Thursday, August 8, 2019

जुनी इमारत कोसळतेय!

३७० च्या निमीत्ताने   (३)

No photo description available.

मोडकळीला आलेल्या जुन्या इमारती पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना नव्या नाहीत. पण् अशा इमारती कोसळल्यावर आधी महापालिका किंवा सरकारच्या माथ्यावर खापर फ़ोडले जात असते. पण वास्तवात पालिका किंवा सरकारपेक्षाही तिथेच हट्टाने वास्तव्य करणार्‍यांनीच आपला जीव किंवा अस्तित्व पणाला लावलेले असते. तो गमावला जाणारा जीव, सरकारच्या माथी खापर फ़ोडून परत येणार नसतो. म्हणूनच अशा मोडकळीस आलेल्या इमारतीची वेळीच डागडुजी करणे किंवा कोसळण्यापुर्वी तिथून सहीसलामत बाहेर पडण्यात शहाणपणा असतो. हे ज्यांची विवेकबुद्धी शाबुत असते, त्यांनाच शक्य असते आणि ते बाहेर पडतातही. जे त्यापेक्षा आताचा पाऊस संपल्यावर सर्वकाही सुरळीत होईल, अशा खुळ्या आशेवर तिथेच ठाण मांडून बसतात; त्यांनी मृत्यूलाच आमंत्रण दिलेले असते. त्यांना नशिब वाचवू शकते, बाकी कोणी त्यांना मदत करू शकत नसतो. १३४ वर्षाची जुनी झालेली कॉग्रेसची इमारत अशीच मोडकळीस आलेली आहे आणि तिच्या एक एक भिंती ढासळू लागल्या आहेत. पण घरमालक बनून बसलेले सोनिया वा राहुल गांधी तीच इमारत भक्कम असल्याचे दावे करतात आणि त्यांचे भाडे वसुलीकार नबी आझाद किंवा चिदंबरम मात्र तिथे अजून थांबलेल्या भाडेकरूंना खोट्या आशा दाखवित असतात. सहाजिकच ३७० कलम किंवा तिहेरी तलाक यासारखी विधेयके मुसळधार पावसासारखी बरसू लागतात, तेव्हा आणखी एखादी भिंत कोसळते आणि कॉग्रेसमध्ये पळापळ होत असते. कालपर्यंत तिथे वास्तव्य करणारेच जीव मुठीत धरून पळू लागतात. कारण त्यांना आपल्या जीवाचे मोल कळत असते आणि सर्वकाही ठिकठाक होईल अशी आशा दाखवणार्‍यांवर विश्वास उरलेला नसतो. ३७० च्या रद्दबातल होण्याने कॉग्रेसची जुनी इमारत कमालीची हादरली आहे. केव्हा कोसळून ढिगार्‍यात अवशेष शोधावे लागतील, राहुलच जाणे.

३७० कलम रद्द करण्यामागे काश्मिरात समानता व शांतता आणण्याची योजना आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी लढवलेल्या प्रत्येक निवडणूकीत भाजपाने तो आग्रह लपवलेला नाही. अगदी २०१४ च्याही निवडणूकीत मोदींनी तशी कल्पना मांडलेली होती आणि तिथल्या विधानसभा निवडणूकीतही त्याचा पुनरुच्चार केलेला होता. त्याला देशभरच नव्हेतर काश्मिरातूनही पाठींबा मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले होते. मात्र एकाएकी तसे पाऊल उचलणे शक्य नव्हते. भारतासाठी हा कितीही अंतर्गत मामला असला, तरी आधीच्या सत्तर वर्षातल्या आत्मघाती राजकारणाने त्याला आंतरराष्ट्रीय विषय बनवून ठेवलेले होते. असे विषय जनतेत बोलताना जितके सोपे असतात, तितकेच प्रत्यक्ष हाताळताना नाजूक असतात. पण कॉग्रेससाठी गेल्या सातआठ वर्षात कुठलाही अन्य राजकीय विषय उरलेला नसून, मोदीद्वेष इतकाच एकमेव मुद्दा होऊन राहिला आहे. सहाजिकच मोदींनी सुर्याला सूर्य म्हटल्यावर त्यालाच चंद्र ठरवण्याला कॉग्रेस धोरण मानले जाऊ लागले आहे. त्यामुळेच देशहित वा राष्ट्रहित कॉग्रेससाठी निरर्थक शब्द होऊन गेलेले होते आणि राहुलनी अध्यक्षपद स्विकारल्यापासून तर पक्षहितालाही कॉग्रेस पारखी होऊन गेली. मोदींच्या विरोधात बोलणे वा त्यांच्या कुठल्याही भूमिकेला विरोध, इतक्यापुरती कॉग्रेस मर्यादित होऊन गेली. सहाजिकच त्यातून पदोपदी व दिवसेदिवस कॉग्रेस जनतेपासून दुरावते आहे, त्याचेही भान कुणाला राहिले नाही. अर्थात माझ्यासारखे काही मोजके पत्रकार व राजकारणाचे अभ्यासक, त्यातून येऊ घातलेल्या संकटाचे इशारे देत होते. पण त्याचा उपयोग कुठे होता? महापालिकेने इमारत रिकामी करण्याचा इशारा दिल्यावर तिच्याच माथी खापर फ़ोडणार्‍या आत्मघातकी रहिवाश्यांप्रमाणे धोका दाखवणार्‍यालाच मोदीभक्त ठरवण्याची पळवाट शोधली गेली. अन्यथा आता अशी ढिगार्‍यात अडकून पडण्याची वेळ राहुल सोनियांवर कशाला आली असती?

३७० कलमाचा प्रस्ताव भाजपाने किंवा अमित शहांनी आणायची खोटीच होती. तो प्रस्ताव कॉग्रेससाठी ढगफ़ुटी होऊनच आला. आधी राज्यसभेतील पक्षाचे व्हीप कालिता यांनीच त्या प्रस्तावाचे समर्थन नाकरून त्याच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश जारी करण्यापेक्षा थेट खासदारकीचाच राजिनामा दिला. नंतर पक्षाचाही राजिमाना दिला. त्यानंतर एक एक ज्येष्ठ कॉग्रेसनेता जगासमोर येऊन आपल्याला कॉग्रेसचीच ३७० विरोधी भूमिका मान्य नसल्याचा डंका पिटू लागला. त्यात प्रामुख्याने राहुल टीम म्हणून आजवर कौतुक झालेल्या तरूण नेत्यांचा समावेश असावा, हा दैवदुर्विलासच ना? कारण ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, दिपींदरसिंग हुड्डा, जयवीर शेरगील हे राहुलच्या नव्या कॉग्रेसचे नेते प्रवक्ते मानले जातात आणि त्यांनी उघड सरकार समर्थनाची भूमिका घेतली. तर त्यांना आवरण्याचीही हिंमत राहुल सोनिया दाखवू शकलेले नाही. आता तर ज्याच्या पित्याने नेहरूंशी काश्मिरच्या विलिनीकरणाचा करार केला व ज्याने दिर्घकाळ कॉग्रेसचा नेता म्हणून विविध पदे भूषवली, तेच काश्मिरचे महाराजा करणसिंग यांनीही सरकारचे समर्थन केलेले आहे. थोडक्यात जुनी इमारत कोसळण्यासारखीच ही घटना म्हणायला नको काय? त्याची चाहुल मागली चारसहा वर्षे अनेकांना लागलेली होती आणि म्हणून तर टॉम वडक्कन, जयंती नटराजन यासारखे अनेक दुय्यम नेते आधीच पक्षातून बाहेर पडलेले होते. तेही सतत इशारे देत होते आणि लाल बावटा दाखवित होते. पण कागदी राफ़ायल विमानातून आकाशात घिरट्या घालणार्‍या राहुलना बघायचेच नसेल, तर सत्य दाखवणार कोण? लहानसहान कारणास्तव कॉग्रेसला तडे जात होते आणि त्याची डागडुजी करण्यापेक्षा राहुल आधीच मोडकळीस आलेल्या संघटनात्मक इमारतीवर आणखीन बोजा चढवित होते. मग परिणाम वेगळा कसा असेल?

मुंबई पुण्यासारख्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जीर्णावस्थेला त्यांचे वय कारणीभूत आहे, तसेच न पेलणारा बोजाही कारण असतो. जेव्हा अशा इमारतींचे बांधकाम झाले, तेव्हा त्यांनी किती मजले पेलावेत किंवा किती भार सोसावा, याचेही काही गणित अभियंत्याने केलेले असते. त्यापेक्षा अधिकचे वजन पेलायची वेळ आली, मग त्या इमारती डबघाईला येऊ लागतात. त्यातच वय वाढत गेल्यानेही त्यांना अपेक्षित भार सोसणेही अशक्य झालेले असते. अशावेळी आणखी बोजा चढवणे म्हणजेच त्या मोडकळीस आलेल्या इमारतीला कोसळून टाकण्यासाठीच प्रयत्न करणे असते. २००४ सालात सोनियांनी अनेक पक्षांचे बाहेरून वा आतुन टेकू लावून मोडकळीस आलेल्या कॉग्रेसचा डोलारा टिकवून ठेवलेला होता. ती तात्पुरती सोय होती आणि डागडुजीही नव्हती. अशा इमारतीवर राहुलसारखा बोजा टाकणे, म्हणजेच पावसाळ्यात ती कोसळून पडण्यासाठी केलेली सज्जता होती्. सहाजिकच २०१४ ते २०१९ च्या अनेक पावसाळ्यात कॉग्रेसची इमारत अधिकाधिक खचत गेली आणि मध्यंतरीच्या राहुल डावपेचांनी बाहेरचे आतले टेकूही काढून घेतले गेले. सहाजिकच त्यातून सुरक्षित बचावणे अनेक नव्या नेत्यांना अशक्य वाटू लागले आणि त्यांनी वेळीच आपला जीव मुठीत धरून बाजूला होण्याचा निर्णय घेतलेला असेल, तर त्यांना शहाणे मानावे लागते. ३७० हा यावर्षीचा मुसळधार पाऊस आहे आणि त्यानंतर उरलेली कॉग्रेस २०२४ च्या लोकसभेपर्यंत किती शिल्लक उरलेली असेल, याची शंका आहे. जनार्दन द्विवेदी हे कॉग्रेसचे जुने ज्येष्ठ नेता असून त्यांनी ३७० हा कलंक होता आणि तो दुरूस्त होतोय अशी भावना व्यक्त केली. त्यातून नेहरू गांधी खानदानच कॉग्रेसच्या जुन्या इमारतीला न पेलवणारा बोजा असल्याचीच कबुली दिलेली आहे. कोणी कितीही अमान्य केल्याने त्या इमारतीचा ढिगारा व्हायचे भविष्य बदलू शकत नाही. ३७० हा नेहरूंनी कॉग्रेसच्या इमारतीवर आधीच चढवलेला नकोसा बोजा होता, त्यात राहुलची भर पडल्यावर काय व्हायचे?  (अपुर्ण)

16 comments:

  1. खुप सुंदर लेख आहे
    तुमचे लेख वाचण्या साठी सदैव आतुर असतो

    ReplyDelete
  2. Bhau Namaskar absolutely fantastic analysis, appreciation is beyond the limit MAN GAYE USTAD BHAU YOU R REALLY GREAT I SALUTE

    ReplyDelete
  3. भाऊ सर तुमचे लीखाण फार वर्षांपासुन वाचत आहे, पण मागील २-३ वर्षांपासुन आपले राजकीय विष्लेषण वाचुन आपले कौतुक करावे तितके थोडेच.

    ReplyDelete
  4. 100 टक्के खरंय भाऊ. पण एक गोष्ट कळत नाही- इतके महाभारत होऊनही मायलेक आपला हेका का सोडत नाहीत? इतके निर्बुद्ध आहेत का ते? की ह्याच भूमिकेतून पुन्हा उभे राहता येऊ शकते हा आशावाद आहे आहे..?

    ReplyDelete
  5. explain how it happened.. we are mroe interested to know your analysis on how it happened.

    ReplyDelete
  6. उत्तम विश्लेषण आहे भाऊ धन्यवाद

    ReplyDelete
  7. ही इतर पक्षांतील चर्चा महत्वाची आहे. आता काश्मिरी लोकांना आर्थिक आधार देवून शांत करणे योग्य होईल. सुप्रीम कोर्टाने देशाच्या ऐक्याला आधार देणे महत्वाचे आहे

    ReplyDelete
  8. अजून राम मंदिर, समान नागरी कायदा बाकी आहेत.

    ReplyDelete
  9. अतिशय सुरेख विश्लेषण, पुढील भागाची वाट पाहत आहे

    ReplyDelete
  10. महाराष्ट्रा येत्य निवडणुकाचे निकाल डोळयांपुढे दिसत ाआहेत.
    विरोधक नेस्तनाबूद झालेले असतिल.

    ReplyDelete
  11. खूपच समर्पक दृष्टांत दिलाय. सुंदर लेख.

    ReplyDelete
  12. सरकारचे आर्थिक निर्णय आणि धोरण चुकलेत अस मला अजिबात वाटत नाही.

    तुमची आणि सरकारची आर्थिक उद्दिष्टे वेगवेगळी आहेत ही तुमची समस्या आहे, सरकारची नव्हे.

    आर्थिक उद्दिष्टांचा निकष लावला तर संघाच्या दृष्टीने मोदीजी शतकातले सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री ठरावेत.

    एकधर्मीय देशाची निर्मिती हे मूळ उद्दिष्ट लक्षात घेतलं तर धर्माधारीत देशातली जनता धर्माच्या पायाशी सतत लीन असायला हवी.

    जनता आपल्या खांद्यावर असलेल्या मडक्याचा अजिबात वापर न करता धर्माला शरण कधी जाते ? जेव्हा जनता सतत विवंचनेत असते,टंचाई आणि अन्नाला मोताद असते.

    गरीब,फाटकी,भिकारडी जनता विचारशक्ती कुंठित झालेली असते जिला दोन वेळच्या भाकरीपलीकडे काहीही सुचत नाही.

    अशी जनता विचार करणे आणि सत्तेला प्रश्न विचारणे असल्या फालतू गोष्टीत कधीही वेळ घालत नाही.

    मसीहा, धर्माचा सर्वोच्च धर्मगुरू,देव आपल्या उद्धाराला येईल ह्या आशेने जनता धर्माला शरण जाते.

    अश्यावेळी ह्या जनतेला सुखासुखी दोन घास मिळाले आणि ती शिक्षण घेऊन विचारप्रवण झाली तर किती मोठा अनर्थ घडेल ?

    म्हणूनच जनता सतत रांगेत उभी राहिली पाहिजे, सतत विवंचनेत, टंचाईग्रस्त असली पाहिजे.

    अशी जनता प्रश्न विचारत नाही उलट ती धर्माच्या दारी लीन असते.

    त्यातूनही जर जनता प्रश्न विचारायला धजावली तर हीच धर्मलीन जनतेची झुंड ह्या चार प्रश्नकर्त्या माणसांच्या अंगावर राष्ट्रवादाची अफू घेऊन हल्ला करायला सोडायला सोयीची असते.

    अनादी काळापासून हेच भारताचे भागधेय असताना मधल्या काही वर्षात देश आपल्या महान मार्गापासून भटकलेला असताना आदरणीय मोदींजींच्या अवताराने पुन्हा आपल्याला मार्गावर आणलेलं आहे.

    त्यामुळे हे मूढ लोकहो,

    सरकारच आर्थिक धोरण, आरोग्यविषयक धोरण, रोजगारविषयक धोरण, शैक्षणिक धोरण अतिशय योग्य दिशेने ठरलेल्या उद्दिष्टानुसार मार्गक्रमण करत आहे.

    समस्या संघसरकारची उद्दिष्ट आणि मूठभर विचार करणाऱ्या माणसांची उद्दिष्ट वेगळी असणं हीच आहे.

    सबब तुम्ही मेंदूची कवाड बंद करून एकधर्मीय राजवटीच्या महान कार्यात स्वतःला झोकून द्या आणि मोक्षप्राप्ती साध्य करा.

    #जय_आर्यावर्त

    #जयतु


    *भाऊ असले मेसेज व्हायरल होत आहेत. यांच्या बद्दल आपले काही मत असतीलच कृपया मार्गदर्शन करावेत.

    एक अज्ञानी वाचक
    वीरेंद्र शर्मा

    ReplyDelete
  13. समर्पक विश्लेषण

    ReplyDelete