३ मार्चला तीन तरूण मुलांच्या व्यावसायिक धाडसाची कथा मी लिहीली होती. त्यात विणा जोशीचा समावेश होता. खरेतर तिनेच नव्याने एक फ़ुड जॉइन्ट सुरू केला, हे निमीत्त धरून लिहीलेला तो लेख आहे. त्यात मी या तिघांना उचापतखोर म्हटले आहे. हा शब्द तसा नसती उठाठेव करणार्यांसाठी वापरला जातो किंवा नकारात्मक आहे. सहाजिकच तो कोणालाही आवडणारा नाही. पण व्यवहारात तो खरेच नकारात्मक असतो का? मला तरी तसे वाटत नाही. शब्द कुठलाही असो, त्याला संदर्भ सोडून बघितले; मग त्याचे अर्थ कसेही बदलत असतात. सहाजिकच ‘उचापतखोर’ असे विषेषण आपल्यामागे लागल्याने कोणीही विचलीत होणे योग्यच आहे. पण विणाची त्यावरची प्रतिक्रीया विचार करायला भाग पाडणारी ठरली. त्या लेखावर व्यक्त होताना विणा म्हणते, ‘वाटलं नव्हतं कोणी आपल्याला उचापतखोर म्हंटल्याचा कधी इतका आनंद होईल. भाऊ आमच्यावर असाच जीव असुद्यात’. ही नुसती प्रतिक्रीया नाही. त्यातला आनंद लपून रहात नाही. मला त्याचा आनंद इतक्यासाठी झाला, की एका नकारात्मक शब्दाचा वापरही सकारात्मक होऊ शकतो. याची ती अनुभूती आहे. मला ही उद्योजक धडपडी मुले उचापतखोर का वाटतात, त्याचे स्पष्टीकरण देणेही तितकेच अगत्याचे आहे. उचापत ही चुकीची असतेच असे नाही. कधीकधी आपल्याला ठाऊक नसलेल्या अनाकलनीय कृतीला आपण उचापत म्हणतो. पण व्यवहारी बाबतीत ते चाकोरी नाकारून केलेले धाडस असते. माणसे व प्रामुख्याने मध्यवर्गिय समाजात चाकोरीला धरून चालण्याला प्राधान्य असते आणि कोणी त्या चाकोरीला सोडून वेगळी वाट शोधू लागला, तर घरापासूनच त्याच्यावर हल्ले वा प्रतिरोध सुरू होत असतो. अशावेळी परिस्थितीशी झुंज देण्यासाठी जमवलेली बहुतांश उर्जा, घरातच खर्ची पडत असते. आपल्यांनाच समजावताना नाकी दम येत असतो. चाकोरी सोडण्यात पाप वा गुन्हा नाही, हे घरातच पटवणे ही एक लढाई असते. कारण आपल्यांनाच आपण उचापतखोर वाटत असतो.
ही मुले नव्या पिढीतली म्हणण्यापेक्षाही मधल्या पिढीतली आहेत. जिथे त्यांच्या पालकांनी थोडीफ़ार सुखी जीवन वा स्थीर जीवनाची चव चाखलेली आहे. शाळकरी वा कॉलेजच्या जीवनात इतकी मजल मारायची, की समाजामध्ये आपल्याला काही चांगली नोकरी व उत्पन्नाचे साधन मिळावे. ते कायमस्वरूपी साधन म्हणजे हक्काचा नियमित मिळणारा पगार. तो आला मग आपोआप जीवन सुस्थीर झाले. कोणीतरी आपल्याला रोजगार वा नोकरी द्यावी व आपल्या बुद्धी गुणवत्तेचा लाभदायक वापर करावा. त्याने त्याचे लाभ उठवावेत आणि आपल्या भाडेपट्ट्याने दिलेल्या बुद्धीची मासिक वार्षिक किंमत दिली तरी समाधानी रहावे. ह्याला सुस्थीर सुखवस्तु जीवन मानले गेलेले आहे. सहाजिकच पगाराची हमी मिळणे शक्य असताना आणि आपल्या बुद्धी कर्तृत्वाला कोणीतरी हक्काचा भाडेकरी मिळत असताना; आपल्याच हिंमतीवर काही पराक्रम करीत स्वयंभू होण्याच्या कल्पना माझ्या पिढीतल्या पालक वर्गाला संतापजनक वाटल्या तर नवल नाही. कंपनी सरकार तनखा देऊन आपले राज्य चालवणार आणि आपण मस्तपैकी ऐषाराम करायला मोकळे असतो, ही त्या सुखी जीवनाची कल्पना आहे. अशा वेळी १८५७ चे बंड किंवा स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे उचापतच नाही काय? आजचा मध्यमवर्ग तसा झालेला आहे आणि त्यातून आपोआप आरक्षण वा सुशिक्षित बेरोजगारीच्या तक्रारी जन्माला आलेल्या आहेत. त्या तक्रारी करणे वा आरक्षण मागणे, ही शैली झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर गुरू, अंबर वा विणासारख्यांनी वेगळी वाट शोधण्य़ाचे केलेले धाडस, त्यांच्या घरातच किती कौतुकाचे ठरले आहे? मला ठाऊक नाही. पण त्यांच्या घरात गोतावळ्यात अनेकांनी नाके मुरडली असणार. कदाचित कडाडून विरोधही केलेला असेल. पाठबळ सहसा मिळत नाही. म्हणजेच दुहेरी झुंज देण्यातून या मुलांना उभे रहावे लागणार ना? त्यांचे पालक माझ्या वयाचे व पिढीतले आहेत. त्यांची मनस्थिती ह्या मुलांनी झुगारली वा झुगारण्याची हिंमत केली, म्हणून मला ते उचापतखोर वाटले.
कदाचित मी मागल्या पिढीतला आणि सुस्थीर जीवनाच्या त्याच तनखा विचारसरणीचा असेन. म्हणून मलाही त्यांचे प्रयोग तितकेसे आरंभी पटलेले नाहीत. गुरू वा अंबर यांच्यासारख्यांना दिलासा वा हिंमत देण्याचे कितीही शब्द मी सातत्याने वापरलेले असतील, तरी आर्थिक समतोलासाठी कितीदा बोचरे प्रश्न विचारलेत; तेच सांगू शकतील. ती माझी सावध विचारणा प्रोत्साहनापेक्षाही पायात बेडी घातल्यासारखी होती, हे सत्य लपवण्यात अर्थ नाही. ही मुले काही धाडस करायला निघतात, तेव्हा पालक त्यांना जुन्या जमान्यातले वाटतात. सहाजिकच पालकांना झुगारून जाण्यातली मजा काही और असते आणि ती वयाची अपरिहार्यताही असते. अशावेळी दिसायला पालक, असायला मित्र, अशा स्थितीत मी त्यांना प्रोत्साहन देण्याकडे झुकलो. कारण मलाही असे धाडस करण्याची इच्छा कधीकाळी झालेली होती. पण तिथपर्यंत मजल मारणे शक्य झाले नव्हते. विशीतिशीत जगाला किंवा जगाच्या चाकोरीला लाथ मारून करीन ती पुर्व म्हणायची उबळ उपजत प्रत्येकात असते. पण परिस्थिती व गोतावळ्यातल्या दडपणाशी झुंज देणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. पण ज्यांचा आपल्या भूमिका व ध्येयावर विश्वास असतो, त्यांना कोणीही रोखू शकत नाही. खरे तर रोखण्यापेक्षाही त्यांना वेळोवेळी ध्येयापासून दुर जाऊ देण्यापासून सावध करणे पुरेसे असते. कारण पाठीशी असलेले वा हितचिंतकही मनातून ह्या धाडसाला उचापतच समजत असतात. आज त्यांची पाठ थोपटणे सोपे आहे. पण चुकले असते, तर त्यांना काय काय ऐकावे लागले असते? मुद्दा इतकाच, की पांघरूण बघून हातपाय पसरण्याचा संयम अशा मुलांकडे आहे आणि अवास्तव स्वप्ने बघण्याइतकी ही मुले बहकलेली नाहीत. या जगात आपले काही स्थान व वेगळेपण उभारण्याची त्यांची इच्छाशक्ती पक्की वाटते. पण आमच्या पिढीसाठी ती उचापत होती व आहे. खरे तर तो हेवाही असू शकेल. आपल्या वयात आपणही असे काही धाडस करायचे राहून गेलो, त्याचे वैषम्य असेल.
माझ्या तरूणपणी आम्ही सुशिक्षीत बेकारांच्या विषयावर चर्चा करायचो. आंदोलने व्हायची. पण सरकार कोणाला रोजगार निर्माण करून देऊ शकले? त्यापेक्षा अधिक रोजगार चाकोरी सोडणार्यांनी निर्माण केले. चाकोरीत जगणे ज्यांना सुरक्षित वाटते, त्यांच्यासाठी नवनव्या चाकोर्या निर्माण करणारे म्हणून समाजात निपजावे लागतात. गुरू पाच वर्षापुर्वी नोकरी करून कशीबशी गुजराण करीत होता. आज त्याने दहाबारा मुलांसाठी रोजगार उभा केला आहे. अंबर किंवा विणा त्याच दिशेने चालले आहेत. त्यांनाही रोजगार घटल्याच्या मोर्चात सहभागी होऊन आपले नाकर्तेपण लपवता आलेच असते की. इन्फ़ोसिसच्या नारायण मुर्तीं किंवा अन्य तत्सम तरूणांनी त्यांच्या बंडखोर वयात केलेल्या उचापतींनीच आज लाखो भारतीय सुशिक्षीतांना लाभदायक रोजगार मिळून गेला आहे. असे किती उचापतखोर पडद्यामागे राहून लाखो रोजगार निर्माण करतात. आपल्या सोबत इतरांच्या जीवनात बदल घडवतात. सरकारला जाब विचारणे वा अन्यायग्रस्ताचा बुरखा पांघरणे सोपे आहे. उचापत हे धाडस असते. ज्यामध्ये जग नसेल तरी आपल्या भोवतालाचा चेहरामोहरा बदलण्याची इर्षा वा इच्छा मोलाची असते. इतरांनी काय करावे, ते शहाणपण शिकवायला माझ्यासारखे उपटसुंभ शेकड्यांनी असतात. पण आपणच पुढाकार घेऊन आपल्यासह आणखी एकदोघांच्या जीवनात सुखसमाधानाचा उदभव करू शकणारे अपवादात्मक असतात. पण तेच समाज वा देशाला बदलू शकत असतात. त्यांची कोणी नोंद घेत नाही वा डंका पिटत नाही. पण त्यांना तरी कुठे पर्वा असते. ते आपण धाडस केले यावरच खुश असतात. परिसराला दरवळून सोडणारी फ़ुले कधी आपल्या सुगंधाची किंमत मागतात काय? त्यांना फ़ुलण्यातला आनंद हवा असतो आणि सुगंधाचा दरवळ आपोआप होऊन जात असतो. ती देखील उचापत असते. फ़क्त पैसे मिळवण्याचे अनेक उद्योग असतात. स्वत:ला आनंदित करण्यासाठी केलेली उचापत समाजाला उर्जितावस्थेकडे घेऊन जाते. सुगंधाचे कर्तृत्व समजायला नाक लागते. उचापतीची महत्ता समजण्यासाठीही आपुलकीचे वडीलधारे नाक असायला हवे.
Aaj mala me hya blog la vel dilyach sarthak vatla,karan taruna madhe aplyapeksha anek patini anubhavi mansanchya vicharana jhugarnyachi ek vrutti ,samaj asate.Pan jevha tich vyakti tyanchya anubhavana tarunanchya vartaman chinta ani swapnansathi kharchi ghalte te hi ekhadya vyapak udatt karyala najresamor thevun tevha khari anubhav ani urjechi sangad ghatli jate.Majhe aji, ajoba hayatit nahit je aplya natva var prem lad kartil pn aaj tyach vayachi bhau tumchyasarkhya sujan ani sajag vyakti shi adrushya ka hoina pn sambandh alyacha anand ahe.
ReplyDeleteइतरांनी काय करावे, ते शहाणपण शिकवायला माझ्यासारखे उपटसुंभ शेकड्यांनी असतात.आवडलेल वाक्य
ReplyDeleteभाऊ तुमच्या वयातील पत्रकारांच्या मध्ये तुम्ही इंटरनेटवर पत्रकारिता सुरू करून केलेली उचापत भलतीच यशस्वी ठरलेली आहे
ReplyDeleteभाऊ,तुम्ही या त्रयीचं केलेलं कौतुक इतरांना देखील प्रेरणा देईल..
ReplyDeleteभाऊ छान. नव्या पिढीला छान मार्गदर्शन
ReplyDeleteआजच डिस्कव्हरी चॅनेल वर वरील उल्लेखित लोकांच्या बद्दल एक एपिसोड दाखवला आहे, लिलिशस नावाने ऑन लाईन स्वच्छ अन आरोग्यदायी मटण चिकन मासे विकण्या बद्दल
ReplyDeleteKhup chaan
ReplyDeleteआ. भाऊ, सुजय डहाके नामक एका नव दिग्दर्शकाने नुकतेच 'फक्त ब्राम्हण अभिनेत्री का?' या विषयावर चर्चा सुरू करुन जातीभेदाचे झाडाला खत पाणी घातले. त्यावर आपण लिहावे हि नम्र विनंती.
ReplyDeleteभाऊ, धन्यवाद तुम्हाला काहीतरी चाकोरी बाहेर जाऊन करणाऱ्या तरुणांना तुम्ही कौतुकाने उचापतखोर म्हटलेत. आपली मधली पिढी खरोखरच संस्थानिकांसारखी होती, चाकोरीतील ग्रँयुएशन पर्यंत शिक्षण घ्यायचे जास्तीत जास्त महत्वाकांक्षा डॉक्टर, इंजिनिअर किंवा CA. शिक्षण पूरे झाले की, छानशी सरकारी, बँका, मोठ्या कंपन्या यात नोकरी शोधायची हीच जीवनाची इतिकर्तव्यता होती. पण यालासुद्धा एक वेगळा पैलू होता आपल्या पालकांचे हातावर पोट असल्यांने लौकरात लौकर शिक्षण पूरे करुन कमाईला हातभार लावणे हाच आपल्या पिढीचा उद्देश असे वेगळे प्रयोग करायला पाठबळ मिळत नसे पैसे आणि मानसिक पण.
ReplyDeleteआजच्या पिढीला आपल्या पिढिचे आर्थिक स्थैर्य वेगळ्या वाटा धुंडायला मदत करते आज वयाच्या तिशीपर्यंत आपले मुल मला करिअर करायचे आहे असे म्हणू शकते व पालक त्याला पाठिंबा देऊ शकतात पण. हाच फरक आपल्या आणि सध्याच्या पिढीत आहे. पण अशा वेगळ्या वाटेवर जाऊन नवीन काहीतरी करणाऱ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
याच विषयाशी धरुन मोदी आणि शहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगळ्या वाटा चोखाळत आहेत, यामुळेच विरोधक बुचकुळ्यात पडणे, बावचळणे, भरकटणे ही सर्व विशेषणे स्वतःच्या बाबतीत खरी करायला लागले नसतील ना?
नाक मुरडण्यासाठी , उगीचच दुसर्यांच्या भानगडीत खुपसण्यासाठी किंवा वर करून न बोलता इतराना कमी लेखण्यासाठी असल्याचे संकेत आपल्या शीर्षकाने बदलले आहेत ही देखील भाषेतील उचापत कौतुक करण्यासारखी आहे.आवडले .
ReplyDeleteसरकारने सर्व प्रश्न सोडवायला हवेत ही अपेक्षा गैर आहे हे देखील कोणीतरी सांगणे जरूर होतेच.सरकारने सर्व प्रश्न सोडवावेत लोकानी काय फ़क्त भाषणं ऐकावीत, मतदान करावे आणि मतदारांची संख्या वाढवत रहावी ?हा प्रश्न कोणी विचारायचा ?
कुणाची वाट बघत बसू नका,
ReplyDeleteएकट्याने चालायला सुरवात करा.
जसजसे तुम्ही यशाचे टप्पे पार कराल,
तसे लोक तुमच्या मागे यायला सुरवात करतील