Saturday, July 6, 2019

आयडिया ऑफ़ कॉग्रेस

Image result for indira emergency

अखेरीस राहुल गांधी यांनी ४० दिवस वाट बघून आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा जाहिर केला आहे. म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी लोकसभा निकालानंतरच तात्काळ कार्यकारिणीची बैठक घेऊन आपला राजिनामा सादर केलेला होता. पराभवाची जबाबदारी स्विकारून राजिनामा देण्याची ही जुनीच पद्धत आहे. अनेक पक्ष व संघटनांत अशी जबाबदारी घेऊन राजिनामे दिले जातात आणि कधीकधी अनुयायांच्या आग्रहास्तव मागेही घेतले जातात. त्यामुळेच राहुल गांधींचा राजिमाना देखावा असल्याचेच सर्वांना वाटत होते. पण त्यांनी राजिनाम्यासोबत एक भूमिकाही मांडलेली होती, त्याकडे फ़ारसे कोणी गंभीरपणे लक्ष दिले नाही. यापुढे पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याच्या वारसाकडे असू नये, असाही मुद्दा त्यांनी मांडलेला होता. पण तो तसा दुर्लक्षित राहिला. आपण कॉग्रेसचा कार्यकर्ता राहू शकतो, पण नेतृत्व मात्र कोणा विगर गांधीने करावे, असा राहुलचा आग्रह आहे. त्याचा अर्थ कोणी कशाला लावला नाही? त्याचा साधासरळ अर्थ आपण नसू तर प्रियंका किंवा अन्य कोणाही गांधी वारसालाही तिथे बसवू नये, असा राहुलचा आग्रह आहे. त्याचा विपरीत अर्थ नक्की काढला जाईल. पण त्याचाही सकारात्मक अर्थ निघू शकतो आणि तो काढला तर कॉग्रेसला चांगले दिवसही येऊ शकतात. त्याचा अर्थ मुळच्या काग्रेस परंपरेकडे किंवा वैचारिक वारशाकडे जाऊया, असे तर राहुलना वाटलेले नसेल का? जिथे ज्याच्यापाशी नेतृत्व करायची कुवत व पात्रता आहे, त्यानेच कॉग्रेसचे नेतृत्व करावे आणि अगदी नेहरू गांधी वारसांनीही त्या कर्तबगाराचे नेतृत्व मान्य करावे, असेही राहुलना म्हणायचे असू शकते ना? त्याचा साधासरळ अर्थ असा, की कॉग्रेस म्हणून जी विचारधारा सव्वाशे वर्षात भारतामध्ये विकसित झाली व फ़ोफ़ावली, तिथे परत जायचे. त्याच विचारांचे विविध पक्ष व गट एकत्र करून नव्याने कॉग्रेसला देशव्यापी समावेशक पक्ष बनवायचे. त्यात ममता, जगन असे प्रादेशिक नेते असतील आणि तिथे शरद पवारही पक्षाध्यक्ष गोऊ शकतॊल. काय वाटते?

मागल्या सत्तर वर्षात भारतामध्ये जे दिल्लीत राजकारण झाले आणि प्रादेशिक पातळीवर राजकारण झाले, त्यात कॉग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. ते जसे प्रशासकीय कामासाठी आहे, तसेच ते प्रादेशिक अस्मिता व राजकीय पक्षांच्या उदयालाही कारणीभूत झालेले आहे. आजचे अनेक प्रादेशिक वा पुरोगामी पक्ष हे मुळातच कॉग्रेसचे नाराज गट वा घटक आहेत. त्यांना वेळीच कॉग्रेसमध्ये समाविष्ट करून घेतले गेले असते आणि त्यांच्या नेतृत्वगुण वा गुणवत्तेला स्थान मिळू शकले असते, तर त्या नेत्यांनी वा त्यांच्या अनुयायांमुळे कॉग्रेस पक्ष अधिकच बलवान होत राहिला असता. त्याचे गटतट होऊन समान विचारधारेचे इतके लहानमोठे पक्ष निर्माण झाले नसते. नेहरू वा इंदिराजी यांनी कॉग्रेस पक्षाला एकहाती आपल्या दावणीला बांधून ती कुटुंबाची मालमत्ता करण्याचा घाट घातला नसता, तर आजचे अनेक प्रादेशिक पुरोगामी पक्ष जन्मालाच आले नसते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष म्हणजे काय आहे? शरद पवार या नेत्याला कॉग्रेसमध्ये घुसमटल्यासारखे झाल्याने त्याने बाहेर पडून दोनदा वेगळी चुल मांडलेली होती. पहिल्या वेळेस त्यांच्यासोबत राज्यातले अनेक दुय्यम नेते बाहेर पडले आणि दुसर्‍या खेपेला अन्य काही राज्यातले दुय्यम नेतेही पवारांच्या सोबत बाजूला झाले. आंध्रातला जगन रेड्डीचा पक्ष तर मुळचा कॉग्रेस पक्षच आहे. पित्याचा वारसा जगनला देण्यात कॉग्रेसने कसूर केल्यामुळे त्याने वेगळी चुल मांडली. ममता बानर्जी त्यापेक्षा वेगळ्या नाहीत. बंगालमध्ये पक्ष डाव्या आघाडीशी खंबीरपणे दोन हात करीत नाही, म्हणून ममतांनी वेगळा राजकीय पक्ष काढला. पुढे डाव्यांचा पराभवही करून दाखवला. अशा नेत्यांना कॉग्रेसमध्ये पुरेसा वाव मिळाला असता, तर तिथे तिथे कॉग्रेस आजच्या इतकी दुबळी नक्कीच झाली नसती किंवा संपली नसती. त्याचे खापर त्या नेत्यांच्या माथी मारण्यापेक्षा गांधी घराण्याने आपल्या अंतरंगात झाकून बघितले पाहिजे.

ममता, शरद पवार किंवा जगन रेड्डी हे अलिकडल्या कालखंडातील कॉग्रेस नेते आहेत, ज्यांनी कॉग्रेसमधून बाजूला होऊन आपले स्थानिक प्रादेशिक पक्ष उभारले. त्यात अनेक कॉग्रेस नेतेच सहभागी होत गेले आणि पर्यायाने कॉग्रेस त्या राज्यात निकामी वा दुबळी होत गेली. दिल्लीत बसून आंध्रा किंवा बंगालचे निर्णय स्थानिक नेत्यांवर लादण्याची चुक गांधी खानदानाची होती. किंबहूना कुठल्याही राज्यातील कॉग्रेस नेता आपल्या कुवतीवर प्रभावशाली ठरू लागला, तर त्याला पांगळा करण्याचे डावपेच कोण भाजपावाला खेळलेला नव्हता. हे नेहरू इंदिरा गांधींनीच केले असे नाही. आज विकलांग झालेल्या कॉग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी तरी वेगळे काय करीत होते? राहुलनी उत्तरप्रदेश विधानसभा गमावला, तेव्हा पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे खडतर आव्हान पेलून अमरिंदर सिंग यांनी तिथे विधानसभा जिंकून दाखवलेली होती. तर त्याच्या गळ्यात नवज्योत सिद्धू नावाचे लोढणे अडकवण्यचे पाप कोणाचे होते? कॉग्रेस अशीच खिलखिळी होत गेली. आज राहुलना पक्षाचा पराभव खुपत असेल, तर त्या पराभवाला फ़क्त त्यांचे निकामी दिल्लीकर सहकारी व श्रेष्ठीच कारणीभूत नाहीत. मायलेकांनीही त्याला हातभार लावलेला आहे. २००४ सालात दिल्लीची सत्ता पुन्हा मिळाली त्याचे खरे श्रेय आंध्रातून अधिक खासदार निवडून आणणा‍र्‍या राजशेखर रेड्डी यांना होते आणि २००९ सालातही तिथल्याच अधिक संख्येने युपीएच्या सत्तेवर शिक्कामोर्तब केलेले होते. तर तिथूनच कॉग्रेसचे खच्चीकरण सोनियांनी केलेले नव्हते का? राजशेखर रेड्डी यांनी विभजनाची वा तेलंगणा राज्याची मागणी फ़ेटाळूनही अधिक खासदार निवडून आणले होते. त्याच राज्याची २०१४ साली विभागणी करून सोनियांनी काय केले? तिथला कॉग्रेस पक्षच नामशेष करून टाकला. कारण जगन रेड्डी त्यांच्या आवाक्यातला नेता नसेल तर तिथली कॉग्रेसही बुडवली गेली हे सत्य आहे.

थोडक्यात हेच अनेकदा झालेले आहेत आणि होत राहिले आहे. आज ओडिशात दिर्घकाळ जिंकलेला बिजू जनता दल नावाचा पक्ष दिसतो, त्याचा वारसाही कॉग्रेसचाच आहे. बिजू पटनाईक हे कॉग्रेस नेताच होते आणि नेहरू वा इंदिराजींशी जमले नाही म्हणून बाजूला झाले. पुढे वेगवेगळ्या राजकीय पक्षात गेले वा संस्थापकही झाले. पण त्यांच्या पुत्राला जो वारसा मिळाला तो कॉग्रेसचाच नाही काय? उत्तरप्रदेशात राष्ट्रीय लोकदल किंवा हरियाणातले लोकदल हे मुळात चौधरी चरणसिंग देवीलाल यांचे वारस होत. त्यांचे राजकारणही कॉग्रेसमध्येच सुरू झाले आणि पटले नाही म्हणून त्यांनी वेगळे तंबू थाटले. त्यांच्यावर तशी पाळी आणली, तिथून कॉग्रेसची वैचारीक राजकीय पक्ष म्हणून वाताहत झालेली आहे. बांगला कॉग्रेस, उत्कल कॉग्रेस असे लहानसहान पक्ष १९६० नंतरच्या काळात आले, त्याला तेव्हाचे नेहरू घराणेच जबाबदार होते. हा इतिहास जितका मागे शोधत जाल तितला कॉग्रेसच्या वंशावळीशी जोडलेला दिसेल्. मार्क्सवादी व जनसंघ-भाजपा याच दोन राजकीय संघटना त्याला अपवाद आहेत. अन्यथा बहुतेक राजकीय पक्षांचा वारसा कॉग्रेसमधून आलेला आहे. स्थानिक वा प्रादेशिक नेत्यांवर अशी पाळी आणली गेली नसती, किंवा केंद्राचे निर्णय त्यांच्यावर सतत लादले गेले नसते, तर पन्नास वर्षात अनेक नेते कॉग्रेसपासून दुरावले नसते. कॉग्रेसची विचारधारा जपणारा पक्ष ही प्रतिमा कायम राहिली असती. पण तसे झाले नाही आणि मागल्या पन्नास वर्षात इंदिराजींच्या नंतर कॉग्रेस हा केंद्रातला पक्ष त्यांच्या घराण्याची खाजगी मालमत्ता बनून गेला. त्याचे नाव कॉग्रेसच राहिले, तरी आयडिया ऑफ़ कॉग्रेस मात्र नामशेष होत गेली. आजची कॉग्रेस ही ‘आयडिया ऑफ़ नेहरू-गांधी फ़ॅमिली एम्पायर’ अशी आहे. तिथे राहुल, प्रियंका वा त्यांचे आप्तेष्ट, यापेक्षा अधिक गुणवत्तेच्या वा कुवतीच्या व्यक्तीला स्थान असू शकत नाही, ही खरी समस्या आहे. राहुलना त्यातून पक्ष बाहेर काढायचा आहे काय?

मार्क्सवादी, भाजपा किंवा मुस्लिम लीगसारखे पक्ष आणि निव्वळ प्रादेशिक असे द्रवीड पक्ष सोडले, तर अन्य विविध दोनतीन डझन पक्ष हे मुळातच कॉग्रेसचे लहानमोठे गटतट आहेत. अशा सर्वांनी एकत्र यायचे ठरवले, किंवा कॉग्रेसने पुढाकार घेऊन त्यांना एका छत्राखाली आणायचे ठरवले; तरी नवी कॉग्रेस जोमाने उभी राहू शकते. आज सुद्धा कॉग्रेसचा इतका दारूण पराभव झाला असताना, त्याच्या पारड्यात साडे एकोणिस टक्के मते पडलेली आहेत्. त्यामध्ये अशा तमाम लहानसहान व प्रादेशिक पण कॉग्रेसचा वैचारिक वारसा घेऊन चालणार्‍या पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी वा मते टाकली, तर ३५-४० टक्के मते होतात. म्हणजेच त्याची भाजपाला मिळालेल्या ३७ टक्के मतांशी बरोबरी होऊ शकते. भाजपला तुल्यबळ् मानता येईल, इतका भक्कम कॉग्रेस पक्ष विनाविलंब उभा राहू शकतो. त्याची प्रचिती नजिकच्या विधानसभा निवडणुकांमध्येही येऊ शकेल. मात्र त्याची एक अट असेल, ती नेतृत्वाची. त्यापैकी प्रत्येक प्रादेशिक वा स्थानिक नेता आपापला बालेकिल्ला उभारून बसलेला आहे. त्या नेता किंवा पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची ताकद नगण्य असेल. पण अशा स्थानिक जागी त्याची विजय संपादन करण्याची कुवत कोणी नाकारू शकत नाही. कॉग्रेसला संघटनात्मक शक्ती व मतांचे पाठबळ असतानाही जे यश महाराष्ट्रात मिळवता आले नाही, त्यापेक्षा मोठे यश पवारांनी आपल्या प्रभावक्षेत्रात आजही मिळवून दाखवले आहे. तेच नविन पटनाईक वा ममतांच्या बाबतीत सांगता येईल. पण वैचारिक भूमिकेसाठी ते राहुल वा सोनियांच्या समोर झुकणार नाहीत. त्यांना सन्मानाने पक्षात आणावे लागेल आणि सन्मानानेच् वागवावे लागेल. तितकी लवचिकता गांधी खानदानाला किंवा त्यांच्या पाठीराख्यांना दाखवावी लागेल. त्यातले पहिले पाऊल राहुलनी उचललेले असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे ना? गांधी कुटुंबातला कोणी नको, ह्या राहुलच्या शब्दांची म्हणून महत्ता आहे.

आज सिद्धरामय्या किंवा अमरींदर सिंग असे धडाकेबाज स्वयंभू नेते कॉग्रेसमध्येही आहेत. त्यात ममता, नविन पटनाईक, शरद पवार अशा अनेकांची भर पडल्यास, त्या पक्षाला खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकेल्. अशा विविध नेत्यांना व पक्षांना सोबत घेतल्यास दुबळी वाटणारी १९ टक्के मतेही अधिक जागा जिंकून देऊ शकतात. ममतांना बंगाल आंदण दिला किंवा पटनाईकांवर ओडिशा सोपवला, तर पक्षाचे कोणते नुकसान होणार आहे? जगनला आंध्रा वा चंद्रशेखर रावना तेलंगणा सोपवला, तर काय कमी होणार आहे? अशा नव्या पिढीतल्या नेत्यांना हाताळणे गुलाम नबी किंवा आनंद शर्मा यांच्यापेक्षा शरद पवारांना सहजशक्य आहे. दिल्लीतले नेतृत्व हुकूमत गाजवणारे असण्यापेक्षा सल्लागार वा वडीलधारे असले, तर कॉग्रेसला अनेक राज्यात नवी पालवी फ़ुटायला वेळ लागणार नाही. पुन्हा कॉग्रेस उभी करण्याची भाषा चालू आहे, त्यासाठी या अटी असू शकतात. नुसतेच राहुलनी अध्यक्षपद सोडायचे आणि पडद्यामागून कळसुत्री बाहुल्याप्रमाणे नेत्याला खेळवायचे; असा प्रकार चालणार नाही. ते ममता वा पवारांना मान्य होणार नाही. त्यासाठी यातला कोणी आपला वेगळा तंबू मोडून कॉग्रेसमध्ये येणार नाही. कारण जितका राहुल वा सोनियांचा अहंकार मोठा आहे, तितकाच ममता किंवा जगनचाही स्वाभिमान ताठ असतो. त्यांना नेतृत्व आयते मिळालेले नाही. त्यांनी वेगळी चुल मांडून व अनेकांशी राजकीय संघर्ष करूनच आपले राजकीय स्थान प्राप्त केलेले आहे. त्यांना सामावून घेणे म्हणूनच सोपे काम नाही. आज जे कोणी नेते कॉग्रेसमध्ये उरलेले आहेत, किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ मानले जातात, त्यापैकी कोणापाशी तितका स्वाभिमान नाही किंवा कुवतही नाही. त्यापैकी कोणाला अध्यक्ष होण्याचीही हिंमत उरलेली नाही. मग पक्षाचे नेतृत्व करणे किंवा स्थानिक वा प्रादेशिक नेत्यांना मुठीत ठेवणे, त्यापैकी कोंणाला कसे शक्य असेल?  

खरेतर कॉग्रेसमध्ये आव्हान पेलू शकेल असा कोणी नेता सोनियांनीच शिल्लक ठेवला नाही. कष्ट उपसून मोल मागावे असा कोण उरला आहे? आपली कुवत सिद्ध करून नेतृत्वाची हुकूमत गाजवावी, असा नेता आज कॉग्रेसला उभारी देण्यासाठी हवा आहे आणि उरलेत कोण? काश्मिरी असून महाराष्ट्रातून दिर्घकाळ लोक्सभेत निवडून आलेले गुलाम नबी आझाद. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आणावे लागलेले चिदंबरम. केरळात आपले कुठलेही स्थान नसलेले अन्थोनी. अशा नेत्यांकडून कॉग्रेसला नवी उभारी मिळू शकत नाही. त्यापेक्षा उतारवयातही झुंजत राहिलेले शरद पवार यांच्याकडे आज कॉग्रेसची सुत्रे दिली, तर त्या पक्षाला नव्याने काही करता येऊ शकेल्. अनेकांना हा प्रस्ताव आवडणारा नाही. पवारांविषयी अनेकांचे पुर्वग्रह पक्के आहेत. म्हणूनच त्यांचे नाव घेतल्यावर नाके मुरडली जाऊ शकतील. पण् मोदीलाटेतही आपला पक्ष टिकवून ठेवण्यातली त्यांची क्षमता आज कॉग्रेसला जीवदान देणारी ठरू शकते. पवारांचा जितका आवाका आहे, त्याच्या तुलनेत त्यांना महाराष्ट्राच्या प्रादेशिक पक्षात अडकून पडल्याने आपल्या गुणवत्तेला झळाळी आणता आलेली नाही. राहुलना प्रामाणिकपणे कॉग्रेसचे पुनरुज्जीवन करायचे असेल, तर राष्ट्रवादीचे कॉग्रेस पक्षात विलिनीकरण करून त्यांनी नवी सुरूवात करावी. उरलेल्या कॉग्रेसी विचारांच्या लहान व प्रादेशिक गटांना व पक्षांना कॉग्रेसमध्ये सुरळीत आणण्याचे कामही पवार यांच्यावर सोपवता येईल. तिथून मग कॉग्रेसचा खरा जिर्णोद्धार सुरू होईल. आयडिया ऑफ़ कॉग्रेस पुन्हा देशव्यापी वैचारिक पक्षाच्या रुपाने उभी राहू शकेल. राहुलना खरेच बिगरगांधी कॉग्रेस अध्यक्ष हवा असेल आणि त्याने कॉग्रेसला उभारी देण्याची अपेक्षा असेल, तर शरद पवारना पर्याय नाही. कारण आज तरी त्यांच्या कुवतीचा व क्षमतेचा अन्य कोणी नेता कॉग्रेसपाशी नाही, की कॉग्रेसवादी अन्य पक्षांपाशी नाही.

22 comments:

  1. खूप छान लेख आहे .

    ReplyDelete
  2. Bhau sundar swapna rangvun dila aahe tumhi Congressina
    Ekach prashna aahe
    Pakshavar asnari pakad ani tya anushangane yenare phayde Gandhi gharane sodle kaay

    ReplyDelete
  3. Congress premi lokani nakki vachava asa lekh aahe he follow kele tari congress cha punaruddhar hoil

    ReplyDelete
  4. Sharad Pawar is fast becoming a spent force ... He will require at least 8 to 10 energetic years to bring about substantial results, given the pathetic state of opposition politics.
    Does he have it him now, at this age and his present political stature ?

    ReplyDelete
  5. रोगापेक्षा औषध भयंकर...🤦‍♂️🤦‍♂️

    ReplyDelete
  6. LOL bhau tumhi pan fantasy world madhe jagu lagalat vatat.

    ReplyDelete
  7. भाऊंनी हा लेख राहुल प्रेमाचं भरतं आलं म्हणून लिहिला की शरद पवारांच्या मायेपोटी लिहिला की काँग्रेसच्या दुर्दैवी दशावताराची किव आली म्हणून लिहिला??? हाहाहाहा...

    विनोद बाजूला. लेखातील कॉग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा युक्तिवाद अजिबात पटला नाही. हे सगळे पक्ष फक्त लोकसभा निवडणुकीपुरते एकत्र येऊन महागठबंधन करून लढू शकत नाहीत तर ते काँग्रेसमध्ये विलीन कसे काय होतील? कोणे एके काळी काँग्रेसमधून फुटताना त्या त्या पक्षांना "काँग्रेसी विचारधारेचे" प्रेम असेल. पण आता इतक्या वर्षांनी आणि तेही बऱ्याच पक्षांनी स्वबळावर सत्तेची चव चाखल्यावर "विचारधारेच्या राजकारणासाठी" विलीनीकरण नाही करणार. शरद पवार सोडले तर सगळ्यांनीच स्वबळावर त्यांच्या त्यांच्या राज्यात सत्ता मिळवली. आता ते पक्ष काँग्रेसमध्ये कशाला सामील होतील? ती केवळ पवारांची मजबुरी असू शकते, इतरांची नाही. म्हणूनच ते महागठबंधनसाठी पळापळ करत होते.

    ReplyDelete
  8. मला वाटते की तुम्ही लिहिलेले प्रत्यक्षात साकारण्याची चिन्हे आता दिसत नाही. कारण गांधी कुटुंबियाची जशी गुर्मी आहे तशी अनेक काँग्रेस नेत्यांची आहे. हे सरकार आपापसातील भांडणामूळे किंवा नोकरशाहीच्या (beaurocracy) असहकार्यामूळे किंवा इतर कारणांमूळे पडेल, अशी दिवास्वप्न ते बगत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसजनांकडे साखर कारखाने आहेत+जिल्हा सहकारी बँका आहेत+इंजिनियरींग कॉलेजेस आहेत+सहकारी सूतगिरण्या आहेत. त्यामूळे सत्ता गेली तरी त्यांच्या घरच्या चुलीला अडचण नाही. सर्वत्र त्यांची दादागिरी पूर्वी चालू होती. तशीच आताही चालू आहे. त्याला धक्का बसला तरच तुम्ही लिहिलेले वास्तव्य साकारले जाईल.

    ReplyDelete
  9. आपले विश्लेषण थेअरी म्हणून तसे योग्यच आहे पण प्रत्यक्षात त्यात अनेक व्यावहारिक अडचणी आहेत । विशेषतः शरद पवारांचे बेभरवशाचे राजकारण पाहता आपण म्हणता ते सत्यात येण्यासाठी लागणारा विश्वास ते मिळवू शकणार नाहीत । शिवाय कधी राष्ट्रीयस्तरावरचा विव्हर करण्याची व्यापक दृष्टी असल्याचे दाखवणारे पवार बऱ्याचवेळा अगदी संकुचित आणि हलका विचार करताना दिसतात । त्यामुळे आपला विचार थिअरी म्हणूनच ठीक । प्रत्यक्षात मात्र हे होणार नाही ।

    ReplyDelete
  10. पवार राष्ट्रीय नेता कधीच नव्हते. महाराष्ट्रात सुद्धा फक्त पश्चिम महाराष्ट्रात त्यांना थोडे स्थान होते व महाराष्ट्रातून आता पवार पूर्णपणे संपले आहेत. पवारांना मराठी माध्यमांनी मोठे केले. प्रत्यक्षात राष्ट्रीय राजकारणात ते दुय्यम पातळीचे सुद्धा नेता नाहीत.

    ReplyDelete
  11. जयराम रमेश यांना अध्यक्ष करून पहा. नरेंद्र मोदी यांच्या तगड्या आव्हानाला २०१३ मध्येच ओळखून काँग्रेसला सावध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चापलुस भाटांनी त्या इशार्याची हुर्यो उडवली.

    ReplyDelete
  12. भाऊ देश हितासाठी काँग्रेस संपलेलीच बरी.परत ह्या राक्षसला पूनेर्जीवन नको !

    ReplyDelete
  13. भारतीय जनसंघाचे उगम स्थान काँग्रेसच. स्व श्यामाप्रसाद मुखर्जी हे मूळ काँग्रेसी मंत्रीच होते ना? त्यांच्याबरोबर पुढे जे लोक जुळत गेले त्यांचा भूतकाळ काय होता ? हां फरक एवढाच की ज्यांची नावे आपण लिहिली ते आपआपल्या राज्यात स्थिरस्थावर होऊन मग बाहेर पडले तर स्व श्यामाप्रसादानी राष्ट्रस्तरावरच सुरूवात केली. राष्ट्रप्रेम राष्ट्रहिताला प्राथमिकता हेच मूळ काँग्रेसचे रूप होते. त्या विचाराकडे काँग्रेस वळली तर भाजप आणि काँग्रेस यात फरक काय राहील ?

    ReplyDelete
  14. मनोरंजात्मक लेख वाटला भाऊ, आत्याबाईला मिशा असत्या तर...!

    ReplyDelete
  15. भाऊ, तुमचा प्रस्ताव चांगला आहे पण विलानीकरणानंतर काही नेते फ्री मध्ये काँग्रेसला मिळतील आणि ते परत काँग्रेसला परवडणार का ? हे फ्री नेते प्रादेशिक विचाराचे कधी कधी वाटतात, राष्ट्रीय विचार करू शकणार नाहीत. तुम्ही म्हणता ती विचारधारा कधीच लुप्त होऊन गेली आहे. आता ती विचारधारा कधीच मुख्यधारा होऊ शकणार नाही.

    ReplyDelete
  16. सावली हरवलेले कॉंग्रेसी नेते ...

    भाऊ ...शरद पवार यांच्याशी राहुल गांधी जुळवून घेऊ शकणार नाही ..जो राहुल आपल्याच पक्षाच्या पंतप्रधाना चा अपमान करतो तो ईतर कोणालाच जूमाणणार नाही ....गांधी फेमिली व्यतिरिक्त ईतर अध्यक्ष हवा अस राहुल म्हणत असतील तर ते फक्त ..सतत हरतो हा शिक्का पुसण्यासाठी ...जरी ईतर कोणी अध्यक्ष झाला तरि निर्णय आतून राहुल गांधीच घेतील ....अध्यक्ष फक्त तो जाहीर करेल ...पण लोकं आता याला अजिबात फसणार नाही ...कॉंग्रेस ची अवस्था महारोग्यसारखी झाली आहे झाकले तरि वास येतो ...कॉँग्रेस उघडी पडली आहे ....कॉंग्रेसी नेता असण्याच सर्वात पहिला नियम म्हणजे आपला कणा ...बाहेर ठेऊन मगच खुर्चीत बसायचं ...कणा आहे अस भासवायच ..तो दाखवायचा नाही ...त्या मुळं कॉंग्रेसी नेते हे निसर्ग नियमाला अपवाद ठरतात ...निसर्ग नियमाप्रमाणे माणूस उन्हात चालला की एकच सावली पडते ..पण कॉंग्रेसी नेत्यांनच्या दोन सावल्या पडतात ..एक राहुल गांधीसारखी सावली व दुसरी सोनिया सारखी सावली ...कणाच काढून ठेवल्यामुळे यांची स्वतः ची सावलीच हरवलीय ...अशा सावली हरवलेल्या नेत्यांना मुळातच प्रेरित करण अवघड आहे ...ते शरद पवार करू शकतील अस वाटत नाही ...जो पर्यत गाँधी घराण्याचा हस्तक्षेप व गांधी घराणे पूर्णपणे संपत नाही तो पर्यत ..कॉंग्रेसी नेता अश्वथामा सारखा पराभवाची जखम कपाळी घेऊन स्वतः ची सावली शोधत शोधत फिरत राहील ...

    ReplyDelete
  17. भारतीय जनसंघाचे उगम स्थान काँग्रेसच. स्व श्यामाप्रसाद मुखर्जी हे मूळ काँग्रेसी मंत्रीच होते ना? आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ हेडगेवार सुद्धा आधी काँग्रेस मधेच होते परंतु गांधीजींनी चालवलेले मुस्लिमांचे लांगुलचालन पटले नाही म्हणून त्यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून संघाची स्थापना केली. एव्हढेच नाही तर जिन्ना, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया हे सुद्धा काँग्रेसीचं होते. परंतु गांधीजी आणि नेहरूंच्या हेकटपणामुळे (खरेतर हुकूमशाही किंवा दादागिरीच ती पण गांधी-नेहरूंच्या बाबतीत असे म्हणायचे नसते) चांगले चांगले नेते त्यांना सोडून गेले. त्यामुळे जे काही घडले त्यात नवे काही नाही. आणि मागील २०-२५ वर्षांमध्ये सोडून जाणाऱ्या नेत्यांच्या कर्तृत्व किंवा तत्वांपेक्षा त्याच्या महत्वाकांक्षाहि तेव्हढ्याच कारणीभूत होत्या. त्यांच्या महत्वाकांक्षा आता गलितगात्र झाल्या आहेत.
    खरेतर काँग्रेस संपली पाहिजे तरच नवा कोणी उभा राहू शकेल पण कृपा करून आता शरद पवार आणि ममता बॅनर्जी नकोत. कोणी नवीन उभा राहायलाच हवा असेल तर तो भाजप पेक्षा चांगला आणि इमानदार पाहिजे. पुन्हा पवार सारखे हरामखोर लोक नकोत.

    ReplyDelete