मागल्या निवडणूकीत नरेंद्र मोदींनी जो प्रचार केला, त्यातले शब्द घेऊन त्यांची नंतरच्या काळात खुप टिंगलटवाळी होत राहिली. त्यामध्ये १५ लाख रुपये, अच्छे दिन किंवा जुमला असे शब्द घेऊन मनसोक्त हेटाळणी झाली. पण नुसते शब्दाचे बुडबुडे उडवून लढता येत नाही, की जिंकताही येत नाही. मात्र धुरळा खुप उडवता येतो. पण जेव्हा धुरळा खाली बसतो, तेव्हा आपण तसूभर पुढे सरकलेलो नाही, याचे भान येते आणि नैराश्याच्या गर्तेत माणूस ढकलला जातो. तसे नसते तर राहुल गांधींना आज इतक्या निराशेने पछाडले नसते. किंवा शपथविधी सोहळ्यातील खुर्ची वा रांगेवरून शरद पवारांना इतका रुसवा दाखवावा लागला नसता. मागल्या पाच वर्षात याच लोकांनी तेव्हाचा पराभव गंभीरपणे घेऊन चांगली तयारी केली असती, तर त्यांना समोरच्या प्रेक्षक पाहुण्यात बसण्याची वेळ आली नसती, की तक्रार करावी लागलीच नसती. तेच शपथविधीच्या मंचावर दिसले असते आणि मोदी-शहांना समोर प्रेक्षकात बसावे लागले असते. याला जमिनजुमला म्हणतात. पवार किंवा अन्य कॉग्रेसवाले फ़क्त जुमला या शब्दाला धरून बसले. पण मराठीतला जमिनजुमला हा शब्द त्यांना कधी आठवलाही नाही. जमिनजुमला म्हणजे स्थावर मालमत्ता असते. ती जमिनी हकिगत असते. हिंदीतला जुमला म्हणजे वरवरचा देखावा किंवा शब्दांची कसरत गंमत असते. १५ लाख हा प्रचारातला जुमला असल्याचे चुकून कुठे अमित शहा म्हणाले आणि नंतरच्या काळात त्याचेच विरोधी पक्षांनी नको तितके भांडवल केले. भाजपाला भारतीय जुमला पार्टी असेही संबोधन दिलेले होते. पण अमित शहा अध्यक्ष असलेला पक्ष जुमला करणारा असला, तरी त्यांचे जुमले जमिनीवरचे म्हणूनच जमिनजुमला होता. जेव्हा प्रतिष्ठा पणाला लागायची वेळ आली, तेव्हा भाजपाची अब्रु शिल्लक राहिली आणि विरोधक दिवाळखोरीत गेले. त्याचे कारण विरोधकांनी मोदींना खोटे पाडण्यासाठी केलेली जुमलेबाजीच होती व ती जनतेने ओळखली होती.
अगदी मतदान संपत आलेले असताना २१ पक्षांच्या वतीने कॉग्रेसचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी सुप्रिम कोर्टात गेले होते आणि त्यांनी प्रत्येक मतदारसंघात किमान ५० टक्के मतदान यंत्राची मोजणी व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजून करण्याची मागणी केली होती. ती अर्थातच कोर्टाने फ़ेटाळून लावली. कारण तशी मोजणी केली तर निदान आठदहा दिवस निकाल लांबले असते. पण त्या निमीत्ताने कॉग्रेसपासून डाव्यांपर्यंत आणि माध्यमातील अर्धवट विद्वानांपर्यंत चाललेली जुमलेबाजी लक्षात घेण्य़ासारखी आहे. त्यांचे व्हिडीओ किंवा हाताशी असलेल्या रद्दीतील बातम्या मुद्दाम कोणी काढून आजही वाचाव्यात. मग खरे जुमलेबाज कोण त्याची खातरजमा करून घेता येईल. सुप्रिम कोर्टातल्या त्या याचिकेनंतर सिंघवी यांच्यापासून चंद्राबाबूंपर्यंत प्रत्येकाचा काय युक्तीवाद होता? आम्ही २१ पक्ष देशातल्या ७५ टक्के जनतेचे प्रतिनिधीत्व करतो, म्हणून कोर्टाने आमचे ऐकून घेतले पाहिजे. किंवा आपल्या बाजूने कौल दिला पाहिजे. ह्याला कुतर्कशास्त्र किंवा निव्वळ खोटेपणाची जुमलेबाजी म्हणता येईल. मागल्या लोकसभेत भाजपाला ३१ टक्के मते मिळालेली होती. म्हणून उरलेली ६९ टक्के मते मोदी विरोधात आहेत, असा दावा सातत्याने हेच लोक करत होते. तोही धडधडीत जुमलेबाज खोटा प्रचार होता. कारण भाजपाला ३१ टक्के मते असली तरी त्यांच्या एनडीए आघाडीत सहभागी झालेल्या मित्रपक्षांना आणखी १२ टक्के मते मिळालेली होती. म्हणजेच मोदींना पंतप्रधान होण्यासाठी ४३ टक्के लोकांनी मते दिलेली असतील, तर ६९ टक्के मते मोदींच्या विरोधात असल्याचा दावा हाच जुमला नाही काय? पण अभ्यासक विश्लेषकांपासून तमाम विरोधक हा खोटेपणा बेशरमपणे सातत्याने करीत राहिले. नव्या लोकसभेचे मतदान संपत आल्यानंतर त्याच्याही पुढे या खोटेपणाची मजल गेली आणि त्यांनी ७५ टक्के मतदाराच्या प्रतिनिधीत्वाचा दावा केला.
मार्क ट्वेन ह्या विचारवंत लेखकाची अशावेळी आठवण येते. तो म्हणतो, एक साधे सरळ खोटे असते आणि दुसरे धडधडीत खोटे असते, पण त्याहीपेक्षा भयंकर खोटे म्हणजे आकडेशास्त्र! मागल्या पाच वर्षात विरोधकांनी व तथाकथित पुरोगाम्यांनी त्या विचारवंताला खरा ठरवण्याचा विडा उचलल्यासारखा खोटेपणा करीत आकडेशास्त्र वापरलेले आहे. मोदींच्या भाजपाला ३१ टक्के मते मिळाली म्हणून उरले्ली ६९ टक्के मते त्यांच्या विरोधात अजिबात नव्हती. उलट त्या ६९ पैकी आणखी १२ टक्के मते निवडणूकपुर्व आघाडीतल्या मित्रपक्षांची म्हणजेच मोदींना पंतप्रधान होण्यासाठीच मिळालेली मते होती. त्याचा साधा अर्थ ५७ टक्के मते एनडीएला मिळालेली नव्हती. पण त्याचा अर्थ ही सर्व ५७ टक्के मते मोदी वा भाजपाच्या विरोधात किंवा कॉग्रेसप्रणित विरोधी टोळीच्या समर्थनाला उभी रहाणारी मते नव्हती. पण आपला मुद्दा पटवून देण्यासाठी खोटेपणा करण्याची हौस भागवताना, पुरोगामी बुद्धीमंतापासून नेत्यांपर्यंत सर्वांनाच कुतर्क नावाच्या आजाराची बाधा झालेली होती. आताही निकाल लागल्यापासून अशा अर्धवटांनी मोदींना इशारे दिलेले आहेत. आजही पुन्हा मोठ्या संख्येने व बहूमताने मोदी जिंकलेले असले तरी जुमलेबाजी संपलेली नाहीच. एका सगळीकडून हाकून दिलेल्या मुर्ख संपादकाने मोदींना ५५ टक्के मतांचा विरोध असल्याचा सिद्धांत मांडला आहे. पण तो खरा मानायचा, तर यापुर्वी कुठला भारतीय पंतप्रधान पन्नास टक्क्याहून अधिक मतांनी देशाचा सर्वोच्च नेता झाला, त्याचाही दाखला अशा शहाण्यांनी द्यायला नको काय? नेहरू, इंदिराजी किंवा राजीव गांधी हे प्रचंड बहूमताने देशाचे पंतप्रधान झाल्याचे कौतुक आजचे विरोधक घसा कोरडा करून सांगत असतात. त्यांच्या नेतृत्वाखालच्या कॉग्रेस पक्षाला एकदा तरी पन्नास टक्क्याहून अधिक मतांनी सत्ता संपादन करता आलेली होती काय?
१९४७ ते १९६४ या प्रदिर्घ काळात नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि अनेक राजकीय पक्ष रांगण्याइतके दुर्बळ होते. तेव्हाही नेहरूंना कधी ५० टक्क्याहून अधिक मतांचा पल्ला गाठता आलेला नव्हता. मग त्यांचे कौतुक कशाला? मोदीप्रमाणेच नेहरूं देखील पन्नास टक्क्याहून अधिक मतदार विरोधात असताना प्रदिर्घ काळ देशाचे पंतप्रधान राहिले होते, असे आजचे हे विद्वान अगत्याने कशाला सांगत नाहीत? आजवर कुठल्याही पंतप्रधानाला भारतीय मतदाराने पन्नास टक्क्याहून अधिक मताने सत्तापदावर बसवले नाही, हे सत्य कोणी सांगायचे? १९७१ किंवा १९८० सालात दोनतृतियांश बहूमताने इंदिराजी पंतप्रधान झाल्या. त्यांना ४५ टक्के मतांचा पल्ला ओलांडता आलेला नव्हता. म्हणजेच त्यांच्याही विरोधात देशातली ५५ टक्के जनता होतीच ना? राजीव गांधी विक्रमी मताधिक्याने १९८४ सालात देशाचे पंतप्रधान झाले. त्यांना ५४३ पैकी ४१५ जागा मिळालेल्या होत्या. पण तरीही मतांची टक्केवारी पन्नाशी ओलांडू शकलेली नव्हती. तेव्हा कोणा पुरोगामी अभ्यासक विद्वानाला राजीव इंदिराजी इत्यदिकांना देशातील पन्नास टक्क्याहून अधिक जनतेचा विरोध असल्याचे स्वप्नही कशाला पडलेले नव्हते? हा सिद्धांत आजच कुठून आला? आधीच्या दहा वर्षात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस व मित्रपक्षांनी युपीए म्हणून मिळवलेली मते किती होती? तेव्हा तर ६५ टक्केहून अधिक मते युपीएच्या विरोधात होती. पण कोणाला तेव्हा आकडेशास्त्र आठवले नव्हते. म्हणून अशा आकड्यांना जुमला म्हणावे लागते. पण तोही जुमला जमिनीवरचा अजिबात नाही, तर हवेतला आहे. धडधडीत खोटेपणा आहे. मोदी व त्यांच्या एनडीएला यावेळी ४५ टक्के तर मागल्या खेपेस ४३ टक्के मते मिळालेली होती. मग इव्हीएमसाठी कोर्टात गेलेल्या २१ पक्षांना ७५ टक्के मतदारांचा पाठींबा हे आकडेशास्त्र कुठून आणले गेले? तर ही निव्वळ दिशाभूल असते.
कुठल्याही थापेबाजाची एक शोकांतिका अपरिहार्य असते. आरंभीच्या काळात त्याच्या खोटेपणाला लोक जरूर फ़सतात. पण हळुहळू त्याचा खोटेपणा लोकांचा लक्षात येऊ लागत्तो. त्यामुळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. त्यातून थापाड्याने शहाणे व्हायचे असते. सावध होणे जरूरीचे असते. पण हाडाचा थापाड्या कधी शहाणा होणार नसतो. जुन्या थापा चालत नसल्या, मग तो अधिकाधिक चटकदार व अतर्क्य थापेबाजी करू लागतो आणि अधिकच उघडा पडत जातो. त्यामुळे लोक फ़सण्याची काही शक्यता नसते. पण अशा थापा त्याचीच दिशाभूल करू लागतात. लोक टिंगलटवाळी करू लागतात आणि कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण थापाड्याचा मात्र आपल्या खोटेपणावर विश्वास बसू लागतो. त्याला तसे भास होऊ लागतात आणि एखाद्या क्षणी सत्य भकास रुप घेऊन सामोरे आले, म्हणजे त्याची पुरती गाळण उडते. या निकालांनी अशा लोकांची तशीच गाळण उडालेली आहे. कारण निकाल खरे व सच्चे असले, तरी विरोधकांना ते समजेनासे झाले आहेत. आपण इतकी जुमलेबाजी थापेबाजी केली आणि लोक तिच्यावर विश्वास ठेवत असल्याचा त्यांना भ्रम झालेला होता. त्यांनीच पोसलेले माध्यमातले मुखंड व विद्यापीठातले अर्धवटराव तशी ग्वाही देत होते. मात्र अशा भाटांकडे लोक दुर्लक्ष करीत होते आणि राहुलसह ममता इत्यादी त्यावर विसंबून राहिलेले होते. म्हणून मते मिळणार नव्हती, की निकालही बदलणार नव्हते. आकड्यांची जुमलेबाजी जमिनीवरची नव्हती, ती किंगफ़िशरच्या विजय मल्ल्यासारखी दिवाळखोर होती. बाजारात कवडीची किंमत नसलेले त्याचे शेअर मनमोहन सरकारने बॅन्कांना घ्यायला लावल्याने किंगफ़िशर वाचली नाही आणि बॅन्काही बुडीत गेल्या. त्याचेच प्रतिबिंब ताज्या लोकसभा निकालात पडलेले आहे. इथे राहुलच्या हास्यास्पद आरोपांना कोर्टाने फ़ेटाळले असतानाही तेच प्रचाराचे मुद्दे बनवण्यात आले आणि दिवाळे वाजून गेलेले आहे.
प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकता येतील, असे एका सभेत मोदी ओघात बोलले होते. ते भाजपाने मतदाराला दिलेले आश्वासन नव्हते. पण मोदींची बदनामी करायला विरोधकांनी त्याचाच जुमला केला आणि मागल्या तीन वर्षात ‘कुठे आहेत १५ लाख’ असा पोरकट सवाल विचारणे चालू होते. त्यामुळे सामान्य मतदार फ़सेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण असे काही आश्वासन मोदी वा भाजपाने दिलेले नाही, हे सामान्य मतदार ओळखून होता. म्हणूनच त्याची फ़सगत झाली नाही. परंतु थापेला फ़सलेला मतदार मोदींवर सूड घेणार; अशा समजूतीमध्ये कॉग्रेस आणि अन्य विरोधकांनी फ़सगत मात्र होऊन गेली. कारण प्रत्येक नागरिकाच्या खात्यात फ़ुकटचे १५ लाख घालणे कुठल्याही सरकारला शक्य नाही, हे समजण्याइतकी अक्कल सामान्य भारतीयाला आहे. कारण या देशात १३० कोटी राहुल गांधी वा प्रियंका गांधी नाहीत. कपील सिब्बल वा मणिशंकर अय्यर घरोघरी जन्माला येत नसतात. तिथे सामान्य बुद्धीचे लोक जन्माला येत असतात आणि आपल्या कुवतीनुसार कष्ट उपसून जीवन कंठत असतात. फ़ुकटचे काही मिळत नाही हे त्यांना नेमके कळलेले असते. म्हणूनच मोदींवरच्या १५ लाखाच्या आरोपांवर लोकांनी कधी विश्वास ठेवला नाही, की राहुल गांधींच्या ७२ हजार रुपयांच्या मोहातही जनता भरकटली नाही. जुमलेबाजी करणार्यांच्या खात्यात निदान काही जमिन असायला हवी. नुसताच जुमला चालत नाही, जुमल्याला आधार म्हणून जमिन असावी लागते. भाजपा व मोदींनी ती जमिन कमावली आहे. राहुल व त्यांचे चहाते हवेतच पतंग उडवित राहिले आणि एका क्षणी त्यांचा पतंग काटला गेला. तेव्हा सध्या गटांगळ्या खाणे सुरू आहे. कुठे जाऊन पडणार याचाही अंदाज आलेला नाही. म्हणून प्रत्येकजण भयचकित होऊन गेलेला आहे. हे सर्व कुतर्कशास्त्राचे विषारी फ़ळ आहे. जे पेरले तेच उगवले आहे.
सामान्य माणसापाशी कुशाग्र बुद्धी नक्कीच नसते. पण त्याच्यापाशी व्यवहारी निर्णय घेण्याची जबरदस्त क्षमता असते. याचे एक बोलके उदाहरण इथे देता येईल. तो खेड्यातला माणूस आठवडी बाजाराला जातो अणि खिशातले मोजके पैसे कुठे व कसल्या जीवनावश्य्क गोष्टीवर खर्च करायचे, ते अल्पावधीत खर्चून गावाकडे येणारी बस पकडतो. तो वेळ मोजून खर्च करतो आणि पैसेही योग्य जागी खर्च करतो. त्याच्या नेमकी उलट स्थिती मुंबईसारख्या महानगरातल्या चिकित्सक शहाण्या लोकांची असते. ते काही तास मॉलमध्ये इकडेतिकडे फ़िरूनही काय घ्यावे किंवा नाही; याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. शेवटी अनेकदा रिकम्या हातांनी माघारी घरी परत येतात. अशा शहरी गोंधळलेपणाला मी एन्टी-इन्कुंबन्सी असे नाव देतो आणि खेड्यातल्या त्या व्यवहारी शहाणपणाला प्रो-इन्कुंबन्सी समजतो. बुद्धीमंत संपादकांच्या दुर्दैवाने देशातला ८०-९० टक्के समाज असाच व्यवहारी शहाणा व मतदार आहे. त्यामुळे त्याच्याच मतांची मोजणी होऊन निवडणूकीचे निकाल लागत असतात. अनेकदा तर शहरी शहाण्यांचे मतदान ३० टक्केही होत नाही आणि वाहिन्यांवर घसा कोरडा करणारे मतदानाच्या दिवशी सुट्टी आनंदात घालवण्यासाठी लॉंग ड्राईव्हला जातात. मग कुतर्कशास्त्र कसे चालायचे? कसे जिंकायचे? राहुलनी दावा करावा आणि राहुलनीच खुश होऊन आपल्या विजयाचा आनंदोत्सव करावा. तशीच मग अशा थापाड्या शहाणे बुद्धीमंतांची गोची होऊन जाते. चर्चा वाद युक्तीवादात ते गदारोळ करून कुतर्कालाच विजयी घोषित करतात. पण मतदानात व्यवहारी शहाणपणाचा विजय होतो. तेच लोकशाहीतले जनतेचे कोर्ट असते आणि त्याचा कौल बघितल्यावर यापुढे असल्या अतिशहाण्यांना सुप्रिम कोर्टातही बाहेरचा रस्ता दाखवला गेला, तर नवल वाटण्याचे कारण नाही. आताही ५५ टक्के मतदार मोदी विरोधात असल्याची टिमकी पुढली पाच वर्षे वाजवत राहिले तर २०२४ सालात मोदी व भाजपा ५० टक्केचाही पल्ला पार करून जातील. तरी हवेतल्या जुमलेबाजांना जमिनजुमला म्हणजे काय त्याचा थांगपत्ता लागलेला नसेल.
सुपर भाउ.सर्वजन राहुल वा प्रियंका नसतात हे वाक्य तर क्लास आहे.सोशल मिडीयावरच्या काॅंगरेसी मुखंडांना तर काॅंगरेसपेक्षा जास्त वाइट वाटतय.तेच ते पुराण लावलय गांधी गोडसे,नेहरु,सावरकर.जमाना कुठे चाललाय तिथ शहा कामाला लागलेसुद्धा.आणि म्हने हे पुरोगामी.
ReplyDeleteभाजपला यावेळी बहुतांश राज्यात ५०% वा जास्त मते मिळालीत.पुरोगामी लोक टी वी जुमला जुमला करत असताना शहा धडधडीत म्हनत होते आम्ही ५०% ची लढाइ लढतोय पण कोणाला एेकेल तर ना.त्यांनी खर करुन दाखवल.आता तर ते गृहमंत्री आहेत पुढची वर्षे कशी असनार हे आठवुन आताच काही लोक रडायला लागलेत
ReplyDeleteभाऊ, अगदी बरोबरच बोललात.
ReplyDeleteथापेबाजी वरून शोले मधला सूरमा भोपाली आठवला 😝😆😆
ReplyDeleteआकडेशास्त्रानुसारच जायचे, तर भाजपच्या विरोधात जितकी मते पडली त्यापेक्षा जास्त मते काँग्रेसच्या विरोधात तेव्हाही पडली होती आणि यावेळीही पडली आहेत. आपल्या विरोधात इतर कोणत्याही पक्षापेक्षा कमी मते मिळवणारा पक्ष म्हणूनही भाजपच विजयी ठरतो.
ReplyDeleteया 15 लाखाला उत्तर म्हणून एक पोस्ट खूप viral झाली होती की जोपर्यंत मोदी आम्हाला 15 लाख देत नाहीत तोपर्यंत आम्ही मोदींना सत्तेतून बाजूला करणार नाही, तसेच झाले
ReplyDeleteभाऊ...,नेहमीप्रमाणे उत्तम विश्लेषण.
ReplyDeleteबर मग ते ५५% यांच्याकडे आहेत तर नैतिक विजय कसा काय साजरा केला नाही अजुन यानी 😁 😁
ReplyDeleteत्या सगळीकडून हाकून दिलेल्या मुर्ख संपादकाचे नाव निखिल वागळे आहे काय?😂
ReplyDeleteसही पकडे है ��
Deleteउत्तम लेख.
ReplyDelete