कालपरवाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इंपीचमेन्टच्या कचाट्यातून सुटका झाली. इंपीचमेन्ट म्हणजे महाअभियोग. लोकशाही देशामध्ये सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्याच्या विरोधात न्यायालयीन कारवाईला प्रतिबंध घातलेला असतो. राष्ट्रापती, राष्ट्राध्यक्ष, सरन्यायाधीश अशी पदे त्यात येतात. म्हणून मग त्यांच्या हाती असलेल्या निरंकुश अधिकाराचा गैरवापर करण्याची शक्यता असते. तर त्याला लगाम लावण्यासाठी महाअभियोग ही घटनात्मक तरतुद केलेली असते. हे राष्ट्रप्रमुख वा तत्सम व्यक्ती सत्तापदावर बसलेली असताना त्याने एखादे गैरकृत्य केले, तर त्याच्या विरोधात महाअभियोग आणला जाऊ शकतो. ती प्रक्रीया संसदीय असते. त्याच्या विरोधात संसदीय सदस्यांच्या समोर खटला व सुनावणी होते आणि त्यांच्या मतांवर निकाल लागू शकत असतो. जगात आजवर असे अनेक महाअभियोग झालेले आहेत आणि अमेरिकेत हा तिसरा प्रयोग होता. पण एकदाही तिथल्या अध्यक्षांची त्यातून हाकालपट्टी झालेली नाही. अगदी अलिकडले उदाहरण म्हणजे विसाव्या शतकातले अखेरचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिन्टन होत. त्यांच्यावरही गंभीर आरोप झाले व तशी स्थिती निर्माण झाली होती. पण अखेरीस त्यावर पडदा पाडला गेला. तुलनेने ट्रम्प यांच्यावरील आरोप गंभीर नव्हते. पण एकूणच अमेरिकन राजकीय सार्वजनिक जीवनात बुद्धीजिवी किंवा सभ्य समाज म्हणून मानल्या जाणार्या वर्गाला ट्रम्प यांच्याविषयी कमालीचा द्वेष आहे. व्यक्तीद्वेष आहे. त्याचाच हा परिपाक होता म्हटल्यास वावगे ठरू नये. आपल्याकडे दोनदा नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत प्रचंड बहूमताने सत्ता मिळवलेली आहे. तब्बल आठ निवडणूकात कुठल्याही पक्षाला वा नेत्याला असे स्पष्ट बहूमत मिळावता आलेले नव्हते आणि तीन दशकानंतर जनतेने इतका स्पष्ट विश्वास एका नेत्यावर दाखवला. पण इथल्या शहाण्या वर्गाने तो कधीच मानला नाही. तशीच काहीशी अवस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आहे.
कुठल्याही देश वा संस्थेचा कारभार हा काही नियमावली वा कायद्याच्या चौकटीतून चालत असतो. ज्याला कुणाला त्या व्यवस्थेत स्थान हवे असते किंवा सत्ताधिकार हवा असतो, त्याला त्या नियम कायद्याचे पालन करूनच ती सत्ता प्राप्त करता येते. पण अशा लोकशाही मुखवट्याच्या मागे एक दरबारी व्यवस्थाही कायम उभी असते आणि जनतेच्या मतांवर सत्ता मिळवणार्यांना अशा बुरख्यातल्या शहाण्यांच्या मर्जीलाही उतरावे लागत असते. कायद्याने आवश्यक असलेल्या पात्रतेपेक्षाही अशा वर्गाचे आशीर्वाद महत्वाचे असतात. अन्यथा जनमानसात विष कालवून नव्या सत्ताधीशाला जमिनदोस्त करायला ही मंडळी सज्ज असतात. नरेंद्र मोदी त्यांचे शिव्याशाप सहन करीत इथपर्यंत पोहोचले आहेत आणि ट्रम्पही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळेच ट्रम्प यांनी अशा वर्गाचा उधळून लावलेला सापळा समजून घेण्यासाठी पाखंडी व ढोंगी लोकशाहीचा आशयही समजून घेतला पाहिजे. लोकशाही दिसायला जनतेच्या मतावर चालत असते. पण त्यात मतभेदाला वाव म्हणून जी तरतुद ठेवलेली आहे, तिचा वापर करून नेहमी सत्ताधीशाला घाबरवण्याचे व मुठीत ठेवण्याचे प्रकार चालू असतात. त्यांना मतांमध्ये वा लोकप्रियतेमध्ये हरवता येत नसेल, तर बदनामी करून वा खोटेनाटे आरोप करून संपवण्याचे डाव खेळले जातात. महाअभियोग असाच एक सापळा होता. मुळात ट्रम्प हा काही चारित्र्यवान राजकारणी नाही किंवा व्यावसायिक राजकारणी सुद्धा नाही. पण चार वर्षापुर्वी त्याने अकस्मात राजकीय आखाड्यात उडी घेतली आणि तथाकथित सभ्य समाजाला धक्का बसला होता. कारण हा माणूस धश्चोट आहे. कुणाच्या बदनामी वा कायदेशीर धमक्यांना भीक घालणारा नाही. तो रिपब्लिकन पक्षातून उमेदवारी मागत होता आणि डेमॉक्रेट पक्षाला ती तिसर्यांना अध्यक्ष पदाची निवडणूक सहज जिंकण्याची संधी वाटली. त्यामुळे ट्रम्प यांची उमेदवारी सोपी होऊन गेली.
२००८ सालात बराक ओबामा अध्यक्षीय निवडणूक जिंकले, तेव्हा रिपब्लिकन पक्षाकडे कोणी लोकप्रिय उमेदवार नव्हता आणि डेमॉक्रेट पक्षाकडे दोन तगडे स्पर्धक होते. माजी अध्यक्ष क्लिन्टन यांची पत्नी हिलरी व कृष्णवर्णिय तडफ़दार ओबामा. त्यांच्या पक्षात या दोघांची जबरदस्त स्पर्धा झाली आणि त्यात हिलरींना माघार घ्यावी लागली. तसे बघायला गेल्यास हिलरी ह्या आपल्या राहुल गांधी वा सोनिया गांधी यांच्याप्रमाणे माध्यमांच्या व बुद्धिजिवी वर्गाच्या गळ्यातला ताईत होत्या. बारा वर्षापुर्वी अकस्मात ओबामा स्पर्धेत उतरले नसते तर तेव्हाच हिलरी क्लिन्टन यांनी इतिहास घडवला असता. माजी अध्यक्षाची पत्नी आणि पहिलीवहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा विक्रम त्यांनी केला असता. पण ओबामा मैदानात आले आणि त्यांना पक्षांतर्गत स्पर्धेतच माघार घेण्याची नामुष्की आली. तिथल्या प्रथेनुसार एका व्यक्तीला दोनदा तेच सत्तापद भोगता येत नसल्याने २००८ नंतर २०१२ मध्येही ओबामा परस्पर पक्षाचे उमेदवार होऊन गेले आणि हिलरींना गप्प बसावे लागले. पण त्या २०१६ च्या तयारीला लागलेल्या होत्या व सगळा बुद्धीजिवी वर्ग व माध्यमे त्यांच्या गोटात सामील झालेली होती. या सर्वांनी मिळून दोन्ही प्रमुख पक्षामधल्या प्राथमिक फ़ेरीपासून नेपथ्यरचना वा सज्जता केलेली होती. इकडून हिलरी आणि रिपब्लिकन पक्षाकडून हिलरीचा प्रतिस्पर्धीही याच टोळीने निश्चीत केलेला होता. त्याचेच नाव होते डोनाल्ड ट्रम्प. त्यामुळे योजना अशी राबवली गेली, की रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्पच अखेरीस उमेदवार झाले पाहिजेत आणि डेमॉक्रेट पक्षात हिलरीसमोर कोणी टिकता कामा नये. कारण ट्रम्प सारख्या राजकारणात नवख्या आणि अननुभवी उमेदवाराला गदारोळ करून संपवण्याचा आत्मविश्वास माध्यमे व बुद्धिजिवी वर्गात होता. सहाजिकच हिलरीसमोरचे पहिले आव्हान होते, डेमॉक्रेट पक्षाची उमेदवारी मिळवणे. त्यासाठी तिथल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना संपवायला माध्यमे कामाला लावली होती. तशीच माध्यमातून ट्रम्प यांचेही स्पर्धक संपवण्याचा खटाटोप चालू होता.
झालेही तसेच. हिलरीचे स्पर्धक बर्नी सॅन्डर्स हे डावे उदारमतवादी अखेरच्या टप्प्यात पराभूत झाले. ती मोठी चलाखी होती. पक्षात त्यांच्या बाजूने वरचष्मा होता. पण तो कमी करण्यासाठी आपल्याकडल्या हायकमांडचा खेळ तिथे झाला. उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी योजलेल्या अधिवेशनात सुपर डेलेगेट्स नावाने संख्या वाढवण्यात आली आणि तिथे हिलरींचे पारडे जड करण्यात आले. सहाजिकच तिकडून हिलरीची उमेदवारी पक्की झाली. तशीच इकडे ट्रम्प यांची उमेदवारी सोपी झाली. त्यांच्यासमोरचे उमेदवार टिकूच नयेत याची पुरेपुर काळजी माध्यमांनी घेतलेली होती. परिणामी नाईलाजास्तव रिपब्लिकन पक्षाला ट्रम्प स्विकारावे लागले. कारण आपली लोकप्रियता ओळखून त्यांनी तिसरा उमेदवार म्हणून उभे रहाण्याची धमकी दिलेली होती. अखेरीस हिलरी विरुद्ध ट्रम्प अशी लढत उरली आणि अमेरिकेतीलच नव्हेतर जगभरच्या माध्यमातील उदारमतवादी लोकांनी ट्रम्प यांना मिळेल त्या मार्गाने लक्ष्य करण्याची मोहिम हाती घेतली. भारतातलेही अनेक संपादक तिथली निवडणूक वार्तापत्रे पाठवण्यासाठी अमेरिकेत दोन महिने ठाण मांडून होते आणि ट्रम्प सहज पराभूत होणार असे हवाले देत होते. ह्या बातम्या वा विश्लेषण नव्हते, तर उदारमतवादी मनोगत होते. कारण अशा जगभरच्या पुरोगामी वगैरे लोकांच्या मनात ट्रम्पविषयी कमालीचा द्वेष भरलेला होता. जसा आपण इथल्या बुद्धीजिवी म्हणून मिरवणार्या संपादकांमध्ये बघू शकतो. ट्रम्प सारखा माणूस आपल्या घटनाबाह्य अधिसत्तेला जुमानणार नाही, ही भिती त्यामागे होती. उलट हिलरी अशा लोकांची गुणगान करणार्या अध्यक्षा ठरणार होत्या. पण त्यांचे दुर्दैव असे, की जगातला सामान्य मतदार असल्या पाखंडाला व ढोंगबाजीला कमालीचा विटलेला आहे. म्हणून जगभरच्या बहुतांश लोकशाही देशातून तो क्रमाक्रमाने उदारमतवादी लोकांचे उच्चाटन करतो आहे. अमेरिकेत काहीही वेगळे घडले नाही. हिलरी यांचा दारूण पराभव करीत ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आले.
खरे तर तो हिलरीचा किंवा डेमॉक्रेट पक्षाचा पराभव नव्हताच. तो अमेरिकाच नव्हेतर जगभरच्या उदारमतवादी पुरोगामी नाटकाचा पराभव होता. कारण ट्रम्प विरोधातली मोहिम त्यांनीच चालवली होती आणि ट्रम्प यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार्या कोणाला तेव्हा हिलरीचे पती बिल क्लिन्टन यांच्यावर लैंगिक शोषणामुळे महाअभियोग भरला गेला तेही आठवत नव्हते. यापेक्षा बदमाशी काय असू शकते? प्रकार तिथेच थांबला नाही. ट्रम्प निवडणूक जिंकले तरी अमेरिकेत सत्तासुत्रे हाती घ्यायला दोन महिन्यांचा अवधी असतो आणि त्या काळात पुढले षडयंत्र रचले गेले. त्यात ट्रम्प यांच्या शपथविधीलाच अपशकून घडवून त्यांना अध्यक्ष मानण्यालाही नकार दिला गेला होता. जो माणूस र्रितसर मतदाराचा कौल घेऊन निवडून आला आहे. त्याला आमचा राष्ट्राध्यक्ष नाही म्हणून आंदोलनाचा पवित्रा घेणारे कुठल्या कायदा वा सभ्यतेचे पालन करीत असतात? अर्थात हे नाटक नवे नाही. आपल्या देशातही नागरिकत्व सुचारणा कायदा वा अन्य सरकारी निर्णयाच्या विरोधात उभारली जाणारी आंदोलने, त्याचेच भारतीय स्वरूप आहे. राज्यघटनेच्या व्यवस्थेनुसार निवडलेला अध्यक्ष नको आणि पंतप्रधान वा सरकारचे निर्णय नकोत, ही कुठली लोकशाही आहे? ही आंदोलने कुठल्या संविधान वा राज्यघटनेला वाचवण्यासाठी आहेत? राज्यघटना समाजातल्या सभ्य वा उदारमतवादी नेत्यांची अघोषित सत्ता मानायची सक्ती करते का? ती कृतीच घटनाबाह्य नाही काय? थोडक्यात जे घटना व त्यानुसारचे सर्व निर्णय झुगारून लावतात, तेच घशाला कोरड पडण्यापर्यंत ‘संविधान बचावा’च्या डरकाळ्या फ़ोडत असतात. यापेक्षा अधिक बेशरमपणा कुठला असू शकतो? निर्भयावर बलात्कार करणार्यांनी न्यायासाठी याचिका करण्यापेक्षा अशी आंदोलने व संविधान बचावशी भाषा तसूभर वेगळी असू शकते काय? निर्भयाला अजून न्याय मिळू शकलेला नाही आणि तिचे गुन्हेगार मात्र ‘न्यायाला’ वाचवण्यासाठी नित्यनेमाने याचिका करीत आहेत. याला उदारमतवाद नाही तर दुसरे काय म्हणता येईल?
जेव्हा प्रतिष्ठेचा व बुद्धीवादाचा मुखवटा पांघरून बदमाश लोक सभ्यतेची परिक्षा घेऊ लागतात,तेव्हा त्यांना योग्य टक्कर देण्यासाठी वाजपेयी वा मनमोहन सिंग यांच्यासारखी सज्जन माणसे कामाची नसतात. त्यांच्यापेक्षा मोदी वा ट्रम्प यांच्यासारखे धश्चोट नेतेच आवश्यक असतात. कारण ज्या कायदा व घटनेने संरक्षण दिले आहे, तिचेच वस्त्रहरण करायलाही हे बदमाश सिद्ध होत असतात. तिथे कृपाचार्य, द्रोणाचार्य वा भीष्माचार्य उपयोगाचे नसतात. ते ग्रंथ वा धर्माचरणाचे धडे देतात. पण द्रौपदीची इज्जत वाचवू शकत नसतात. तेव्हा चमत्कार घडवून आणू शकेल असा श्रीकृष्णच कामाचा असतो. ट्रम्प वा मोदी तसे आहेत. म्हणून या लोकांना पुरून उरले आहेत. अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बहूमताच्या बळावर ट्रम्प विरोधातील महाअभियोगाचा प्रस्ताव डेमॉक्रेट पक्षीयांनी संमत करून घेतला आणि सिनेटचे शिक्कामोर्तब बाकी होते. पण ट्रम्प यांनी तिथेच बाजी मारली आणि डावपेच असे उलटलेत, की आता आणखी चार वर्षासाठी ट्रम्प यांनाच अध्यक्षपदी बसण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण त्यांच्याइतका लोकप्रिय दुसरा उमेदवार रिपब्लिकन पक्षाकडे नाही आणि त्यांच्याशी टक्कर देऊ शकेल असा कोणी चेहरा डेमॉक्रेट पक्षापाशी नाही. त्यामुळे ह्या महाअभियोग नाट्याने नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणूकीतील ट्रम्प यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. आपल्याकडेही मोदींना कोंडीत पकडायला कपील सिब्बल वा अन्य लोकांनी सरन्यायाधीशांच्या विरोधात इंपीचमेन्ट आणायचे नाटक रंगवले होते. पण सगळाच डाव उलटण्याच्या भितीपोटी अखेरीस माघार घेतली होती. त्याचा अर्थ ट्रम्प चांगला माणूस आहे वा उत्तम प्रशासक आहे, असा अजिबात होत नाही. पण सभ्यतेचा मुखवटा पांघरलेल्या या बदमाशांपेक्षा ट्रम्प परवडला, अशी लोकांची भावना झाली आहे.
कुठल्याही कारस्थानामागे मुळात गुन्हेगारी प्रवृत्तीच असते. मग ते शिजवणार्यांनी कितीही सभ्यतेचे मुखवटे लावलेले असोत. कारस्थान जितका सोपा मार्ग असतो, तितकाच घातकही असतो. तो उलटला तर आपला नक्की कपाळमोक्ष होईल, याची नेहमी खात्री बाळगली पाहिजे. उदारमतवाद ही भूमिका वाईट अजिबात नाही. पण ती अलिकडल्या काळात बदमाश व भंपक लोकांनी बळकावलेली आहे. म्हणूनच त्यांची तुलना निर्भयाच्या बलात्कारी गुन्हेगारांशी करण्याला पर्याय उरत नाही. जेव्हा अशी कायद्याची व राज्यघटनेसह सभ्यतेची विटंबना राजरोस होऊ लागते, तेव्हाच लोकांना न्यायालयापेक्षाही हैद्राबादच्या चकमकीत संशयितांना परस्पर ठार मारणे आवडू लागते. गुन्ह्याची शहानिशा होऊन पुराव्याने गुन्हा सिद्ध करण्यावरचा लोकांचा विश्वासच उडून जात असतो. त्यापेक्षा नुसता संशयीतही गुन्हेगार म्हणून मारला जाण्यातला न्याय भावू लागतो. सभ्य माणसेच बदमाशी करू लागल्यावर गुंड वा त्यांच्या गुन्हेगारीतून मिळू शकणारा घटनाबाह्य कायदेबाह्य न्याय लोकांना आवडू लागणे स्वाभाविक आहे. हिलरी वा इथल्या उदारमतवादी भंकपपणाने सभ्यतेवरचा सामान्य लोकांचा विश्वास उडवला आहे. रॉबिनहुडची कल्पना त्यातूनच जन्म घेत असते. झटपट न्यायाची संकल्पनाही तशीच उदयास येत असते. सभ्य समाज गुन्हेगारी कारस्थाने करू लागला, मग गुन्हेगारच लोकांना सभ्य वाटले तर नवल नसते. मग त्यातल्या त्यात किमान सभ्य वागणारा परमेश्वर वाटू लागतो. ट्रम्प यांचे यश अशा निकषावर तपासले पाहिजे. तो चारित्र्यसंपन्न वा गुणी माणूस नसेलही. पण त्याच्या विरोधात कारस्थाने शिजवणारे वा कायद्याची विटंबना करणारे नजरेला टोचू लागतात, तेव्हा तारतम्य निर्णायक होत असते. तथाकथित सभ्य भामट्यांना झुगारून कारभार करणारे राज्यकर्ते लोकांना आवडू लागतात. जगभर हेच होताना आपल्याला दिसत आहे. फ़क्त त्या उदारमतवादी भामटेगिरी़च्या भक्तीत फ़सलेल्या माध्यमांना वा पत्रकार संपादकांना ते बघता आलेले नाही.
भाऊ,
ReplyDeleteट्रम्प ह्यांच्या विरोधात महाभियोग हा परराष्ट्रची (युक्रेन) ची मदत घेतल्याचा आरोप आहे,
बिल क्लीनटन ह्यांच्यावर व्यभिचाराचे आरोप आहेत
ट्रम्प ह्यांच्यावरचे आरोप जास्त गँभीर आहेत
जबरदस्त लेख...👍👍
ReplyDeleteअगदी बरोबर.भारतीय व अमेरिकन बुद्धीवादी,संपादक विचारवंत मंडळीं एकमेकांना शोभतील अशीच आहेत.
ReplyDeleteभंपकपणा व नको तेवढे वैचारिक स्वातंत्र्य ह्या मंडळींनी घेत राहिली,तर लोकशाही प्रणाली वरील लोकांचा विश्वास उडून जाऊ शकतो. व आपण म्हणता तसे, एखाद्या रॉबिन हूड सारखे व्यक्तिमत्त्व, लोकांना तारणहार वाटत राहील.
भाऊ, एकदम परखड आणि सत्य लिहिले आहात. शहाना कोर्टाने तडीपारीतून निर्दोष सोडुन सुद्धा जाहीररित्या तडीपार संबोधणारे व मोंदीना मौतका सौदागर म्हणणारे हेच तथाकथित उदारमतवादी असतात. यांच्या न्यायालयात यांना वाटेल तो निर्दोष असतो मग प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले तरीही यांना मान्य नसते. तुका म्हणे ऐशा नरा माराव्या मोजून पैजारा.
ReplyDeleteयेथील ढोंगी बुद्धिवाद्यांवर टीका करण्याच्या ओघात मा. नरेंद्र मोदीना नकळत ट्रम्पसारख्या विधीनिषेधशून्य राजकारण्याच्या पंक्तित बसवणे योग्य नाही.कोणताही फायदा नसताना अनेक वर्षे संघप्रचारक म्हणून कार्य केलेल्या आणि जातिधर्मात विभागलेल्या भारतीय मतदाराला भाजपला अभूतपूर्व मताधिक्य देण्यास प्रवृत्त करण्याचा पराक्रम करणारे मा. नरेंद्र मोदी कुठे आणि ट्रम्प कुठे !बाकी विश्लेषण अचूक आहे .
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच आरसा दाखवलाय तुम्ही माध्यमांना!
ReplyDeleteभाऊ, आपल्याकडील हे हरामखोर संपादकही तशाच प्रकारचे भामटे आणि जनतेच्या मतावर दरोडा घालणारे दरोडेखोर आहेत.
ReplyDeleteभाऊ तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात जो सत्तेचा तमाशा झाला म्हणजेच जनादेश उघड उघड पणे नाकारून एक विचित्र आघाडी सरकार बनले त्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्धी माध्यमांनी उघडपणे पक्षपाती भूमिका घेत जिंकलेला भाजप पराभूत झाला अशी आवई उठवली, अगदी कालपरवा दिल्लीत केजरीवाल जिंकले म्हणून राजदीप सरदेसाई यांनी स्टुडिओत नाच केला,मतदार हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत असतो आणि संधी मिळताच या लोकांना धडा शिकवत असतो,हे असेच चालले तर 2024 मध्ये मोदी आणि शहा यांनी भाजपला 400 जागा मिळवुन दिल्या तर आश्चर्य वाटायला नको मात्र हे या दोघांचे कर्तृत्व नसेल तर याला जवाबदार या मीडियाच्या नादी लागलेला दिवाळखोर विरोधी पक्ष असेल
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteफार उत्तम लेख!!!
परंतु मनमोहन ला सज्जन म्हंटले आहे ते अजिबात पटले नाही. चोरांच्या टोळीत राहणारा, देशाच्या लुटीत हक्काने बिनबोभाट वाटा उचलणारा सज्जन कसा? असो.
बऱ्याच दिवसांपासून तुम्ही या विषयावर, म्हणजे अमेरिकेतील पाखंडी लोकशाही विषयी, सविस्तर लिहावे असे वाटत होते. त्या विषयी पुष्कळ वाचन केले आहे. पण तुमचेही मत, विश्लेषण जाणून घ्यायचे होते. ते आज योगायोगाने मिळाले. आभारी आहे.
- पुष्कराज पोफळीकर
मौनी मंदमोहन ला सज्जन म्हणणे हे खटकलेच, ज्या माणसाला पंतप्रधान असताना कधी बोलणे जमले नाही तो आज लोकांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या पंतप्रधानांना नावे ठेवतो. हा सज्जन तर नाहीच भामटा चोर आणि देशद्रोही आहे. भाऊ नी त्याला सजन म्हणणे आणि माननीय मोदींना ट्रम्प च्या पंक्तीत बसवणे योग्य नाही.
Deleteलोकशाही व राज्यघटना वाचवा म्हणणाऱ्या भामट्या लोकांना व तथाकथित लिबरल(लिबरांडु म्हणणे जास्त चांगले) मिडियाला एकदम तंतोतंत लागू पडणारा लेख
ReplyDeleteRight✔
ReplyDelete