Sunday, August 25, 2019

जेटलींची दुरदृष्टी

Image result for jaitly  yechury

आज भाजपा सत्तेत आहे आणि दुसर्‍यांदा आपले बहूमत मिळवून सत्तेत आलेला राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्या यशाचा मुकूट अर्थातच नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर आहे. मोदींचीच लोकप्रियता भाजपाला इथपर्यंत घेऊन आली, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. परंतु एखाद्या राजकीय पक्षाच्या घडामोडीत अनेक महत्वाची वळणे येत असतात आणि त्या मोक्याच्या वळणावर पक्षाला किंवा व्यक्तीलाही योग्य भूमिका घेता आली नाही, तर सुवर्णसंधी मातीमोल होऊन जाते. उलट तात्कालीन लाभ किंवा प्रासंगिक भूमिका घेतली गेल्यास दिर्घकाळ त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात. म्हणूऩच त्यावेळी योग्य निर्णय घेण्यातही एक दुरदृष्टी व विवेकबुद्धी असायची गरज असते. जी भाजपातल्या एका नेत्यापाशी होती, म्हणून अठरा वर्षांनी नर्रेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन इतकी मोठी झेप भाजपाला घेता आली. त्या नेत्याचे नाव आहे अरूण जेटली. १९९६ सालात भाजपा प्रथमच लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला होता. पण त्याला बहूमताचा पल्ला काही गाठता आलेला नव्हता. बहूमताचे गणित जमवण्यासाठी आवश्यक असलेली संख्या जमवता येईल, असे कुठलेही पक्ष भाजपाच्या सोबत यायला राजी नव्हते. पण राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान व्हायला आमंत्रित केलेले होते. आपण बहूमत सिद्ध करू शकतो, असे सांगूनच शपथ घेता आली असती आणि सरकार स्थापन करता येणार होते. पण प्रत्यक्ष लोकसभेला सामोरे जायची वेळ आल्यावर बहूमताचा आकडा आणायचा कुठून, ही समस्या होती. शपथ घेतली तरी सरकार कोसळण्याची हमी होती. मग अल्पावधीसाठी सरकार बनवून नामुष्की कशाला पत्करावी? वाजपेयी अडवाणी यांच्यासमोर असा पेच उभा होता. तेव्हा ती नामुष्की पत्करण्यात पक्षाला भवितव्य असल्याची अजब भूमिका मांडणारा तरूण नेता जेटली होते.

वाजपेयींनी सरकार स्थापन केले तरी शिवसेना, अकाली दल व जॉर्ज फ़र्नांडीस यांच्या समता पक्षापलिकडे कोणी पाठीशी उभा रहयला राजी नव्हता. मग सरकार स्थापन करायचे आणि पराभूत होऊन नामुष्की पत्करायची, तर भविष्य कसे घडणार होते? भाजपात दोन तट पडलेले होते. एकाला सरकार बनवल्यास इतर लहानमोठे पक्ष सत्तेत हिस्सा मागायला सोबत येतील, अशी अपेक्षा होती, तर दुसरा गट नाक कापले जाणार म्हणून सरकार स्थापन करू नये, असा हट्ट धरून बसला होता. झालेही त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच. पण तेव्हा त्या निराशावादाचे सत्य मान्य करतानाही त्यातला लाभ सांगायला जेटली उभे राहिले. त्यांनी अशी भूमिका मांडली, की भाजपाने अल्प काळासाठी सरकार स्थापन केले आणि ते कोसळले, तरी हरकत नाही. त्यामुळे मतदाराला हा पक्ष सरकार स्थापन करायला घाबरत नाही, अशी खात्री पटवता येईल आणि भविष्यात स्थीर सरकारसाठी अधिकाधिक मतदार भाजपाकडे वळायला प्रवृत्त होईल. त्यासाठीच ही सुवर्णसंधी आहे समजून ती साधावी; असा जेटलींचा आग्रह होता. तो मानला गेला आणि १९९६ सालातले पहिले तेरा दिवसांचे वाजपेयी सरकार स्थापन झाले व कोसळलेही. पण अवघ्या दोन वर्षात जेटलींचे शब्द खरे ठरले. देवेगौडा व गुजराल यांची आघाडी सरकारे कॉग्रेसच्या पाठींब्याने स्थापन झाली आणि कोसळल्याने मध्यावधी लोकसभा निवडणूका घेण्याची पाळी आली. त्यात भाजपाने पुन्हा सर्वात मोठा पक्ष होतानाच आणखी नवे मित्रपक्ष जोडले आणि १९९८ मध्ये पुर्ण बहूमत सिद्ध करणारे वाजपेयी सरकार स्थापन झाले. तेही कोसळून पुन्हा मध्यावधी निवडणूका झाल्यावर तिसर्‍यांदा भाजपा सर्वात मोठा पक्ष होऊन भाजपाचे सरकार स्थापन झाले. ते पाच वर्षे चाललेही. त्यातून पक्षाचा जो पाया घातला गेला, त्यावरचा कळस मोदींनी दहा वर्षानंतर बहूमताने बांधला.

अनेकांना वाजपेयींनी तेरा दिवसाचे सरकार स्थापन करणे ही घोडचुक वाटलेली होती. सहाजिकच तसा आग्रह धरणार्‍याची दुरदृष्टी कशी लक्षात येऊ शकेल? कारण जेटली तेव्हा भाजपातला तरूण अननुभवी नेताच होता ना? पण जितके जेटली तरूण व अननुभवी होते, तितकेच अन्य पक्षातही तरूण व कुशाग्र बुद्धीमत्तेचे नेतेही होते. जेव्हा वाजपेयी सरकार पडले, तेव्हा त्यांच्या जागी कोणाला पंतप्रधान करावे? त्यासाठी कुठलाही पर्याय भाजपाच्या विरोधकांपाशी नव्हता. आजच्या इतकीच तेव्हाही तथाकथित पुरोगाम्यांची भूमिका नकारात्मक होती. भाजपा नको यावर सर्वांचे एकमत असले, तरी सरकार कोणाचे असावे आणि पंतप्रधान कोणाला बनवावे; याविषयी कुठलीही सहमती नव्हती. म्हणून तर वाजपेयी सरकार तेरा दिवसात कोसळल्यावर नव्या पंतप्रधानाचा शोध सुरू झाला. घाईगर्दीने आघाडीची मोट बांधली गेली. एका बाजूला डावी आघाडी होती, दुसर्‍या बाजूला पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांची आघाडी आणि तिसरीकडे प्रादेशिक पक्षांची वेगळी आघाडी होती. तरीही त्यांची बहूमताची बेरीज पुर्ण होत नव्हती आणि त्यांना सत्तेबाहेरून कॉग्रेसने पाठींबा द्यावा, असे काहीसे समिकरण तयार करण्यात आले. पण असे कडबोळे चालावू शकणारा नेता तरी अनुभवी, मुरब्बी व खमका असायला हवा ना? म्हणून तशा नेत्याचा शोध सुरू झाला. त्यात मार्क्सवादी पक्षाचे दोन दशकाहून अधिक काळ बंगालमध्ये निवडणूका जिंकणारे व आघाडी सरकार समर्थपणे चालवणारे ज्योती बसू यांच्यापर्यंत येऊन हा शोध थांबला. खरेच ती निवड योग्य होती आणि बनणार्‍या सरकारला काही स्थैर्य देणारी होती. पण मार्क्सवादी पक्षातही जेटलींसारखे काही कुशाग्र बुद्धीचे चाणक्य बसले होते. त्यांनी त्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. ही बाब निर्णायक महत्वाची आहे. त्याच तरूण नेत्यांनी बसुंच्या पंतप्रधानपदाला आक्षेप घेतला आणि डाव्यांच्या हातातून एक सुवर्णसंधी निघून गेली. इतिहासाने दिलेली संधी पायदळी तुडवली गेली.

आघाडीचे सरकार म्हणजे अनेक अडचणी व विवाद असणार आणि बहूमत आपले हक्काचे नसल्याने मार्क्सवादी विचारधारेनुसार ते सरकार चालू शकणार नाही. म्हणूनच आपल्या विचारांचे नसलेल्या सरकारचे नेतृत्व ज्योती बसुंनी करू नये, असा अट्टाहास डाव्यांचे दोन तरूण नेते सीताराम येच्युरी व प्रकाश कारत यांनी धरला. पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्ये त्यांनी तो प्रस्ताव हाणून पाडला आणि त्या आघाडीला अन्य पर्याय म्हणून देवेगौडा यांच्याकडे वळावे लागलेले होते. त्या सरकारमध्येही डावे सहभागी झाले नाहीत, पण पाठींबा त्यांनीच दिला होता. मात्र ती सुवर्णसंधी असल्याचे व्यवहारी ज्ञान ज्योतीबाबूंना होते. म्हणूनच त्यांनी पक्षाच्या अडवणूकीवर नाराजी व्यक्त करताना ही हिमालयाइतकी मोठी भयंकर चुक असल्याचे मतप्रदर्शन केलेले होते. त्यासाठी त्यांना पक्षातूनही शिव्याशाप ऐकावे लागलेले होते. टिकेचे लक्ष्य व्हावे लागलेले होते. इथे जेटली व येच्युरी-कारत यांच्या बुद्धीची तुलना करण्यासारखी आहे. तरच जेटली यांच्यातला चाणक्य समजू शकतो. बहूमत पाठीशी नसताना कोसळण्याची हमी असलेले सरकार बनवण्याचा अट्टाहास जेटलींनी धरला, त्याच काळात मार्क्सवादी तरूण नेत्यांनी बहूमत पाठीशी असतानाही पंतप्रधानपद नाकारण्याचा आग्रह धरलेला होता. जेटली प्रसंगातले भविष्य बघू शकले आणि येच्युरींना ते समोर असूनही बघता आले नाही. त्यांनी सुवर्णसंधीला लाथ मारण्यात धन्यता मानली आणि जेटली मात्र निराशाजनक परिस्थितीतही भविष्यातली सुवर्णसंधी बघू शकले होते. आपण जबाबदारी सोडून पळत नाही, हे दाखवायची ती संधी होती आणि ती जेटली बघू शकले. पण पुस्तकी बुद्धीने ग्रासलेल्या मार्क्सवादी शहाण्यांना समोरचे सत्य बघता आले नाही. मतदाराला पर्याय दाखवायचा होता. बळ नसताना भाजपाने जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवली आणि बळ असतानाही मार्क्सवादी शहाणे मात्र सोज्वळता व पावित्र्याचे नाटक रंगवित बसले.

आता त्या घटनाक्रमाला तेविस वर्षे उलटून गेली आहेत. जेटलींनी इहलोकीचा निरोप घेतला आहे. त्यांच्याआधीच तेव्हा सरकार बनवावे म्हणून आग्रह धरणारे दुसरे तरूण नेते प्रमोद महाजन निवर्तले होते. पण येच्युरी, प्रकाश करात आजही हयात आहेत. दरम्यान दोन्हीकडल्या राजकीय पक्षांची काय अवस्था आहे? १९९६ सालात फ़क्त आपल्या विचारांचे बहूमत असलेल्या सरकारसाठीच हटून बसलेले मार्क्सवादी, आज भारतीय राजकारणातून नामशेष होऊन गेलेले आहेत. तर तेव्हा निराशेतली संधी बघणार्‍या जेटली महाजन या तरूण नेत्यांनी आपल्या पक्षाला देशातला सर्वव्यापी पक्ष बनवण्याचा भक्कम पाया घालून घेतला. स्वबळावर बहूमत संपादन करू शकण्यासारखी पार्श्वभूमी निर्माण करून ठेवली. मध्यंतरी भले दहाबारा वर्षे गेली असतील. पण आधी आघाडीचे सरकार व् मित्रपक्षांच्या नाकदुर्‍या काढताना भाजपा आपले एकपक्षीय बहूमतापर्यंत पोहोचू शकला. उलट मार्क्सवादी मात्र सोवळ्या ब्राह्मणांनाही लाजवणार्‍या ग्रंथप्रामाण्याच्या आहारी जाऊन डावी चळवळ व पक्षालाही नामशेष करून बसलेले आहेत. अरूण जेटलींचे गुणगान आता सगळीकडून होत आहे. त्यांच्या विविध निर्णय, राजकारण, कारभार व कर्तृत्वाचे पोवाडे गायले जात आहेत. पण बुद्धीच्या मर्यादा आणि संधीचे सोने करण्याचा व्यवहार समजू शकलेला एक जमिनीवरचा नेता, ही अरूण जेटलींची खरी ओळख होती व आहे. आणिबाणी नंतरच्या राजकारणातून उदयास आलेल्या पिढीचेच हे सगळे प्रतिनिधी आहेत. ती पिढी अस्तंगत होत असताना प्रत्येकाने आपापल्या पक्षासाठी वारसा म्हणून काय मागे ठेवले? त्याची गणतीही कुठेतरी व्हायला हवी ना? नेता कुठल्या पदापर्यंत पोहोचतो, त्यामुळे इतिहास घडवत नसतो. जिथे पोहोचतो, तिथून तो व्यक्ती, संघटना व समाज, देशासाठी काय देऊन जातो, त्यावर त्याचे मूल्यमापन करण्याला इतिहास म्हणता येईल. जेटलींनी भाजपाला काय दिले? हा एक किस्सा त्यासाठी पुरेसा ठरावा.

18 comments:

  1. खरा नेता काळाच्या पुढे पाहतो कारण तो सर्वांच्या पुढे चालूनच नेता सिद्ध होत असतो.

    ReplyDelete
  2. श्री भाऊ मला तुमचा हेवा वाटतो तुम्ही च प्रत्येक गोष्टीत वेगळे पण बघू शकता

    ReplyDelete
  3. खरय भाउ. पण आता सरकारच कस होणार? जेटलींसारख संकटमोचक कोण आहे?

    ReplyDelete
  4. भाऊ, स्व. जेटलीजींचे आम्हाला माहिती नसलेला पैलू माहिती करुन दिल्याबद्दल आभार.

    ReplyDelete
  5. भाऊ तुमचे लेख वाचून माहितीत तर भर पडतेच पण खूप शिकायला सुद्धा मिळते. तुम्ही सुद्धा तुमच्या लेखातून माझ्या सारख्या तरुण वाचकांसाठी एक वेगळी दृष्टी देता धन्यवाद.

    ReplyDelete
  6. वा भाऊ ! तुमच्यामुळे आम्हाला इतक्या नवनवीन गोष्टी कळतात की ज्या अन्यथा कधीच कळल्या नसत्या आपले मानावे तितके आभार थोडे आहेत असेच लिहित रहा देव आपल्याला उदंड आयुष्य देवो

    ReplyDelete
  7. सुंदर लेख...ही बाजु मांडली, त्या बद्दल धन्यवाद...अनेक गोष्टी आपल्या कडुन शिकायला मिळतात...

    ReplyDelete
  8. म्हणजे जेटली मतदारांचा व लोकशाहीचा विचार करत होते. छान लेख

    ReplyDelete
  9. खरोखरच चाणक्य बुद्धी असलेला नेता !

    ReplyDelete
  10. अप्रतिम विश्लेषण

    ReplyDelete
  11. जेटलींच्या कर्तृत्वाबद्दल अजून लिहावे

    ReplyDelete
  12. Nice Post, Thanks For Sharing
    Satta King
    Get Updated Result for Satta King anytime Click here
    Satta King has become a genuine brand to earn more money in just a short time.

    ReplyDelete
  13. अरूण जेटेलींना भावपूर्ण आदरांजली.

    वाजपेयींनी १३ दिवसांचे सरकार स्थापन केले त्यामागे अरूण जेटलींचा सल्ला होता याविषयी पूर्वी कधी वाचले नव्हते. इंडीया टुडेमधील https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/19960531-odds-stacked-against-bjp-government-as-it-faces-determined-onslaught-from-third-front-832970-1996-05-31 या लेखात स्वत: वाजपेयींनीच ती जोखिम घेतली असे म्हटले आहे आणि त्या लेखात अरूण जेटलींचे नावही नाही.

    दुसरे म्हणजे ११ व्या लोकसभेसाठी मतदान २७ एप्रिल, २ मे आणि ७ मे १९९६ रोजी झाले. मतमोजणी ८ तारखेपासून सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी अभूतपूर्व 'फ्रॅक्चर्ड मॅन्डेट' येणार हे नक्की झाले. १० तारखेला नरसिंह रावांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. तरीही पडद्याआडून तिसरी आघाडी स्थापन करून काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करायच्या हालचाली सुरू झाल्याही होत्या. तिसरी आघाडी स्थापन करायला चंद्रबाबू नायडू आणि डावे पक्ष यांनी पुढाकार घेतला होता. सगळ्यात पहिल्यांदा ज्योती बसूंना नेतृत्व स्विकारायची गळ घालण्यात आली. त्याला त्यांनी नकार दिल्यावर वि.प्र.सिंगांकडे विचारणा झाली. त्यांनीही नकार दिल्यानंतर देवेगौडांची नेतेपदी निवड झाली. ही घटना १४ मेच्या (की १३ मे च्याच ?) रात्री ९ च्या सुमारास. रात्री दहा-साडेदहाला देवेगौडांची निवड झाल्याची बातमी मी बातम्यांमध्ये बघितली होती हे पक्के आठवते. दरम्यान वाजपेयींनी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केलाही होता. राष्ट्रपतींनी वाजपेयींना १५ मे रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रपती भवनात भेटायला बोलावले होते. त्यापूर्वी काँग्रेसचे देवेगौडांना सरकार स्थापन करायला समर्थन देत असल्याचे पत्र राष्ट्रपतींना दिले जाणे अपेक्षित होते. पण प्रस्तावित सरकारच्या कार्यक्रमाविषयी आणि अन्य गोष्टींविषयी हे नेते चर्चा करत राहिले आणि राष्ट्रपतींकडे काँग्रेसचे समर्थनाचे पत्र पोहोचते झाले नाही. वाजपेयी राष्ट्रपतींना भेटले तेव्हाच राष्ट्रपतींनी वाजपेयींना सरकार बनवायला पाचारण केले आणि वाजपेयींनी दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ मे १९९६ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. खरं तर शर्मांनी वाजपेयींना सरकार बनवायचे आमंत्रण तसे घाईनेच दिले असे म्हणता येईल. जर वाजपेयींना पाठिंबा द्यायला तयार असलेल्या खासदारांचा आकडा १९४ च्या पुढे जात नव्हता तर ते उरलेले ८० खासदार कुठून आणणार याची खातरजमा राष्ट्रपतींनी वाजपेयींना सरकार बनवायला पाचारण करण्यापूर्वी करायला नको होती का?देशात स्थिर सरकार असावे यासाठी राष्ट्रपतींचेही काही उत्तरदायित्व असते. ते पूर्ण करण्यात शर्मा कमी पडले हे नक्की.

    १६ मे १९९६ च्या लोकसत्तामध्ये 'आज वाजपेयी पंतप्रधानपदाची शपथ घेणार' ही बातमी होतीच. पण त्याबरोबरच 'देवेगौडांना पंतप्रधानपदाची हुलकावणी' अशीही एक बातमी होती. अर्थातच तेव्हाचा पेपर माझ्याकडे नाही पण ही बातमी मी वाचल्याचे पक्के आठवते.

    तेव्हा लिहायचा मुद्दा म्हणजे वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार पडल्यानंतर धावाधाव होऊन देवेगौडांची नेतेपदी निवड झाली नव्हती तर वाजपेयींनी शपथ घ्यायच्या आधीच ती निवड झाली होती.

    ReplyDelete
    Replies
    1. काहीही.. ओढून ताणून ... देवेगौडा

      Delete
  14. Bhau I agree with your opinion. You have told untold story of great man .But my mind always asking me why was he chose to contest 2014 loksabha from Punjab and against Captain Amrindar Singh?.I am not objeting to anyone but something is mysterious.......

    ReplyDelete
  15. खूप छान लेख भाऊ, प्रमोद महाजनांच्या विषयी पण वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  16. जेटली दूर दृष्टीचा एक मोठा साच्चा नेता होता हे खरेच पण मध्यम वर्ग विरुध्द होता त्यांनी जी एस टी आणून शिक्षण, घरे, अन्नधान्य महाग केले, टॅक्सेस वाढवले, पेट्रोल जीएस्टी बाहेर ठेवून सण्या मांनसासाठी महागाई वाढवली .. अगदी मेडिकल री एम्बुर्सेमेंत पण tax लावला पण मल्याला पळू दिले

    ReplyDelete