऊ मार्मिक विवेचन. 100% बरोबर

    ReplyDelete
  2. व्वा भाऊ,एकदम सटीक!जुगारात बायको पणाला लावणा-या युधिष्ठिराची उपमा अगदी चपखल!!

    ReplyDelete
  3. वाह: भाऊ एकदम उत्तम व सुयोग्य कथन केले आहे तुम्ही . धन्यवाद !

    ReplyDelete
  4. एकूण काय, राहूल महात्मा गांधीचा कॉंग्रेस संपवण्याचा विचार पूर्ण करणार तर...

    ReplyDelete
  5. मला स्वतःला २३ मेला लागलेल्या निकालावर अपेक्षित प्रतिक्रिया दिसल्या नाहीत. म्हणून मी २४ मेला माझ्या फेसबुकवरच्या अकाउंट्सवर "अगा ते अघटीत घडले! कालच्या दिवसात एकाही विरोधी पक्षनेत्याने किंवा पक्षाने तथाकथीत EVM घोटाळ्याबद्दल वक्तव्य केले नाही." अशा पोस्ट्स पाठवल्या होत्या. आता मला त्याचे कारण कळले. सर्वजण अर्धा दिवस स्वप्नात मग्न होते. अर्धवट अक्कलेच्या लोकांना अशीच अद्दल झाली पाहिजे.

    ReplyDelete
  6. Is it possible that pravin and divya spandana are under cover agents planted BJP in Congress camp?

    ReplyDelete
    Replies
    1. Tasa asel tar Congress chi diwalkhori ankhinach spashtpane samor yeil..

      Delete
  7. प्रसाद भोकरेJune 26, 2019 at 9:51 AM

    डोळ्यात अंजन घालणार लेख. धन्यवाद भाऊ.

    ReplyDelete
  8. भाऊ, अतिशय परखड आणि सडेतोड मिमांसा!
    महेंद्र परळकर

    ReplyDelete
  9. भाऊ,अतिशय परखड आणि सडेतोड विश्लेषण.

    ReplyDelete
  10. श्री भाऊ खरोखरच तुमचा अभ्यास जबरदस्त आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्या प्रेमात आहोत

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. Very nice+True eye opner article

    ReplyDelete
  13. Bhau
    Just want to add one more fact on this person Pravin Chakravarthi that he was Jailed in USA in a fraud case. After knowing this, cong made sure that all links (Weblinks) related to that were deleted from net.

    Thanks

    ReplyDelete
  14. Divya Spandana is none other than once famous Kanada actress Ramya ( known to be S.M Krishna's daughter)

    ReplyDelete
  15. नेहमीप्रमाणेच अतिशय मार्मिक विश्लेषण.

    ReplyDelete
  16. Shrikant Narayan DhekneJuly 7, 2019 at 11:43 AM

    JayDeep Saranjaame, The Second?

    ReplyDelete